Category Archives: सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग : पुण्याहून सिंधुदुर्गातील चीपीसाठी निघालेले विमान सिंधुदुर्ग जिल्हय़ात न उतरवता ते चक्क गोव्याच्या दिशेने नेवून मोपा विमानतळावर उतरविण्यात आले. खराब हवामानामुळे धावपट्टीवर धुके असल्याच्या कारणाने निर्णय घेण्यात आला. या कारणाने आज प्रवास करणार्या ४५ प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
फ्लाय ९१ चे विमान पुणेहून सिंधुदुर्ग साठी ४५ प्रवाशांना घेऊन निघाले. मात्र शनिवारी सकाळी चीपी विमानतळावर धुके असल्याने हे विमान गोवा मोपा विमानतळावर उतरण्यात आले व तिकडून प्रवाशांना कारने मोफत सिंधुदुर्गात आणण्यात आले. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र विमान न आल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
सिंधुदुर्गात येणारे विमान आज शनिवारी पुन्हा एकदा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले .या विमानतळावर दिवसा येणारी विमाने खराब हवामानामुळे वारंवार रद्द करण्याची नामुष्की येत आहे याकरिता या विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानकावर परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व्हावे, या ठिकाणी नवीन टर्मिनस प्लॅटफॉर्म आणि बिल्डिंग व्हावी, या स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करावा तसेच सावंतवाडी स्थानकावरून कोरोना काळात काढून घेण्यात आलेला १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस व १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा इत्यादी मागण्यांसाठी येत्या २६ जानेवारीला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही अराजकीय संघटना रेल रोको आंदोलन करणार आहे. त्याबाबत ची नोटीस संबंधित प्रशासनाला दिलेली होती त्याचाच भाग म्हणून रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री शैलेश आंबर्डेकर यांनी आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रेल रोको करू नये असा आशयाचे पत्र संघटनेला सुपूर्द केले.परंतु कोकण रेल्वेने दिलेल्या पत्रात संघटनेच्या मागण्यांसंदर्भात एकही सकारात्मक बाब नसल्याने संघटनेने आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत अशा आशयाचे पत्र क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री आंबर्डेकर यांना सुपूर्द केले. तसेच आमच्या मागण्यांसंदर्भात बेलापूर येथे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांचा अध्यक्षतेखाली २३ जानेवारीच्या अगोदर बैठक आयोजित करावी अशी विनंती संघटनेने केली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड श्री संदीप निंबाळकर, सचिव श्री मिहिर मठकर, सल्लागार श्री सुभाष शिरसाट आदी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग: २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री ना. श्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनस च्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण टर्मिनस उभारण्यासाठी आपण राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध करावा, या ठिकाणी कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या गाडी क्र. १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा. नव्याने १२१३३/३४ मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला सावंतवाडी थांबा मिळावा, आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे या विषयावर पालकमंत्री श्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आपण योग्य कार्यवाही करून येत्या काही महिन्यात ही कामे मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांचा संघटनेतर्फे शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला.
त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे विलीनीकरण या संदर्भात निवेदन देण्यात आले. आणि सावंतवाडी टर्मिनस का गरजेचे आहे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पटवून दिले. त्यावर आमदार श्रीमती गायकवाड मॅडम यांनी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा कानावर हा विषय घालते असे संघटनेला आश्र्वासित केले.
यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, प्रकाश येडगे, प्रशांत परब आदी संघटनेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी नियुक्त केले आहे. वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवणचे ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे नीलेश गौतम कांबळे, माणकादेवीचेच्या स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या कर्मचार्यांचा या पथकात समावेश आहे.
दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. यासाठी नेमलेले अधिकार्यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.
या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.
उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले.
तर पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकला आहे. महत्वाच्या देवस्थानावर ही दावा केला गेला आहे, असं विधान राज्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नितेश राणे यांनी केला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दावा केलेल्या जागांची यादी समोर आली असून देवगड, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांचा समावेश या यादीत आहे. १५६ ठिकाणी वक्फ बोर्डानं दावा केल्याचं समोर येत आहे. मंत्री नितेश राणे म्हणाले होते की, या बोर्डानं दावा ठोकल्यावर आपण न्याय देखील मागू शकत नाही. या काद्यात कोर्ट, अधिकाऱ्यांसह सर्व मंडळी ही विशिष्ट समाजाची असणारी आहेत. या कायद्याचा विचार अन् माहिती आपण घेतली पाहिजे व सावध झालं पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव विधेयक पारीत करत आहेत. इस्लामिक राष्ट्रामध्ये असा कोणाही वक्फ बोर्ड नसताना आपल्याच देशात का? हा खरा प्रश्न आहे. हिंदुराष्ट्रात अशा प्रकरचे इस्लामीकरण षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही. देशात आणि राज्यात हिंदूच सरकार आहे. हिंदू नीही धर्माभीमान बाळगून 100% कडवट पणा दाखवून पुढे यावे, असे नितेश राणे म्हणाले होते. तसेच जिल्ह्यात ५० ते ६० टक्के जमिनींवर वक्फ बोर्डनं दावा ठोकल्याचे विधान त्यांनी आंबोली येथील हिंदू धर्म परिषदेत केला होता.
सिंधुदुर्गातील आंबोलीमध्ये हिंदू धर्म परिषदेत मंत्री नितेश राणे यांनी धक्कादायक माहिती समोर आणलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० टक्के जागा आणि महत्त्वाच्या देवस्थानांवर वक्फ बोर्डने दावा केल्याचा खुलासा केला होता. तसेच त्यात जिल्ह्यातील देवस्थानं असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता. त्या आधारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाने दावा केल्याची यादी आपल्या हाती लागली आहे. जिल्ह्यातील १५६ ठिकाणी वक्फ बोर्डाच्या जमिनीवर दावा केल्याचं दिसून येत आहे. यात शेतजमिनीवर दावा केल्याचं देखील दिसत आहे.











