Konkan Railway: कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने NRMU पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३४२ मतांनी त्यांचा विजय झाला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन अशा २ प्रमुख संघटनांमध्ये ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने बुधवारी झाली होती. याची मतमोजणी मडगाव येथे गुरुवारी झाली. कॉम्रेड नेते संघटनेचे महामंत्री कॉ.वेणू पी नायर यांच्या नेतृत्वाखाली एनआरएमयुने ही निवडणूक लढवली होती. विजयानंतर लाल सलाम च्या घोषणांनी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानंकावर जल्लोष सुरु होता.
लाल बावटा प्रणीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने आपला लाल झेंडा फडकवत केआरसी तसेच संलग्न अन्य संघटनांचा पराभव केला.कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते त्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत मतदान केले. या निवडणुकीत ५ हजार २४९ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार ७९६ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी एनआरएमयूला २ हजार ५५३ मते मिळाली तर केआरसी एम्पा्लॉईज युनियनने २ हजार २११ मते मिळवता आली. यामुळे ३४२ मतांनी एनआरएमयुने विजय मिळवला आहे.या विजयाचा जल्लोष सर्वच रेल्वे स्थानकांवर एनआरएमयुच्या वतीने कर्मचारी करत होते.