मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती वाढली आहे.
आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.
मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे. 20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.
कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.