रत्नागिरी: रत्नागिरी शहरापासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या हातखंबा तारवे वाडी येथे काजू बागायातीला लागलेल्या भीषण वणव्यात एका शेतकऱ्याचा आगीत होरपळल्याने मृत्यू झाला आहे. गोविंद विश्राम घवाळी (वय ६५) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हातखंबा येथील काजूच्या बागेत आचानक वणवा पसरला. त्यामुळे बाग वाचविण्यासाठी शेतकरी गोविंद घवाळी यांनी धाव घेतली. मात्र एवढी आग भीषण होती की त्या आगीत ते होरपळले गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामस्थांनी या घटनास्थळी धाव घेतली.
रत्नागिरी: रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा अंतिम प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. अंतिम अधिसूचना काढल्यानंतर आठह कातळ शिल्पे राज्य संरक्षित होणार आहे.
खाली नमूद केलेली कातळशिल्पे संरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
भगवतीनगर,
चवे,
देवीहसोळ,
कापडगाव,
उक्षी,
कशेळी,
वाढारूणदे,
बारसू या रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.
ही शिल्प एका विशिष्ठ जागेत न आढळता समुद्र किनार्यालगत सुमारे ३०० कि.मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. कोकणातील या कातळशिल्पावर अश्मयुगी संस्कृती रूजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांच्या भोवती गूढकथा परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास संरक्षण आणि जतन होवू शकते. म्हणून सुधीर रिसबूड, त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.
संगमेश्वर: मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून २ ते ३ वर्षे अंदाजे वय असलेल्या या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार करत आहेत. वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थ श्री.सुर्वे व पोलिस पाटील यांनी कळविल्या नंतर परिक्षेत्र वन अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्यासमवेत घटनास्थळी समक्ष पाहणी केली. त्यावेळी सदर बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले व ती मादी आहे.
या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसा पूर्वी झाला असावा. बिबट्याचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला असावा असा अंदाज आहे
रत्नागिरी | उजाला पावडरच्या जाहिरातीबाबत माहिती देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी सोन्याचे दागिने साफ करुन देतो सांगत दागिने लंपास केल्याची घटना गोळप विवेकानंद येथे घडली. याप्रकरणी अज्ञात दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शोभा श्रीकांत पाटील (57, गोळप विवेकानंदनगर, गारवा घर नं. १३१९ रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली.
नक्की काय घडले? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शोभा पाटील यांच्या घरी दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी उजाला पावडरचे जाहिरातीबाबत माहिती दिली. त्यानंतर सोन्याचे दागिने साफ करुन देतो असे सांगितले. शोभा यांनी दागिने दिल्यानंतर त्यांनी गॅसवरील कुकरमध्ये साफ करण्यासाठी टाकले आहेत असे भासवले. शोभा या दागिने पाहण्यासाठी गेल्या असता दोघे तरुण दागिने घेऊन फरार झाले. कुकरमध्ये दागिने सापडलेच नाहीत. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच पूर्णगड पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. पोलिसांनी दोन अज्ञातावर भादविकलम 419, 420, 34 गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी : खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर एक पथक त्या ठिकाणी दाखल होऊन त्या खवले मांजराला जीवनदान देण्यात आले आहे. पथकाने खवले मांजर ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वैद्यकीय तपासणी करून ते सुरक्षित असल्याची खात्री करून घेण्यात आली त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
खेडशी नाका येथे खवले मांजर आल्याची माहिती केतन साळवी यांनी दूरध्वनीद्वारे दिली होती. या बचाव कार्यात पालीचे वनपाल एन.एस.गावडे, रत्नागिरीचे वनरक्षक प्रभू, साबणे, जाकादेवी वान रक्षक शर्वरी कदम यांनी सहभाग घेऊन खवले मांजर ताब्यात घेतले आणि नंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे, सहायक वन रक्षक रत्नागिरी आणि चिपळूण सचिन नीलख यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी श्री प्रकाश सुतार आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले.
खवले मांजरा विषयी या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
खवले मांजर भारतात हिमालय आणि ईशान्येकडील भाग वगळता सगळीकडे आढळतं. पण शिकारीमुळे बहुतेक भागात ही प्रजाती नष्ट झाली आहे. भारतात भारतीय खवले मांजर आणि चिनी खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. या प्राण्याच्या संपूर्ण शरीरावर खवले असतात त्यामुळे धोक्याची सूचना मिळाली की ते आपल्या शरिराचे वेटोळे करून घेते. हल्ला न करता स्वतःचं संरक्षण करण्याची वृत्ती निसर्गाने त्याला बहाल केलीये. साधारण पाच फूट लांब आणि मोठी शेपटी असलेल्या या प्राण्याला दात नसतात पण शिकार करण्यासाठी एक फुट लांब जीभ असते. खवले मांजर आपल्या या एक फूट लांबीच्या चिकट जीभेने मुंग्या, वाळवी आणि डोंगळे खावून जगते.
तस्करीसाठी वापर खूप पूर्वी स्थानिक लोक आणि आदिवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खायचे. पण पुढे त्यांना इतर पर्याय उपलब्ध झाल्याने आणि वन्यजीव संरक्षणाचा कायदा आल्याने यावर निर्बंध आले. पण गेल्या काही वर्षांमध्ये तस्करीच्या उद्देशाने भारतात खवल्या मांजराची शिकार वाढल्याचं दिसतं. खवले मांजरांची बिळं शोधून त्यांना बाहेर काढलं जातं आणि त्याची खवलं काढण्यासाठी उकळत्या पाण्यात टाकलं जातं. या खवल्यांची किंमत आंतरराष्ट्रीय तस्करीत लाखोंमध्ये असते.
या खवल्यांचा उपयोग ही खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो.
तस्करी रोखण्यासाठी उपाय. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने International Union for Conservation of Nature (IUCN) जाहीर केलेल्या रेड डेटा लिस्ट म्हणजेच धोक्यात आलेल्या प्राण्यांच्या यादीत खवले मांजराचा समावेश करण्यात आलाय. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत या खवले मांजराचा पहिल्या श्रेणीत समावेश करण्यात आलाय. स्थानिक पातळीवर सुद्धा काही प्राणीमित्र संस्था या प्रजातीला वाचविण्यासाठी पुढे सरल्या आहेत.
रत्नागिरी | चिपळूण येथे यांचा यंत्र वाशिष्टी नदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशन ची सामग्री दाखल झाली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील गाळ उपसा ची जबाबदारी नाम फाउंडेशनने स्वीकारली आहे. शासनाने गाळ उपसण्यासाठी लागणारा इंधन पुरवठ्यास मंजुरी दिली आहे त्यानुसार सध्या दोन पोकलेन दाखल झाले आहेत .वाशिष्टीने देखील गाळ उपशासाठी गतवर्षी एकूण तीन टप्पे करण्यात आले होते त्यानुसार काही प्रमाणात गाळ काढला गेला अजूनही मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे शिल्लक असल्याचे बचाव समितीचे म्हणणे आहे दुसऱ्या टप्प्यातील गाळ काढण्याचे काम अतिशय संत गतीने होत असल्याचे निदर्शनास येतात चिपळूण बचाव समिती पुन्हा आक्रमक झाली होती
२२ जुलै २०२१ रोजी चिपळूणात आलेल्या महापुराने संपूर्ण चिपळूण उद्धवस्त झाले.प्रत्येक क्षेत्राला या पुराचा जबरदस्त असा फटका बसला.या महापुराची कारणमीमांसा झाली तेव्हा धरणक्षेत्रातून सोडण्यात आलेले भरमसाठ पाणी तसेच चिपळूणमधील वाशिष्ठी व शिव या दोन नद्यामध्ये साठलेला भयंकर गाळ अशी दोन प्रमुख कारणे समोर आली.त्यासाठी चिपळूण बचाव समितीने पुढाकार घेत प्रथम नद्यांमधील गाळ काढण्याची मागणी शासनाकडे केली.प्रथम दुर्लक्ष झाल्याने बचाव समितीने थेट उपोषणाचे हत्यार उपसले आणि त्याला एका जनआंदोलनाचे स्वरूप मिळाले आहे.
रत्नागिरी:राजापुरातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या खुनातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचे तो वापरात असलेल्या मोबाईल सेवा कंपनीकडे कॉल डिटेल्स पोलिसांकडून मागवण्यात आले आहेत. त्यामुळे त्याचा कोणा कोणाशी संपर्क होते त्याचा उलगडा होणार आहे.
वारीसे यांचा खून हा पूर्वनियोजित व प्लॅन करून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार घटनेच्या दिवशी पंढरीनाथ हा कुणाकुणाच्या संपर्कात होता. याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच या आरोपीच्या संपर्कात मोठे नेते आणि अधिकारी असल्याचे आरोप पण होत आहेत. पंढरीनाथ याच्या कॉल डिटेल्स मुळे पोलिसांना आरोपी सोबत या खुनात कोण कोण सामील आहेत याचा तपास लावणे सोपे होईल.
दरम्यान आरोपी पंढरीनाथ यानेही खुनाची कबुली पोलिसांजवळ दिली आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अखेर पोलिसांकडून पंढरीनाथ याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रत्नागिरी: शुक्रवारी (१० फेब्रुवारी) सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान डिझेलची तस्करी करणारी बाेट सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून हर्णै- गुहागर दरम्यानच्या समुद्रात पकडली.आयएनडी/एमएच/७/एमएम/२८५१ (साेन्याची जेजुरी) असे कारवाई केलेल्या बाेटीचे नाव असून, बाेटीच्या मालकाचे नाव कळू शकलेले नाही. या बाेटीवरून सुमारे २४ हजार रुपयांचा डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे
मागील महिन्यात दिवसांत ५० मेट्रिक टन डिझेलची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरीतील सीमा शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला हाेता. हर्णै-गुहागर समुद्रात ४/५ नाॅटीकल माईलमध्ये दुपारी १:३० वाजता डिझेल भरून नेणारी बाेट अधिकाऱ्यांना दिसली. या बाेटीत तस्करीचे डिझेल असल्याच्या संशयावरून ही बाेट पकडून दाभोळ बंदरामध्ये आणण्यात आली.
या बाेटीची तपासणी केली असता बाेटीवर चार खलाशी असल्याचे पुढे आले. त्यांच्याकडे चाैकशी केली असता रात्री समुद्रात माेठ्या व्हेसलमधून डिझेल बाेटीत उतरून घेतल्याचे सांगितले. बाेटीची तपासणी केली असता बाेटीमध्ये एकूण १७ वेगवेगळे भाग आहेत. त्यातील दाेन भाग रिकामे असून, उर्वरित १५ भागांमध्ये डिझेलचा साठा सापडला. हा साठा सुमारे २४ हजारांचा असल्याचे तपासात पुढे आले आहे. ही बाेट नेमकी काेठून आली याचा तपास सुरू आहे. रत्नागिरी सीमा शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अमित नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी : पत्रकार वारिसे यांच्या मृत्यूनंतर रिफायनरी विरोधकांकडून, पत्रकारांकडून आणि सामान्य जनतेतून संतप्त प्रतिक्रया देण्यात येत आहेत.. तळकोकणतील ‘रानमाणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्रसाद गावडे याच्या संतापाचा परखड भाषेतील एक विडिओ पण बराच व्हायरल होत आहे.
‘रानमाणूस’ म्हणतो >>>>>>>>>
तो मेला नाही! तो मारला गेला आहे! रिफायनरी विरोधी गावकर्यांचा आवाज बनलेल्या शशिकांत वारिसे या निर्भीड, सच्च्या पत्रकाराचा दिवसाढवळ्या खून झाला. माझं शांत, संयमी, सुखी आणि समाधानी कोंकण आता तसे राहिले नाही. देवाला, देवचाराला सत्याच्या रुपाला घाबरणारे लोक आता बदलेले आहेत. रानपाखरांसारखे जगण्याचे स्वातंत्र्य भोगणारे लोक आता घाबरून जगात आहेत कारण उकिरड्यावरची गिधाडे आता आमचा आसमंत बळकावू पाहत आहेत. आज वारिसे गेला, उद्या गावडे जाईल तर परवा परब.
तुम्ही लाईक, शेयर आणि कंमेंट करून मोकळे व्हा. विरोध करू नका आणि व्यक्त होऊ नका कारण इथल्या राखणदारालाही मारून टाकणारी नरभक्षकी जमात मोकाट फिरते आहे. सत्ता,संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हंटला तर डोकं फोडतील……. हलकट, लाचारांचा देश म्हंटला तर रस्त्यावर झोडतील…….. खरीदले जाणाऱ्यांच्या देश म्हंटला तर वाट रोखतील…….. देवाधर्माविषयी, नेत्यांविषयी वाईट बोलले तर नाक्यावर गाठून ठोकतील…….. शोषण करणाऱ्यांचा देश म्हंटला तर नोकरीवरून कडून टाकतील……. म्हणून माझ्या प्यारे भाईयों और बेहेनों, माझ्याकडून या नपुसंकत्वाला सलाम…… सबको सलाम ………. सबको सलाम……….
मुंबई :पत्रकार वारीसे यांच्या मृत्यू नंतर अनेक आरोप आणि प्रत्यारोप होत असताना अजून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पत्रकार उन्मेष गुजराथी यांनी पुराव्यानिशी ‘स्प्राऊट्स’ या इंग्रजी दैनिकात रत्नागिरीतील रिफायनरी संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली आहे.
या बातमीचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे
रत्नागिरी येथील विनाशकारी रिफायनरीच्या विरोधात स्थानिक जनतेमध्ये प्रक्षोभ आहे. या प्रक्षोभाला वाचा फुटू नये. म्हणून प्रसारमाध्यमांनाच ‘मॅनेज’ करण्याचे काम चालू आहे. विशेष म्हणजे काही स्थानिक पत्रकारांना तर थेट जमिनीच आमिषापोटी दिलेल्या आहेत, अशी खळबळजनक माहिती ‘स्प्राऊट्स’च्या स्पेशल इन्व्हेस्टीगेशन टीमच्या (एसआयटी ) हाती आलेली आहे.*
‘टीव्ही ९ मराठी’चे स्थानिक पत्रकार मनोज लेले, ‘मुंबई आजतक’चे राकेश गुडेकर आणि ‘साम’चे अमोल कलये यांना पंढरीनाथ आंबेकर यांनी कोट्यवधी रुपयांच्या जमिनी अमिषापोटी दिल्या आहेत. यासंबंधीचा सातबारा उताराच ‘स्प्राऊट्स’च्या एसआयटीच्या हाती आलेला आहे.
या सातबारा / नमुना ८ अ मध्ये स्वतः प्रमुख आरोपी आंबेकरसुद्धा जमीन मालक असल्याचे दिसून येत आहे. आंबेकर हाच अशी जमिनी गिफ्ट देण्याचे प्रकार करायचा. या पत्रकारांना विविध कामांसाठी लागणारी प्रकल्पातील कंत्राटेसुद्धा मिळणार आहेत. याशिवाय प्रकल्पग्रस्त दाखला, नोकरी किंवा नुकसानभरपाई तर मिळेलच. स्मार्ट सिटीत घरसुद्धा हातात येणार आहे. हे सर्व फायदे समोर ठेवत रत्नागिरी परिसरातील बहुतांशी दैनिके, टीव्ही आणि सोशल मीडियाचे पत्रकार यांना आंबेकरने आपल्या बाजूने वळवले आहे. परिणामी सध्या वारिसे यांच्यासारखा एखाद दुसरा पत्रकार याला अपवाद ठरत होता.
पंढरीनाथ आंबेकर हा भूमाफिया आहे. रिफायनरीला विरोध करणारे स्थानिक कार्यकर्ते, पत्रकार यांना दहशत दाखवण्याचे काम हा आंबेकर करीत असे. याच आंबेकर याने पत्रकार शशिकांत वारिसे याची अंगावर अवजड जीप घालून हत्या केली. सध्या हा प्रमुख आरोपी अटकेत आहे.
केवळ स्थानिकच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रमुख वृत्तपत्रांत रिफायनरीसंदर्भात बातम्या येवू नये, याची काळजी रिफायनरीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर करत असतात. त्यासाठी या काही प्रमुख प्रसारमाध्यमांच्या मालक व संपादकांना ‘पाकिटे’ देण्याचे काम नागवेकर करीत असतात. जे पत्रकार ही आमिषे, धमक्या यांना भीक घालत नाहीत. त्यांना अगदी जीवे मारण्यातही येते, ही सर्व कामगिरी आरोपी पंढरीनाथ आंबेकर करीत असे. आरोपी आंबेकर हा नागवेकर यांचा उजवा हात मानला जात आहे. त्यामुळे वारिसे यांच्या हत्या प्रकरणात नागवेकर यांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
भीतीपोटी पत्रकारांनी नातेवाईकांच्या नावावर घेतल्या जमिनी ‘स्प्राऊट्स’च्या हाती आलेल्या कागदपत्रांमध्ये वरील पत्रकारांना आंबेकरने जमिनी दिल्याचे आढळून येते. काही पत्रकारांनी मात्र स्वतःच्या नावावर जमिनी न घेता नातेवाईकांच्या नावांवर जमिनी घेतल्याचे दिसून आले आहे. नाणार प्रकल्प जाहीर झाल्यापासून आंबेकर हा जमीन माफिया म्हणून समोर आला. त्याने गुजरात, राजस्थान, दिल्लीमधील लोकांनासुद्धा ‘स्थानिक शेतकरी’ दाखवून बेकायदेशीरपणे जमिनी विकलेल्या आहेत, याची सखोल चौकशी करण्यात यायला हवी, मात्र ही चौकशी ‘मॅनेज’ होण्याची शक्यता अधिक आहे.