गडचिरोली:वन्यजीवांच्या शिकारीसाठी जंगलात दबा धरून बसलेल्या एका मोठ्या टोळीला जेरबंद करण्यात आलापल्ली वनविभागाला मोठे यश आले आहे. रविवारी, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आलापल्ली वनपरिक्षेत्रातील जंगलात काही जण शिकारीच्या उद्देशाने लपून बसल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांच्या नेतृत्वाखालील गस्ती पथकाने तातडीने परिसरात सापळा रचला. वनविभागाच्या पथकाची चाहूल लागताच शिकाऱ्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने पाठलाग करून १२ जणांना ताब्यात घेतले.
शिकाऱ्यांची झडती घेतली असता वनविभागाच्या हाती धक्कादायक पुरावे लागले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकडूचे (चार अवशेष), एक उडणारी खार, एक हरीनाल पक्षी आणि घूबड प्रजातीतील पक्षांचे अवशेष व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील शिकारी टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व शिकाऱ्यांवर भारतीय वन अधिनियम, १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अंतर्गत गंभीर गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदर मोहीम आलापल्लीच्या उपवनसंरक्षक दिपाली तलमले व उपविभागीय वन अधिकारी शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार, वनरक्षक दत्ता सुरवसे, निलेश टेकाम, सुधाकर सोयाम, सुरेश मडावी, श्याम जंगमवार, नामाजी मडावी आणि देवाजी सलामे यांनी सहभाग घेतला. वन्यजीव संरक्षणासाठी वनविभागाचे विशेष लक्ष असून, नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित वनविभागाला द्यावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांनी केले आहे.


