Author Archives: Kokanai Digital
नागपूर: रेल्वेत प्रवाशांकडून वातानुकूलित (एसी) कोचला जास्त मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’ कमी करून ‘एसी कोच’ वाढवले गेले, असा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केला.
मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मध्य रेल्वेसह देशभरात प्रवासी गाड्यांमधील सातत्याने स्लिपर कोच कमी होऊन वातानुकूलित ‘थ्री टायर एसी कोच’ वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राम करण यादव पुढे म्हणाले, रेल्वेत सातत्याने प्रवाशांकडून ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वातानुकूलित कोच वाढवले गेले.
देशातील काही ठिकाणी मागणीनुसार ‘स्लिपर कोच’च्याही गाड्या चालवल्या जात आहेत. त्यातच सध्या ‘एसी थ्री टायर’ आणि ‘स्लिपर कोच’मधील सीटच्या प्रवासी भाड्यात खूप जास्त फरक नाही. रेल्वेकडून सातत्याने पायाभूत सुविधा बळकट केली जात असून थ्री लाईन, फोर लाईनसह इतरही कामांना गती दिली गेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मग कमी झालेल्या पॅसेंजर रेल्वे पुन्हा चालवण्याबाबत प्रक्रिया होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेत अमृत भारत योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्थानकांचा विकास होत असल्याचेही यादव म्हणाले.
महाव्यवस्थापकांचा दावा कितपत योग्य?
कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाड्यांचे दोन स्लीपर डबे कमी करून त्या जागी दोन ‘ईकाॅनाॅमी थ्री टायर एसी’ चे डबे जोडले गेले आहेत. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर चालवते. या गाड्यांना स्लीपर कोचपेक्षा एसी कोचला जास्त मागणी होती हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कारण या गाड्यांच्या स्लीपर कोच च्या तिकीट चार महिने आगावू बूक करताना भेटणे मुश्किल होत असे. मग मागणी कमी कशी असा प्रश्न प्रवाशांकडून विचाराला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लीपर श्रेणी आणि थ्री टायर एसी यांच्या तिकीट दरांमध्ये जास्त फरक नाही असे महाव्यवस्थापक बोलत आहेत. पण खरे पाहता थ्री टायर एसी चे प्रवासभाडे स्लीपर श्रेणीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा पण चुकीचा आहे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.
पुणे: अयोध्येत नुकतेच प्रभू रामलल्लांच्या मूर्तीचा राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण देश राममय झाले असताना विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणार्या पुण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. कलेच्या गोंडस नावाखाली एका नाटकात रामायणाची पात्रे अगदी घाणेरड्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे विद्यापीठातील ललित कला मंचाने आयोजित केलेल्या या नाटकात रामायणाची पात्रे खूप चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. या नाटकात सीता माताची भूमिका करणारा कलाकार या नाटकात शिव्या देताना आणि सिगारेट पिताना दाखवला आहे.
नाटक चालू असताना आपल्या देवी देवतांचा अपमान सहन न झाल्याने अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली आहे.
'सीतामाई सिगारेट पितात आणि शिव्याही देतात' पुण्यात नाटकामध्ये हिंदू देवतांचा अपमान – Kokanai https://t.co/CHqkzVhNPl…#पुणे pic.twitter.com/YG4KjAGL9H
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) February 3, 2024
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या सोमवारी आणि मंगळवारी दिनांक ०५ आणि ०६ फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेच्या वेर्णा ते माजोर्डा या विभागां दरम्यान रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण दोन तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. या मेगाब्लॉक मुळे सोमवार दिनांक ५ फेब्रुवारीला मुंबई सिएसएमटी वरून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 22229 Mumbai CSMT – Madgaon Jn. Vande Bharat या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून ही गाडी रत्नगिरी ते करमाळी या स्थानकांदरम्यान सुमारे १ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
मुंबई: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
अशोक सराफ यांनी… pic.twitter.com/u7F6KkDe8z
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 30, 2024
वाशी, २९ जानेवारी : कोकणातील हापूस वाशी बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूसची विक्रमी आवक झाली आहे. यावर्षी जानेवारीत बाजार समितीमध्ये विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. प्रतवारीनुसार या आंब्याला प्रतिपेटी सात हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.
अद्याप आंबा हंगामाला पूर्णपणे सुरूवात झालेली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला दरही चांगला मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आंब्याचा मोहराची गळ झाली होता. तसेच बुरशीजन्य रोग आणि रसशोषक कीडींचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे मोहर गळ झाल्याने पुनर्मोहराची प्रकिया लांबली. परिणामी फळ तयार होण्याच्या प्रक्रियेलाही उशीर झाला. परंतु काही भागात अवकाळीचा फटका बसूनही योग्य व्यवस्थापनामुळे फळ वेळेत तयार झाले आहे.
मागील वर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे चांगल्या प्रमाणत उत्पादन राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांना होता. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचा मोहर काळा पडला. याशिवाय रसशोषक कीडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.