Category Archives: स्थानिक बातम्या

श्री क्षेत्र टेरव येथे २ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला रंगणार वार्षिक जत्रोत्सव.

   Follow us on        

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरव या पुरातन व सुप्रसिद्ध देवस्थानचे ग्रामदैवत श्री वाघजाई देवी आणि कुलदैवत श्री कुलस्वामिनी भवानी देवी आहे. श्री काळकाई देवी ही माहेरवाशिणींची रक्षणकर्ती देवी म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच जागृत आणि नवसाला पावणाऱ्या देवता असा या देवतांचा लौकीक आहे. शक्ती, युक्ती, बुद्धी व भक्ती यांचा अजोड मिलाप असलेल्या महाबली श्री हनुमान जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा करण्यात येतो, यंदा हा उत्सव गुरूवार दिनांक २ एप्रिल रोजी मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. श्री भवानी वाघजाई व हनुमान मंदिराची अप्रतिम रंगरंगोटी करून मंदिर यात्रोत्सवासाठी सजविण्यात आले आहे. सदर रंगकाम ज्येष्ठ आर्किटेक्ट श्री सतीश राव, सीपीएमसी, मुंबई यांच्या सल्ल्याने व देखरेखीखाली ठेकेदार श्री अमित पारकर, आकार आविष्कार इन्फ्रा, मुंबई यांनी केले आहे.

चैत्र पौर्णिमेला रुढी परंपरेनुसार सूर्योदय झाल्यावर ब्राम्हण, मानकरी, ग्रामस्थ आणि पुजारी यांच्या उपस्थितीत मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करतील. दुपारी १२ वाजता ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही मानकरी श्रीफळाच्या तीन जोड्या श्री कुलस्वामिनी भवानी मातेसमोर ठेवून व गाऱ्हाणे घालून पुजारी ते श्रीफळ वाढवतील व प्रसाद म्हणून मानाप्रमाणे त्याचे वाटप करतील. तसेच मंदिराच्या पोवळीबाहेर पूर्व दिशेस देवीचे देणे मागणे दिले जाईल. मंदिराच्या बाहेर पावट्याच्या घुगऱ्या व देवीच्या देण्या मागण्याचा प्रसाद दिला जाईल. रुढी परंपरेनुसार पूजाविधी संपन्न झाल्यावर, पुजारी पालखीत *कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी* या देवतांची रुपी लावतील. शतकाच्या दिशेने वाटचाल करणारा टेरव गावचा चैत्रपौर्णिमा जत्रोत्सव म्हणजेच ग्रामस्थ, माहेरवाशिणी, चाकरमानी आणि भक्तांच्या आनंदाला उधाण आणणारा दिवस असतो. चैत्र पौर्णिमे निमित्त पंचक्रोशीतील मौजे कामथे व चिंचघरी येथील पालख्यांचे मिरवणुकीने वाजतगाजत रात्रौ टेरव येथे आगमन होईल. पालख्या विद्युत रोषणाईंनी तसेच विविध प्रकारच्या फुलांनी सजविलेल्या जातील. ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळीत तिन्ही पालख्यांची मिरवणूक मंदिराकडे मार्गस्थ होईल. तिन्ही पालख्या नाचत उंचावून एकमेकींना भेटतात ते दृश्य विलोभनीय असते. मंदिरात तिन्ही पालख्या स्थानापन्न झाल्यावर दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्या नंतर सालाबादप्रमाणे रात्रौ मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही पालख्यांची पूजा व सन्मान केल्यावर आपआपल्या गावी मार्गस्थ होतील. सदर वेळी श्री क्षेत्र टेरवची पालखी मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वारापर्यंत निरोप देण्यासाठी नेली जाईल आणि अशाप्रकारे जत्रोत्सवाची सांगता होईल.

तरी सर्व भाविक, चाकरमानी, माहेरवाशिणी व हितचिंतक यांनी वार्षिक जत्रोत्सवानिमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Sawantwadi: मळगाव घाटीत रस्त्यावर डिझेल सांडल्याने अपघात; ५ ते ६ दुचाकीस्वार जखमी

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २० : सावंतवाडी–रेडी मार्गावरील मळगाव घाटीत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडल्याची घटना समोर आली आहे. डी. के. टुरिझमच्या परिसरापासून ते मुख्य वळणाखालील भागापर्यंत रस्त्यावर डिझेल पसरल्याने संपूर्ण मार्ग अत्यंत घसरडा बनला आहे.

या घसरड्या रस्त्यामुळे पाच ते सहा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटना घडल्या असून त्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्यावर सांडलेले डिझेल वेळेत साफ करण्यात आले नसल्याने आणि रात्रीच्या अंधारामुळे धोका अधिक वाढला होता. विशेषतः दुचाकीस्वारांना या ठिकाणी वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघात होण्याची शक्यता कायम आहे.

दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, वाहनांचा वेग कमी ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्यावर सांडलेले डिझेल साफ करावे, अशी मागणी वाहनधारकांकडून जोर धरत आहे.

आजही जिवंत आहे माणुसकी! हरवलेले पाकीट प्रामाणिक हातांनी परत

   Follow us on        

संदेश सुरेश जिमन: या काळात स्वार्थ, संशय आणि बेपर्वाई वाढत असताना, संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे परिसरात घडलेली एक छोटीशी घटना माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जागा करणारी ठरली आहे.

अंत्रवली मालपवाडी गावातील नितेश गंगाराम मालप हे कलंबस्ते येथे प्रवास करत असताना त्यांचे पाकीट हरवले. त्या पाकिटात केवळ पैसे नव्हते, तर त्यांच्या ओळखीचा आधार असलेली लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आणि गाडीची मूळ कागदपत्रे होती. पाकीट हरवल्याचे लक्षात येताच चिंता, अस्वस्थता आणि भीती स्वाभाविकच होती.

मात्र हे पाकीट तेलेवाडी येथील ग्रामस्थ सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांना सापडले आणि इथूनच माणुसकीचा खरा चेहरा समोर आला. कोणताही लोभ न धरता, कुठलीही अपेक्षा न ठेवता, त्यांनी प्रामाणिकपणाने ते पाकीट मूळ मालक नितेश मालप यांना शोधून काढून सुरक्षितपणे परत केले.

आज जिथे अनेकदा हरवलेली वस्तू परत मिळेल याची आशा मावळते, तिथे सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांच्या या स्तुत्य कृतीने समाजाला प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा दीप उजळून दाखवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

सिंधुदुर्ग : फोंडाघाट घोणसरी परिसरात बिबट्याच्या बछड्याला वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद; ग्रामस्थांना मोठा दिलासा

   Follow us on        

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – कणकवली तालुक्यातील फोंडाघाटजवळील घोणसरी-बोंडगवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्यांच्या कुटुंबातील एका बछड्याला वनविभागाने यशस्वीपणे जेरबंद केले आहे. ही कारवाई यशस्वी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, भीतीचे वातावरण काहीसे निवळले आहे.

घोणसरी गावातील बोंडगवाडी आणि पिंपळवाडी भागात गेल्या आठवड्यापासून बिबट्याची नर, मादी आणि दोन बछडे वावरत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. विशेषतः सतीचे मंदिर ते बोंडगवाडी हा जंगलमय आणि निर्मनुष्य मार्गावर या बिबट्यांचे वारंवार दर्शन होत होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. कामानिमित्त बाहेर पडताना लोकांना एकटे जाणे धोकादायक वाटत असल्याने घोळक्याने प्रवास करावा लागत होता.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घोणसरीचे सरपंच प्रसाद राणे आणि पोलीस पाटील भालचंद्र राणे यांनी फोंडाघाट वनविभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आणि बिबट्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. बिबट्याच्या शिकारी आणि वावराच्या आधारे गुरुवारी रात्री पिंजरा लावण्यात आला होता.

वनाधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि पिंजऱ्यात बिबट्याचा एक बछडा अलगद अडकला. या बछड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन कोल्हापूर वनक्षेत्रात हलवण्यात आले आहे. ही यशस्वी मोहीम फोंडाघाटचे नूतन वनपाल सारीक फकीर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

तथापि, एक बछडा जेरबंद झाला असला तरी नर-मादी बिबट्या आणि दुसरा बछडा परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

कोकणाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष: मतदारांनी सजग राहावे – समाजसेवक आकाश पोकळे

   Follow us on        

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना कोकणातील विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी न मिळणे या प्रश्नांकडे समाजसेवक आकाश पोकळे यांनी लक्ष वेधले आहे. मतदारांनी विकासाच्या निकषावर मतदान करून कोकणाचे हित जपावे, असे आवाहन त्यांनी केले.

पोकळे यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई–गोवा महामार्गाचे काम रखडले असून कोकणातील नागरिकांना या समस्येमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विविध प्रकल्पांबाबत स्थानिकांमध्ये असंतोष असून आंदोलने करताना नागरिकांना पोलिसांच्या काठ्यांचा सामना करावा लागणे ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यातही कोकणातील लोकप्रतिनिधी प्रभावीपणे पुढाकार घेत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रेल्वे स्थानकांवरील स्टॉल, लहान व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील रोजगारात स्थानिक युवकांना प्राधान्य देण्यासाठी ठोस धोरण राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

कोकणाचा सर्वांगीण विकास आणि स्थानिकांच्या हिताच्या दृष्टीने सक्षम नेतृत्व आवश्यक असल्याचे सांगत पोकळे यांनी मतदारांना “विचारपूर्वक मतदान करा आणि कोकणाचे संरक्षण करा” असे आवाहन केले.

Sangameshvar: अंत्रवली ग्रामपंचायत कार्यालयाला आश्वासनाचा विसर, पत्रकार संदेश जिमन यांच्या स्मरणपत्राने कार्यकारी मंडळाला येईल काय जाग?

   Follow us on        

गतवर्षी १२ जून २०२३ रोजी पत्रकार संदेश जिमन आणि वाडी ग्रामस्थ यांनी प्रशासनाला धारेवर धरत मागणी नसताना बांधण्यात आलेल्या मालपवाडी येथील साकवाचा मुद्दा उपस्थित केला. त्या साकवाला दोन्ही बाजूला चढणे उतरणे यासाठी योग्य ती सुविधा नसल्याने उपोषण करणार असे पत्र संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला दिले होते.

या पत्राची दखल घेत सरपंच महोदयांनी लेखी पत्र संदेश जिमन यांना दिले. त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला असा की “३१ जानेवारी २०२४ पर्यंत साकवाच्या दोन्ही बाजूचे काम पूर्ण केले जाईल.” हे एक वेळकाढू आश्वासन ठरले. अद्याप ते काम पूर्ण न झाल्याने पत्रकार संदेश जिमन यांनी या समस्येकडे आपला मोर्चा पुन्हा वळवला आहे.

दिनांक २० जून २०२४ रोजी ग्रामपंचायत अंत्रवली येथे ग्रामसेवक महोदयांना स्मरणपत्र देऊन संदेश जिमन यांनी चांगली झाडाझडती घेतली. या पत्रात संदेश जिमन यांनी ग्रामपंचायत अंत्रवली च्या कार्यकारी मंडळाला दिलेल्या आश्वासनाकडे डोळे झाक का केली? उपोषणाला विरोध करण्यासाठीच केवळ हा आश्वासनाचा बनाव होता काय?
असे प्रश्न विचारले आहेत.

ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाने जर कर्तव्यदक्षतेने हा विषय मार्गी लावला असता तर स्थानिक ग्रामस्थांना आणि संदेश जिमन यांना हा खटाटोप करावा लागला नसता. केवळ मोठ्या पदांची लालसा बाळगणे पण प्रत्यक्षात त्या पदांचे महत्त्व ध्यानात न घेता कामात कुचराई करणे हे कितपत योग्य! कोणत्या दबावामुळे हे काम आजवर पुर्ण झाले नाही,याचे उत्तर गुलदस्त्यात आहे.

या गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी. प्रश्न निकाली काढावा. जर काहीच शक्य नसेल तर संदेश जिमन यांनी कायदेशीर मार्गाने जाण्यास ग्रामपंचायत कार्यालयाची काही हरकत नसल्याचे लेखी पत्र ग्रामपंचायतीने द्यावे असे पत्रात म्हटले आहे.

या विषयाचे गांभीर्य ध्यानात घेऊन संबंधित विभागाने चौकशी आदेश देऊन सत्यता पडताळणे गरजेचे आहे. दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. लाखोंचा निधी कोणाच्या भल्यासाठी? ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांसाठी की जनसामान्यांच्या हितासाठी?  ही अनागोंदी कोणाच्या आशिर्वादाने चालते? याला जबाबदार कोण? कारवाई झाली पाहिजे! ही ग्रामस्थांची मागणी आहे.

Chiplun: श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेचा गोंधळ शुक्रवार १३ जून, २०२५ रोजी संपन्न होणार.

   Follow us on        

चिपळूण : श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार शुक्रवार दिनांक १३ जून, २०२५ रोजी मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदान संपन्न होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते.

 

जसे वैष्णवाच्यांत भजन – कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात, तसेच देवीचा, खंडोबाचा, ज्योतिबाचा गोंधळ, जागर करण्याचा अनेक कुळांचा कुलाचार आहे. ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी श्री भवानी माता आहे. गोंधळ हा भवानी मातेचा मुख्य व महत्वाचा धार्मिक विधी आहे.

 

देवस्थानच्या पुजाऱ्यानी पूजेची मांडणी व घट स्थापित केल्यावर मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. त्या नंतर दिवट्या पाजळून घटाच्या भोवती पाच प्रदक्षिणा घालून *’भैरी – भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो -उदो -उदो’* असा उदघोष करण्यात येईल. परंपरेनुसार हा गोंधळ, गोंधळी न घालता श्री क्षेत्र टेरव गावातील कदम घालतील.

 

कुलस्वामिनी श्री भवानी मातेस गाऱ्हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधिवत पूजा-अर्चा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

 

दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल व अशा प्रकारे गोंधळ ह्या धार्मिक विधीची सांगता होईल.

 

गोंधळ या भवानी मातेच्या मुख्य व आवडत्या मंगल उत्सवात सर्वांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

 

Dodamarg: दोन कार समोरासमोर धडकल्याने अपघात

   Follow us on        

दोडामार्ग: कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन गाड्या समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात सकाळी १०:०० च्या सुमारास घडला. अपघातात दोन्ही गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमीना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळेदोडामार्ग ते तिलारी या राज्यमार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

Chiplun: राधाकृष्ण वाडी, टेरव आयोजित कबड्डी स्पर्धेत कळकवणे क्रीडा मंडळ विजेता तर काळेश्री कान्हे, मोडकवाडी संघ उपविजेता.

 

   Follow us on        

Chiplun: श्री सत्यनारायण महापूजे निमित्त राधाकृष्ण साधनालय संघ पुरस्कृत, राधाकृष्ण क्रीडा मंडळ आयोजित भव्य कबड्डी स्पर्धा गुरुवार ८ मे ते शनिवार दिनांक १० मे २०२५ या कालावधीत कै.बाबुराव दादाजीराव कदम क्रिडा नगरीत राधाकृष्ण मंदिरा समोर संपन्न झाली. सदर स्पर्धा ग्रामीण कबड्डी विकास संघटना, चिपळूण या संस्थेच्या मान्यतेने घेण्यात आल्या. एकूण २० संघानी सदर स्पर्धेत भाग घेतला. कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन श्री अजित आबाजीराव कदम संचालक सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई, टेरवच्या उपसरपंच सौ. रिया राकेश म्हालीम व वाडीतील मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते ८ मे रोजी करण्यात आले.

स्पर्धेस विजेत्या संघास रोख पारितोषिके व आकर्षक चषक भेट देण्यात आले.

१. कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या अंतिम विजयी संघास कै. वसंतराव अमृतराव कदम यांच्या स्मरणाचा श्री अजित वसंतराव कदम यांसकडून रुपये रोख ₹. १०,००० व आकर्षक चषक,

२. काळेश्री कान्हे, मोडकवाडी या अंतिम उपविजयी संघास कै. सौरभ सुहासराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री सुहास (नंदू) दत्तात्रयराव कदम (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) यांस कडून रोख ₹.७५०० व आकर्षक चषक,

३, ४ केदारनाथ, आडरे व केदार वाघजाई, कोळकेवाडी या दोन्ही उपांत्य विजय संघास प्रत्येकी ₹. ५,००० व आकर्षक चषक कै. रघुनाथ नारायणराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री अशोक रघुनाथराव कदम व कै. महादेवराव कृष्णाजीराव यांच्या स्मरणार्थ श्री निलेश महादेवराव कदम यांसकडून देण्यात आले.

५. काळेश्री कान्हे, मोडकवाडी या संघाचे श्री राकेश मोडक यांस उत्कृष्ट चढाई पटू म्हणून कै. अनंतराव सखारामराव मोर यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत अनंतराव मोरे आणि बंधू,

६. कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या संघाचे श्री सोहम कदम यांस उत्कृष्ट पकडी करिता कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री स्वप्नील मानसिंगराव कदम,

७. तसेच कळकवणे क्रीडा मंडळ, कळकवणे या संघाचे श्री संकेत घडशी यांची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कै. दीपकराव दिनकरराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री विनय दीपकराव कदम,

८. तर कुलस्वामिनी धामणवणे (उंडरेवाडी) या संघास शिस्तबद्ध संघास कै. राधेश्याम पांडुरंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश राधेश्यामराव कदम यांच्या वतीने रोख रक्कम व आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट खेळाडूस कूलरही भेट देण्यात आला. सदर बक्षिचांचे वितरण सर्वश्री दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, अजितराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार, गोपीचंदराव, अनिलराव, संभाजीराव, अनंत साळवी, अशोकराव, भाऊराव, विश्वासराव, अशोकराव या मान्यवरांच्या शुभहस्ते शनिवार दिनांक १० मे, २०२५ रोजी करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांसाठी २५ सन्मानचिन्हे कै. सौ. वनमाला मानसिंगराव कदम यांच्या स्मरणार्थ श्री मानसिंगराव बाबुराव कदम यांनी प्रायोजित केली.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वाडीतील सर्व अबाल वृद्धांनी अपार मेहनत घेतली. सर्व तरुणांनी तसेच वाडीतील अनेक मान्यवरांनी यथाशक्ती अर्थिक सहाय्य करून संस्थेस उपकृत केले.

सदर संघाच्या वृक्षाचे, वटवृक्षात रुपांतर करण्यासाठी गेली पन्नास वर्षे कैलासवासी हणमंतराव, काशीरामराव, उद्धवराव, वसंतराव, दत्तारामराव, पर्वतराव, पांडुरंगराव, दत्तात्रयराव, सखारामराव, भाऊराव, जगन्नाथराव, बाबुराव या व इतर अनेक सद्गृहस्थानी अपार कष्ट घेतले. सध्या राधाकृष्ण साधनालय संघाचे कार्य पुढे नेण्याचे काम सर्वश्री धोंडजीराव, रघुनाथराव, दशरथराव, मानसिंगराव, बजाजीराव, संभाजीराव, भाऊराव, विश्वासराव, बाळकृष्णराव, अशोकराव, गोपीचंदराव, जिजाजी घडशी, वासुदेव सुतार व शहरातील व वाडीतील सर्व लहान थोर ग्रामस्थ व तरूण वर्ग एकत्रितपणे करत आहेत. राधाकृष्ण मंदिरात, वाडीत होणारे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदान एकत्र पणे साजरे करण्यात येतात.

कबड्डी स्पर्धेस आलेल्या अंदाजे ₹ १,५०,००० खर्च वाडीतील सर्व लहान थोर मंडळींनी सढळहस्ते सहकार्य करून उचलल्याबद्दल आम्ही सर्व तरुणवर्ग व बांधवांचे आभारी आहोत . सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वश्री शिरीष पांडुरंगराव कदम, ओंकार (बाबू) अशोकराव कदम, प्रशांत अनंतराव मोरे, विनय दीपकराव कदम, राजेश मारुतीराव कदम व ओम अविनाशराव कदम यांनी विशेष मेहनत घेतली.

स्पर्धेचे नियोजन व समालोचन श्री चंद्रकांत शंकरराव मोरे, मुंबई उपनगर कबड्डी असोसिएनचे मा.जेष्ठ पदाधिकारी यांनी उत्तम रित्या पार पाडले.

दोडामार्ग भेडशी गावची सुकन्या साक्षी गावडेची गोवा रणजी क्रिकेट संघात निवड

 

मुंबई: दोडामार्ग तालुक्यातील भेडशी खानयाळ गावची सुकन्या आणि सद्यस्थितीत मुंबई-दहिसर येथे स्थायिक असलेल्या साक्षी बंड्या गावडे हिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट संघात ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दिनांक २८ फेब्रुवारी रोजी निवड झाली असून तिचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. साक्षी हिने मास मीडिया मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इयत्ता सातवी पासून लेदर बॉल क्रिकेटचे धडे घेत आहे. तिचे वडील बंड्या गावडे यांना क्रिकेटची फार आवड. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिची यापूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये १६ आणि १९ वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. तिचा परफॉर्मन्स पाहून गोवा क्रिकेट अकॅडमीने तिची 23 वर्षाखालील महिलांच्या गोवा रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी ऑलराऊंडर म्हणून निवड केली आहे. सध्या ती गोवा येथे रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी प्रशिक्षण घेत आहे. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथील अशोक नारायण परब (मांजरेकर) यांची ती नात असून रणजी संघामध्ये झालेल्या निवडीबद्दल तिच्या मामेगावी कलंबिस्त येथे तिचे कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण सावंत, निलेश पास्ते, अशोक राऊळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search