मुंबई :विद्यमान सरकारने आजच घरगुती गॅस सिलिंडर दरात २०० रुपयाने मोठी कपात करण्याचा सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी जाणते कडून तसेच विरोधकांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी याबाबत आपले मत मांडले आहे. ३१ मार्च २०१४ ला सिलिंडर ४१० रुपये होती. निवडणुकीच्या तोंडावर जनतेला खुश करण्यासाठी या निर्णय घेण्यात आला आहे. खरेतर ही दरकपात यापूर्वीच करायला हवी होती. रशिया युक्रेन युद्धामुळे रशियाने भारताला स्वस्तात कच्चे तेल दिले. त्याचा फायदा ग्राहकाला मिळाला नाही. फेब्रुवारी २०२१ पासून सिलिंडर दारात १३ वेळा वाढ करण्यात आली. एकूण वाढ ३७९.५० झाली; त्यामुळे दरकपात होऊनही सिलिंडर १७९.५० रुपयाने महागच आहे.
याला म्हणतात जुमला! गॅस सिलेंडर स्वस्त. आनंद झाला असेल. थांबा ✋
सरकारनं फेब्रुवारी २०२१ पासून सिलेंडरची १३ वेळा किंमत वाढवून ३७९.५० रुपयांनी महाग केला. दर कमी झाला २०० रुपयांनी. तरीही १७९.५० रुपयांनी महागच! याला म्हणतात जुमला! #Cylinderpic.twitter.com/e96ZcE8icw
Library in Train: आधुनिकीकरणामुळे आताच्या जगात पुस्तकांची जागा स्मार्टफोन ने घेतली आहे. आताच्या पिढीत पुस्तक वाचनाची आवड कमी होत असताना पंचवटी एक्सप्रेसमध्ये सध्या वाचनालय सुरू करण्याची अनोखी संकल्पना रेल्वेच्या प्रवाशांनी राबवली आहे. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी लोकसहभागातून एमएसटी कोचमध्ये नवीन कपाट आणून त्या ठिकाणी पुस्तके जमा करायला सुरवात केली आहे.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.नाशिकहून सकाळी सव्वासातला पंचवटी एक्स्प्रेस निघते. अकराला ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचते. त्यानंतर सव्वासहाला पुन्हा सीएसटीहून निघते, तर रात्री साडेनऊला प्रवाशांना नाशिकमध्ये सोडते. या प्रवासात काही नियमित प्रवासी असून प्रवासादरम्यान मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या हेतूने हे वाचनालय सुरू करण्याची अनोखी संकल्पना अमलात आणली आहे.
या संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून, हिंदी, मराठी, इंग्रजी पुस्तकांचा खजिना या एमएसटी कोचमध्ये असणार आहे.वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि प्रवाशांना नवनवीन पुस्तकांची ओळख व्हावी, हा या मागचा उद्देश आहे. प्रवासी ही पुस्तके घरी घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक प्रवाशाने काही महत्त्वाची पुस्तके दान करण्याचे ठरवले असून, या वाचनालयात दिवसेंदिवस पुस्तकांची वाढ होत आहे.
मुंबई :ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज दुःखद निधन झाले आहे त्या ८१ वर्षांच्या होत्या. सीमा देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
यंदा कर्तव्य आहे,माझी आई, सुवासिनी, मोलकरीण, पाहू रे किती वाट अशा चित्रपटात त्या महत्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. सालस, सोशिक अशा बहुढंगी भूमिकेतून सीमा देव यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. जगाच्या पाठीवर चित्रपटात त्या आंधळ्या मुलीच्या भूमिकेत दिसल्या. आनंद सारख्या हिंदी चित्रपटातही त्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवताना दिसल्या. सीमा देव गेल्या काही वर्षांपासून अल्झायमर या आजाराने त्रासलेल्या होत्या. रमेश देव हयातीत असतानाही त्या त्यांना ओळखत नव्हत्या. रमेश देव यांचे निधन झाले हेही त्यांना ठाऊक नव्हते. आपल्या मुलांना सुनानाही त्या ओळखत नसत. त्यामुळे अशा दिवसांत मुलगा अजिंक्य देव आपल्या आईची योग्य ती काळजी घेत असे.
सिंधुदुर्ग : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात
या वर्षीचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.
कोल्हापुर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या के. मंजुलक्ष्मी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. उद्या बुधवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर किशोर तावडे यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे.
के. मंजूलक्ष्मी हे सध्या सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून ते सिंधुदुर्ग मध्ये सर्वाधिक प्रशासकीय कारभार सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. ते सिंधुदुर्ग येथे दोन वर्ष जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व तीन वर्ष जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते.के.मंजुलक्ष्मी ह्या ९ फेब्रुवारी २०१८ ला सिंधुदुर्ग मध्ये जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी रुजू झाल्या त्यानंतर दोन वर्षानी २० मे २०२० रोजी त्यांची जिल्हाधिकारी पदी शासनाने नियुक्ती केली होती. कोरोना काळात त्यांनी जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम केले होते.तर सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छ भारतमध्ये देशात पहिल्या क्रमांकावर आला होता यामुळे त्यांचा दिल्लीत सत्कार ही झाला होता .
मुंबई:ठाकरे कुटुंबातील सर्वाल धाकटे सदस्य अर्थात उद्धव आणि रश्मी ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे मात्र सध्या निसर्गात रमल्याचं पाहायला मिळत आहे.पर्यावरण, निसर्ग आणि जीवसृष्टीचा जवळून अभ्यास करणाऱ्या तेजस ठाकरे यांच्या टीमनं एक किमया केली आहे.
पश्चिम घाटमाध्यावरील परिसरात तेजस ठाकरे यांच्या टीमला एक साप आढळला असून, त्याला ‘सह्याद्रीओफिस’ असं नाव देण्यात आलं आहे. टीमला मिळालेल्या या यशामुळं ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या च्या नावे आणखी एका यशस्वी मोहिमेची नोंद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार ठाकरे वाईल्ड लाईफ फाऊंडेशननं लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियम, जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टीट्युट यांच्यासह हर्षित पटेल आणि तेजस ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडली.
मुंबई :मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पनवेल येथील निर्धार मेळाव्यानंतर कोकणातील मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांचाकडून टोलनाके आणि कंत्राटदारांची कार्यालये फोडण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र या प्रकारानंतर राज्याचे सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण भलतंच नाराज झाले आहेत. या विषयावर त्यांनी एक पत्र लिहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
पत्रात ते लिहितात
दगड फोडला तर कलाकृती उभी राहते आणि दगड फेकला विध्वंस होतो याची कोणीतरी कधीतरी आठवण करून द्यावी म्हणून आज हे पत्र लिहीत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम अंतिम टप्प्यात अतिशय वेगाने सुरु आहे आणि त्यात ही सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड महाराष्ट्र विरोधी आणि विनाशकारी मानसिकतेची आहे.
जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो…. ? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक….. ? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे…. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे आहे.
मुंबई गोवा महामार्ग आता खरोखरी दृष्टीपथात येत आहे. येत्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात जाण्यापूर्वी सिंगल लेन पूर्ण झालेली असेल याचा मी अत्यंत जबाबदारीने पुनरुच्चार करतो आणि डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मुंबई गोवा महामार्ग देशसेवेसाठी तयार होईल हा शब्द देतो. म्हणून … दगड भिरकावून तोडफोड करणारी विनाशकारी विचारसरणी नको आता त्या ऐवजी दगड रचून नवा इतिहास रचणारी प्रगतिशील कामं करणारी तरुणाईची साथ हवी आहे…. अवघ्या महाराष्ट्राला….
कोकणचा सुपुत्र म्हणून अनेक लहान-मोठ्या समस्या जवळून बघितल्या होत्या. यातल्या अनेक समस्यांचं मूळ मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरण हेच आहे, याची देखील जाणीव आहे. केंद्रात मोदीजी आणि राज्यात त्रिशुळ सरकार गतिमान पद्धतीने काम करत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री या नात्याने पनवेल ते झाराप मुंबई गोवा महामार्गावर रस्त्यावर कडक उन्हात आणि भर पावसात उतरून रस्ते कामाची सलग आठ वेळा पाहणी केलेला मी कोकणी माणूस आहे. भाजपाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे.
खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हा रखडलेला प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं ही स्वाभिमानी प्रतिज्ञा केली होती ती कार्यसिद्धी झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे व्रत म्हणून स्वीकारलं आहे.
या कामात असणाऱ्या असंख्य अडचणी सोडवणं हे शिवधनुष्यच होतं. पण कार्यभार स्वीकारताच कोकणवासियांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने एकेक पाऊल उचलू लागलो. या कामातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. केवळ खड्डे न बुजवता CTB टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समस्येला कायमस्वरूपी पूर्णविराम दिला जातो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यालयं फोडण्यापर्यंत या श्रेयजीवींची मजल गेली आहे. या तोडाफोडीमुळे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत पसरत आहे, अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सुरु असलेल्या कामांना हातभार लावण्याऐवजी अशाप्रकारे आडकाठी आणून यांना नेमकं काय साध्य करायचं आहे ? हा प्रश्नच आहे. गणेशोत्सवापूर्वी सिंगल लेन आणि वर्षाअखेरपर्यंत पूर्ण महामार्ग पूर्ण करणारच या निश्चयातूनच आपला विभाग काम करत आहे.
ज्या आदरणीय मोदीजींनी काश्मीर मधल्या दगडफेकू तरुणांच्या हाती रोजगार दिला तेव्हाच त्यांची अनेक दशकांची विनाशकारी विचारसरणी बदलली आणि बदलली काश्मीरची अर्थव्यवस्था….त्याचप्रमाणे मोदीजींचा कट्टर अनुयायी म्हणून एक दिवस हीच मंडळी तोडफोडप्रेमी विनाशकारी विचारधारा सोडून कोकणच्या विकासाची आणि प्रगतीची विचारसरणी फॉलो आणि लाईक करतील ही आशा बाळगून आहे…..
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीमध्ये गौरी गणपती आणि दिवाळी या सणांसाठी आनंदाचा शिधा (Anandacha Shidha) वाटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा शिधा 100 रुपयांत वाटण्यात येणार असल्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सांगण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेलाचा समावेश या शिध्यामध्ये असणार आहे.
मागील वर्षी अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी वेळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच राज्यातील सात कोटी नागरिकांना या आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत होतं. पण तरीही हा शिधा काही वेळत पोहचला नव्हता. ह्यावर्षी हा शिधा वेळेत पोहोचला जाणार याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
MSRTC News: एसटीतील प्रवासात प्रवाशाना आणि वाहकाला नेहमी सतावणारी समस्या म्हणजे सुट्ट्या पैशाची चणचण. या कारणावरून कित्येकवेळा प्रवासी आणि वाहकांमध्ये भांडणे होताना दिसतात. पण आता ही समस्या दूर होणार आहे. कारण एसटीमध्ये सुद्धा तिकिटाच्या पेमेंट साठी क्युआर कोड स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामळे सुट्ट्टे पैसे नसले तरी त्याची चिंता भेडसावणार नाही आहे. या बदलासाठी या महिन्यात सर्वप्रथम एसटीची तिकीट मशिन बदलण्यात येणार आहेत. यामध्ये कोडस्कॅन अपडेट करून घेण्यात येणार असून या महिना अखेरपर्यंत एकाचवेळी ही सेवा महाराष्ट्रात उपलब्ध होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
बदलत्या काळानुसार लाल परी अर्थात् एसटी महामंडळ प्रवाशांना आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे बदलती गरज लक्षात घेऊन एसटीनेही नागरिकांना कॅशलेस तिकीट पेमेंट करण्याचा निर्णय घेतला असून, ऑगस्ट अखेरपर्यंत सध्या असलेल्या तिकीट मशिनमध्ये बदल करण्यात येणार आहे.
क्युआर कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार आहे. आधी ही सिस्टीम अपडेट करून घेण्यात येणार असून, त्यानंतर ही अंमलबजावणी सुरू होईल.आतापर्यंत प्रवाशांना ई-तिकीट दिले जात होते. आता पेमेंटही ई-सेवा प्रणालीद्वारे होणार आहे. गणेशोत्सवाआधी या सेवेला आरंभ होण्याची शक्यता असून चाकरमान्यांना एक नवी सेवा महामंडळाकडून मिळेल.
वेंगुर्ले : तुळस गावातील चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांच्या घरा समोर एक दुर्मिळ प्रकारचा साप आढळून आला आहे. सर्पमित्रांनी दिलेल्या माहितीनुसार अति दुर्मिळ असा ‘कॅस्ट्रोज कोरल साप’ Castro Coral Snake असल्याचे समजते.
याबाबत सर्विस्तर वृत्त असे कि तुळस गावातील चूडजीवाडा येथील सद्गुरु सावंत यांना त्यांच्या घरासमोर एक वेगळ्या प्रकारचा साप दिसला. त्यांनी सर्पमित्र महेश राऊळ यांना कॉल करून त्या ठिकाणी ताबडतोब बोलाविले. सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्या सापाचे निरीक्षण केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हा अति दुर्मिळ असा कॅस्ट्रोज कोरल साप आहे, त्यांनी लगेचच त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. २०२१ मध्ये सर्पमित्र श्री महेश राऊळ यांना असा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळला होता. दोन वर्षांनी पुन्हा एकदा हा अति दुर्मिळ कॅस्ट्रोज कोरल साप आढळून आला.
सिंधुदुर्ग मध्ये या सापाची नोंद ही तिसऱ्या वेळा झाली आहे. त्यामध्ये वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांना हा साप मृत अवस्थेत आढळला होता. आणि त्यानंतर सात ते आठ वर्षांनी दोन वेळा जीवंत साप महेश राऊळ यांनाच मिळाला आहे. या सापाचे संशोधन हेमंत ओगले यांनी केले आहे.हा साप विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणारा आणि फारसा दृष्टीस पडत नाही. याचा रंग ब्राऊन ब्लॅक असून पोटाखालून पूर्णपणे भगवा असतो. आणि त्याचा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे धोतक मानले जाते. दगडाखाली आणि पाला पाचोळ्याखाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक सरडे पाली गांडूळ इत्यादी आहे.
साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते.पूर्ण वाढलेला साप हा करंगळी एवढा जाड असतो त्याच्याबरोबर त्याच्या डोक्यावर भगवी जाड रेषा असते आणि हा साप घाबरला तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्याजवळ येऊ नका असा इशारा देत असतो. हा दुर्मिळ साप पुन्हा एकदा मिळाल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जैवविविधता जगाच्या नकाशावर झळकली आहे. याआधी बरेचसे पशुपक्षी प्राणी जे अति दुर्मिळ आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आढळलेले आहेत. दरम्यान तुळस येथे या रेस्क्यूच्या वेळी त्यांच्यासोबत वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, सचिव सचिन परुळकर आणि गुरुदास तिरोडकर आणि सद्गुरु सावंत आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यानंतर सर्पमित्र महेश राऊळ यांनी त्या सापाला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.