Category Archives: कोकण रेल्वे

संगमेश्वर रेल्वे स्थानकात चार एक्सप्रेसना थांबा मिळावा यासाठी ठाकरे शिवसेना आक्रमक

   Follow us on         संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर वांद्रे-मडगाव, श्री गंगानगर, अजमेर-एरणाकुलम मरुसागर आणि जबलपूर-कोईंबतूर या चार साप्ताहिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, अशी येथील प्रवाशांची बऱ्याच वर्षांपासूनची मुख्य मागणी आहे. यासंदर्भातील प्रस्ताव आधीच केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठवून जवळपास सात महिने उलटून गेले आहेत, तरीसुद्धा यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. निर्णय घेण्यास होणाऱ्या या विलंबामुळे आणि प्रशासनाकडून सद्यस्थिती स्पष्ट केली जात नसल्याने संगमेश्वरमधील प्रवाशांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

​या प्रलंबित प्रश्नावर ठोस निर्णय घेतला जावा आणि रेल्वे प्रशासनाने या प्रस्तावावर आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक प्रवासी प्रतिनिधी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाची लवकरात लवकर एक संयुक्त बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी केली आहे.

​या नियोजित बैठकीमध्ये चारही एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्याच्या प्रस्तावाची सध्याची स्थिती काय आहे, केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून यावर नेमकी काय कार्यवाही सुरू आहे आणि निर्णय होण्यास का उशीर होत आहे, या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी या पत्राद्वारे व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांकडून कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने विनंती अर्ज पाठवले जात असून, या जनआंदोलनासारख्या मोहिमेला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत आहे.

​स्थानिक प्रवाशांच्या या न्याय्य मागणीला व्यापक जनसमर्थन मिळत असल्याने, या मोहिमेला आता खऱ्या अर्थाने जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाने या संवेदनशील विषयाची तातडीने व गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. कोकण रेल्वे प्रशासन या संयुक्त बैठकीला कसा प्रतिसाद देते आणि संगमेश्वरकरांच्या या जुन्या मागणीला अखेर न्याय मिळतो का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गरीबरथ एक्सप्रेसचे प्रवासभाडे कमी होणार

   Follow us on        

कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने एक अत्यंत महत्त्वाचा प्रशासकीय व सेवाविषयक निर्णय घेतला आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते केरळमधील कोचुवेली (तिरुवनंतपुरम) दरम्यान धावणारी लोकप्रिय गरीबरथ एक्सप्रेस आता तिच्या जुन्या स्वरूपात न धावता नव्या वर्गवारीत दाखल होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून या गाडीच्या वेळापत्रकात आणि वाहतूक संरचनेत सुधारणा करण्यात येत असून, त्याचा थेट फायदा या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना होणार आहे.

​रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, सध्या १२२०१/१२२०२ या क्रमांकाने धावणारी गरीबरथ एक्सप्रेस जानेवारी २०२७ पासून सुपरफास्ट श्रेणीऐवजी नियमित मेल/एक्सप्रेस ट्रेन म्हणून चालवली जाईल. या बदलासोबतच गाडीला नवीन क्रमांक देखील प्रदान करण्यात आले आहेत. त्यानुसार कोचुवेली ते लोकमान्य टिळक टर्मिनस या प्रवासासाठी १६३७२ हा नवीन क्रमांक असेल, तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली या परतीच्या प्रवासासाठी १६३७१ हा नवीन क्रमांक वापरात येईल.

​कोणत्याही ट्रेनला सुपरफास्ट दर्जा टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण प्रवासात ताशी ५५ किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त सरासरी वेग राखणे तांत्रिकदृष्ट्या बंधनकारक असते. मात्र, कोकण रेल्वेच्या कठीण भौगोलिक रचनेत आणि वाढत्या गाड्यांच्या प्रवाहात या गाडीचा सरासरी वेग ५५ किमी प्रतितासापेक्षा कमी होत असल्याने रेल्वे बोर्डाने या ट्रेनला मेल/एक्सप्रेस वर्गवारीत हलवण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलामुळे गाडीच्या वेळापत्रकाचे नियोजन अधिक अचूक आणि वास्तववादी करणे प्रशासनाला शक्य होणार आहे.

​गाडी मेल/एक्सप्रेस श्रेणीत वर्ग केल्यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत सुपरफास्ट गाड्यांसाठी आकारला जाणारा अतिरिक्त ‘सुपरफास्ट सरचार्ज’ आता या गाडीच्या तिकीट दरातून वगळला जाईल. त्यामुळे प्रवाशांच्या खिशावरील तिकीट खर्चाचा भार काही प्रमाणात हलका होणार असून, गरीबरथच्या प्रवाशांना अधिक किफायतशीर दरात आपला प्रवास पूर्ण करता येईल.

​हा नवीन नियम आणि बदललेला क्रमांक जानेवारी २०२७ मधील निश्चित केलेल्या तारखेपासून पूर्णपणे लागू केला जाणार आहे. तोपर्यंत ही गाडी तिच्या सध्याच्या १२२०१/१२२०२ या क्रमांकानेच पूर्ववत धावत राहील. ठाणे, पनवेल, रत्नागिरी, सावंतवाडी रोड, मडगाव, मंगळुरू आणि एरणाकुलम या प्रमुख स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

मंगळुरू एक्सप्रेसमध्ये बॅगेचे लॉक तोडून ९ लाखांच्या दागिन्यांची चोरी

   Follow us on         कणकवलीहून मुंबईकडे एका कार्यक्रमासाठी निघालेल्या कासार्डे येथील चव्हाण दांम्पत्याने मंगळूरू एक्सप्रेस ट्रेनच्या एस-०३ डब्यातून प्रवास केला होता. प्रवास दरम्यान त्यांनी आपली ट्रॉलीबॅग सीटखाली ठेवली होती आणि रत्नागिरी व रोहा रेल्वे स्थानकांदरम्यानच्या प्रवासात अज्ञात व्यक्तीने बॅगेचे कुलूप तोडले.

​चोरट्यांनी बॅगेतील प्लॅस्टिकच्या पांढऱ्या पिशवीची चेन उघडून अंदाजे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले आहेत. यामध्ये ५० ग्रॅम वजनाचे काळे मणी असलेले सोन्याचे गंठण आणि २०१८ मध्ये बनवून घेतलेले सोन्याचे गोठ यांचा समावेश आहे.

​चोरीला गेलेल्या दागिन्यांची खरेदीवेळची किंमत दोन लाख ३४ हजार रुपये असली, तरी सध्याच्या बाजाराभावानुसार त्यांची अंदाजे किंमत तब्बल नऊ लाख रुपये होत आहे. या घटनेमुळे प्रवासादरम्यान चव्हाण कुटुंबाला मोठा मानसिक धक्का बसला असून त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

​प्रवास संपल्यानंतर पनवेल रेल्वे स्थानकाजवळ पोहोचल्यावर ही चोरी लक्षात आल्यानंतर त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून अधिकृत फिर्याद नोंदवली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

​फिर्यादी महेश चव्हाण हे एका पायाने अपंग असून, आधीच प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या या कुटुंबावर या चोरीच्या घटनेमुळे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून लवकरात लवकर आरोपीचा शोध घ्यावा आणि चोरीला गेलेला ऐवज हस्तगत करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी आर्त विनंती पीडित कुटुंबाने केली आहे.

Konkan Railway: रेल्वेच्या नव्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजमध्ये महाराष्ट्र राज्याबाबत दुजाभाव

   Follow us on        

एकूण २२ टक्के सर्वाधिक भागभांडवल आणि वार्षिक १,१४७ कोटी रुपयांचा प्रवासी महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या हक्काच्या सावंतवाडी कोचिंग टर्मिनसला ₹४,७०४.०८ कोटींच्या तिसऱ्या आर्थिक पुनर्रचना पॅकेजमधून पूर्णपणे डावलून शेजारच्या गोवा व कर्नाटकातील कामांना शेकडो कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे.

​रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या ५ वर्षांच्या या भव्य आराखड्यात गोव्यातील पेडणे व जुने गोवा येथील दोन बोगद्यांसाठी १,४८६ कोटी रुपये, कर्नाटकातील ५ स्थानकां वरील लूप लाईन्ससाठी ४२५.५५ कोटी रुपये आणि दोन्ही राज्यांतील ३ क्रॉसिंग स्थानकांसाठी २७१.२२ कोटी रुपयांची खैरात केली असताना, संपूर्ण कोकणाच्या जिवावर उभ्या असलेल्या कोकण रेल्वेने सावंतवाडी टर्मिनस व दुहेरीकरणासाठी प्रशासनाने एक रुपयाचाही निधी उपलब्ध करून दिलेला नाही.

​सावंतवाडी स्थानकावर दररोज दुपारी ‘सीएसएमटी-सावंतवाडी एक्सप्रेस’ आणि ‘तुतारी एक्सप्रेस’ एकाच वेळी उभ्या राहतात, मात्र टर्मिनसचा विकास न झाल्यामुळे तिथे स्वतंत्र स्टॅबलिंग लाईन किंवा वॉशिंग पिट लाईन उपलब्ध नाही; परिणामी गाड्यांच्या स्वच्छता आणि पाणी भरण्याच्या मूलभूत सोयीअभावी सावंतवाडी-मुंबई एक्सप्रेसला थेट चिपळूण गाठावे लागते तर दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला देखभालीसाठी रिकामे मडगावला पाठवावे लागत आहे.

​या बिकट परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी यार्डाचा विस्तार करणे, अतिरिक्त प्लॅटफॉर्म उभारणे आणि रुळांची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे असताना, रेल्वे प्रशासनाकडून उलट मळगाव बाजूला रुळांच्या नियोजित जागेतच नवीन इमारत बांधकाम सुरू करून मूळ टर्मिनस प्रकल्पाचे अस्तित्वच धोक्यात आणण्याचा लाजीरवाणा प्रकार सुरू आहे.

​२७ जून २०१५ रोजी झालेल्या भव्य भूमीपूजनाच्या आश्वासनांना प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्याचा आरोप करत, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने (सावंतवाडी) या पॅकेजमध्ये तातडीने सुधारणा करून सावंतवाडी कोचिंग टर्मिनसचा समावेश करावा, रुळांच्या जागेतील वादग्रस्त बांधकाम त्वरित थांबवावे आणि मडगाववरील ताण कमी करण्यासाठी स्टॅबलिंग यार्ड, वॉशिंग पिट लाईन व अतिरिक्त लूप लाईनची उभारणी करावी या मागण्यांसाठी व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आता १६ डब्यांची होणार

   Follow us on        

मुंबई आणि कोकणादरम्यान धावणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची सतत वाढणारी गर्दी आणि तिकिटांची वाढती मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने या मार्गावर मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या मार्गावर ८ डब्यांऐवजी थेट १६ डब्यांची (16-Car Rake) वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून, यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी दुप्पट आसने उपलब्ध होणार आहेत.

​मध्य रेल्वेच्या मुख्य यांत्रिक अभियंता कार्यालयाने (CSMT, मुंबई) जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार (दिनांक ३० ऑक्टोबर २०२६) या नव्या योजनेची अंमलबजावणी १० नोव्हेंबर २०२६ पासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे मुंबई आणि गोव्यादरम्यान प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना आणि पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः सुट्ट्यांच्या आणि सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची तुफान गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी मध्य रेल्वेचा हा निर्णय अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

​नियोजनानुसार, माटुंगा वर्कशॉपमध्ये नियमित दुरुस्ती व देखभाल (SS-II maintenance) पूर्ण झालेला १६ डब्यांचा नवीन रेक ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत बाहेर पडेल. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२६ रोजी वाडीबंदर (WB) कोचिंग डेपो येथे या १६ डब्यांच्या ट्रेनची प्राथमिक तपासणी आणि सुरक्षिततेची चाचणी (trial) पूर्ण केली जाईल. ही सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण करून नवीन १६ डब्यांची गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

​या वेळापत्रकानुसार, ९ नोव्हेंबर २०२६ रोजी मडगाववरून रात्री १०:३० वाजता प्रवास पूर्ण केल्यानंतर सध्याची ८ डब्यांची (VB Rake-19) वंदे भारत ट्रेन सेवेतून मागे घेतली जाईल. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०५:२५ वाजता मुंबई CSMT येथून सुटणाऱ्या ट्रेन नंबर २२२२९/२२२३० मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसमध्ये हा १६ डब्यांचा नवा रेक अधिकृतपणे समाविष्ट केला जाईल आणि ती मडगावच्या दिशेने रवाना होईल.

​दरम्यान, मडगाव मार्गावरून मोकळी झालेली ८ डब्यांची वंदे भारत ट्रेन (VB Rake-19) नागपूर विभागाकडे पाठवली जाणार असून, ११ नोव्हेंबर २०२६ पासून ती नागपूर-सिकंदराबाद (NGP-SC) वंदे भारत एक्सप्रेस म्हणून सेवेत दाखल होईल. तर नागपूर-सिकंदराबाद मार्गावरील जुनी गाडी (VB Rake-35) दुरुस्तीसाठी माटुंगा वर्कशॉपमध्ये पाठवली जाईल. या रेक अदलाबदलीमुळे (Rationalisation) मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर गाड्यांची उपलब्धता अधिक सक्षम आणि सुरळीत होणार आहे.

संगमेश्वर रेल्वे स्टेशनवर चार साप्ताहिक एक्स्प्रेसच्या थांब्यांसाठी संगमेश्वरकरांची जन पत्र मोहीम

 

कोकण रेल्वेच्या CMD यांना नागरिकांनी वैयक्तिक पत्रे पाठविण्याचे आवाहन; जनतेच्या एकजुटीतून थांब्यांसाठी प्रयत्न

   Follow us on        

संगमेश्वर : संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात चार साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी आता संगमेश्वरच्या जनतेच्या वतीने पत्रमोहीम राबविण्यात येत आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) संतोष कुमार झा यांना नागरिकांनी स्वतःच्या वतीने पत्रे पाठवून या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील सुमारे १९६ गावांतील नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात चार साप्ताहिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने या मागणीसाठी आता जनतेने मोठ्या संख्येने पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

या चार एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा, ही मागणी :

१. १०११५/१०११६ – वांद्रे टर्मिनस–मडगाव एक्स्प्रेस

२. १६३११/१६३१२ – श्री गंगानगर–तिरुवनंतपुरम एक्स्प्रेस

३. १२९७७/१२९७८ – अजमेर–एर्नाकुलम मारुसागर एक्स्प्रेस

४. ०२१९७/०२१९८ – जबलपूर–कोईम्बतूर एक्स्प्रेस

या चारही गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकात थांबा मिळाल्यास तालुक्यातील नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नियमित रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे ही मागणी केवळ काही व्यक्तींची नसून संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीशी संबंधित आहे.

 

प्रत्येक घरातून पत्र, प्रत्येक प्रवाशाचा सहभाग!

या पत्रमोहीमेत घरातील प्रत्येक रेल्वे प्रवाशाने स्वतंत्र पत्र पाठवावे. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि गावातील नागरिकांनाही सहभागी करून घेऊन जास्तीत जास्त पत्रे कोकण रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

“संगमेश्वरच्या चार एक्स्प्रेस थांब्यांसाठी आता जनतेनेच एकजुटीने पुढे यावे. प्रत्येक नागरिकाचे पत्र ही आपल्या मागणीला मिळणारी ताकद आहे. ही कोणत्याही एका व्यक्तीची किंवा ग्रुपची लढाई नसून संपूर्ण संगमेश्वरच्या जनतेच्या हक्काची लढाई आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून या पत्रमोहीमेत सहभागी व्हावे,” अशी भावना नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ही गाडी ‘सुपरफास्ट’ म्हणुन धावणार नाही; गाडीच्या क्रमांकातही बदल

   Follow us on        

कोकण रेल्वेच्या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम दरम्यान धावणाऱ्या अत्यंत लोकप्रिय रेल्वे गाडीच्या संदर्भात प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे विभागाने या गाडीचा वर्ग आणि ओळख क्रमांक बदलण्याचा निर्णय घेतला असून यामुळे या मार्गावरील प्रवाशांच्या प्रवासाच्या नियोजनात बदल होणार आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ‘सुपरफास्ट’ श्रेणीत समाविष्ट असलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसची (गाडी क्रमांक २२११३ / २२११४) पुनर्रचना करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीचा दर्जा आता ‘मेल/एक्स्प्रेस’ असा केला आहे. श्रेणीतील या फेरबदलामुळे गाडीच्या जुन्या क्रमांकामध्येही सुधारणा करण्यात आली असून आता ही रेल्वे ११०७३ आणि ११०७४ या नव्या क्रमांकांनी ओळखली जाणार आहे.

​रेल्वे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे की, हे सर्व बदल तात्काळ लागू न होता १ जानेवारी २०२७ पासून अंमलबजावणीत येतील. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरुवातीपासून या गाडीचे आरक्षण किंवा प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्व प्रवाशांनी जुन्या क्रमांकाऐवजी ११०७३ / ११०७४ या नवीन क्रमांकाचाच वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

​या रेल्वेच्या वेळापत्रकाबद्दल सांगायचे तर, मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरून ही गाडी दर मंगळवारी आणि शनिवारी तिरुवनंतपुरमच्या दिशेने रवाना होते. तर परतीच्या प्रवासात तिरुवनंतपुरम येथून मुंबईसाठी ही रेल्वे दर सोमवारी आणि गुरुवारी सुटते. श्रेणी आणि क्रमांकात बदल झाला असला तरी गाडीच्या मूळ वेळापत्रकात आणि धावण्याच्या दिवसांमध्ये कोणताही फेरबदल करण्यात आलेला नाही.

​प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण मार्गावरील या गाडीचे प्रमुख थांबे पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत. ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेरणेम, मडगाव आणि कारवार या महत्त्वाच्या स्थानकांवर ही गाडी पूर्वीसारखीच थांबणार आहे. त्यामुळे या भागातील प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच सेवा मिळत राहील, फक्त तिकिट बुकिंग करताना प्रवाशांनी नवीन क्रमांकाची नोंद घेणे आवश्यक आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष मेगाब्लॉक

   Follow us on        

गेल्या १८ वर्षांपासून रडतखडत सुरू असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आता अखेर पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि इंदापूर बायपासचे काम रखडल्यामुळे सुट्ट्यांच्या काळात किंवा सणासुदीच्या दिवशी प्रवाशांना तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. या भागात लागणाऱ्या लांबच लांब रांगेमुळे वाहनधारकांचे दोन ते तीन तास नाहक वाया जात असत. हा त्रास कायमचा दूर करण्यासाठी आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बायपासच्या कामाला गती दिली आहे.

​या कामाचा भाग म्हणून कोकण रेल्वे ट्रॅक ओलांडणाऱ्या उड्डाणपुलावर गर्डर बसवण्याचे अत्यंत महत्त्वाचे आणि जोखमीचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. या तांत्रिक कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मेगाब्लॉक मंजूर करण्यात आला आहे. प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी हा ब्लॉक दररोज घेण्याऐवजी शुक्रवार आणि शनिवार वगळून फक्त उर्वरित दिवसांत लागू करण्यात आला आहे.

​कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेचा विचार करून या ब्लॉकची वेळ पहाटे साडेचार ते साडेसात अशी निश्चित केली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या तीन तासांच्या कालावधीत संबंधित रेल्वे मार्गावरून कोणतीही नियमित प्रवासी गाडी धावत नाही. त्यामुळे या कामासाठी मेगाब्लॉक घेतला गेला तरी रेल्वेच्या प्रवासावर किंवा वेळापत्रकावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नसून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

​पुलाचे गर्डर चढवण्याचे काम अत्यंत सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंते, अधिकारी आणि संबंधित ठेकेदार कंपनीचे पथक घटनास्थळी पूर्ण तयारीसह तैनात असणार आहे. सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करून हे आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

​हे काम वेळेत आणि निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे यासाठी कोकण रेल्वेचे तांत्रिक अधिकारी आणि महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली आहे. दोन्ही विभागांच्या परस्पर समन्वयातून आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली असून, संपूर्ण यंत्रणा या कामासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.

अतिरिक्त रेल्वे ट्रॅक, लूपलाईन आणि फलाटाच्या जागी इमारत! कोकण रेल्वेचे चुकीचे नियोजन!

   Follow us on        

सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात प्रवेशासाठी केवळ पाश्चिममेकडील बाजूवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे प्रवाशांची वाढती गरज आणि मागणी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने स्थानकाच्या पूर्वेला विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत ३.२८ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून स्थानकाच्या पूर्व भागात तिकीट बुकिंग कार्यालय, प्रवासी प्रतिक्षा कक्ष, पीआरएस केंद्र आणि इतर आधुनिक सुविधा उभारण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार यांनी आगामी एक वर्षात हे सर्व काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली आहे.

​मात्र, एकीकडे स्थानकाच्या या विस्तारीकरणाचे स्वागत होत असतानाच, दुसरीकडे स्थानिक नागरिक व रेल्वे प्रवाशांमधून टर्मिनसच्या घोषणेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सागर तळवडेकर यांनी मांडलेल्या भूमिकेनुसार, सावंतवाडी स्थानकाच्या पूर्वकडील राखीव भागात कोकण रेल्वे प्रशासन इमारत बांधण्याचे नियोजन करत आहे. जर या ठिकाणी प्रशासकीय इमारत उभी राहिली, तर भविष्यात टर्मिनससाठी आवश्यक असलेले अतिरिक्त प्लॅटफॉर्म आणि लूपलाईनचे काम कधीच होऊ शकणार नाही, अशी भीती वर्तवली जात आहे.

​कोकण रेल्वे महामंडळाची सावंतवाडी टर्मिनस प्रकल्प पूर्ण करण्याची मानसिकता दिसत नसून, पुढील ५ वर्षांत यासंदर्भात कोणतेही ठोस काम करण्याचे नियोजन नाही, असा आरोप प्रशासनावर केला जात आहे. गणेशोत्सव, दिवाळी किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात जाणारे चाकरमानी महिनोंमहिने प्रतीक्षेत असतात आणि गाड्या १० ते १२ तास उशीर होत असल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागतात. गाड्यांमध्ये शौचालय उभे राहून प्रवास करावा लागणे ही नित्याची बाब बनली असताना, प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर प्रवास मिळावा हा प्रश्न तीव्रतेने विचारला जात आहे.

​कोकण रेल्वे काँगो प्रजासत्ताकात मेट्रोचे बांधकाम आणि श्रीलंकेतील प्रकल्पांमध्ये सहभागी होत असताना, ज्या कोकणच्या मातीने व प्रशासनाने रेल्वेला उभे केले, तिथेच मूलभूत गरजांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याबद्दल प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. परदेशी प्रकल्पांमध्ये सहभाग घेणे ही आनंदाची बाब असली, तरी टर्मिनससाठी आवश्यक असलेले रेल्वे ट्रॅक, लूपलाईन आणि अतिरिक्त प्लॅटफॉर्मच्या विकासाला बाधक ठरणारे कोणतेही नियोजन होऊ नये, अशी प्रवाशांची स्पष्ट भूमिका आहे.

उत्तर महाराष्ट्र-कोकण थेट रेल्वेने जोडण्याचे प्रयत्न सुरू

   Follow us on        

खासदार नारायण राणे यांनी २१ ऑक्टोबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून उत्तर महाराष्ट्र आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. धुळे येथील स्थानिक नागरिक गणेश शंकरलाल शर्मा यांच्या निवेदनाची दखल घेत राणे यांनी ही मागणी केली. धुळे रेल्वे स्थानकाचा टप्प्याटप्प्याने ‘उगम-समाप्ती स्थानक’ अर्थात टर्मिनस म्हणून विकास करण्याबाबतची तांत्रिक, कार्यान्वित आणि आर्थिक व्यवहार्यता तपासण्याची विनंती त्यांनी रेल्वेमंत्र्यांना केली आहे.

​धुळे स्थानकात रेल्वे गाड्यांची देखभाल, दुरुस्ती आणि वाहतूक सुरळीत चालण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये रेल्वे यार्डची पुनर्रचना करणे, फलाटांची लांबी वाढवणे, पिट लाईनची सोय करणे, तसेच रेक उभे करण्याची व्यवस्था निर्माण करणे यांसारख्या विविध विकासकामांची टप्प्याटप्प्याने आखणी करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.

​या पायाभूत सुविधा तयार झाल्यास कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे आणि उत्तर महाराष्ट्र यांच्यात थेट गाड्या धावू शकतील. यामुळे प्रवाशांचा प्रवास सोपा होण्यासोबतच कोकणातील पर्यटन उद्योग, स्थानिक रोजगार निर्मिती आणि व्यापाराला मोठा वेग मिळेल. याशिवाय, धुळे हे मध्य प्रदेश आणि गुजरातशी रेल्वेने जोडलेले असल्याने, या शेजारील राज्यांतील पर्यटकांनाही कोकणात येणे सोपे होईल आणि पर्यटन क्षेत्राला नवीन ग्राहकवर्ग उपलब्ध होईल.

​भविष्यातील प्रवाशांची संख्या आणि रेल्वेच्या दीर्घकालीन विस्ताराचा विचार करून रेल्वे बोर्ड व संबंधित अधिकाऱ्यांना या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती राणे यांनी पत्राद्वारे केली आहे. हा प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यास राज्यातील दोन महत्त्वाच्या भागांमधील दळणवळण सुलभ होऊन व्यापार आणि प्रादेशिक अर्थकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

​धुळे स्थानकाचा टर्मिनस म्हणून कायापालट झाल्यास धुळ्यासह नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना याचा थेट फायदा होईल. भविष्यात मनमाड-इंदूर आणि बोरविहीर-नरडाणा या नव्या रेल्वे मार्गांशी धुळे टर्मिनस जोडले गेल्यास, मध्य प्रदेश आणि गुजरातला कोकणाशी जोडणारे धुळे हे एक प्रमुख रेल्वे केंद्र म्हणून उदयास येईल. यामुळे प्रवाशांच्या सेवेसोबतच कृषी मालवाहतूक आणि उद्योगांनाही मोठा दिलासा मिळेल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search