KonkanRailway News: गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्या दिवा चिपळूण मेमू विशेष गाडी संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 01155 दिवा चिपळूण मेमू विशेष गाडीला दिवा या सुरवातीच्या स्थानकावरून याआधी नियोजित केलेल्या वेळेच्या 10 मिनिटे अगोदर सोडण्यात येणार आहे.
नियोजित वेळेनुसार ही गाडी संध्याकाळी 19:45 या वेळी सुटणार होती. मात्र रेल्वे प्रशासनाने त्यामधे बदल करून ही गाडी सुधारित वेळेनुसार ही गाडी 10 मिनिटे अगोदर म्हणजे संध्याकाळी 19:35 वाजता सुटणार आहे. हा बदल दिनांक 13 सप्टेंबर पासून असणार आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे.
चिपळूण :चिपळूण तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी एकास ताब्यात घेतले आहे.तसेच त्याच्याकडून ‘तुईया’ Plum Headed Parakeet या प्रजातीच्या पोपटाची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ असे एकूण १२ पक्षी आढळून आले आहेत.
या प्रकरणी जितेंद्र धोंडू होळकर, (रा.कोंढेमाळ, चिपळूण) याला ताब्यात घेतले आहे. तो विशिष्ट प्रजातीचे पोपट पकडून विक्री करत असलेबाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश्री कीर, वनपरिमंडळ अधिकारी दौलत भोसले, उमेश आखाडे, सुरेश उपरे व वनरक्षक राजाराम शिंदे, अश्विनी जाधव इत्यादी वनविभागाचे अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जितेंद्र होळकर याच्या कोंढेमाळ येथील राहत्या घरी व गुरांच्या गोठ्यामध्ये अचानक धाड टाकली.
त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये पहाणी केली असता घराशेजारील प्रभाकर जिवा करंजकर यांच्या लाकडाच्या खोपटीत दोन पिंजऱ्यामध्ये पोपट प्रजातीमधील ‘तुईया’ (प्लम हेडेड पॅराकीट) या प्रजातीची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ पक्षी आढळून आले. या पक्षांबाबत जितेंद्र होळकर याच्याकडे विचारणा केली असता हस्तगत करण्यात आलेल्या दोन पिंजऱ्यातील एकूण १२ पोपट हे माझेच आहेत. मी गुरे चारण्यासाठी गावाजवळील डोंगरावर गेलो असताना लाकडाच्या डोलीतून सुमारे ४-५ महिने व १ वर्षापूर्वी ताब्यात घेतले आहेत. तसेच यापुर्वी मी १० ते १२ जणांना पोपट विकले असल्याचे सांगितले. जितेंद्र धोंडू होळकर यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
रत्नागिरी, दि. ०८ : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड-आंबडवे रस्त्यावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास सावरे फाटा ते घोसाळे फाटा यादरम्यान आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे मात्र वाहकासह 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर आंबडवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात एसटी बस पलटी झाली आहे. मंडणगड-आंबडवे या रस्त्याचे अपूर्ण कामामुळे येथे अपघात होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीमधील कशेडी घाटात आज सकाळी ११:५० वाजता टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात झाला. या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एसटी बसक्र. MH-14-BT-2635 वरील चालक योगेश दादाजी देवरे वय ३५ वर्षे हे कशेडी घाट उतरत असताना समोरुन वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक UP-70-HT-7551 वरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वय ५५ वर्षे राहणार घाटकोपर, मुंबई यांना डोळआ लागल्याने गाडी चुकीच्या साईडला जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातामध्ये सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत अपघात ग्रस्तांना मदत केली.
अपघातामधील एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. त्यापैकी ८ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या जखमींपैकी अनंत दत्तात्रेय विंचू यांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय इथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी इथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.
दापोली: दापोली तालुक्यातील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण ताजे असताना अजून असेच एक प्रकरण समोर आले आहे.
आंजर्ले जवळील मुर्डी येथून एक ३३ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास आकांक्षा आनंद बेनेरे( रा. राममंदिर, मुर्डी ) या मुलगी नेहा हिला आंगणवाडित सोडून आंजर्ले येथे कामावर जात असल्याचे घरच्यांना सांगून घराबाहेर पडली. मात्र, सायंकाळपर्यंत घरी न परतल्यान तिच्या घरच्यांनी तिच्या कामावर, गावात तसेच नातेवाइकाकडे शोध घेतला. ती मिळून न आल्याने पती आनंद यांनी रविवारी आकांक्षा हि बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल श्री. मोहिते करीत आहेत.
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील रखडल्या प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कोंडमळा येथे महामार्ग रोखत शुकवारी आंदोलन केले होते. याप्रकरणी बेकायदा जमाव केला व महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील कोंडमळा येथे भुयारी मार्ग बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शिवाय शेतकरी, जनावरे, विद्यार्थी, तसेच बाजारपेठ व रेशन दुकानावर ये-जा करताना महामार्गाचा अडथळा निर्माण होत आहे. येथे वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत; तसेच सावर्डे, असुर्डे, वहाळफाटा आदी ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) विभागाकडे, तसेच ठेकेदार कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र पाठपुरावा करूनही दाद घेतली गेली नाही. त्यामुळे याबाबात शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कोंडमळा येथे महामार्ग रोखत ठेकेदार कंपनीविरोधात जोरदार घोषणा केली.
याप्रकरणी बेकायदेशीर जमाव करून महामार्ग अडवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुकाप्रमुख सावंत यांच्यासह अन्य २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विनोद सहदेव आंबेरकर यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. संदीप शिवराम सावंत (वय ५१), प्रीतम नंदकुमार वंजारी (३२), सागर सुशील सावंत (५६), साहिल संजय शिर्के (२३), संदीप सीताराम राणे (४२), शैलेश पांडुरंग कांबळी (३८), प्रशांत संजय सावंत (२९) या सात जणांसह अन्य २० कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी: हातखंबा येथे डंपरने ट्रकला धडक दिल्याने एक जण जखमी झाला आहे .हातखंबा येथील ईश्वर धाब्यासमोर शुक्रवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मागून येणाऱ्या डंपरने पुढे असणाऱ्या ट्रकला धडक देत अपघात केला. यात एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निवळीहुन हातखंब्याच्या दिशेने दोन्ही वाहने मार्गक्रमण करीत असताना ईश्वर धांब्यासमोर ट्रक (गाडी क्रमांक MH 14 BJ 4731) आला असता मागून येणारा डंपरने (क्रमांक-MH10CR-8970) धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या डंपर चालक गणेश दिलीप मयेकर (वय 36 राहणार- पोमेंडी रत्नागिरी) हा स्वतः जखमी झाला. डंपरमधील जखमी चालकाला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रत्नागिरी:हवामान विभागाने उद्या दिनांक 28 जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक 1 ली ते 7 वी पर्यंत) विद्यालयांना उद्या शुक्रवार दि. 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज दिला आहे.
हवामान खात्याने जिल्ह्यात उद्या शुक्रवार दिनांक 28 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या 28 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई गोवा महामार्गाची वाहतुक ठप्प झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी येथे मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, निवळी येथे दरड कोसळण्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. ही दरड हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, दरड कोसळल्याने हा मार्ग तूर्तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील चार नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. तर खेड येथील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट असून प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रत्नागिरी, दि.२६: हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये, यासाठी शाळा (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व माध्यमिक) विद्यालयांना उद्या गुरुवार दि. २७ जुलै रोजी सुट्टी जाहीर केल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी आज दिला.
हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै रोजी रेड अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री नदी, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओळांडली आहे. जिल्ह्यात अनेक भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये यासाठी उद्या २७ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.