रत्नागिरी :टोलनाका तोडफोड आंदोलनाप्रकरणी आज दिनांक 18 ऑगस्ट २०२३ रोजी मनसेच्या एकूण 14 जणांना अटक करण्यात आलेली आहे तर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 68 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई अन्वये मनसे च्या एकूण 97 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. आंदोलन प्रकरणी राजापूर, रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे यांनी तात्काळ कारवाई केली व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
दिनांक 16 सप्टेंबर रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणानंतर कोकणातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तोडफोडीच्या एकूण 3 घटनांची नोंद झाली असून त्या घटनेसंदर्भात पुढीलप्रमाणे अटक झाली आहे.
1) हातिवले येथील घटनेत 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत व त्यांना 1 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.
2) खानू येथील घटनेत एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे व अटकेची कारवाई चालू आहे.
3) पाली येथील JCB वर काठीने हल्ला करून काचांची तोडफोड प्रकरणी 8 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत व अटकेची कारवाई चालू आहे.
अटक करण्यात येणाऱ्या मनसे च्या 14 जणांना मा. न्यायालयात दिनांक 19/08/2023 रोजी हजर करण्यात येणार आहे.
अटक करण्यात आलेल्यांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 02 पदाधिकारी व 12 कार्यकर्ते यांची यादी समावेश आहे. त्यांची नावे खालीलप्रमाणे
1) अद्वैत सतीश कुलकर्णी, मनसे शहर अध्यक्ष, रा. अभ्युदय नगर,
2) अविनाश धोंडू सौंदळकर, दक्षिण जिल्हा अध्यक्ष रा. नाचणे रोड रत्नागिरी,
Konkan Railway News :कोकणात गणेश चतुर्थी हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. या दरम्यान या मार्गावरील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात ताण सहन करावा लागतो. चाकरमान्यांची पहिली पसंती असलेल्या कोकण रेल्वेवर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाड्या चालविल्या जातात त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास पूर्णपणे नाहीसा करणे शक्य नसले तरी रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन केल्यास तो थोडा कमी करता येणे शक्य आहे.
कोकण रेल्वे संस्थापक सदस्य आणि अभ्यासक श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर कोकण रेल्वेला या नियोजनाबाबत पत्र लिहून यावर एक उपाय पण सुचविला आहे. त्यांनी लिहिलेले पत्र खालीलप्रमाणे
कोकण रेल्वे महाव्यवस्थापक १८/८/२०२३
सन्माननीय महोदय
कोकण रेल्वेला गणेशोत्सवात अडीचशे च्या वरती अतिरिक्त जागा गाड्या मार्गावर प्रवास करणार आहेत. यापूर्वीच मी पत्र दिले होते किमान गणपतीचे पहिले पाच दिवस येतानाच्या गाड्या लोढा मिरज मार्गे वळवाव्यात परंतु त्याची आपण दखल घेतली नाही पर्यायाने या वेळेला गणेशोत्सवात रहदारी वाढल्यामुळे गाड्यांना विलंब होणे हे नित्याचे होणार आहे .
तरी यावर आणखीन एक तोडगा म्हणून गणपतीच्या दिवसांमध्ये गणेशोत्सवाच्या अगोदर पाच दिवस व चतुर्थी नंतर पाच दिवस ज्या गाड्या पनवेल पासून पुढे रोहा मार्गे मेंगलोर पर्यंत धावतील त्या गाड्यांना पहिले प्राधान्य देऊन पुढे काढल्या जाव्यात व येणाऱ्या गाड्या सिग्नलला अथवा स्टेशनला उभ्या करून यांना जाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा व पाच दिवसानंतर जाणाऱ्या गाड्या स्टेशनला साईडला घेऊन येणाऱ्या गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून गणेशोत्सवात जाणाऱ्या लोकांना प्राधान्याने पुढे जाता येईल व येणाऱ्या गाड्यांना पाच दिवसानंतर येताना प्राधान्य मिळेल. नियमित गाड्यांच्या बाबतीत हे असे नियोजन करणे शक्य नसले तरी अतिरिक्त गाड्यांच्या बाबतीत असे करणे शक्य होईल. रेल्वे प्रशासनाने याची आपण नोंद घ्यावी ही नम्र विनंती
सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर संस्थापक सदस्य कोकण रेल्वे 9404135619
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीमध्ये गौरी गणपती आणि दिवाळी या सणांसाठी आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शिधा 100 रुपयांत वाटण्यात येणार असल्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा समावेश या शिध्यामध्ये असणार आहे.
मागील वर्षी अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी वेळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच राज्यातील सात कोटी नागरिकांना या आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत होतं. पण तरीही हा शिधा काही वेळत पोहचला नव्हता. ह्यावर्षी हा शिधा वेळेत पोहोचला जाणार याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या दक्षिणेकडील राज्यांच्या स्थानकांवर काही गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर काही कालावधीसाठी थांबे देण्यात आले होते. त्या थांब्यांना कायम करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे थांबे पुढील सूचना मिळेपर्यंत Till Further Advice कायम राहणार आहेत. रेल्वेच्या या प्रसिद्धी पत्रकानुसार एकूण 6 स्थानकावरील 16 गाड्यांचे थांबे कायम करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रातील स्थानके अजूनही प्रतिक्षेत
लांब पल्ल्यांच्या गाड्यांना कोकण रेल्वेच्या महाराष्ट्रातील स्थानकांवर थांबे मिळावेत यासाठी विविध प्रवासी संघटनेंकडून अनेक वर्ष मागण्या होत आहेत. या स्थानकां कडून मिळणारे उत्पन्न आणि महत्त्व पाहता अधिक थांब्यासाठी होणारी मागणी रास्त आहे. मात्र या मागण्यांना रेल्वे प्रशासनाने नेहमी केराची टोपली दाखवली आहे. लांब पल्ल्याच्या नेहमीच्या गाड्यांना सावंतवाडी, खेड, संगमेश्वर तसेच ईतर महत्त्वाच्या स्थानकावर थांबे मिळावेत यासाठी अनेक वर्ष मागणी करूनही रेल्वे प्रशासन या मागण्या गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. दुसरीकडे दक्षिणेतील राज्यातील स्थानकांवर या गाड्यांना सहजासहजी थांबे मिळत आहेत. या सर्व प्रकारावरून कोकण रेल्वे नेमकी कोणासाठी हा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा रहात आहे.
Mumbai Goa Highway News :मुंबई – गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन मनसे आता आक्रमक झाली आहे. मनसेने खळखट्याक आंदोलन सुरु केलं असून, टोलनाक्यांना लक्ष केलं आहे. मनसे कार्यकर्त्याने मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले टोलनाका फोडला आहे.रत्नागिरी-सिंधुदूर्गाच्या सीमेवर राजापूरमध्ये हा टोलनाका आहे. हा टोलनाका अद्याप सुरु झालेला नाही. पण त्याआधीच मनसेने तो फोडला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा असं आवाहन केलं होतं. तसंच सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे असं म्हटलं होतं. त्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे.
मनसेच्या एका कार्यकर्त्याने हातात झेंडा घेऊन टोलनाक्यावरील काचा फोडल्या. यावेळी त्याने तोंडावर रुमाल बांधला होता. हातातील काठीने काचा फोडल्यानंतर त्याने तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेनंतर टोलनाक्यावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
Railway Reservation Fraud : कोकण रेल्वे तिकीट आरक्षणामध्ये काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असून त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. या काळाबाजार प्रकरणी रेल्वे पोलीसांनी बुधवारी सावंतवाडी येथील एका युवकाला ताब्यात घेतले होते. त्या युवकाला ताब्यात घेत त्याच्यावर रेल्वे ऍक्ट नुसार १४३ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षकांनी दिली. अक्षय देशपांडे ( वय – ३० ) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि मडगाव रेल्वे पोलीसच्या पथकास सावंतवाडी येथील एका ऑफिसमध्ये तिकिटांचा काळाबाजार चालत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी या ऑफिसवर धाड टाकली. या धाडीत मिळालेल्या माहितीनुसार येथे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या संशयावर हे ऑफिस चालवीत असलेल्या या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे रेल्वे तिकीट बुकिंग आयडी देखील ब्लॉक केले गेले आहे . रेल्वे ऍक्ट १४३ नुसार दाखल गुन्ह्यामध्ये ३ वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. दरम्यान संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.
KonkanRailway News: गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्या दिवा चिपळूण मेमू विशेष गाडी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01155 दिवा चिपळूण मेमू विशेष गाडीला दिवा या सुरवातीच्या स्थानकावरून याआधी नियोजित केलेल्या वेळेच्या 10 मिनिटे अगोदर सोडण्यात येणार आहे.
नियोजित वेळेनुसार ही गाडी संध्याकाळी 19:45 या वेळी सुटणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यामधे बदल करून ही गाडी सुधारित वेळेनुसार ही गाडी 10 मिनिटे अगोदर म्हणजे संध्याकाळी 19:35 वाजता सुटणार आहे. हा बदल दिनांक 13 सप्टेंबर पासून असणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे.
MSRTC News: एसटीतील प्रवासात प्रवाशाना आणि वाहकाला नेहमी सतावणारी समस्या म्हणजे सुट्ट्या पैशाची चणचण. या कारणावरून कित्येकवेळा प्रवासी आणि वाहकांमध्ये भांडणे होताना दिसतात. पण आता ही समस्या दूर होणार आहे. कारण एसटीमध्ये सुद्धा तिकिटाच्या पेमेंट साठी क्युआर कोड स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामळे सुट्ट्टे पैसे नसले तरी त्याची चिंता भेडसावणार नाही आहे. या बदलासाठी या महिन्यात सर्वप्रथम एसटीची तिकीट मशिन बदलण्यात येणार आहेत. यामध्ये कोडस्कॅन अपडेट करून घेण्यात येणार असून या महिना अखेरपर्यंत एकाचवेळी ही सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
बदलत्या काळानुसार लाल परी अर्थात् एसटी महामंडळ प्रवाशांना आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे बदलती गरज लक्षात घेऊन एसटीनेही नागरिकांना कॅशलेस तिकीट पेमेंट करण्याचा निर्णय घेतला असून, ऑगस्ट अखेरपर्यंत सध्या असलेल्या तिकीट मशिनमध्ये बदल करण्यात येणार आहे.
क्युआर कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार आहे. आधी ही सिस्टीम अपडेट करून घेण्यात येणार असून, त्यानंतर ही अंमलबजावणी सुरू होईल.आतापर्यंत प्रवाशांना ई-तिकीट दिले जात होते. आता पेमेंटही ई-सेवा प्रणालीद्वारे होणार आहे. गणेशोत्सवाआधी या सेवेला आरंभ होण्याची शक्यता असून चाकरमान्यांना एक नवी सेवा महामंडळाकडून मिळेल.
Vande Bharat Train News : चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे तयार होणारी एकतीसवी वंदे भारत ट्रेन ही देशातील पहिली केशरी रंगाची सेमी-हाय स्पीड एक्सप्रेस असणार आहे. दिनांक 19 ऑगस्ट रोजी चेन्नई उत्पादन युनिटमध्ये या केशरी रंगाच्या वंदे भारत ट्रेनचे अनावरण होण्याची अपेक्षा आहे.
देशभरात 25 वंदे भारत गाड्या धावत असताना, असे आणखी चार रेक या महिन्यात सेवेत येण्यासाठी ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहेत. तथापि, आणखी दोन वंदे भारत गाड्यांची निर्मिती प्रक्रिया पुढच्या टप्प्यात आहे, त्यापैकी एकतीसवा रेक नवीन कलर कोडनुसार बनवला जाणार आहे.
भारतीय राष्ट्रध्वजापासून प्रेरित होऊन, नवीन वंदे भारत ट्रेन भगव्या रंगाच्या संयोजनात दारावर आणि डब्यांवर हिरव्या रंगाच्या पट्ट्यांसह बनवलेली असेल. भारतीय रेल्वेच्या म्हणण्यानुसार ड्रायव्हर केबिनच्या पुढील भागाला अधिक सौंदर्यपूर्ण आणि लक्षवेधी बनवण्यासाठी केशरी रंगाच्या आकर्षक रंगसंगती असतील.
भारतातील पहिल्यावहिल्या स्वदेशी डिझाइन आणि निर्मित सेमी-हाय स्पीड वंदे भारत ट्रेनने प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा अनुभव दिला आहे. हाय स्पीड, सुधारित सुरक्षा मानके आणि जागतिक दर्जाची सेवा ही या ट्रेनची वैशिष्ट्ये आहेत.स्वयंचलित दरवाजांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत गाड्यांचा वेग वेगवान आहे आणि त्यांचा वेग ताशी 160 किमी आहे. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग सीट्ससह, रिक्लाइनिंग एर्गोनॉमिक सीट्स आणि आरामदायी आसनांसह ट्रेनमध्ये उत्तम राइडिंग आराम आहे.प्रत्येक आसनासाठी मोबाईल चार्जिंग सॉकेटच्या सुविधेसह, ट्रेनमध्ये एक मिनी पॅन्ट्री आहे ज्यामध्ये हॉट केस, बाटली कुलर, डीप फ्रीझर आणि गरम पाण्याचा बॉयलर आहे.याशिवाय प्रत्येक डब्यात आपत्कालीन खिडक्या, अग्निशामक यंत्रणा आणि सीसीटीव्हीची व्यवस्था आहे.
पनवेल :मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पनवेलमध्ये तोफ धडाडली आहे. पनवेल येथे आज संपन्न झालेल्या मनसे निर्धार मेळाव्यामध्ये राज ठाकरे आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे.
▪️ आज मी इथं मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेविरुद्धच्या आंदोलनाला झेंडा दाखवायला आलोय.
▪️ कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना.. खड्डे इथे पण दिसले असते आणि खर्च पण वाचला असता. अहो, आपण चंद्रावर जाऊ शकतो पण महाराष्ट्रात रस्ते चांगले बंधू शकत नाही का?
▪️ २००७ ला मुंबई-गोवा हायवेचं काम सुरु झालं, त्यानंतर इतकी सरकारं आली पण रस्त्याचं काम झालंच नाही आणि तरीही त्याच लोकांना निवडून कसं दिलं जातं? रस्ते खड्ड्यात गेले काय आणि आपण खड्ड्यात गेलो काय आपल्या मतदारांना काहीच वाटत नाही?
▪️ फक्त कोकणातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुंबई ते नाशिक जायला ८ तास लागतात… लोकांचे ह्या रस्त्यानी शब्दशः हाल केलेत. काय चाललं आहे महाराष्ट्राचं?
▪️ भारतीय जनता पक्षाने मध्यतंरी सल्ला दिला की मनसेने रस्ते आणि टोल बांधायला पण शिका. त्यांना इतकंच सांगतो की, दुसऱ्यांच्या आमदारांना फोडून आणायच्या ऐवजी स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका आणि पक्ष बांधायला शिका. नको ते सल्ले आम्हाला देऊ नका.
▪️ लोकांच्या डोक्यावर बंदुका ठेवायच्या आणि धाकावर लोकांना पक्षात घ्यायचं आणि त्यानंतर ती लोकं गाडीत झोपून जाणार. यानंतर “मी तुला दिसलो का? मी होतो का.” म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का?
▪️ अजित पवार म्हणे महाराष्ट्राचा विकास करायला सत्तेत गेलो. काय बोलताय ? पंतप्रधानांनी ७०,००० कोटींच्या घोटाळ्याची आठवण करून दिली आणि हे टुणकन निघाले. बहुधा भुजबळांनी सांगितलं असेल जेलमध्ये काय काय असतं. ते म्हणाले असतील जेलपेक्षा भाजपकडे गेलेलं बरं.
▪️ मी नितीन गडकरींना फोन करून सांगितलं की अहो समृद्धी रस्ता करून इतके दिवस झाले पण अजून तुम्ही फेन्सिंग का नाही केलं? रस्त्यावर अनेक प्राणी येत आहेत, त्यांचे अपघात होत आहेत, गाड्यांचे अपघात होत आहेत. इतकी साधी गोष्ट पण सरकारच्या लक्षात येऊ नये ?
▪️ आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा १५,६६६/- कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या.
▪️ मी नितीनजींना विनंती केली होती की तुम्ही वैयक्तिक लक्ष घाला तर ते म्हणाले की अहो कॉन्ट्रॅक्टर पळून जातात. हे नेमकं मुंबई गोवा हायवेच्या बाबतीतच का घडलं? कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का?
▪️ आधी नाणार मग बारसूच्या प्रकल्पाच्या नावाखाली, कोकणी माणसाच्या हजारो एकर जमिनी कोणी बळकवल्या? ह्याचा शोध घेतलाच गेला पाहिजे.
▪️ मुंबई गोवा महामार्गावर आजपर्यंत २५०० लोकं मृत्युमुखी पडलेत. अनेकांना दुखणी लागली आहेत, गाड्यांचं नुकसान झालं आहे. तरीही त्याच लोकांना निवडून देत आहेत, त्यामुळे हे पुन्हा पुन्हा निवडून येणारे निवांत आहेत. ते टेंडर, टक्केवारीत व्यस्त आहेत.
▪️ जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत. ह्यांनी कोव्हीड पण नाही सोडला. निवडणुकीच्या वेळेस हे पुन्हा बाळासाहेबांच्या नावाने भावनिक करून मतं मागतील आणि आमची भोळीभाबडी जनता त्यांना पुन्हा भुलणार असेल तर ह्याच नरकयातना पुन्हा भोगाव्या लागतील.
▪️ २०२४ ला मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल असं आता सरकार सांगतंय. चांगलंच आहे, हे व्हायलाच हवं. पण पुढे काय? मुंबई-पुणे रस्ता झाला, आणि पुणे पसरत गेलं. घडलं काय तर पुण्याची पार वाट लागली. पुण्यात मराठी माणूस हा आक्रसत चालला आहे. हेच कोकणात होणार आहे.
▪️ गोव्यात २०२३ चा कायदा आहे की तुम्हाला सहज शेतजमीन घेता येणार नाही. आणि जर घेतली तर तिकडे शेतीच करावी लागली, तिथे इतर उद्योग, हॉटेलं उभारता येणार नाही.
▪️ गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गोव्याचा आम्ही गुरुग्राम होऊ देणार नाही, थोडक्यात उत्तर भारतीयांना जमिनी घेऊन गोव्याची वाट लावू देणार नाही. आणि हे बोलणारा कोण तर भाजपचा मुख्यमंत्री.
▪️ ३७० कलम रद्द झाल्यावर काय सांगितलं की कोणीही आता काश्मिरात जमीन घेऊ शकता. मला आनंद आहे की ३७० रद्द झाला. मी तर अभिनंदन पण केलं होतं.
▪️ पण तुम्ही कश्मीर असो, हिमाचल असो की आपल्या ईशान्य भारतातील राज्य तिथे कोणत्याही बाहेरच्या माणसाना जमीन घेता येणार नाही. मग हा नियम महाराष्ट्रात का नाही ? बरं मला सांगा ३७० झाल्यावर तुम्ही म्हणालात की काश्मीरमध्ये कोणीही जमीन घेऊ शकतो मग आत्तापर्यंत अदानी किंवा अंबानी समूहाने जमीन का नाही घेतली ?
▪️ शिवडी-न्हावाशेवा रस्ता होणार तेव्हा बघा रायगड जिल्ह्याची काय अवस्था होते. तिथल्या जमिनी आधीच परप्रांतीयांनी विकत घेतल्या आहेत आणि पुढे जाऊ परिस्थिती अशी होणार कि फायदे कोणाचा होणार तर परप्रांतीयांचा आणि आपला मराठी माणूस त्यांच्याकडे नोकऱ्या करणार.
▪️ मी पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी माणसांच्या विरोधात नाही. माझ्या पक्षात अनेक अमराठी आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात माझा मंडणगडचा तालुकाध्यक्ष तर एक शीख सरदार आहे.
▪️ अमेरिकेतील एम्पायर स्टेट बिल्डिंग, त्यावर एकदा छोटं विमान आदळलं, त्याच्याखाली एकदा बॉंम्बस्फोट झाला होता तरीही बिल्डिंग दणकट आहे. ती बिल्डिंग १४ महिन्यांत झाली होती. आणि आपल्याकडे वरळी-वांद्रे सीलिंकला १२ वर्ष लागतात आणि मुंबई गोवा महामार्गाला १६ वर्ष लागली. काय बोलायचं?
▪️ अमेरिकेत १९२७ च्या महामंदीच्या काळात सरकारने लोकांना पैसा देता यावं म्हणून अमेरिकेत रस्त्यांचं जाळं उभारलं, त्याच्यावर आजची अमेरिका उभी राहिली.
▪️ माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना आवाहन आहे की, पनवेलपासून सावंतवाडीपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचं काम वेळेत व्हावं ह्यासाठी पक्ष म्हणून ताकदीने रस्त्यावर उतरा. सर्वसामान्य लोकांना त्रास होईल असं आंदोलन नको पण आंदोलन असं करा कि सरकारला धडकी भरली पाहिजे.
▪️ ह्या आंदोलनंतरही महाराष्ट्र सैनिकांनी जागृत राहावं. कोकणी माणसांच्या जमिनी कोणीही बळकावू नये हे पहावं. कोकणात उद्योग आलेच पाहिजेत पण ते कोकणच्या निसर्गाची हानी करून नाही. निसर्गाने कोकणाच्या रूपाने जे अद्भुत दान महाराष्ट्राच्या पदरात टाकलं आहे, त्याचं संवर्धन करूया.