Category Archives: रायगड

Konkan Biodiversity | अलिबाग येथे आढळले दुर्मिळ वाघाटी रानमांजर

   Follow us on        
अलिबाग– अलिबाग तालुक्यातील कणकेश्वर मंदिरालगत असलेल्या जंगल परिसरात दुर्मिळ अशा वाघाटी रानमांजराचे Rusty Spotted Cat प्रथमच दर्शन झाले आहे. सर्वात लहान आकारातील मांजरांची प्रजाती म्हणून ही मांजर ओळखली जाते.
वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य अदिती सगर आणि समीर पालकर हे कणकेश्वर मंदीर परिसरालगतच्या जंगल परिसरात भ्रमंती करत असताना त्यांना ही मांजर आढळून आली. रस्टी स्पॉटेड कॅट नावाने ओळखली जाणारी ही मांजर यापूर्वी कधीही अलिबाग लगतच्या परिसरात आढळून आली नव्हती.
ही रानमांजर प्रामुख्याने ओल्या दमट पानगळीच्या जंगलात आढळून येते. राज्यात ताडोबा आणि पश्चिम घाट परिसरात या मांजरांचे वास्तव्य आढळून आले आहे. वाघाटीच्या  चेहऱ्यावर दोन गडद पांढऱ्या रेषा, तर चार गडद काळ्या रेषा असतात. सदर रेषा या नाकापासून वर डोक्यापर्यंत स्पष्ट असतात. या मांजरीचे डोळे खूप मोठे असतात आणि त्यांच्या बुबुळांचा रंग निळसर ते राखाडी तपकिरी असतो. त्यांचे कान गोलाकार आणि लहान असतात आणि पाठीवर राखाडी ठिपके असतात. वाघाटी प्राणी इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) द्वारे नामशेष होण्याची भीती असलेल्या यादीत आहे. मार्जारकुळात समावेश असलेल्या वाघाटीचा समावेश नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांमध्ये होतो.

वर्ष संपत आले तरी महामार्ग पूर्ण होण्याची चिन्हे दिसेनात; जनआक्रोश समितीतर्फे साखळी उपोषण सुरू

पेण: मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु असून १२ वर्षे उलटूनही पनवेल ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी (गोवा सीमा) मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत अनेक वर्षे अनेक आंदोलने झाली. माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली. परंतु काम पूर्ण झाले नाही. गणेशोत्सव काळात कामाला गती देण्यात आली होती. त्यामुळे या महिन्यात सदर काम पूर्ण होईल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, गणेशोत्सवानंतर कामाची गती मंदावली असून डिसेंबर अखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे.

याच मुद्द्यावर कोंकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने आपली टिप टॉप प्लाझा, ठाणे येथे भेट घेऊन निवेदन दिले होते. आपण त्याच वेळी संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले होते.

त्यानंतर, स्थानिक नागरिक, शेतकरी व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे दि. १२ डिसेंबर, २०२३ पासून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पांडापूर, कासू येथे साखळी उपोषण सुरु आहे. त्याची उच्चस्तरीय दखल घेतली असल्याचे दिसत नाही.

तरी, आपण यात लक्ष घालून आपण स्वतः संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत सदर ठिकाणी भेट देऊन मागण्यांची नोंद घ्यावी व संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी विनंती जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आली आहे.

महाड: सजावटीच्या आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार चवदार तळे

रायगड: महाड येथील चवदार तळे व आजूबाजूचा परिसर आता सजावटीच्या आकर्षक दिव्यांनी उजळून निघणार आहे. यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच हे काम पूर्णत्वास येणार असल्‍याचे महाड नगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे.
महाडमध्ये २० मार्च १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यतेविरोधात सामाजिक न्यायासाठी लढा दिला होता. या सत्याग्रहानंतर चवदार तळे जगाच्या नकाशावर आले. महाड नगरपालिकेने चवदार तळ्याचा इतिहास जपण्यासाठी १९८७ मध्ये तळ्याचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले होते.
चवदार तळ्याच्या भिंती नव्याने बांधण्यात आल्या असून तळ्याच्या काठी सभागृह बांधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता, त्या पायऱ्यांचे देखील सुशोभीकरण केले आहे. तळ्याच्या मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे व दोन्ही बाजूला उद्याने विकसित करण्यात आली आहेत. चवदार तळ्यावर वर्षभर असंख्य अनुयायी व पर्यटक भेट देतात. शिवाय दरवर्षी चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन, मनुस्मृतिदिन, डॉ. आंबेडकर जयंती व पुण्यतिथी यानिमित्त लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात.
तळ्याच्या सुशोभीकरणांमध्ये आणखीन भर पडावी, या दृष्टीने महाड नगरपालिकेने आता चवदार तळे व परिसरामध्ये सजावटीचे दिवे व आकर्षक दिव्यांचे खांब उभारण्यास सुरुवात केली आहे. तळ्याच्या चारी बाजूने तसेच दोन्ही उद्यानांमध्ये ११० खांब उभारण्यात आले आहेत. खांबांवर नक्षीदार असे सजावटीचे दिवे लावले जाणार आहेत. या दिव्यांमुळे चवदार तळ्याचा परिसर आणखीनच उठून दिसेल. महानगरपालिकेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुदानातून सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून हे दिवे बसवण्यास सुरुवात केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search