Category Archives: रत्नागिरी
चिपळूण : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल कोसळणं ही दुर्देवी घटना आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, हे फार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या श्री. गुप्ता, श्री. सिन्हा व श्री. मिश्रा या तिघाजणांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज पहाटे केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना ही दुर्देवी आहे. दोन किलोमीटरचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाची असणारी तिघा तज्ज्ञ लोकांची समिती याची तपासणी करुन, अहवाल देईल.
“मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा.”