चिपळूण :मान्सूनचे आगमन झाले असून, गेले काही दिवस कोकणात सर्वत्र मुसळधार वृष्टी होत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ भरले असून, काही धबधबेही प्रवाहित झाले आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण पेढे येथे महामार्ग लगतच असणारा ‘सवतसडा धबधबाही’ प्रवाहित झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत.मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी आनंद घेण्यासाठी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. हा धबधबा सुरक्षित मानला जातो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.
मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो.
या घाटामध्येच कोकणच्या निर्मात्या श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो.
धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.
सावंतवाडी : पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही शुल्क आकारणी स्थगित केली जावी असे आदेश दिले आहेत. सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आठवडाभरा पूर्वी धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत असे एस. नवकिशोर रेड्डी यांनी जाहीर केले होते. मात्र दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.
सिंधुदुर्ग : वर्षा पर्यटनासाठी पहिली पसंती असलेल्या आंबोली येथे धबधब्याच्या ठिकाणी सायंकाळी धबधब्याचा प्रवाह वाढल्याने दगड त्याबरोबर खाली येवून पर्यटकांना धोका निर्माण झाला होता. या वेळी काही पर्यटक आनंद लुटत असताना अचानक धबधब्याच्या प्रवाहातून दोन- तीन दगड खाली आले. यामुळे तेथे असलेल्या सगळ्यांचीच धावपळ उडाली. त्यातील एक दगड एका पर्यटकाच्या पायावर आदळल्याने दुखापत झाली.
काल आंबोली येथील मुख्य धबधब्यकडे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटताना अचानक धबधब्याच्या प्रवाहातून दगड कोसळू लागल्याने पर्यटकांची तारांबळ उडाली. यात बेळगाव येथील युवक किरकोळ जखमी झाला. ही बाब तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलिस दीपक शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी प्रसंगावधान राखत पर्यटकांना धबधब्याकडे जाण्यास मनाई केली.
Mumbai Goa Vande Bharat |कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 27 जून पासून वंदे भारत एक्सप्रेस चालू होत आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि अनेक सुविधा असलेली ही गाडी नेमकी कशी असेल याची उत्सुकता सर्व कोकणवासीयांना आणि गोवेकरांना लागून राहिली आहे. खरे सांगायचे तर अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेल्या सुविधांचा घेतलेला हा विशेष आढावा..
काय आहेत सुविधा
या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
कोकणातील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध
प्रत्येक डब्यात प्रवाशांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी संपर्क यंत्रणा (GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम) लावण्यात आलेली असून त्यामध्ये 32 इंची एलसीडी टीव्हीसुद्धा समाविष्ट आहे.
मनोरंजनाच्या उद्देशाने ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसनव्यवस्था. बाहेरील उष्णता आणि आवाज नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलेशन.
प्रकाशयोजना संयुक्त आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध. इलेक्ट्रिक बिघाड झाल्यास ट्रेनच्या प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन दिव्यांची सोय.
अत्याधुनिक प्रणाली असलेल्या शौचालयांची डब्यात सुविधा.
अर्थातच यातील काही सुविधांमध्ये श्रेणीनुसार फरक असेल. उदाहरण द्यायचे झाले तर रोटेट चेअरची सुविधा फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या डब्यांत उपलब्ध असेल.
दुसरी बाजू | अलीकडेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोवा राज्यात दारूच्या दरात असलेली तफावत कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात दारूच्या किमतीत शिथिलथा आणावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. गोव्यातून कमी किमतीत दारू खरेदी करून चोरीच्या मार्गाने जिल्ह्यात विकून चांगले पैसे मिळत असल्याने जिल्हयातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी करताना दिसत आहे. परिणामी जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. मद्याच्या दरातील ही तफावत दूर केल्यास या प्रवृत्तीला आळा घालता येणे शक्य होईल. याबरोबरच दारूचे दर कमी केल्याने जिल्ह्याच्या पर्यटनाचा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्ह्याच्या हितासाठी ही मागणी केली असली तरी त्याचा इतर बाजूने पण विचार होणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम गोवा राज्यात दारू स्वस्त का आहे याचा इतिहास पाहू.
गोवा मुक्ती संग्रामाच्या तीव्र लढ्यानंतर अखेर १९६१ साली गोवा राज्याचे भारतात विलीनीकरण झाले. त्यानंतर गोव्यातून पोर्तुगीज गेले खरे पण ते गोव्याला अनेक गोष्टी देऊन गेले. त्यातील एक म्हणजे त्यांची जिवनशैली आणि संस्कृती.पोर्तुगीजांनी आपल्या वास्तुशास्त्रानुसार अनेक इमारती गोव्यात बांधल्या, युरोपियन अन्नपदार्थ त्यांनी गोव्यात आणले. एवढच नाही दिवसभराच्या दगदगीनंतर संध्याकाळी वाईनबरोबर शांत निवांत लाईफ एन्जॉय करायची सवय देखील पोर्तुगीजांनी गोव्याला लावली. त्यांची ही संस्कृती पर्यटकांना पण भावली आणि पर्यटक येथे आकर्षित झाला. पुढे या वाईनची जागा बिअर, रम आणि व्हिस्की या मद्यांनी घेतली
नंतर गोव्याला ३० मे १९८७ ला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. नवीन राज्य तयार झाले खरे पण ते इतके लहान होते की त्यात फक्त दोनच जिल्हे आहेत. आत्ता राज्य चालवण्यासाठी लागणारा पुरेसा महसूल फक्त या दोनच जिल्ह्यातून मिळणार नव्हता. तत्कालीन राज्यकर्त्यांच्या एव्हाना एक लक्षात आले होते की गोवा हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकते. त्यासाठी पोर्तुगीजांनी आणलेल्या संस्कृतीचा पर्यटनासाठी वापर करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार रणनीती आखली गेली आणि त्याचाच एक भाग म्हणुन सरकारने दारूवरील अतिरिक्त कर कमी करून दारू स्वस्त करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून गोव्यात दारू स्वस्त झाली.गोव्यात सरकारने दारू स्वस्त केली पण बाकीच्या गोष्टींवरचा कर मात्र वाढवला आणि समतोल साधला.
साहजिकच पर्यटकांची संख्या वाढण्यामध्ये येथील कमी दारूचे दर हे एक महत्वाचे कारण ठरले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याच्या दरात शिथिलता आणल्यास जिल्ह्याला कोणते फायदे होणार आहेत?
गोवा आणि सिंधुदुर्ग येथील भौगोलिक स्थिती जवळपास समान आहे. गोव्यात समुद्रकिनाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. हे पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वळविता येणे शक्य आहे. जिल्ह्यातील दारूचे हे दर कमी झाल्यास हे शक्य होणार आहे. दरातील तफावत कमी झाल्यास जिल्हातील तरुणांकडून होणारी तस्करी पण बंद होणार आहे. त्यामुळे दीपक केसरकर यांची ही मागणी मान्य झाल्यास असा दुहेरी फायदा जिल्ह्याला होऊ शकतो.
प्रत्येक गोष्टीची सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन बाजू असतात. सकारात्मक बाजू बघितली आता नकारात्मक बाजू बघू
जिल्ह्यात दारूचे दर कमी झाल्यास तरुणांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची शक्यता आहे. दर कमी असल्याने अधून मधून मद्यपान करणारा तरुण दररोज मद्यपान करायला लागण्याची शक्यता आहे. हे पटवून घेण्यासाठी आपण गेल्यावर्षी झालेला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेचा NFHS संदर्भ घेऊया. या सर्व्हेक्षणातून मिळालेल्या आकडेवारी नुसार मद्यपानात गोवा राज्याचा देशात प्रथम क्रमांक लागतो तर गोव्यातील महिला याबाबतीत देशात पाचव्या क्रमांकावर आहेत.
दुसरी गोष्ट म्हणजे ही मागणी मान्य झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हय़ातून दारू खरेदी करून त्यांची त्याच्या लगतच्या जिल्ह्यात तस्करी करण्याच्या प्रयत्न होणार आहे हे नक्की. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण कमी प्रमाणात असला तरी ईतर जिल्ह्यातील तरुण असणार आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आज जसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तरुण कमी किंमतीत दारू खरेदी करून आपल्या भागात विकतो आहे तसेच राजापूर तालुक्यातील काही तरुण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दारू खरेदी करून आपल्या भागात विकण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा कि आज जो मद्य तस्करीचा प्रश्न सिंधदुर्ग जिल्ह्यात निर्माण झाला तोच प्रश्न उद्या लगतच्या जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच राज्यातील फक्त एका जिल्हय़ात वेगळा दर आणि ईतर जिल्ह्यात वेगळा दर ठेवण्यास काही तांत्रिक अडचणी येणार असून हा निर्णय घेताना त्याचा विचार प्रशासनाला करावा लागणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नेहमीच जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील राहिले आहे. त्यामुळेच त्यांनी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र मद्य दरात शिथिलता आणल्या नंतर होणारे दुष्परिणाम कसे हाताळले जातील यावर या प्रयोगाचे यश अवलंबून आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
रत्नागिरी | प्रस्तावित रिफायनरी साठी होणार्या विरोधासाठी चर्चेत आलेल्या बारसू परिसरातील कातळशिल्पांची देशातील नामांकित संशोधक व अभ्यासक आज दिनांक 13 जून ला पहाणी करणार आहेत. ही पाहणी आज सकाळी 10 वाजता होणार असून या संशोधकांमध्ये डॉ. पार्थ चौहान, मृदुला माने, जिग्ना देसाई, डॉ. प्रबिन सुकुमारन आणि अभ्यासकांमध्ये सुधीर रिसबुड, सतीश ललित आदींचा समावेश असेल.तसेच खासदार विनायक राऊत येथील स्थानिक ग्रामस्थांसोबत सहभागी होणार आहेत.
बारसूच्या सडय़ावर असलेली काही कातळशिल्प युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ घोषित होण्याच्या मार्गावर आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू ते देवाचे गोठणे येथील सडय़ावर पसरलेली कातळशिल्प संरक्षित करावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. येथील पंचक्रोशीतील सर्वच ग्रामसभांनी तसे ठरावही केले आहेत. हाच जागतिक वारसा संरक्षित करण्यासाठी येथे रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्प प्रस्तावित होऊ नये ही मागणी ग्रामस्थ करत आहेत.
रत्नागिरी |तीर्थक्षेत्र आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथे रविवारी एका मोठ्या लाटेच्या तडाख्याने समुद्रकिनाऱ्या वरील स्थानिक व्यावसायिकांना तसेच पर्यटकांना फटका बसला सुमारे १० ते १२ पर्यटक लाटेच्या जोरदार तडाख्याने किरकोळ जखमी झाले होते.
सोमवारी देखील समुद्राच्या उधाणाचा जोर कायम होता , त्यामुळे पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन गणपतीपुळे आज सोमवारी सकाळी समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षण मोठा दोरखंड बांधून पर्यटकांना समुद्रावर जाण्यास मज्जाव केला आहे. तसेच अजून दोन दिवस तरी समुद्रावर जाण्यास पर्यटकांना मनाई केली जाणार आहे, असे गणपतीपुळे ग्रामपंचायत व जयगड पोलीस सांगण्यात आले आहे.
रविवारी समुद्राला मोठे उधाण येवून मोठ्या लाटा निर्माण होऊन येथील किनारपट्टीवर धडकल्याने येथील व्यावसायिकांचे पण नुकसान झाले होते. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथील नुकसानीची पाहणी करून 49 व्यावसायिकांना नुकसान भरपाई दिली जाईल असे जाहीर केले आहे.
सिंधुदुर्ग | ”आंबोली घाटात शस्त्रधारी टोळीची दहशत” या मथळ्याखाली खोटी बातमी पसरवून आंबोली पर्यटन स्थळाची बदनामी केली गेली आहे असा आरोप आंबोली ग्रामपंचायतीने एका प्रसारमाध्यमावर केला आहे.
NTC मीडिया ब्रेकिंग न्यूज या प्रसारमाध्यमाच्या वतीने दिनांक ०६/०६/२०२३ रोजी “आंबोली घाटात शस्त्रधारी टोळीची दहशत” या मथळ्याखाली एक बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीत कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही आहे. सदर बातमीमुळे आंबोली पर्यटन स्थळाची बदनामी झाली असून त्याचा परिणाम येणाऱ्या पावसाळी पर्यटनावर होणार आहे. या प्रसार माध्यमाची चौकशी करून त्यांच्याकडे या बातमीबद्दल काही पुरावा असल्यास सादर करण्यास सांगावे; ठोस पुरावा न सादर केल्यास या प्रसार माध्यमाविरोधात कारवाई करण्यात यावी. तसेच या बदनामीबद्दल त्या प्रसार माध्यमाच्या जबाबदार व्यक्तीने आंबोलीत उपस्थित राहून माफी मागावी व इतर माध्यमांमध्ये प्रसिद्ध करावी. अशा आशयाचे पत्र ग्रामपंचायतीने पोलीस निरीक्षक, सावंतवाडी यांना दिली आहे.
पर्यटन | उन्हाळी पर्यटनासाठी देशभरातील पर्यटकांनी पहिली पसंती गोवा आणि मनाली या ठिकाणांना दिल्याचे समोर आले आहे. OYO Summer Vacation index 2023 नुसार ही माहिती समोर आली आहे.
हॉटेलमध्ये वास्तव्यासाठी ऑनलाईन बुकिंग सेवा देणाऱ्या ओयो या कंपनीने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
OYO ने आपल्या अॅप द्वारे हे सर्व्हेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 15,000 लोकांना प्रश्न विचारण्यात आले. ओयोच्या सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांपैकी एकूण 92 टक्के लोक देशातील विविध ठिकाणांना भेट देण्याचे नियोजन करत आहेत.
या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, लोकांचे प्राधान्य 1 ते 3 दिवसांच्या मुक्कामासह लहान सहलींना आहे. तसेच पर्यटन स्थळ कोणते आहे, हे देखील पर्यटकांसाठी खूप महत्वाचे असते.
या सर्व्हेक्षणात पर्यटकांनी पर्वतीय प्रदेशांना पर्यटनासाठी सर्वाधिक 30 टक्के पसंती दर्शवली आहे. तर त्या खालोखाल समुद्रकिनाऱ्यांना 26 टक्के मते मिळाली आहेत. ओयोने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
ओयोने म्हटले आहे की, “भारताचे आवडते माउंटन डेस्टिनेशन मनाली आहे, त्यानंतर काश्मीर, मॅक्लॉड गंज, उटी आणि कूर्ग आहेत. तर समुद्रकिनाऱ्यांसाठी गोवा हा भारतीयांसाठी पसंतीचा मुख्य पर्याय आहे. एकूण 50 टक्के लोक गोव्यात प्रवास करू इच्छितात.
7 मे ते 14 मे 2023 या काळात हे संशोधन झाले आहे. त्यात म्हटले आहे की, “गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्सच्या मागणीत 20 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानंतर अंदमान निकोबार, केरळ, पाँडेचेरी आणि गोकर्णचा समावेश आहे.”
सिंधुदुर्ग | शामजोशी :कोकण रेल्वेमार्गावरील शेवटचे स्थानक सावंतवाडी हा राज्यातील शेवटचा थांबा आहे. या स्थानकास टर्मिनस चा दर्जा देण्यात आला आहे. मात्र हा दर्जा फक्त नावापुरताच दिला की काय असा प्रश्न वारंवार पडत आहे.
कोकणातील ईतर स्थानकांशी तुलना करता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे देण्यात आले आहेत. लांब पल्ल्याच्या गाडय़ा, सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांना येथे क्वचितच थांबा आहे. खूप प्रयत्न करून कसाबसा जनशताब्दी या गाडीला येथे थांबा मिळविण्यात यश आले आहे. एक दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांना येथे थांबे देण्यात आले होते. मात्र त्या गाड्यांची या स्थानकावर येण्याची वेळ खूपच गैरसोयीची होती. कमी प्रतिसाद म्हणुन त्या गाड्यांचे येथील थांबे काढून टाकले, मात्र त्याबदल्यात अजून दुसऱ्या कोणत्या गाडीला येथे थांबे दिले गेले नाही आहेत.
अलीकडेच वंदे भारत या गाडीची चाचणी घेतली असता टर्मिनस असूनही तिला या स्थानकावर थांबविण्यात आले नाही. यावरून या गाडीला सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्याची आशा कमी झाल्याचे बोलले जात आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तालुक्यातील प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतो. त्याचबरोबर आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर आणि ईतर पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक हे सोयीचे आहे. या स्थानकावर वंदे भारत आणि तेजस या सारख्या गाड्यांना थांबा दिल्यास येथील पर्यटनाचा विकास होईल. मुंबई गोवा महामार्ग येथून फक्त २ ते ३ किलोमीटर अंतरावर आहे,त्यामुळे काही सुविधा उपलब्ध करून देवून रस्ते वाहतुकीची समस्या सुटल्यास त्याचा फायदा येतील नागरिकांना तसेच येथे भेट देणार्या पर्यटकांना होणार आहे.