Category Archives: सिंधुदुर्ग
सावंतवाडी :गोवा ते नागपूर असा 805 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग याला कोल्हापूर सांगली लातूर येथून प्रचंड विरोध होत आहे. आता त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये या सहित अन्य गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अंधारात ठेवल्याचे ठासून सांगितले. काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार 28 मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचे दिसून आले. या सर्व गावांमध्ये लवकरच ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व गावांचा मिळून सावंतवाडी तालुक्याचा तालुका मेळावा घेण्याचे नियोजन आहे. या अगोदर खनिज संपत्तीच्या खाणींकरिता खाजगी कंपन्यांकडून शासनाची हात मिळवणी करून गावकर यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे खनिज संपत्ती यांच्या खाणी तयार करून त्याची मालवाहतूक करण्यासाठीची कंत्राटदार व भांडवलदारांची सोय असल्याचे शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पश्चिम घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यावरण जैवविविधता धोक्यात येणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर सांगली लातूर येथील शेतकरी जर विरोध करत असतील तर त्याबरोबर सिंधुदुर्गचे शेतकरी देखील सोबत असतील असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.
या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौशल सदस्य गिरीश फोंडे, पर्यावरण तज्ञ काका भिसे,सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत, कोल्हापूरचे शेतकरी सुधाकर पाटील, के डी पाटील, तात्यासो पाटील, बाळासाहेब पाटील, प्रवीण नार्वेकर जयसिंग पाटील हे सहभागी झाले होते.
लवकरच या गावांच्या स्वतंत्र सभा व तालुका मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे.




सावंतवाडी:सध्याच्या सोशल नेटवर्किंग युगात जनजागृती करण्यासाठी किंवा आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करून अपेक्षित परिणाम मिळवता येतात. अगदी जवळचे कोकणातील उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर फेसबूक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटवर बनविण्यात आलेले Sawantwadi Railway Station – Terminus हे पेज.
सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि कोकण रेल्वे संबधीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, जनजागृती करून समस्यां सोडविण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्यात यावा या हेतूने या पेजची निर्मिती करण्यात आली. कोकण रेल्वे अभ्यासक सागर तळवडेकर यांनी हे पेज बनवले आहे. या पेज द्वारे त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते मिहीर मठकर, विहंग गोठोस्कर, भूषण बांदिवडेकर,तेजस पोयेकर ईत्यादींनी पोस्ट, लाईव्ह च्या माध्यमातून वेळोवेळी अनेक कोकण रेल्वे संबधी अनेक समस्या येथे मांडून जनजागृती केली आहे.
दोन दिवसांपूर्वी या पेजवर या कार्यकर्त्यांनी फलक मोहीम राबवून काही फोटो पोस्ट केले होते. ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून तिच्यावर दृश्ये views, लाईक आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. “कोकण रेल्वे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा आशयाची फलक मोहीम ”कोकणवाचवा” आणि ”SaveKokanRailway” या hashtag सहित कार्यकर्त्यांनी राबवून ते फोटो या पेज वर पोस्ट केले होते.
आम्हाला अजून पाठिंबा दर्शविण्यासाठी आमच्या ह्या चळवळीत सामील व्हा.या पेज ला फॉलो करून आमच्या सोबत जोडले जा ही तुम्हा सर्वांना विनंती. आवाहन या पोस्ट मध्ये करण्यात आले आहे
#Save Konkan Railway..
#Merge Konkan Railway With Indian Railways.
#Sawantwadi Terminus@followers
Posted by Sawantwadi Railway Station-Terminus on Friday 22 March 2024
सावंतवाडी, दि. २३ मार्च : शहराच्या पर्यटन वाढीसाठी नरेंद्र डोंगरावर सुरू केलेली जंगल सफारी दिनांक ३१ मार्च पर्यंत मोफत करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
या सफारीच्या उद्घाटन प्रसंगी पर्यटकांना ही सेवा दिनांक ३१ मार्चपर्यंत मोफत देण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सफारी आता मोफत सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आली आहे.
आशिष सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री केसरकर यांनी एका कार्यक्रमात ही सफर मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्या ठिकाणी वन विभागाकडून लहान मुलांसाठी ५० रुपये तर मोठ्यांसाठी १०० रुपये असा दर आकारण्यात आला होता. त्यानंतर ४ दिवस पैसे घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याची दखल केसरकर यांच्याकडून घेण्यात आली असून, ही सफारी मोफत देण्यात यावी, अशा सूचना त्यांच्याकडून वन विभाग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोफत सफर सुरू केली असून, या सफारीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे
Loksabha Election 2024|लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अजून जाहीर करण्यात आला नसून हा विषय महायुतीसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरणभैय्या सामंत ही दोन नाव प्रामुख्याने या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. आज भाजपची महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या जागेसाठी दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आजतरी या ही उत्सुकता संपणार अशी आशा निर्माण झाली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जनसंपर्क मोठा आहे. सर्वपक्षीय असलेले राणे यांचे संबंध, राणे यांची काहीशी आक्रमक शैली, तसेच राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले निलेश राणे याच मतदारसंघात यापूर्वी खासदार राहिले आहेत. त्यांचाही संपर्क आजवर या मतदारसंघात कायम राहिला आहे. या नारायण राणे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.
शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू असलेले किरण भैय्या सावंत हे शासनाच्या रत्न सिंधू योजनेचे सदस्य आहेत. त्यांनी गेले काही महिने लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी संपर्क सुरू केला आहे. इतकेच नाही तर उदय सामंत यांच्या यशस्वी कारकिर्दीमागे आणि उदय सामंत यांच्या प्रत्येक निवडणुकीत किरणभैय्या सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ही दोन वेळा भेट घेत किरण सामंत यांनी आशीर्वाद घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नारायण राणे यांच्या ऐवजी किरणभैय्या सामंत यांना मिळू शकते.
दिपक केसरकर यांचे विधान चर्चेत..
काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी आंगणेवाडी यात्रेच्या दरम्यान माध्यमांजवळ बोलताना मोठे वक्तव्य केलं होतं. महायुती जेव्हा मजबूत आहे त्यावेळेला कोण कोणाच्या चिन्हावर लढलं याला फार महत्त्व नसतं, कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला पालघरची सीट शिवसेनेला दिली त्यावेळेला भाजपने आपला उमेदवार सुद्धा दिला होता, त्यामुळे जिथे जे चिन्ह चालतं आणि निवडून येण्याची शक्यता अधिक असते तिथे आपला उमेदवार द्यायला कोणताच कमीपणा नसतो, नाहीतर मग युती कशाला म्हणायची? असं मोठे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यामुळे किरणभैय्या सामंत यांना लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, तरी ते भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू शकतात, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.