Category Archives: कोकण रेल्वे

“सावधान! येथे अपघाताची शक्यता” | सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर गतिरोधकांची नितांत गरज

सावंतवाडी, दि. १२ फेब्रु.: कोणताही अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते. त्यानंतर  त्या रस्त्यांवर गतिरोधक बसविले जातात. मात्र अपघात होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतली तर जीव वाचू शकतात. सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बाजारपेठेत, गाव वस्तीत, शाळेच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसवून वाहनांच्या वेगावर मर्यादा घालून अपघात टाळले जातात. अशाच तजवीजची गरज  सावंतवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर असेलेला रस्त्यावर करण्याची आवश्यक्यता निर्माण झाली आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशदारासमोर हा रस्ता असून सावंतवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनचालक वाहने सुसाट चालवीत असतात. या रस्त्याच्या पलीकडे उपहारगृहे, एटीएम आणि इतर दुकाने आहेत. त्याचप्रमाणे स्थानकावरून बाहेर पडून सावंतवाडी साठी एसटी बस पकडायची असेल तर हा रस्ता ओलांडावा लागतो. कित्येकवेळा बस उभी असताना प्रवासी बस चुकू नये म्हणून घाईघाईने रास्ता ओलांडताना दिसतात. अशा वेळी अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. कित्येकवेळा अपघात होता होता वाचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे दोन ठिकाणी झेब्रा क्रोसिंग मार्किंग पट्टे आखले असले तरीही अपघात टाळण्यासाठी ते अपुरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे मोठा अपघात होण्याआधीच दोन्ही बाजूने गतिरोधक बसवावे अशी मागणी होत आहे. 
शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवावेत
गतिरोधक उंच असल्यास त्याठिकाणी दुचाकी वाहनचालक घसरुन पडण्याची शक्यता असते.  तेंव्हा हे गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून बसवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी मेगाब्लॉक; सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व जनशताब्दी एक्सप्रेस उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११.३० वाजेपर्यंत आडवली ते आचिर्णे विभागादरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे प्रामुख्याने सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

१) Train no. गाडी क्रमांक १०१०६ सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस 
या गाडीचा दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड- कणकवली विभागादरम्यान ९० मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. .
२) गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस
या गाडीचा दिनांक ९ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास रत्नागिरी स्थानकादरम्यान १० मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून २ विशेष मेमू गाड्या धावणार

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावरील सध्याची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर दोन महिन्यांसाठी दोन विशेष मेमू गाड्या चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. या गाड्या आठ डब्यांच्या असून पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाच्या असणार आहेत. दोन्ही गाड्यांच्या प्रत्येकी ९ असे मिळून एकूण १८ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
१) गाडी क्रमांक ०११५७ पनवेल – रत्नागिरी विशेष मेमू 
दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ही गाडी पनवेल येथून रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी  सुटून रत्नागिरी येथे  पहाटे ४ वाजता पोहोचेल.
या गाडीचे थांबे : सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड
2) गाडी क्रमांक ०११५८ चिपळूण – पनवेल विशेष मेमू 
दिनांक ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ही गाडी चिपळूण  येथून दुपारी  ३ वाजून २५ मिनिटांनी  सुटून पनवेल येथे  रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी पोहोचेल.
या गाडीचे थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे.

”…. म्हणुन गाड्यांचे हे डबे कमी केले जात आहेत.” गाड्यांचे स्लीपर कोचेस कमी केल्यावर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे स्पष्टीकरण

नागपूर: रेल्वेत प्रवाशांकडून वातानुकूलित (एसी) कोचला जास्त मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’ कमी करून ‘एसी कोच’ वाढवले गेले, असा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केला.

मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मध्य रेल्वेसह देशभरात प्रवासी गाड्यांमधील सातत्याने स्लिपर कोच कमी होऊन वातानुकूलित ‘थ्री टायर एसी कोच’ वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राम करण यादव पुढे म्हणाले, रेल्वेत सातत्याने प्रवाशांकडून ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वातानुकूलित कोच वाढवले गेले.

देशातील काही ठिकाणी मागणीनुसार ‘स्लिपर कोच’च्याही गाड्या चालवल्या जात आहेत. त्यातच सध्या ‘एसी थ्री टायर’ आणि ‘स्लिपर कोच’मधील सीटच्या प्रवासी भाड्यात खूप जास्त फरक नाही. रेल्वेकडून सातत्याने पायाभूत सुविधा बळकट केली जात असून थ्री लाईन, फोर लाईनसह इतरही कामांना गती दिली गेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मग कमी झालेल्या पॅसेंजर रेल्वे पुन्हा चालवण्याबाबत प्रक्रिया होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेत अमृत भारत योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्थानकांचा विकास होत असल्याचेही यादव म्हणाले.

 

महाव्यवस्थापकांचा दावा कितपत योग्य? 

कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाड्यांचे दोन स्लीपर डबे कमी करून त्या जागी दोन ‘ईकाॅनाॅमी थ्री टायर एसी’ चे डबे जोडले गेले आहेत. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर चालवते. या गाड्यांना स्लीपर कोचपेक्षा एसी कोचला जास्त मागणी होती हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कारण या गाड्यांच्या स्लीपर कोच च्या तिकीट चार महिने आगावू बूक करताना भेटणे मुश्किल होत असे. मग मागणी कमी कशी असा प्रश्न प्रवाशांकडून विचाराला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लीपर श्रेणी आणि थ्री टायर एसी यांच्या तिकीट दरांमध्ये जास्त फरक नाही असे महाव्यवस्थापक बोलत आहेत. पण खरे पाहता थ्री टायर एसी चे प्रवासभाडे स्लीपर श्रेणीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा पण चुकीचा आहे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

Konkan Railway | सोमवारची मुंबई सिएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस उशिराने धावणार

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या सोमवारी आणि मंगळवारी दिनांक ०५ आणि ०६ फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेच्या वेर्णा ते माजोर्डा या विभागां दरम्यान रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण दोन तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. या मेगाब्लॉक मुळे सोमवार दिनांक ५ फेब्रुवारीला मुंबई सिएसएमटी वरून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 22229 Mumbai CSMT – Madgaon Jn. Vande Bharat या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून ही गाडी रत्नगिरी ते करमाळी या स्थानकांदरम्यान सुमारे १ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.

सावधान! कोकण रेल्वे प्रवासादरम्यान विक्रेत्यांकडून वडापाव विकत घेत असाल तर ही बातमी वाचाच

रत्नागिरी : कोकण रेल्वेमधून प्रवास करताना चिपळूण – रत्नागिरी ही स्थानके आली कि खास करून वडापाव विकणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गाडीत चढून वडापाव विक्री करतात. प्रवासी पण रास्त किंम्मत आणि गरम असल्याने हे वडापाव खरेदी करतात. मात्र हे फेरीवाले प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.  
समाज माध्यमांवर एक फोटो  मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. एक वडापाव विक्रेता विक्रीस आणलेल्या वडापाव च्या ट्रे वर पाय ठेवून झोपला असल्याचा हा किळस आणणारा हा फोटो आहे.  हा फोटो चिपळूण स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे. 
या प्रकारामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. रेल्वे कॅन्टीन च्या विक्रेत्यांकडून असे किळसदायक प्रकार घडल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्यामुळे प्रवासी वर्ग या बाहेरील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेत असे. मात्र इथेही असे अनुभव येत असल्याने प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ घ्यावे कि न घ्यावे हा प्रश्न साहजिकच त्यांना पडला आहे. हे विक्रेते बहुतेक करून परप्रांतीय आहेत. विकताना ते असे किळसवाणे प्रकार करत असतील तर हे खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छतेचे किती मापदंड पाळत असतील हा प्रश्न समोर आला आहे.  

कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल; स्लीपर डब्यांमध्ये कपात. येत्या गुरुवारपासून अंमलबजावणी

Konkan Railway News: कोकणात गावी जाण्यासाठी कोकणवासीयांची आणि गोवेकरांची पहिली पसंद असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. या गाड्यांचे २ स्लीपर डबे कमी करून त्या जागी इकॉनॉमी २ थ्री टायर एसी डबे जोडले जाणार आहेत. हा बदल कायमस्वरूपासाठी करण्यात येणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १०१०४/१०१०३ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “मांडवी” एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. २०११२ /२०१११ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांत हा बदल दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ गुरुवारपासून पासून अमलांत आणला जाणार आहे.

श्रेणी सध्याची संरचना सुधारित संरचना बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त ) 01 01 बदल नाही
टू टियर एसी 01 01 बदल नाही
थ्री टायर एसी 04 04 बदल नाही
इकॉनॉमी थ्री टायर एसी 00 02 02 डबे वाढवले
स्लीपर 09 07 02 डबे कमी केले
जनरल 04 04 बदल नाही
एसएलआर 01 01 बदल नाही
पेन्ट्री कार 01 01 बदल नाही
जनरेटर कार 01 01 बदल नाही
एकूण 22 LHB 22 LHB

 

कोकणातील प्रवाशांकडून नाराजीचे सूर 
या गाड्यांचे सेकंड स्लीपर डबे कमी केल्याने कोकणातील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या आधी या गाडीला ११ स्लीपर डबे होते त्यानंतर ते ९ वर आणलेत. आता तर त्यातही कपात करून ७ वर आणले आहेत. याचा खूप मोठा तोटा कोकणातील सामान्य प्रवाशांना सोसावा लागणार आहे. कारण त्यावरील श्रेणीचे तिकीट त्यांना परवडणारे नाही. आधीच तिकीट मिळणे खूप कठीण त्यात हे डबे कमी केल्याने अधिकच कठीण झाले आहे. 
गोवा आणि दक्षिणेकडील प्रवाशांचे हित नजरेसमोर ठेवून असे बदल होत असतील तर कोकण रेल्वे नक्की कोणासाठी हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.  

सावंतवाडीत रामभक्त नाही आहेत का? ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ ला थांबा न दिल्याने प्रवाशांचा रेल्वेला प्रश्न..

सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. बांदा, वेंगुर्ला, शिरोडा, रेडी पासून आंबोली चौकुळ अशा विस्तारित क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे सोयीचे स्थानक आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही हे कोकण रेल्वे च्या पूर्ण मार्गातील पाहिल्या दहा स्थानकांत मोडते. असे असूनही येथे खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संघटनांनी वेळोवेळी मागणी करूनही अजूनही काही मुख्य गाड्यांना थांबे मिळाले नाही आहेत. त्यात भर म्हणजे आता विशेष गाड्यांच्या थांब्यांसाठी सावंतवाडी स्थानकाला वगळण्यात येत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आताच जाहीर करण्यात आलेल्या अयोध्ये यात्री साठी चालविण्यात येणार्‍या ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ ला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला नाही आहे. त्यामुळे सावंतवाडीत रामभक्त नाहीत का? असा सवाल प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचाराला जात आहे. रेल्वे अभ्यासक आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे श्र. सागर तळवडेकर यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाडीला सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

विविध मागण्यांसाठी सावंतवाडी येथे आज लाक्षणिक उपोषण. 

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. 

 

 

 

 

 

 

कोकण रेल्वेसंबधी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी २३ संघटना एकत्र; उद्या दिनांक २६ जानेवारीला सावंतवाडी येथे लाक्षणिक उपोषण

सावंतवाडी: सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून उद्या २६ जानेवारी रोजी अ अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे. 
संघटनेमार्फत खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत 
१) सावंतवाडी टर्मिनस परिपूर्ण करून त्याला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.
२) कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करणे
३)ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.
४)सावंतवाडी स्थानकावर प्रवासी सुविधांचा विस्तार करणे(पूर्णवेळ PRS,अमृत भारत स्थानक योजना,एक स्थानक एक उत्पाद, आदी.
५) प्रा. मधु दंडवते यांचा प्रत्येक स्थानकावर तैल चित्र लावणे.
६)चिपळूण – कराड, वैभववाडी – कोल्हापूर, सावंतवाडी – बेळगाव या रेल्वे मार्गांना चालना देणे.
७)सावंतवाडी स्थानकावर मंगलोर, मंगला सहित अतिरिक्त सुपरफास्ट गाड्यांना थांबा देणे.
८. याच बरोबर पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी बांद्रा – वसई – सावंतवाडी नवीन एक्सप्रेस किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून पुणे – कल्याण – सावंतवाडी एक्सप्रेस तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी एक्सप्रेस सुरू करावी.
९. येथील भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात व न्याय मिळावा.
सामाजिक आणि राजकीय पक्षांचा पाठिंबा
या उपोषणास कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह एकूण २३ संस्था एकत्र आल्या आहेत. सिंधुदुर्ग प्रतिष्ठान-मुंबई, संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था-मुंबई, पागवाडी मुळीक प्रतिष्ठान- इन्सुली सिंधुदुर्ग, घे भरारी फाऊंडेशन-चर्चगेट, जनजागृती सेवा संस्था-ठाणे , ऑटो रिक्षा चालक मालक संघटना-सावंतवाडी, मुस्लिम हेल्थ अँड वेलफेअर फाऊंडेशन- सावंतवाडी इत्यादी संघटनांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे. याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांनी आपले समर्थन दिले आहे. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे.   
  
ईमेल अभियान 
आपल्या रेल्वे प्रशासन,केन्द्र सरकार व राज्य सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी संघटनेतर्फे ‘ई-मेल करा’ अभियान राबविण्यात येत आहे. आपल्या हक्कासाठी, कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी,न्यायासाठी सांवतवाडी येथे रेल्वे टर्मिनस  व्हावे जेणेकरून आम्हा कोकणवासियांना हक्काच्या गाड्या मिळतील यासाठी रेल्वे प्रशासन,केन्द्र सरकार व राज्य सरकारला जाग येण्यासाठी शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवण्याचे आवाहन संघटनेमार्फत करण्यात आले आहे. त्यासाठी  खाली लिंकवर  ई-मेल चा मायना दिला आहे त्यात स्व:ताचे नाव व मोबाईल नंबर टाकुन आपल्या ईमेल ने सन्माननीय पंतप्रधान तसेच रेल्वे मंत्री, रेल्वेराज्यमंत्री, रेल्वे बोर्ड व कोकण रेल्वेचा व्यवस्थापकीय संचालक यांना आणि महाराष्ट्र शासनाचे मंत्री यांना पाठवायचे आहेत.

अयोध्येला जाणाऱ्या रामभक्तांसाठी कोकणरेल्वे मार्गे २ विशेष फेऱ्या

Konkan Railway News: फेब्रुवारीपासून वास्को वरुन कोकण रेल्वेमार्गावर अयोध्येला जाण्यासाठी आय.आर.सी.टि.सी. कडून दोन वेळा विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन कोकणातील स्थानकांवर थांबणार असून १२ फेब्रुवारीला या गाडीची पहिली ट्रिप असणार आहे. या गाडीच बुकिंग हे फक्त आय.आर.सी.टि. सी. च्या माध्यमातून केल जाणार असून देशभरातून 66 स्थानकांवरून अशा ट्रेन सुटणार आहेत. याच बुकिंग राउंड ट्रिप मधे केल जाणार आहे. लवकरच IRCTC च्या वेबसाईटवर हे बुकिंग उपलब्ध होईल. जे रामभक्त अयोध्येत जाऊ इच्छितात त्यांनी या आस्था ट्रेनचा लाभ घ्यावा अस आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सल्लागार समिती सदस्य सचिन वहाळकर यांनी केल आहे. त्यांनी नुकतीच कोकण रेल्वेमार्गावरुन अयोध्ये साठी ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. सदर विशेष ट्रेन कोकण रेल्वेमार्गावरुन सोडल्याबद्दल त्यांनी IRCTC तसेच रेल्वे मंत्रालयाचे आभार मानले.
गाडी क्रमांक ०६२०५ वास्को – दर्शन नगर- वास्को द गामा स्पेशल एक्सप्रेस 
ही गाडी दिनांक १२ फेब्रुवारी आणि २६ फेब्रुवारी (सोमवारी) चालविण्यात येणार आहे. रात्री १० वाजून १० मिनिटांनी ही गाडी  वास्को स्थानकावरून सुटून तिसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता अयोध्येला  पोहोचणार आहे.
परतीचा प्रवासात म्हणजे दुसऱ्या दिवशी  ही गाडी दिनांक १६ फेब्रुवारी आणि ०१ मार्च (शुक्रवारी) रोजी  रात्री  ८ वाजता ही गाडी सुटून तिसऱ्या दिवशी रात्री  १२ वाजता  वास्को या स्थानकावर पोहोचणार आहे.
या गाडीचे कोकणात मडगाव , थिवी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आणि वसई या स्थानकावर थांबे आहेत.
ही गाडी २० सेकंड स्लीपर आणि २ एसएलआर असे मिळून एकूण २२ कोचसहित चालविण्यात येणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search