रत्नागिरी – कार्तिकेयाची महाराष्ट्रातील सर्वात सुंदर मूर्ती चिपळूणच्या श्रीविंध्यवासिनी मंदिरात आहे असे प्रतिपादन लेखक,अभ्यासक आशुतोष बापट यानी केले. ”सफर चिपळूण गुहागर परिसराची” या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात (२ एप्रिल) बोलताना त्यांनी हे कौतुकोद्गार काढले. या वेळी व्यासपिठावर मंदिर स्थापत्य आणि मूर्तीशास्त्राचे अभ्यासक लेखक आशुतोष बापट, ज्येष्ठ दुर्गतज्ञ प्र.के. घाणेकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, ज्येष्ठ शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतिन जाधव उपस्थित होते.
मंदिर आणि मूर्ती हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. (व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काहीतरी आगळे वेगळे अद्वितीय असे लक्षण) त्याकडे आपण अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपल्या मूर्ती कशाही, भंगलेल्या वगैरे असल्या, तरी त्या आपल्याला काहीतरी सांगून जात असतात. आपल्या संस्कृतीला दोन अंगे आहेत, आधिभौतिक म्हणजे ऐहिक जीवन समृद्ध करणे आणि दुसरी बाजू आधिदैविक अर्थात् तत्त्वज्ञान, अध्यात्म, मंदिर, मूर्ती, कला आदींची असून माणसाचे जीवन समृद्ध होण्याकरता ते आवश्यक आहे. कोकणातील मूर्तीवर लेखन होतेय ही चांगली गोष्ट आहे. कोकण किती समृद्ध आहे ? हे यातून लोकांना कळेल. लोकांचा ओघ कोकणाकडे वाढेल, अशी भावना ज्येष्ठ मूर्तीतज्ञ डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केली.
चिपळूणच्या रावतळे परिसरात विंध्यवासिनीचे मंदिर आहे. नंद-यशोदेची ही मुलगी जी कृष्णाच्या ऐवजी वासुदेव–देवकीच्या कोठडीत पोहोचली आणि तिला कंसाने ठार मारण्यासाठी उचलले असता ती त्याच्या हातातून निसटून विंध्यपर्वतावर जाऊन राहिली अशी पुराणकथा आहे
विंध्यवासिनी देवीचे हे मंदिर बहुधा यादवकालीन असून देवी पुरातन काळापासून शाक्तपंथीयांना पूजनिय असावी. परकीयांच्या आक्रमणात येथील मूळ रहिवासी असलेल्या बाराराव या कोळी जमातीने आपल्या कुलदेवतेचं रक्षण करण्यासाठी तिचं संपूर्ण मंदिर डोंगर तोडून व दगड मातीचा ढीग रचून त्यात गाडून टाकलं. कालांतराने छत्रपती संभाजीमहाराजांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. त्याकाळापासून आजापर्यंत देवीची नित्य पूजाअर्चा चालू आहे.
१९७६ साली देवीच्या स्थापनेचा ३०० वा वर्धापनदिन साजरा झाला. देवीची मूर्ती होयसाळ शैलीची असून ती ८०० ते १००० वर्षे जुनी असावी. त्याचप्रमाणे मूर्ती अष्टभूजा असून महिषासुरमर्दिनी या आक्रमक रूपांत उभी आहे. तिच्या आठही हातांत आयुधे असून तिने पायाखाली रेड्याला दाबून धरले आहे. नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो. तिच्या गाभाऱ्यातील मयूर हे वाहन असलेल्या कार्तिकेयाची मूर्तीही अत्यंत देखणी आहे. या दोन्ही मूर्ती अतिशय सुंदर असून त्यावरील सुबकता, कोरीव काम व काळ्या पाषाणाची आजही टिकून असलेली तकाकी पाहून त्या कारागिरांच्या कामगिरीचे कौतुक वाटते.
साभार – FB (Chiplun Cha Balya)
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.