Category Archives: महाराष्ट्र

पुणे-विजयदुर्ग एसटी बस प्रवासात वाहकाचे चांगले वर्तन; भारावलेल्या प्रवाशाने लिहिले आगाराला कौतुकाचे पत्र

सिंधुदुर्ग :एसटीच्या अस्तित्वात चालकासोबतच वाचकाचा (कंडक्टर) चा वाटा पण महत्त्वाचा मानला जातो. वाहकाची वागणूक जर विनम्र आणि सोज्वळ असेल तर प्रवासी एसटीला प्राधान्य देतो. त्यामुळे वाहकाने गर्दी आणि कामाच्या ताणला न कंटाळता अगदी प्रवाशांबरोबर चांगले वागणे गरजेचे आहे.

कित्येक वेळा एसटीच्या प्रवासात खूप चांगले अनुभव वाहकांकडून प्रवाशांना येत असतात. असाच एक अनुभव पुणे ते विजयदुर्ग या मार्गावर गणेश चतुर्थीदरम्यान प्रवास करणार्‍या एका प्रवाशाला आला. वाहकाच्या प्रवाशांना दिल्या गेलेल्या चांगल्या वागणुकीमुळे भारावून गेलेल्या या प्रवाशाने विजयदुर्ग आगाराला चक्क पत्र लिहून त्या वाहकाचे कौतुक केले आहे.

गाडी मध्ये गर्दी असूनही वाहक शिरसाट यांचा व्यवहार खूपच चांगला आणि प्रवाशांना मदत करणारा होता. अशा वाहकांमुळे एसटीची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्याने या पत्रात म्हटले आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या पत्रास एसटीचा गौरव मानून आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर प्रसिद्ध केले आहे.

नितीन गडकरी यांच्या कारकीर्दीवर चित्रपट येतोय; पोस्टर प्रदर्शित

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ‘गडकरी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची रीं भूमिका कोण साकारेल? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गडकरी’ या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि टीझरची प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट बघत आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘’नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’’ 27 ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

आता आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एसटीचे आरक्षण शक्य होणार

मुंबई :आता भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एसटी बसचे आरक्षण करता येणे शक्य होणार आहे. एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि रेल्वेच्या आयआरसीटीसी यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणालीसंदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि रेल्वेच्या आयआरसीटीसी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सामजंस्य करारावर सह्या केल्या. या करारामुळे आयआरसीटीसी च्या bus.irctc.co.in संकेतस्थळावरुन प्रवाशांना एसटीचे तिकीटदेखील आरक्षित करता येणार आहे.

सध्या आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावरून रेल्वेसेवा, विमानसेवा आणि खाजगी बससेवांची तिकीट आरक्षणाची तसेच हॉटेल बूकिंगची सुविधा उपलब्ध होती. आता या निर्णयामुळे एसटीचे तिकीट प्रवाशांना येथून आरक्षित करता येणार आहे.

गणेशोत्सवासाठी ‘टोल माफी’ आहे कि नाही? शासन निर्णय जाहीर न झाल्याने संभ्रम

मुंबई : गणेश चतुर्थी सण अगदी काही दिवसांवर आला आहे. पुढील एक दोन दिवसांनंतर चाकरमानी गावी जायला लागतील. मात्र अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी केलेल्या टोल माफीच्या घोषणेबाबत  अधिकृत शासन निर्णय (जी.आर)  जाहीर करण्यात आला नसल्याने ही टोल माफी नक्की देण्यात येणार कि नाही याबाबत प्रवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम अजून पूर्ण नाही झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्यासाठी टोल माफीची घोषणा अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र या घोषणेचा अधिकृत शासन निर्णय (जी.आर) अजूनही प्रसिद्ध झाला नसल्याने ही टोलमाफी आहे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुढील एक दोन दिवसांत चाकरमानी गावी जाण्यास सुरवात करतील. जर टोल माफ होणार असेल तर तसे स्टिकर आणि पास मिळवण्यात त्याची यामुळे मोठी दगदग होणार असल्याने शासनाने याबाबत लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी होत आहे.

चाकरमान्यांची चिंता वाढवणारी बातमी; ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांची बेमुदत संपाची घोषणा

मुंबई : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. जसजसा चतुर्थी सण जवळ येत आहे तसतसा उत्साह वाढत चालला आहे. मात्र चाकरमान्यांची चिंता वाढवणारी  बातमी समोर आली  आहे. ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे. 
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली असली तरी त्यामध्ये अजून चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर (ST Worker Protest) जाणार आहेत. येत्या 11 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर हा संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 
राज्य सरकारने नुकताच एक जीआर काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांनाही 42 टक्के महागाई भत्ता मिळावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. तसेच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने 11 सप्टेंबरपासून संप करण्यात येणार आहे. 
राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन (ST Worker Protest) करण्यात येणार असल्याचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीनं काढण्यात आलं आहे. 

नागपूर ते मुंबई प्रवास अवघ्या साडेतीन तासांत शक्य

मुंबई: मुंबई आणि नागपुरकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या साडेतीन तासांत करता येणं भविष्यात शक्य होईल. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झालाय अशी सूत्रांची माहिती आहे.

प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येत आहे. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे. बुलेट ट्रेनचा 68 टक्के भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असणार आहे. प्रकल्पाचा खर्च 1 लाख 70 हजार कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 766 किमी लांबीचा हा मार्ग असून प्रत्येक किलोमीटरचा खर्च 232 कोटी रूपये असेल. 

एकूण 13 स्टेशनं या मार्गावर असतील. नागपूर, वर्धा, खापरी, पुलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, करंजा लाड, मालेगाव, मेहकर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर अशी स्टेशनं असणार आहेत.

 

‘सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणुन घोषित

मुंबई :’सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सातपाटीमधील मच्छीमार सहकारी संस्थांनी याबाबत सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्याबद्दल मागणी केली होती ती आता पूर्ण झाली आहे. पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केल्यास या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.

 

 

Rain Alert : कोकणसह राज्यात पुढील चार दिवस पाऊस सक्रिय होणार

Rain Alert : राज्यातील शेतकर्‍यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील बहुतेक जिल्हय़ात पुढच्या ४/५ दिवसात पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत कोकण गोव्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस , तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिनांक ०४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात तर दिनांक ०५ ते ०७ सप्टेंबर पर्यंत कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.

दिनांक ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता आहे.

उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला असल्याने उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचा मुख्य सचिवांकडे केली आहे. याबाबत माहिती त्यांनी समाज माध्यमातून जनतेला दिली आहे. 

काय म्हणालेत विजय वडेट्टीवार? 

राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे.

उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी.

सनातन धर्माची मच्छरांशी तुलना करणार्‍या उदयनिधीं विरोधात मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात प्रतिक्रिया

मुंबई :तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्मा विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध स्तरावरून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनिधीचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.

हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.

आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी.

नेमके काय बोलले उदयनिधी? 

तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या विधानावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे आरोप फेटाळून लावले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे” या आपल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे म्हणाले. मात्र अमित मालवीय यांनी नरसंहाराचा दिलेला संदर्भ चुकीचा असून आपण नरसंहाराबाबत काही बोललो नाही, असे ते म्हणाले.

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search