सिंधुदुर्ग: समाज माध्यमांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास आपला संदेश संबंधित यंत्रणेकडे पोहोचवून इच्छित परिणाम साधता येतो. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसताना केवळ फेसबुकच्या माध्यमातून जनजागरण करून संगमेश्वर या रेल्वे स्थानकावर गाडयांना थांबे मिळवून देऊन पत्रकार संदेश जिमन यांनी ही गोष्ट दाखवून दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी स्थानकावरील प्रश्नांसाठी सुद्धा ओंकार लाड या नावाच्या तरुणाने नेहमीच आवाज उठवला आहे. सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून त्याने या स्थानकावरील गैरसोयींवर यंत्रणेचे लक्ष वेधले आहे. वैभववाडी स्थानकावर पुरेशी प्रवासी संख्या असताना सुद्धा पादचारी नाही होता. याकडे ओंकार ने वेळोवेळी X च्या माध्यमातून इथे पादचारी पूल व्हावा अशी मागणी केली होती. त्याचा या प्रयत्नाला अखेर यश आले असून येथे एक पादचारी मंजूर करण्यात आला असून कालच आमदार नितेश राणे यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे.
मूळ गाव वैभववाडी-नापणे असलेला ओंकार सध्या मुंबईमध्ये आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण करत आहे. तसेच शिक्षण पूर्ण करता करता तो नामांकित बिग ४ मध्ये नोकरी सुद्धा करत आहे. मुंबईमध्ये सध्या तो आई बाबा समवेत वास्तव्यास आहे. कोकण रेल्वे असो व मुंबई लोकल, ज्या ज्या गोष्टी त्याला खटकतात त्या त्या गोष्टी तो X च्या माध्यमातून शासनासमोर आणि जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्म वरून खाली उतरून रूळ ओलांडावे लागत आहे. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींचे खूप हाल होतात. पुरेशी प्रवासी संख्या असूनही प्रशासन इथे साधा एक पादचारी पूल का बांधत नाही हा प्रश्न त्याने उठवायला सुरवात केली. येथील आमदार नितेश राणे यांच्या x वरील पोस्ट वर कंमेंट करून किंवा संबंधित यंत्रणेला टॅग करून त्याने जनजागरण केले. अखेर त्याचा प्रयत्नांना यश आले असून येथे एक पादचारी पूल मंजूर झाला आहे.
वैभववाडी स्थानकावर या पुलाव्यतिरिक्त अजून कित्येक प्रश्न आहेत. या स्थानकावर अजून गाडयांना थांबा मिळणे आवश्यक आहे. तसेच येथे PRS तिकीट बुकिंग सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. या गोष्टींसाठी मी माझे प्रयत्न नेहमीच चालू ठेवीन असे ओंकार आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हणाला
Special Appreciation Post 🙌🏻🎉@NiteshNRane – We are really grateful and thankful for this gesture😊 It wouldn’t have been possible without your efforts! Humble thanks for whatever you have done & doing. Looking forward to PRS counter and halt to Netravati Exp!
Konkan Railway: कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने NRMU पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३४२ मतांनी त्यांचा विजय झाला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन अशा २ प्रमुख संघटनांमध्ये ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने बुधवारी झाली होती. याची मतमोजणी मडगाव येथे गुरुवारी झाली. कॉम्रेड नेते संघटनेचे महामंत्री कॉ.वेणू पी नायर यांच्या नेतृत्वाखाली एनआरएमयुने ही निवडणूक लढवली होती. विजयानंतर लाल सलाम च्या घोषणांनी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानंकावर जल्लोष सुरु होता.
लाल बावटा प्रणीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने आपला लाल झेंडा फडकवत केआरसी तसेच संलग्न अन्य संघटनांचा पराभव केला.कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते त्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत मतदान केले. या निवडणुकीत ५ हजार २४९ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार ७९६ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी एनआरएमयूला २ हजार ५५३ मते मिळाली तर केआरसी एम्पा्लॉईज युनियनने २ हजार २११ मते मिळवता आली. यामुळे ३४२ मतांनी एनआरएमयुने विजय मिळवला आहे.या विजयाचा जल्लोष सर्वच रेल्वे स्थानकांवर एनआरएमयुच्या वतीने कर्मचारी करत होते.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. या अवकाळी पावसाने आणि पावसाच्या सुसाट वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकालाही झोडपले. धक्कादायक गोष्ट म्हणजे पावसामुळे स्थानकावरील सुशोभीकरणाच्या काही भागातील पीव्हीसी शीट निघून लोबकळण्याचा प्रकार घडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे देखील कोटयावधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र आज झालेल्या घटनेमुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेच्या सुशोभणीकरणाचे काम सर्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या कामी पुढाकार घेतला असून यामुळे या रेल्वे स्थानकांना कार्पोरेट लूक येणार आहे. मात्र हे करताना कोकणातील पाऊस आणि वादळाचा विचार केले असल्याचे दिसत नाही कारण उद्घाटना आधीच या सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला आहे. आजच्या पावसात या स्थानकावरील छताला लावलेले पीव्हीसी शीट खाली निघाल्या, काही शीट लोम्बकळण्याच्या अवस्थेत दिसत होत्या.
रत्नागिरी शहरात परतीचा पाऊस झाला प्रचंड विजांच्या कडकडाट सह वादळी वारे सुटले असून त्याचा फटका कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला बसला आहे मात्र हा प्रकार घडला त्यावेळी त्या ठिकाणी प्रवासी उभे नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यामुळे कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना गुरुवारी हुबळी येथील रेल सौधा येथे आढावा बैठकीच्या अध्यक्षतेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणालेत .
यापूर्वी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात या प्रस्तावाला विरोध झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर या प्रस्तावावर पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
कोकण रेल्वे कार्पोरेशन ही स्वतंत्र संस्था असल्याने तिला मिळणार्या नफ्यातच विकासकामे करावी लागतात त्यामुळे त्यावर मर्यादा येतात. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेसाठी कोणतीही तरतूद केली जात नाही आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या अनेक लाभांपासून कोकण रेल्वेमार्ग वंचित राहिला आहे. अनेक समस्यांनी घेरलेल्या आणि कर्जबाजारी असलेल्या कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे अशी मागणी आता महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांनी करण्यास सुरवात केली आहे. अलीकडेच कोकण रेल्वेच्या विलिनीकरणा संदर्भात मुंबई मध्ये अखंड कोकण रेल्वे सेवा समितीची पत्रकार परिषदे संपन्न झाली होती. या परिषदेत कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाच्या मागणीवर जोर देण्यात आला होता.
रेल्वेतील विविध रिक्त पदांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपत होती तिला १५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असून दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत अर्ज स्वीकृती करण्यात येईल अशी माहिती कोकणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज दिली.
कोकण रेल्वेने विविध १९० पदांसाठी भरती जाहीर केली होती. ही भरती लोटे एमआयडीसी येथील रोलिंग स्टॉक कंपनी साठी आहे असा गैरसमज काही अर्जदारांमध्ये आहे. मात्र ही भरती रोलिंग स्टॉक कंपनीसाठी नसून कोकण रेल्वेसाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Konkan Railway is pleased to announce the extension of last date of submission of application to 21/10/2024 for the 190 vacancies across various posts in KRCL. Shri Santosh Kumar Jha, CMD/KRCL advises candidates to remain vigilant & avoid fraudulent schemes. @RailMinIndiapic.twitter.com/IxxLzFnepc
कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य
या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे
Konkan Railway News: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील क्रमांक ११ आणि १२ च्या प्लॅटफॉर्मच्या लांबीच्या विस्ताराचे काम अपूर्ण असून ते डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील ३ गाड्या दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत ‘शॉर्ट टर्मिनेट’ करण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्यांचा प्रवास दादर आणि ठाणे या स्थानकांपर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.
गाडी क्र. १२१३४ मंगळुरु जं. – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास ठाणे स्थानकावर मर्यादित Short Terminate करण्यात येणार आहे.
गाडी क्र. २२१२० मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर मर्यादित Short Terminate करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२०५२ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा ३१/१२/२०२४ पर्यंतचा प्रवास दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे
मुंबई, दि. ०१ ऑक्टो: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण या महत्त्वाच्या मागणीवर जोर देण्यासाठी आज दिनांक ०१ सप्टेंबर रोजी अखंड रेल्वे प्रवासी संघटने तर्फे आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद संपन्न झाली. यावेळी या संघटनेच्या आणि या संघटनेच्या संलग्न संघटनेंच्या पदाधिकाऱ्यांनी, रेल्वे अभ्यासकांनी आणि पत्रकारांनी हजेरी लावली होती.
अत्यंत खोल अभ्यास करून आणि मिळवलेल्या आकडेवारींची माहिती देवून कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करणे किती महत्वाचे आहे याबाबत आपली मते यावेळी वक्त्यांनी मांडली.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ची स्थापना १९९० मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री, स्वर्गीय श्री. जॉर्ज फर्नांडिस आणि अर्थमंत्री, स्वर्गीय श्री. मधु दंडवते यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली बांधा-वापरा-हस्तांतरित करा (BOT) तत्त्वावर करण्यात आली. यात भारतीय रेल्वे ५१%, महाराष्ट्र राज्य शासन २२%, कर्नाटक राज्य शासन १५%, गोवा राज्य शासन ६% व केरळ राज्य शासन ६% असा आर्थिक वाटा होता. रोहा आणि ठोकूर (मंगळुरू) दरम्यान अस्तित्वात नसलेला रेल्वे मार्ग नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली होती. मूळ करारानुसार १५ वर्षे किंवा सर्व देणी देऊन झाल्यावर यांपैकी जे आधी होईल तेव्हा कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन होणे अपेक्षित होते. परंतु, २००८-०९ मध्ये केंद्र सरकारने कोकण रेल्वे सर्व देणी देऊन झाल्यावरही स्वतंत्रच राहील असे ठरवले. यामुळे एकप्रकारे संस्थापकांच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला आहे.
आता महामंडळ स्थापन करण्याचा उद्देश सफल होऊन २५-३० वर्षांनंतरही कोकण रेल्वेचा कारभार स्वतंत्रच असून केवळ आपल्याला मिळणाऱ्या नफ्याच्या जोरावर हे महामंडळ केवळ रेल्वे चालवण्याखेरीज इतर पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी लक्षणीय कामगिरी करू शकत नाही.
बांधकाम खर्च अधिक असल्यामुळे १९९३ मध्ये कोकण रेल्वे मार्गावर रोहा – वीर आणि मंगळुरु – उडुपी मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु झाल्यापासून सादर मार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी ४०% तर मालवाहतुकीसाठी ५०% अधिभार लागू केला गेला. १९९८ मध्ये संपूर्ण मार्ग सुरु झाल्यावर हा अधिभार संपूर्ण मार्गाला लागू करण्यात आला. परंतु आज ३१ वर्षांनंतरही हा अधिभार तसाच असून तो काढण्याची गरज आहे असे मत सचिव अक्षय महापदी यांनी व्यक्त केले.
गेल्या १० वर्षांत आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेला भरीव निधी मिळून अभूतपूर्व सुधारणा सुरु आहेत. वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेला २,६२,२०० कोटी रुपयांचा
निधी देण्यात आला. परंतु केवळ वेगळ्या पद्धतीच्या व्यवस्थापन संरचनेमुळे कोकण रेल्वेला अर्थसंकल्पातून भरीव लाभ मिळालेला नाही. संपूर्ण देशात नवीन रेल्वेमार्ग, दुहेरीकरण, चौपदरीकरण, यांसारखे प्रकल्प भरभरून सुरु असताना १७/०९/२०१८ ला केंद्रीय रेल्वेमंत्रालयाकडे देण्यात आलेल्या कोकण
रेल्वेच्या केवळ १४१ किलोमीटर दुहेरीकरण प्रस्तावाला संबंधित राज्य शासन निधी देत नाहीत म्हणून रेल्वे बोर्डाने आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २७/०२/२०२३ म्हणजेच तब्बल ४ वर्षे उलटून गेल्यावर नकार कळवला. पंतप्रधानांनी ६ ऑगस्ट, २०२३ ला उदघाटन केलेल्या अमृत भारत स्थानक योजनेत कोकण रेल्वेवरील एकाही स्थानकाचा समावेश नव्हता. भारतीय रेल्वेवर जास्त प्रवासी वाहतूक असणाऱ्या मार्गांचे उच्च-घनता मार्ग (HighDensity Network – HDN) आणि अति गर्दीचा मार्ग (Highly Utilized Network – HUN) असे वर्गीकरण केले जाते.यात मुंबई दिल्ली, मुंबई चेन्नई यांसारख्या मार्गांचा समावेश आहे. परंतु, वर्षभर प्रवाशांची गर्दी असूनही कोंकणकों रेल्वेमार्ग केवळ स्वतंत्र कारभारामुळे या वर्गीकरणांपासून मुकला आहे, ज्यामुळे महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा विकासप्रकल्पांना अडथळा निर्माण होतो. निधीच्या कमतरतेमुळे आजही कित्येक महत्वाच्या स्थानकांवरील फलाटांवर पूर्ण छप्पर नाही, काही ठिकाणी दोन फलाटांना जोडणारा पूल नाही, काही ठिकाणी फलाटच नाहीत.
२९ मे, २०२४ च्या आर्थिक अहवालानुसार कोकण रेल्वेवर ३६६२ कोटी रुपये जुने आणि ३६७५ कोटी रुपये वर्तमान कर्ज असे एकूण ७३३७ कोटी रुपयांची दायित्वे आहेत. त्यात १५०० कोटी रुपयांच्या बाँडचा समावेश आहे. पुढील चार ते पाच वर्षांत बाँडचे पैसे परत करायचे असून ९०० कोटी इतकी रक्कम जुलै आणि ऑगस्ट २०२४ मध्येच देय होती. त्यासाठी पुन्हा भरीव निधीची आवश्यकता भासणार आहे असेही अक्षय महापदी म्हणाले.
२०१६-१७ पासून कोकण रेल्वेचे अधिकृत भागभांडवल ४००० कोटी रुपये इतके आहे, सर्व भागधारकांनी मिळून त्यापैकी मागील वर्षीपर्यंत २०३७ कोटी रुपये दिलेले आहेत. त्यात भारतीय रेल्वेने १२५६.१२ कोटी, महाराष्ट्र शासनाने ३९६.५४ कोटी, गोवा शासनाने ९१.२९ कोटी कर्नाटक शासनाने २७०.३६ कोटी आणि केरळ शासनाने १०८.१४ कोटी इतकी रक्कम दिली आहे. मूळ भागधारक टक्केवारीचा विचार केल्यास भारतीय रेल्वे २०४० कोटी, महाराष्ट्र ८८० कोटी, गोवा २४० कोटी, कर्नाटक ६०० कोटी आणि केरळने २४० कोटी देणे आहेत.
म्हणजेच आतापर्यंत दिलेली रक्कम सोडून महाराष्ट्रा ला वाढीव ४८३ कोटी, गोव्याला १४८ कोटी, कर्नाटकला ३२९ कोटी आणि केरळला १३१ कोटी टप्प्याटप्प्याने द्यावे लागणार आहेत. त्याअर्थी राज्य शासनांनी कोकण रेल्वेतून बाहेर
पडणेच हिताचे आहे. अन्यथा संबंधित शासनांना वेळोवेळी निधीचे वितरण करावे लागणार आहे.राज्य शासनांचा विचार केल्यास गोवा शासनाकडून कोकण रेल्वेला १६.८५ कोटींचेटीं चेदेणे दिलेले नव्हते. १४१किलोमीटर टप्पा दुहेरीकरणाच्या कामासाठी कर्नाटक शासनाने निधी देण्यास असमर्थता दर्शवली आहे. इतर राज्यांनी केंद्रीय मंत्रालयाने निधीबाबत वारंवार स्मरण पत्रे दिल्यावरही त्यांना उत्तर न दिल्यामुळे तो टप्पा दुहेरीकरणाचा
प्रस्तावच रद्द करण्यात आला. बॉन्डचे पैसे परत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वेने सर्व भागधारकांना विनंती केली होती, परंतु, महाराष्ट्राने तसे करण्यास नकार दिला. तर राज्य शासनांनी आपापल्या हिस्सेदारी नुसार निधी उपलब्ध करून दिल्यावरच निधी देण्याची भूमिका केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने घेतली. रेल्वे मंत्रालयाकडून कोकण रेल्वेला मिळणारा निधीही कर्ज स्वरूपातच मिळतो. निधीची कमतरता भासली म्हणून बॉन्ड किंवा इतर स्वरूपात कर्ज आणि ते फेडण्यासाठी पुन्हा नवीन कर्ज अशा दुष्टचक्रात कोकणची ही रेल्वे अडकली आहे. तसेच, केंद्रीय रेल्वे मंत्रालय व महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळची राज्य सरकारे एकमेकांकडे निर्देश करून निधी
देण्यासाठी हात आखडता घेत असल्यामुळे कोकणातील रेल्वे विकास अडकून पडला आहे. २५ वर्षांपूर्वी उभारलेल्या मार्गावर केवळ ४६ किलोमीटर दुहेरी मार्गाची भर घालतानाही कर्जच काढावे लागले.असे मत राजू कांबळे यांनी व्यक्त केले.
कोकण रेल्वे महामंडळाला अर्थसंकल्पीय तरतूद नसल्याने त्याचा थेट परिणाम कोकणातील विकासावर होत आहे, त्याचे जिवंत उदाहरण हे सावंतवाडी टर्मिनस आहे, टर्मिनस ला मंजूर रक्कम ही 18 कोटीच्या वर असून ही ती कामे गेली 10 वर्षे अपूर्णच आहे, त्यामुळे हे महामंडळ भारतीय रेल्वेत विलीन होणे ही काळाची गरज आहे असे मत सागर तळवडेकर यांनी उपस्थित केले.
यावेळी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती चे अध्यक्ष शांताराम नाईक, सचिव अक्षय महापदी, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सागर तळवडेकर, कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे राजू कांबळे, अखिल कोकण विकास महासंघचे तानाजी परब, ॲड राणे, कोकण गणेशभक्त प्रवासी समितीचे दीपक चव्हाण, वैभववाडी विकास मंचचे विठ्ठल तळेकर, मराठा ऑर्गनायझेशन चे प्रमोद सावंत, मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश चे संजय सावंत, कोकण रेल्वे प्रवासी संघटना वैभववाडीचे सूर्यकांत मुद्रस, मिलिंद रावराणे, तसेच समितीचे सल्लागार सुरेंद्र नेमळेकर, श्रीकांत सावंत, सावंतवाडी संघटनेचे गणेश चमणकर, स्वप्नील नाईक, विनोद नाईक आदी उपस्थित होते.
Konkan Railway: कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांची तैलचित्रे कोकण रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर लावण्यास सुरवात झाली आहेत. राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण रेल्वे स्थानकांवर तैलचित्रे लावण्यात आली आहेत. तसेच अजुन काही महत्वाच्या स्थानकांवरही तैलचित्रे लवकरच लागण्याची शक्यता आहे.
प्राध्यापक मधु दंडवते यांचे कोकण रेल्वे अस्तित्त्वात आणण्यासाठी दिलेले योगदान पाहता त्यांचा मरणोत्तर सन्मान होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची तैलचित्रे कोकण रेल्वेच्या काही महत्वाच्या स्थानकांवर लावण्यात यावीत अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली होती. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, ठाणे या संघटनेनेही त्यांची तैलचित्रे खेड, चिपळूण, संगमेश्वर, विलवडे, राजापूर आणि वैभववाडी या स्थानकांवर लावण्यात यावीत यासाठी निवेदन दिले होते. या मागण्यांना रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही तैलचित्रे कोकण रेल्वेच्या स्थानकांवर लावण्यास सुरवात केली आहे. रेल्वेच्या या उपक्रमाचे प्रवासी संघटनांनी कौतुक केले असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
तैलचित्रे लागलीत पण सावंतवाडी स्थानकाच्या नामकरणाचे काय?
प्राध्यापक मधु दंडवते यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDTअसे करण्यात यावे यासाठी प्रवासी संघटनांनी निवेदने दिली होती. मात्र एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करावयाचे झाल्यास त्या राज्यातील शासनाने रेल्वे विभागाला तशी शिफारस करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून उत्तर आले होते. त्यानुसार कोकण विकास समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक ०३ जून २०२४ रोजी निवेदन सादर करून शासनातर्फे तशी शिफारस करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. दिनांक २७ जून रोजी राज्य गृह (परिवहन) विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या नामकरणाबाबत लिखित स्वरूपात त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र या मागणीचे पुढे काय झाले ते गुलदस्त्यातच आहे.
मुंबई: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे या महत्वाच्या मागणीला वाचा फोडण्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती – महाराष्ट्र तर्फे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे संबधित प्रश्नांसाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोकण रेल्वेवरील स्थानकांचा संथगतीने होणारा विकास,
कोकण रेल्वेचे दुहेरीकरण, कोकण रेल्वेला थेट अर्थसंकल्पीय निधी मिळण्यात येणार्या अडचणी, कर्जात बुडत चाललेली कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वेचे विलिनीकरण किती महत्वाचे या विषयांसाठी ही पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब, ग्लास हाऊस, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१ येथे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान पार पाडण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सर्व कोकण प्रेमी प्रवासी आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
Konkan Railway: प्रवाशांचा प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका गाडीच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वेतर्फे घेण्यात आला आहे.
गाडी क्र. २२४७५ / २२४७६ हिसार जं. – कोईम्बतूर जं. – हिसार जं. एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) या गाडीच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. टू टियर एसी श्रेणीचा एक कोच आणि थ्री टियर एसी श्रेणीचा एक कोच असे दोन कोच कायमस्वरूपासाठी या गाडीला जोडण्यात येणार आहेत. दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ पासून हा बदल करण्यात येणार आहे. या वाढीव डब्यांमुळे या गाडीच्या डब्यांची संख्या एकूण २२ झाली आहे.
या गाडीच्या डब्यांची सुधारित संरचना २
फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०५, थ्री टियर एसी – १३, पँट्री कार – ०१, जनरेटर कार -०२ एकूण २२ LHB कोच