



सिंधुदुर्ग : पुण्याहून सिंधुदुर्गातील चीपीसाठी निघालेले विमान सिंधुदुर्ग जिल्हय़ात न उतरवता ते चक्क गोव्याच्या दिशेने नेवून मोपा विमानतळावर उतरविण्यात आले. खराब हवामानामुळे धावपट्टीवर धुके असल्याच्या कारणाने निर्णय घेण्यात आला. या कारणाने आज प्रवास करणार्या ४५ प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
फ्लाय ९१ चे विमान पुणेहून सिंधुदुर्ग साठी ४५ प्रवाशांना घेऊन निघाले. मात्र शनिवारी सकाळी चीपी विमानतळावर धुके असल्याने हे विमान गोवा मोपा विमानतळावर उतरण्यात आले व तिकडून प्रवाशांना कारने मोफत सिंधुदुर्गात आणण्यात आले. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र विमान न आल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
सिंधुदुर्गात येणारे विमान आज शनिवारी पुन्हा एकदा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले .या विमानतळावर दिवसा येणारी विमाने खराब हवामानामुळे वारंवार रद्द करण्याची नामुष्की येत आहे याकरिता या विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.