Category Archives: राजकारण
मुंबई : शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबत दोन्ही बाजूने तुफान राडा चालू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर सभा घेणार नाही असे जाहीर करून या विषयाला पूर्णविराम लावला. आपण माघार का घेतली याबाबत त्यांनी समाज माध्यमातून स्पष्टीकरणही दिले.
या स्पष्टीकरणात ते म्हणाले
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही.
बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले #शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती.
बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल.
कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार”
मुंबई :सर्व राजकीय पक्षांनी येत्या 2024 लोकसभा निवडणुकी साठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत लढवणार हे निश्चित झाले आहे, मनसे खाली नमूद केलेल्या लोकसभा क्षेत्रात सध्या चाचपणी करत असून त्यातील पाहिले संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
ही यादी खालील प्रमाणे
- कल्याण लोकसभा – श्री राजू पाटील
- ठाणे लोकसभा – श्री अभिजित पानसे/ श्री अविनाश जाधव
- पुणे लोकसभा – श्री वसंतराव मोरे
- उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा- सौ.शालिनीताई ठाकरे
- दक्षिण मुंबई लोकसभा- श्री बाळा नांदगावकर
- संभाजी नगर लोकसभा – प्रकाश महाजन
- सोलापूर लोकसभा – दिलीप धोत्रे
- चंद्रपूर लोकसभा – श्री राजू उंबरकर
- रायगड लोकसभा – वैभव खेडेकर
रत्नागिरी – राजापूर तालुक्यातील बारसू ग्रामस्थांनी सुरू केलेले रिफायनरीविरोधी आंदोलनामुळे येथील तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच दिवशी दि.६ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
उद्धव ठाकरे बारसू ग्रामस्थांना भेटण्यासाठी येत असल्याने प्रशासनाकडून सुरू असलेल्या चर्चेला खीळ बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोणी अडवल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा ठाकरे शिवसेना गटाकडून दिला आहे.
तर राज ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा पंधरा दिवस आधीच जाहीर झाला होता. ”जागा राखल्या नाहीत तर तुमचे अस्तित्व काय?” या शिर्षकाखाली त्यांची रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सायंकाळी जाहीर सभा होणार आहे.
या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यामुळे वातावरण तापाण्याची शक्यता आहे. ग्रामस्थ, प्रकल्पविरोधी संघटनांचे नेते चर्चेऐवजी पुन्हा संघर्ष हाती घेतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच या दौऱ्याबाबत प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोन्ही नेत्यांचे दौरे होणार असल्याचे पोलिस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
सावंतवाडी – शिवसेना ठाकरे गटाने काल दिनांक 1 एप्रिल रोजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे एप्रिल फुल आमदार गुल अशा घोषणा देत ढोल बडवून केसरकर यांचा निषेध नोंदवला.शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याच्या नेतृत्वाखाली येथील एसटी बसस्थानकात आंदोलन करण्यात आले.
सावंतवाडीतील जगन्नाथ उद्यानात मोनोरेल सुरू, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंचायत समिती इमारत नवीन जागेत स्थलांतर, एक लाख सेट टॉप बॉक्स आदिची घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच नाही. मंत्री केसरकर हे पंधरा वर्षे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप करुन यापुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाही. यासाठी आम्ही ठाकरे गट म्हणून प्रयत्न करणार असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.
या आंदोलनात मायकल डिसोजा, बाळा गावडे, गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, भारती कासार, श्रृतिका दळवी, श्रेया कासार, अर्चना बोंद्रे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मुंबई : दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी भारतीय निवडणूक आयोगाने निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी आणि वृत्तपत्रात आपल्या पक्षास ‘शिंदे गट’ असे न संबोधता ‘शिवसेना’ असे संबोधले जावे अशी विनंती शिवसेनेतर्फे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
हे पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांच्यामार्फत जाहीर करण्यात आलेले आहे.
नवी दिल्ली :भारतीय संसदेतील शिवसेना पक्षाचं कार्यालय आता एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आलं आहे. खासदार राहुल शेवाळे हे शिंदे गटाचे गटनेते आहेत. शेवाळे यांनी केंद्रीय सचिवालयाला यासंदर्भातील पत्र दिलं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्वाळा केल्यानंतर संसदेतील शिवसेना कार्यालयावर एकनाथ शिंदे गटाचा ताबा मिळावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली होती. त्यानुसार, राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाने आज संसदेतील शिवसेनेच्या कार्यालयात आज एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी प्रवेश घेतला.
काल महाराष्ट्र विधीमंडळातील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी ताबा मिळवला. त्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयात एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी प्रवेश केला.
Breaking News :केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने ज्या बहुमतावर शिंदे हेच खरे शिवसेनेचे नेते आणि त्यांच्याच गटाला धनुष्यबाण दिले आहे ती आकडेवारी पुढीलप्रमाणे
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडी येथील सभेत तेलशुद्धीकरण प्रकल्पास विरोध करणाऱ्यांना धमक्या दिल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या झाली, असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला.
याप्रकरणी सखोल चौकशी होऊन खऱ्या सूत्रधारांचा छडा लागेपर्यंत आम्ही आवाज उठविणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. प्रकल्प परिसरात अनेक व्यापाऱ्यांनी कवडीमोल किमतीत जमिनी घेतल्या असून त्यांची यादी जाहीर करण्याचा इशारा राऊत यांनी दिला.कोकणात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश नाईक आणि आता वारिसे यांची हत्या झाली. सरकार बदलताच कोकणात हत्येचे सत्र सुरू झाले असल्याचा आरोप करून राऊत म्हणाले, आरोपींनी आतापर्यंत किती सुपाऱ्या घेतल्या, कोणाच्या हत्या केल्या, याचा शोध घेतला पाहिजे. वारिसे काही नेत्यांच्या डोळय़ांत खुपत होते. त्यांना आधीही धमक्या आल्या होत्या. वारिसे यांची हत्या करणाऱ्या आरोपीमागील खरे सूत्रधार कोण, याची सखोल चौकशी करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या आसपास ज्यांनी कवडीमोल किमतीत जमिनी घेतल्या, त्यांची माहिती देण्यास वारिसे यांनी सुरुवात केली होती. प्रकल्प समर्थक, सरकारमधील काही व्यक्तीआणि रत्नागिरीतील काही राजकारणी यांचे जमिनी लाटण्यात साटलोटे आहे. परप्रांतीयांबरोबर अब्जावधी रुपयांचे व्यवहार झाले असून जमिनी घेणाऱ्यांची यादी जाहीर करण्याचा इशारा राऊत यांनी दिला.