Category Archives: महाराष्ट्र

सिंधुदुर्ग – बारसू रिफायनरी विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. रिफायनरी मुळे कोकणाचा विकास नाही तर विनाश होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने स्थानिक जनतेला विश्वासात न घेता कोकणात नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादले जात आहेत अशी सरकारवर टीका होत आहे.
बारसू रिफायनरीचा वाद चालू असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर एका नव्या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी १२,५०० एकर भूसंपादन करणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेऊन जमीन, शिल्लक जमीन आणि भूसंपादन प्रक्रिया ठरवण्यात येणार आहे.
अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.
Vision Abroad
रत्नागिरी – एकीकडे सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये बारसू रिफायनरी प्रकल्पावरून जुंपली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी बारसूची जागा केंद्र सरकारला लिहिलेल्या एका पत्राद्वारे सुचवली असल्याचे समोर आले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहाल होतं. 12 जानेवारी 2022 रोजी ही पत्र लिहण्यात आलं होतं. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकार उपलब्ध करून देण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी दर्शवली होती. त्याचबरोबर याठिकाणची बहुतांश जमीन ही ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न येणार नाही असंही या पत्रात नमूद करण्यात आलं. या पत्रामध्ये स्पष्टपणे लिहण्यात आलं होतं की ही जागा ओसाड आहे.
यामुळे आता ठाकरे गटाचीही कोंडी झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहताना बारसूमधील लोकांना विश्वासात घेतलं होतं का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Gold Purity Test – आपण विकत घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत कायमच आपल्या मनामध्ये एक शंका असते. यावर उपाय म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजेच बीआयएस ने एक स्मार्टफोन ऍप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे.
या ॲपचं नाव बीआयएस केअर ॲप असे असून त्या ॲपद्वारे हॉलमार्क सर्टिफाइड गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी च्या शुद्धतेबाबत खात्री पटवता येते.बीआयएस ही भारतातील स्टॅंडर्ड बनवणारी एक राष्ट्रीय संस्था आहे.
बीआयएस केअर ॲप कसे डाउनलोड करावे?
अँड्रॉइड फोनचा वापर करणाऱ्यांनी प्ले स्टोअर मध्ये जाऊन बीआयएस केअर ॲप असे सर्च करावे आणि ते ॲप इन्स्टॉल करावे
ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये आपले नाव फोन नंबर आणि ईमेल आयडी एंटर करावा.
ओटीपीचा वापर करून आपला फोन नंबर आणि ईमेल आयडी कन्फर्म करावा.या ॲपचा वापर करून तुम्ही सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत चाचणी करू शकता. या ॲपमध्ये व्हेरिफाय HUID नावाचे फीचर आहे. तुम्ही विकत घेतलेले सोन्याचे दागिने जर हॉलमार्क सहित असतील तर तुम्ही व्हेरिफाय HUID वापर करू शकता.
HUID नंबर म्हणजे काय?
एक जुलै 2021 रोजी भारत सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचे सिम्बॉल बदलले. या नियमानुसार सोन्याच्या दागिन्यांवर तीन सिम्बॉल असतील.
1. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचा हॉलमार्क
2. सोन्याची प्युरीटी ग्रेड
3. सहा आकडी अल्फा न्यूमेरिक HUID नंबर
HUID नंबर हा इंग्रजी अक्षरे आणि अंक यांच्यापासून बनलेला आहे. सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करताना दागिन्याच्या प्रत्येक तुकड्याला HUID नंबर दिला जातो. हा नंबर युनिक असतो. ज्वेलरीवर हा नंबर स्टॅम्प केलेला असतो.
31 मार्च 2023 नंतर सहा आकडी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID शिवाय कुठल्याही प्रकारचे सोन्याचे दागिने विकण्यास बीआयएसने मनाई केली आहे.
जर तुम्हाला आपण खरेदी केलेल्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत, हॉलमार्कबाबत काही तक्रार असेल तर ती तुम्ही या ॲपचा वापर करून दाखल करू शकता.
मुंबई – राज्य शासनाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी ह्या विषयाचे मूल्यांकन एकत्रित मूल्यांकनामध्ये धरू नये आणि त्यांना केवळ श्रेणी द्यावी असा निर्णय काल महाराष्ट्र शासनानं जाहीर केला. हा निर्णय चूकीचा आहे आणि शासनानं तो मागे घ्यावा.
वास्तविक शासनानं १ जून २०२० म्हणजे सुमारे तीन वर्षांपूर्वी राज्यातील सर्व म्हणजे सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे केले होते. हे एक चांगले पाऊल होते. शासनानं तोच स्वत:चा निर्णय आता फिरवला आहे.
हा निर्णय फिरवताना शासन म्हणतंय की हा निर्णय कोविडच्या महामारीच्या काळात आला असल्याने शाळा नियमीत चालू नव्हत्या. म्हणून मराठी भाषा शिकण्यासाठी अडचणी आल्या. पण प्रश्न असा पडतो की, शाळा सुरू नव्हत्या तर मराठीच कशाला इतरही शिक्षण अडचणीचं झालं होतं. मग मराठीचाच का वेगळा विचार?
हे खरं आहे की मराठी विषय काही शाळांमध्ये नवीन होता परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या शाळांना तीन वर्ष होती. मग ह्या तीन वर्षात त्या शाळांना मराठी शिकवण्याची व्यवस्था का उभी करता आली नाही? तीन वर्ष काही कमी नाहीत, मग तरीही मराठी शिकवण्याबाबत ह्या शाळांचा निरूत्साह का? असेल तर ह्या निरूत्साहावर शासन काय करत आहे?
शासन निर्णयात असं म्हटलं आहे की “मराठी विषयाच्या अध्ययनामध्ये आणि पर्यायाने संपादणूकीमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत असे दिसून येते”. शासन हे कशाच्या आधारावर म्हणत आहे? त्याचा काही अहवाल आहे का?
आज एप्रिल महिना आहे. शाळा सुरू व्हायला अजून अडीच महिने आहेत. मराठी शिकवण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न करायला आणि व्यवस्था सिध्द करायला पुरेसा वेळ आहे. शासनानं हा निर्णय मागे घ्यावा आणि शाळांना पुढील अडीच महिन्यात तयारी करायला सांगावी.
राज्यात इतर परीक्षा मंडळाच्या शाळांत मराठीविषयी एक प्रकारची अनास्था आहे. म्हणून त्यांच्याकडून शासनावर दबाव येत असणार. कदाचित पालकांचीही मराठी बाबत अनास्था असणार. परंतु ह्यावर मात करून महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी शिकवली जावीच ह्यासाठी शासन ठाम असावं. महाराष्ट्रात रहातात त्यांनी मराठी शिकावं, स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर राखावा ह्या आग्रहात काहीच गैर नाही.
मराठी भाषेचा सन्मान राखणे, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे आणि मराठीचा प्रसार करणे ह्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबध्द असलं पाहिजे. किंबहुना जेंव्हा भाषावार प्रांतरचना झाली तेंव्हा महाराष्ट्र सरकारवर आलेली, राज्यघटनेनं दिलेली ही एक महत्वाची जबाबदारी आहे.
महाराष्ट्र शासनानं स्वतः:ची ही जबाबदारी पार पाडावी आणि नवा मराठीविरोधी आदेश त्वरित मागे घ्यावा.
अनिल शिदोरे
नेते आणि प्रवक्ते – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
MSRTC News :एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र काही वाहक मद्यप्राशन करून गाडी चालवत असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत अशा तक्रारी अलीकडे वारंवार येवू लागल्या आहेत. यावर उपाय म्हणुन वाहकांची अल्कोहोल टेस्ट घेण्याचे आदेश आदेश प्रत्येक आगाराला दिले आहेत.
वाहकांनी मद्यप्राशन केले नसल्याची खात्री करुनच त्यांना कर्तव्यावर पाठवावे असे स्पष्ट आदेश महामंडळाने काढले आहेत.
एसटी चालक मद्यधुंद अवस्थेत आढळल्यास वाहतूक नियंत्रक, पर्यवेक्षक, वाहन परिक्षक यांनी तातडीने स्थानक, आगार प्रमुख यांना त्याची माहिती ताबडतोब द्यावी. त्यानंतर त्याला कामगिरीवरुन उतरुन घेतील. तसेच त्वरित ड्रायव्हरची वैद्यकीय चाचणी करण्यात येईल, तसेच स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात येऊन खातेंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
एसटीचा प्रवास सुरक्षित मानला जातो. वाहकांची नोकर भरती करताना त्याच्या आरोग्य चाचण्या केल्या जातात. त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण देवूनच त्यांच्या हातात गाडीचे स्टेअरिंग दिले जाते. खाजगी वाहतुकीशी तुलना करता एसटी बसेसच्या अपघातांचे प्रमाण पण खूप कमी आहे. मात्र अलीकडे काही वाहक मद्यप्राशन करून गाड्या चालवत अशा तक्रारी प्रवाशांकडून यायला लागल्या होत्या त्यामुळे महामंडळाने असे आदेश काढल्याचे समजते.
Vision Abroad
मुंबई – खारघर येथील घटनेला सर्वस्वी सरकार जबाबदार असून त्यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. अशा मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
पत्रात ते असे म्हणतात की खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लाखो संख्येनं नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला,त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला.ही दुर्दैवी घटना निसर्ग निर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे.या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार आहे. निवृत्ती न्यायाधीशांमार्फत या घटनेची चौकशी केली गेली पाहिजे. या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा. तसंच या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केलेली मदत अगदी तुटपुंजी असून किमान प्रत्येकी २० लाख, तर उष्माघातामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मोफत उपचारासह प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत केली गेली पाहिजे असे ते या पत्रात म्हणाले आहेत.
शहरात सर्वत्र सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी उपस्थित ११ श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू होण्याची वेदनादायी घटना कालच घडली आहे. प्रखर उन्हामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.
उष्माघात होण्याची कारणे
- उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
- कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे
- जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे
- घट्ट कपड्याचा वापर करणे
- अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो.
लक्षणे
- थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे
- भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे
- रक्तदाब वाढणे, मानसिक बेचैन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था इत्यादी
उपचार
- रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे
- रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत
- रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी
- रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक्ड लावावेत
- आवश्यकतेनुसार शीरेवाटे सलाईन देणे
काय करावे
- तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे
- हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत
- बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करण्यात यावा
- प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी
- उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा
- अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
- गुरांना छावणीत ठेवावे तसेच त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
- घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे
- कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी
- सूर्यप्रकाशाशी थेट संबंध टाळण्याचे कामगारांना सूचित करावे
- पहाटेच्यावेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करावा
- बाहेर कामकाज करताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा
- गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी
- रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत
- जागोजागी पाणपोईची सुविधा उभारावी
काय करु नये
- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये
- दुपारी १२.०० ते ३.३० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे
- गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे
- बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत
- उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत


















