Category Archives: सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चीपी विमानतळा बाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकणातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाच्या विकासास आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील चार महिन्यांत चिपी विमानतळावर नाइट लँडिंगसाठी परवानगी मिळणार असून, या विमानतळावरून मुंबई सेवाही अखंडित सुरू ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.
नुकतीच मंत्रालयात चिपी विमानतळासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत, विमानतळ विकासासाठी आवश्यक उपाययोजना आणि सुविधांच्या उभारणीबाबत सखोल चर्चा करण्यात आली. विमानतळाच्या सुशोभीकरणासाठी DPDC (District Planning and Development Council) मार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, “मुंबई ते चिपी दरम्यानची सेवा कुठल्याही परिस्थितीत खंडित होता कामा नये. विमानतळाच्या सर्व सुविधा तातडीने पूर्ण कराव्यात. खास करून रात्री लँडिंगला अनुमती मिळवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने राबवावी”
चिपी विमानतळासंदर्भात लवकरच विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेणार
तसेच, विमानसेवा अधिक सुलभ आणि नियमित करण्यासाठी नवीन मार्ग आणि कंपन्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्नही लवकरच होणार आहे. या अनुषंगाने विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याची माहितीही राणे यांनी यावेळी दिली.
दोडामार्ग: झाड तोडण्यासाठी चढलेल्या युवकाच्या पायाला वुड कटर लागून अति रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साटेली-भेडशी येथे मंगळवारी दुपारी घडली. नागेश लाडू मयेकर (वय 40, रा. साटेली-भेडशी) असे या युवकाचे नाव आहे.
नागेश मयेकर हा साटेली-भेडशी शेजारील घोटगे गावात सहकार्यांसोबत झाड तोडण्यासाठी गेला होता. प्रथम झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तो वुड कटर घेऊन झाडावर चढला. दरम्यान फांद्या तोडण्याचे काम सुरू असताना अचानक कटर त्याचा पायाला लागला. यात त्याच्या मांडीची रक्तवाहिनी कापली गेल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. त्याच परिस्थितीत त्याला साटेली-भेडशी प्राथ. रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रात स्थानिक ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी माहिती घेतली असता नागेश याचा अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला असे सांगितले. शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नागेश याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, विवाहित बहीण असा परिवार आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग वासियांसाठी एक खुशखबर आहे. मुंबई सिंधुदुर्ग विमानसेवा लवकरच चालू होणार आहे. परुळे चीपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर येत्या १८ एप्रील पासून एअर अलायन्सची मुंबई -सिंधुदुर्ग- मुंबई सेवा देणारी विमाने उतरणार आहेत. एअर अलायन्स बरोबरच इंडीगो विमान कंपनीची सेवा सुरू करण्याबाबत युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशी माहीती खा. नारायण राणे यांनी दिली. अलीकडेच नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू यांनी याबाबत विशेष योजना अंमलात आणण्यात येईल असे माजी केंद्रीय मंत्री, खा. नारायण राणे यांना आश्वासीत केले होते. गेल्याच आठवड्यापासून सिंधुदुर्ग- पुणे विमान वाहतुक सुरुही झाली आहे.
गेले काही महिने चिपी ते मुंबई ही नियमित सुरु असलेली सेवा बंद झाली होती. ही सेवा पुनः मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई अशी सेवा सुरु करण्यासाठी उड्डाण संचालनालयाने विशेष धोरण अंमलात आणावे यासाठी खा. नारायण राणे आग्रही होते. त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू तसेच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत सिंधुदुर्ग विमानतळावरील सेवा किती महत्वाची आहे, तसेच विमानतळावरील अन्य सेवा, सुविधा, समस्या यांकडे लक्ष वेधले होते. यानंतर वेगाने कार्यवाही होत सिंधुदुर्ग विमानतळावरील अनेक सेवा सुविधा अपडेट करण्यात येत आहेत. यामुळे येत्या १८ एप्रील पासून मुंबई-चिपी- मुंबई ही एअर अलायन्सची विमान सेवा दर शुक्रवारी सुरु होणार आहे. याबरोबरच इंडिगो या कंपनीची विमान सेवा मार्ग लवकरच जाहीर केला जाणार आहे.
काही त्रांत्रीक त्रूटी दुर केल्यानंतर त्याची माहीती जाहीर होईल. असे खा. नारायण राणे म्हणाले.
अलायन्स एअरने मुंबई-सिंधुदुर्गा-मुंबई दरम्यान उड्डाणे सुरू केली होती. मात्र आरसीएस चा कालावधी ऑक्टोबर २०२४ मध्ये संपला आणि ही सेवा थांबली. उड्डाण सेवा थांबवल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेवर तसेच एअरलाइन वापरकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. पर्यटक, स्थानिक प्रवासी आणि जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला मिळणारी उभारी लक्षात घेता सिंधुदुर्गासाठी आरसीएस आणखी पाच वर्षांसाठी वाढवावी, सिंधुदुर्गासाठी अलायन्स एअर सेवा पुन्हा सुरू करावी. अशी भुमिका खा. राणे यांनी स्पष्ट केली आहे.
सावंतवाडी : सांगेली खालचीवाडी येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. या मुलाचे नाव निशांत धोंडिबा नार्वेकर असून त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, निशांत नार्वेकर हा आपल्या आई-वडिलांसोबत सांगेली खालचीवाडी येथे राहत होता. तो स्थानिक हायस्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता.सोमवारी त्याच्या घरी आई-वडील नसल्याने तो एकटाच होता. याच संधीचा गैरफायदा घेत त्याने आपल्या राहत्या घरातील खोलीचा दरवाजा बंद करून वाशाला दोरीने गळफास घेतला. ही घटना निशांतचा मामे भाऊ दर्श पोतदार याला समजताच त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मनोज राऊत आणि पोलीस शिपाई संतोष गलोले यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

देवगड: हापूस आंबा, विशेषतः देवगड हापूस, याच्या अस्सलपणाची खात्री करण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आता युनिक आयडी (UID) कोड वापरला जाणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या युनिक आयडी कोडद्वारे ग्राहकांना खात्रीशीरपणे खरा देवगड हापूस आंबा मिळू शकेल.
हा कोड आंब्याच्या पेटीवर आणि उत्पादनावर लावला जाईल, ज्यामुळे बनावट किंवा इतर प्रजातींच्या आंब्यांना हापूस म्हणून विकण्याच्या प्रकारांना आळा बसेल. हा उपक्रम या वर्षाच्या हंगामापासून प्रभावीपणे लागू होत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदीची पडताळणी करता येईल आणि हापूसच्या नावाने होणारी तोतयागिरी थांबेल.
हापूस आंब्यासाठी युनिक आयडी (UID) प्रक्रिया
ही देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने सुरू केलेली एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांना अस्सल देवगड हापूस आंब्याची खात्री देणे आणि बनावट आंब्यांना बाजारातून हद्दपार करणे हा आहे.
नोंदणी आणि कोड निर्मिती:
देवगडमधील प्रमाणित आंबा उत्पादक आणि विक्रेते यांची नोंदणी संस्थेकडे केली जाते. नोंदणीकृत उत्पादकाला संस्थेकडून त्याच्या उत्पादन क्षमतेच्या संख्येनुसार स्टिकर देण्यात येतील. या स्टिकर वर त्या शेतकर्याची माहिती असलेला UID नंबर असणार आहे.
आंब्यावर कोड लावणे:
हा युनिक आयडी कोड आंब्याच्या पेटीवर किंवा काही प्रकरणांमध्ये थेट आंब्याच्या स्टिकरवर लावला जाईल.
कोडमध्ये उत्पादकाची माहिती, आंब्याचा हंगाम, आणि उत्पत्तीचा तपशील (उदा., देवगड) समाविष्ट असणार आहे.
ग्राहकाद्वारे पडताळणी:
ग्राहक हा कोड स्कॅन करून (QR कोड असल्यास मोबाइलद्वारे) किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर/अॅपवर टाकून आंब्याची अस्सलता तपासू शकतील.
यामुळे आंबा खरोखर देवगडचा हापूस आहे की नाही, याची खात्री पटेल.

या उपक्रमाचा उद्देश:
- बनावट हापूस आंब्यांची विक्री रोखणे.
- ग्राहकांचा विश्वास वाढवणे आणि हापूसच्या ब्रँडचे संरक्षण करणे.
- उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळवून देणे.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन महामंडळाची बस स्थानके व बसगाडयांच्या विविध अडचणीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज बैठक घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग डोंगराळ, दुर्गम जिल्हा असून एस टी बस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे बस सेवा सुरळीतपणे चालू रहावी व प्रवाशांची गैरसोय टाळून सुलभ रित्या त्यांना एसटी बसची सेवा मिळावी, अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली. या मागणीला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती नितीश राणे यांनी दिली, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानक व बस गाड्यांच्या विविध अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले
कुडाळ:वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर खाली सापडून शाळकरी विद्यार्थिनी मनस्वी सुरेश मेथर (15, रा. निवती) जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास पाट तिठा (माऊली मंदिर नजीक) येथे घडली. मोटारसायकलस्वार युवकाला किरकोळ दुखापत झाली. मनस्वी मोटारसायकलच्या मागे बसून जात होती. वाळू वाहतूक करणारा डंपर परुळे – पाट मार्गे कुडाळच्या दिशेने येत होता. मोटारसायकल व डंपरची धडक बसून झालेल्या अपघातात मनस्वी डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. जखमी मोटारसायकलस्वाराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान निवती व पाट पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, निवती पोलिस ठाण्यात धडक देत, अपघाताला कारणीभूत ठरणा-यांवर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी, तसेच बेदरकार डंपर वाहतुकीला आळा घालावा अशी मागणी लावून ठरली. या अपघाताची खबर योगेश उल्हास मेतर (रा. निवती मेढा) यांनी निवती पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार या अपघातप्रकरणी सोळा वर्षीय मोटारसायकलस्वार मुलगा, गाडी चालविण्याचा परवाना नसतानाही त्याला गाडी चालविण्यास दिल्याने त्याचे वडील वैभव मांजरेकर (रा.हुमरमळा करमळीवाडी) आणि डंपर चालक शैलेश कुमार सिंग अशा तिघांवर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.











