Mumbai Goa Highway : कोकणवासीयांना त्रास देणारा आणि येथील राजकारण्यांना शरमेने मान खाली घालाव्या लागणार्या मुंबई गोवा महामार्गाचा विषय महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी विनोदी मालिकेत सुद्धा चांगलाच गाजला आहे. ज्या विनोदी मालिकेत प्रेक्षकांना हसवण्यात येते त्याच विनोदी मालिकेत हा गंभीर विषय दाखविण्यात आला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे हा कधीच विनोदाचा विषय होऊ शकत नाही यात वाद नाही. कारण या खड्ड्यांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. मात्र या विनोदी मालिकेत या विषयाचे भांडवल न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने कोकणातील जनतेला एक स्पष्ट मेसेज देण्यात आला आहे. ‘मी एकटा काय करणार?’ ह्या विचाराने कित्येक कोकणवासिय या प्रश्नावर गप्पच असल्याने हा विषय सुटत नाही. या प्रश्नासाठी प्रत्येकाने आपल्या परीने सुरवात केली पाहिजे.
मुंबई :यंदा कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्यां चाकरमान्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकावेळी एक नाही तर दोन खुशखबर दिल्या आहेत. यावर्षी शिंदे गटाकडून मोफत एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदार संघ विभागातून १२ ते १८ मोफत बसगाड्या सोडल्या जाणार आहेत. तर कोल्हापूर मार्गे जाणाऱ्यांसाठी टोलमाफी दिली जाणार आहे. शनिवारी वर्षा बंगल्यावर या संदर्भात निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात काल वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई गोवा महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे गटाने सांगितले.
तसेच ज्यांना बुकिंग मिळालं नाही किंवा ज्यांच्याकडे जाण्याची काही सोय नाही अशा लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईच्या प्रत्येक विधान सभा मतदार संघातून या गाड्या सोडल्या जाणार आहेत. वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, श्रीकांत शिंदे उपस्थित होते. तसेच काही पदाधिकारी देखील या बैठकीला उपस्थित होते.
New Vande Bharat Express : अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी चेन्नईतील एकात्मिक कोच फॅक्टरीला भेट दिली होती. त्यांनी नवीन रेकची पाहणी केली आणि घोषणा केली की भगव्या रंगाची सेमी-हायस्पीड ट्रेन भारताच्या तिरंग्यापासून प्रेरित आहे. आता प्रथमच वंदे भारत एक्सप्रेस ICF उत्पादन युनिटच्या बाहेर रेल्वे रुळांवर आदळल्याचे दिसून आले आहे. नवीन भगवी वंदे भारत एक्सप्रेस अद्याप कार्यरत नाही आणि सध्या ती ICF येथे आहे, जिथे वंदे भारत गाड्या तयार केल्या जातात, असे ANI ने वृत्त दिले आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी यापूर्वी जाहीर केले होते की, भारतीय-निर्मित अर्ध-हाय-स्पीड वंदे भारत एक्स्प्रेसचा 28वा रेक ‘भगवा’ रंगाचा असेल. एकूण 25 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सध्या भारतात कार्यरत आहेत, तर पारंपारिक पांढर्या आणि निळ्या रंगातील आणखी दोन वंदे भारत रेक आधीच तयार केले गेले आहेत. “या 28 व्या रेकचा रंग चाचणीच्या आधारावर बदलला जात आहे,” ते म्हणाले.
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी 28 वा रेक कार्यान्वित होईल अशी अपेक्षा होती. तथापि, नंतरच्या अहवालांनी सुचवले की नवीन केशर-ट्रेनचे उद्घाटन 19 ऑगस्ट ही तारीख असेल. तथापि, यास आणखी विलंब झाला आहे आणि तो प्रवाशांचा पहिला संच कधी घेऊन जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत बातमी नाही. केंद्रीय मंत्र्याने आधी सांगितले की स्वदेशी ट्रेनच्या 28 व्या रेकचा नवीन रंग “भारतीय तिरंग्यापासून प्रेरित” आहे. ते म्हणाले की, वंदे भारत ट्रेनमध्ये 25 सुधारणा करण्यात आल्या आहेत. ही मेक इन इंडियाची संकल्पना आहे, (ज्याचा अर्थ) भारतात आमच्या स्वत:च्या अभियंत्यांनी आणि तंत्रज्ञांनी डिझाइन केलेली आहे. त्यामुळे वंदेच्या ऑपरेशनदरम्यान एसी, टॉयलेट इत्यादींबाबत फील्ड युनिट्सकडून आम्हाला जे काही फीडबॅक मिळत आहेत. भारत, त्या सर्व सुधारणांचा वापर रचनेत बदल करण्यासाठी केला जात आहे,” वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
लडाख : लेहमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या एका ट्रकचा भीषण अपघात झालाय. या ट्रकमध्ये 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि 7 जवान होते. क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघाताची दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचं ट्रक थेट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवानांचा मृत्यू झाला. हे सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली.
भारतीय सैन्याची एक रुग्णवाहिका आणि आणखी काही वाहनं क्यारी शहाराच्या दिशेला जात होती. या दरम्यान एका ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक थेट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमधील सर्व 9 जवान शहीद झाले. एकूण 34 जवान क्यारी शहराच्या दिशेला जात होती. त्यापैकी 9 जणांचा दुर्देवी अपघातात मृत्यू झालाय.
भारतीय सैन्याचा ताफा लेहच्या न्योमा येथून क्यारीच्या दिशेला जात होता. या दरम्यान घाटात संध्याकाळी पावणे सहा ते सहा वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. सैन्याच्या ताफ्यातील एक ट्रक थेट दरीत कोसळलं. या ट्रकमध्ये 10 जण होते. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी बुधवार दि. २३ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक २३ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसला रोहा ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.
2) दिनांक २२ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्स्प्रेसला उडुपी – कणकवली दरम्यान सुमारे तीन तास रोखून ठेवले जाणार आहे.
3) दिनांक २३ ऑगस्ट रोजी सुटणार्या गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा जं. एक्स्प्रेसला सावंतवाडी रोड – कणकवली दरम्यान सुमारे तीस मिनिटे रोखून ठेवले जाणार आहे.
सावंतवाडी |सागर तळवडेकर : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून तेथे वंदे भारत, मत्स्यगंधा, मंगलोर एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका दीप्ती दत्ताराम गावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण यांना पाठवले आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असणारे सावंतवाडी स्थानकात विविध समस्या अनेक दिवसांपासून आहेत, या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या तसेच टर्मिनस चे टप्पा २ चे काम पूर्ण व्हावे आणि येथे मंगलोर,वंदेभारत,नेत्रावती,मत्स्यगंधा,मंगला या दैनिक गाड्यांना व नागपूर मडगाव ह्या विदर्भ कोकण जोडणाऱ्या रेल्वेगाडीला या स्थानकात थांबा मिळावा म्हणून प्रवाशांनी तसेच विविध संघटनांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली आहे परंतु या समस्या अजूनही जैसे थे आहेत
कोकणातील गणेशोत्सव हा एका महिन्यावर आलाय, हा उत्सव राज्यात नाही तर संपूर्ण देशातील पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे, लाखो चाकरमानी या उत्सवासाठी लवकरच कोकणाकडे रवाना होणार आहेत ही बाब लक्षात घेऊन सावंतवाडी स्थानकातील वरील समस्या लवकरात लवकर सोडवून कोकणातील प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
मुंबई | जयवंत दरेकर : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण करताना जुन्या रस्त्याच्या दुतर्फा असलेली नैसर्गिक मोठी झाडे तोडावी लागली त्यामुळे रस्ते परिसर ओसाड झाला, झाडांची सावलीच नष्ट झाल्यामुळे नैसर्गिक गारवा नाहीसा झाला. हा नाहीसा झालेला नैसर्गिक गारवा – सावली अर्थातच कोकणाचे रस्त्याचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी कोकणच्या मातीत सहज वाढणारी आणि दिर्घ आयुष्य असलेले वड,पिंपळ, किंजल, उंबर, चिंच, जांभूळ, गुलमोहर, पारिजात,आणि इतर वृक्षांची डिसेंबर महिन्यात चौपदरीकरण काम पूर्ण झाल्यानंतर लागवड करण्याची पूर्व तयारी करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, आणि महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाचे अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती.
या बैठकीत रविन्द्र चव्हाण यांनी आजपासूनच दापोलीच्या कोंकण कृषी विद्यापीठापासून ते कोकणात असलेल्या नर्सरी केंद्रांना संपर्क करून निदान ३ ते ४ वर्ष जुनी रोपे यांचा शोध करून कोणतीही हयगय न करता डिसेंबरपर्यंत उपलब्ध होतील या पूर्व तयारीला लागा असे आदेश वन खात्याच्या चीफ कन्झर्वेटिव ऑफिसर (आयएफएस) श्री गोवेकर साहेब याना दिले. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग , कोंकण चे मुख्य अभियंता श्री शरद राजभोज साहेब, राष्ट्रीय महामार्ग( सां . बा. विभागचे )’मुख्य अभियंता श्री.संतोष शेलार साहेब, अधीक्षक अभियंता श्रीमती तृप्ती नाग मॅडम, उप अभियंता अकांक्षा मेश्राम मॅडम, उप अभियंता श्री पंकज गोसावी साहेब, स्वीय सहाय्यक श्री उत्तम मुळे साहेब, श्री एकनाथ घागरे साहेब, श्री अनिकेत पटवर्धन साहेब या विषयावर सतत पाठपुरावा करणारे आणि चर्चेसाठी मागणी करणारे कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. जयवंत दरेकर आणि त्यांना सक्रियपणे सहकार्य करणारे श्री. श्रीधर@काका कदम त्यांचे सहकारी श्री उदय सुर्वे, श्री संतोष गुरव, श्री राजू मुलुक, ॲड. प्रथमेश रावराणे,श्री शंकर उंबाळकर,श्री.हरिश्चंद्र शिर्के, आणि वृक्षप्रेमी श्री सुनील नलावडे हेही उपस्थित होते.
रत्नागिरी : चिपळूण एस. टी. आगारातर्फे खास श्रावण महिन्यानिमित्त अष्टविनायक दर्शन आणि मार्लेश्वर दर्शन जादा एस.टी. बससेवा सुरू करण्यात येणार आहे. भाविकांना दर सोमवारी मार्लेश्वर दर्शनासाठी चिपळूण ते मार्लेश्वर आणि मार्लेश्वर ते चिपळूण अशी एस.टी. ची सेवा सुरू करण्यात येईल. यासंदर्भात आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांनी पत्रकारांना माहिती दिली.
श्रावण महिना सुरू झाला आहे. या निमित्ताने २१, २८ऑगस्ट, ४ व ११ सप्टेंबर रोजी श्रावणी सोमवारनिमित्त मार्लेश्वर जादा एस. टी. गाडी सोडण्यात येणार आहे. सकाळी ८ वा. चिपळूण मार्लेश्वर व दुपारी ३:३० वा. मार्लेश्वर चिपळूण अशी बस निघेल. या गाडीचा तिकीट दर १३० रुपये असून, महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत लागू आहे. या गाडीचे बुकिंगदेखील सुरू करण्यात आले आहे. त्याच पद्धतीने अष्टविनायक दर्शनासाठीदेखील चिपळूण आगारातून एस.टी. बस सोडली जाणार आहे. त्याचेही बुकिंग सुरू करण्यात आले आहे. ही गाडी खास महिलांसाठी असून, ६५५ रुपयांत अष्टविनायक दर्शन घेता येणार आहे. श्रावण
महिन्यामध्ये अनेकजण देवदर्शन घेत असतात. या निमित्ताने प्रवाशांची सोय व्हावी आणि एस.टी.च्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने या गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. चिपळूण आगारातून अष्टविनायक दर्शन गाडी सुटेल. यासाठी जास्तीत जास्त महिलांनी बुकिंग करावे. महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतीमुळे एस. टी. च्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे राजेशिर्के यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग : मडगावच्या दिशेने जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसची धडक बसून बोर्डवे रेल्वे फटका नजीक तीन गवेरेडे ठार झाले. ही घटना शुक्रवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास घडली. मोटरमन कडून याबाबत माहिती मिळतच कणकवली रेल्वे स्टेशन वरील आरपीएफ कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच याबाबत वनविभागाला देखील माहिती देण्यात आली. गवे रेड्यांना बसलेली रेल्वेची धडक ही एवढी जोरात होती की यात काही गवे ट्रॅक पासून दूरवर जाऊन पडले. तर काही एका गव्याचा अक्षरशा मांसाचा सडा रेल्वे ट्रॅक वर पडला होता.
Vande Bharat Express News:वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास महाग, ती फक्त श्रीमंतासाठी बनवण्यात आली आहे अशी टीका नेहमीच वंदे भारत ट्रेन विरोधात केली जात आहे. या टीकेला सरकारने गांभीर्याने घेतले असून वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सर्वसामान्य नागरिकांना पण घेता येईल या दिशेने प्रयत्न चालू केले आहेत. याचाच एक भाग म्हणुन रेल्वे प्रशासन येत्या ऑक्टोबर महिन्यापासून नॉन एसी वंदे भारत ट्रेन चालू करणार आहे. यामुळे अगदी स्वस्तात आरामदायी प्रवास आता करणं शक्य होणार आहे. या वर्षात दोन नॉन-एसी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. ICF चेन्नईकडून वंदे भारत नव्या स्वरुपात आणण्याची योजना आखण्यात येत आहे. दरम्यान, वेगाने, आरामदायी आणि अगदी वाजवी दरात प्रवाशांना प्रवास करता येण्यासाठी ही नॉन एसी वंदे भारत ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
आता धावत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसची बाह्य रचना ही थोडी वेगळी असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण यामध्ये आरामदायी प्रवासामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नसल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. तसेच यामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा देखील उपलब्ध असणार आहे. या गाड्यांमध्ये फायर अलार्म सिस्टीम, इमर्जन्सी अलार्म या सुविधा असणार आहे. तर या ट्रेनमधील टॉयलेट देखील वंदे भारत एक्सप्रेस सारखेच असणार आहेत. दोन डब्यांमध्ये जर्क-फ्री प्रवास करण्यासाठी सुधारित कपलर देखील असणार आहे. या ट्रेनला एलएचबी कोच असणार आहेत.
एसी वंदे भारत पेक्षा वेग कमी
एसी वंदे भारतपेक्षा नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा वेग कमी असणार आहे. नॉन एसी वंदे भारत एक्सप्रेसचा ताशी वेग हा 130 किमी असणार आहे. सध्या वंदे भारत एक्सप्रेसचा वेग हा ताशी 160 किमी इतका आहे. यावर बोलतांना रेल्वे मंत्रालयाने म्हटलं की, रेल्वेच्या खिडक्या उघड्या असताना जास्त वेगाने रेल्वे चालवणे हे धोकादायक ठरु शकते. त्यामुळे या रेल्वेचा वेग एसी वंदे भारत एक्सप्रेसपेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.
सध्या वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसल्याचं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर उपाय म्हणून रेल्वे मंत्रालयाकडून सामान्य लोकांसाठी ही नॉन एसी वंदे भारत रेल्वे सुरु करण्यात येणार आहे. तिकिटांचे दर किती असतिल हे जाहीर केले नसले तरी सध्या चालविण्यात येणार्या वंदे भारत एक्सप्रेस च्या तिकिट दरापेक्षा निम्मे किंवा त्याच्या आसपास असण्याचा अंदाज आहे. यामध्ये स्लिपर कोचची देखील सुविधा देण्यात येणार आहे.