Mumbai Goa Vande Bharat |कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 27 जून पासून वंदे भारत एक्सप्रेस चालू होत आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि अनेक सुविधा असलेली ही गाडी नेमकी कशी असेल याची उत्सुकता सर्व कोकणवासीयांना आणि गोवेकरांना लागून राहिली आहे. खरे सांगायचे तर अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेल्या सुविधांचा घेतलेला हा विशेष आढावा..
काय आहेत सुविधा
या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
कोकणातील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध
प्रत्येक डब्यात प्रवाशांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी संपर्क यंत्रणा (GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम) लावण्यात आलेली असून त्यामध्ये 32 इंची एलसीडी टीव्हीसुद्धा समाविष्ट आहे.
मनोरंजनाच्या उद्देशाने ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसनव्यवस्था. बाहेरील उष्णता आणि आवाज नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलेशन.
प्रकाशयोजना संयुक्त आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध. इलेक्ट्रिक बिघाड झाल्यास ट्रेनच्या प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन दिव्यांची सोय.
अत्याधुनिक प्रणाली असलेल्या शौचालयांची डब्यात सुविधा.
अर्थातच यातील काही सुविधांमध्ये श्रेणीनुसार फरक असेल. उदाहरण द्यायचे झाले तर रोटेट चेअरची सुविधा फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या डब्यांत उपलब्ध असेल.
“पाणी पाहिजे असेल तर गाडयांना थांबा द्या…” वंदे भारत एक्सप्रेसला थांबा न दिल्याने ही धमकी चिपळूण येथील प्रवाशांनी दिली आहे
चिपळूण:कोकण रेल्वे प्रशासन या मार्गावर धावणार्या रेल्वेगाड्यांसाठी पाणी चिपळूण येथील वाहणार्या वाशिष्ठी नदीतून उचलते. पाण्यासाठी रेल्वेगाड्या थांबत असताना प्रवाशांसाठी थांबा का नाही, असा सवाल कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला. कोकण रेल्वेसाठी जमीन, पाणी आमचे असल्याने वंदे भारत रेल्वेला चिपळूणच्या स्टेशनवर थांबा मिळालाच पाहिजे, अन्यथा जलसंपदा विभागाकडे रेल्वेसाठी जे पाणी दिले जाते ते बंद करण्याची मागणी करण्यात येईल व रेल्वेचे पाणी आम्ही बंद करू, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कोकणात चिपळूण रेल्वेस्थानकावर २५ तर मालवाहतुकीच्या किमान १० गाड्या थांबतात. जवळपास प्रवासी व मालवाहतूक अशा एकूण ३५ गाड्या येथून जावून येवून आहेत. ४ वर्षापूर्वी वाशिष्ठी नदीचे पाणी कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये भरण्यासाठी घेवू नये, असे ठरले असताना रेल्वे प्रशासनाने ६ बोअरवेल स्थानक परिसरात मारल्या आहेत. त्या सहाही बोअरवेलचे पाणी रेल्वे गाड्यांना भरण्यासाठी कमी पडत होते. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून रेल्वे प्रशासनाने वर्षाला ७ कोटी ३० लाख लिटर पाणी नदीतून उचलण्याची परवानगी घेतली होती.या बदल्यात केवळ ८० हजार रुपये वर्षाला कोकण रेल्वे जलसंपदा विभागाला भरत आहे.
Konkan Railway News : पुढील दोन दिवसांत कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर बुधवारी दिनांक 21/06/2023 रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या गाड्या खालीलप्रमाणे
1) गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा 21/06/2023 रोजी सुरू होणारा प्रवास रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान 02:30 तासांसाठी नियंत्रित केला जाईल.
2) दि. 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेस उडुपी – कणकवली विभागादरम्यान 03:00 तासांसाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल.
3) दि. 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस सावंतवाडी – कणकवली विभागादरम्यान अर्ध्या तासासाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल
Mumbai -Goa Vande Bharat Express | बहुप्रतीक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन दिनांक २७ जून रोजी होणार आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबईसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सोबत बेंगळुरू-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर या पाच वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून धावणार आहेत.
वेळापत्रक
मुंबईहून सकाळी ५.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्थानकावर दुपारी १.१५ वा. पोहोचेल.
मडगावहून दुपारी २.३५ वाजता सुटेल ती मुंबईत ‘सीएसटी’वर रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.
वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल प्रमुख थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी.
Prime Minister Modi to flag off five new Vande Bharat trains on June 27
Konkan Railway Track Doubling | कोकण रेल्वे यंदा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ०१ मे १९९८ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी कोकण रेल्वे राष्ट्राला समर्पित केली होती. या २५ वर्षात मुंबई ते आपले गाव या प्रवासासाठी कोकणवासीयांची नेहमीच कोकण रेल्वेला नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. कोकणरेल्वेने सुद्धा आपल्या सेवेत खूप चांगल्या सुधारणा केल्या आहेत.
सुरवातीच्या काळात प्रत्येक दिवशी सरासरी १७ गाड्या या मार्गावर धावत होत्या. आता प्रवाशांची संख्या वाढली त्यामुळे गाड्यांची संख्याही वाढली त्यामुळे ही सरासरी वाढून प्रत्येक दिवशी ५० एवढी झाली आहे. त्याबरोबर १७ मालगाड्या रोज धावतात. स्थानकांची संख्याही वाढून ४९ ची ६८ एवढी झाली आहे.
एवढ्या गाड्या वाढवूनसुद्धा अजून गाड्यांची मागणी होत आहे. कारण या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. हंगामाच तर सोडाच तर पावसाचे एक दोन महिने सोडले बाकीच्या दिवशी आरक्षित तिकीट मिळविण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त या मुळे आरक्षणात संधीसाधू दलालांचा सुळसुळाट आहे. मजबुरी असल्याने या दलालांकडून दुप्पट भावात तिकीटे खरेदी करावी लागतात.
जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुःख तर विचारूच नका. या कोच मधून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. सीट भेटली ते नशीबवान म्हंटले तरीही खचाखच भरलेल्या डब्यातून टॉयलेट ला जाणे पण अशक्य होते. त्यात जागेसाठी आणि इतर कारणांसाठी होणारी भांडणे पण सहन करावी लागतात. अशा परिस्थितीत ८/१० तास प्रवास करताना जीव नकोसा होतो. हंगामात तर आरक्षित डब्यांची स्थिती अशीच जनरल डब्यांसारखी होते.
या कारणांनी या मार्गावर नवीन गाड्या सोडण्यासाठी नेहमीच मागणी होत आहे. मात्र नेहमीच या मागणीला लाल कंदील दाखवला गेला आहे. कारण त्यांच्यामते कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत असून या मार्गावर आता कोणतीही नवीन गाडी सुरू करता येणे शक्य नाही.
रेल्वे रूळ दुहेरीकरण – एक काळाची गरज
कोकण रेल्वे वर गेल्या २५ वर्षात गाड्या वाढल्यात, स्थानके वाढली आणि प्रवासी संख्या पण वाढली. मात्र रेल्वे रूळ दुहेरीकरणाचा प्रश्नावर रेल्वे प्रशासनाने प्राधान्य दिले नसल्याचे दिसत आहे. मुंबई ते रोहा या मार्गावर आधीच रेल्वे रूळ दुहेरीकरण झाले आहे. मात्र हा मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो. तर रोहा या स्थानकापासून पुढे कोकण रेल्वेमार्ग चालू होतो. गेल्या २५ वर्षात फक्त ४९ किलोमीटर कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण झाले आहे. रोहा ते वीर या स्थानकांदरम्यान हे दुहेरीकरण ऑगस्ट २०२१ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाला एकूण ५५० कोटी एवढा खर्च आला होता. मात्र त्यापुढील रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाबाबत अजूनही काही वाच्यता रेल्वे प्रशासनाकडून केली जात नाही आहे.
दिवा सावंतवाडी या गाडीप्रमाणे वसई – सावंतवाडी अशी गाडी चालू करावी अशी मागणी होत आहे. ही मागणी रास्त आहे. कारण सध्या या मार्गावर चालणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्यांत तुफान गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी जनरल गाडीची गरज आहे. अनेक स्थानके अशीही आहेत जेथे प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असूनही तेथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले नाही आहेत. दुहेरीकरण झाल्यास नवीन गाड्या सोडून अशा स्थानकांना प्राधान्य देता येईल.
पर्यटनवृद्धी साठी
कोकणाला लाभलेल्या निसर्गसंपन्नतेमुळे कोकण भाग पर्यटनासाठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून या अगोदरच मान्यता मिळाली आहे. विस्टाडोम कोच सारख्या सुविधा देऊन रेल्वे प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे यावर वाद नाही. मात्र येथे पर्यटनासाठी येण्यासाठी रेल्वेची तिकिटे भेटणे मुश्किल होत असल्याने त्याचा पर्यटनावर परिणाम होत आहे.
पुण्यातील कोंकणासीयांसाठी
कोकण रेल्वेचा फायदा पुण्यातील कोंकणवासीयांना पाहिजे तसा झाला नाही आहे. सध्या काही मोजक्याच लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यावरून कोकण रेल्वे मार्गावरून धावतात. या गाड्या कोकणातील मोजकेच थांबे घेत असल्याने आणि या गाडयांना होणाऱ्या गर्दीमुळे या गाड्या पुणेकरांसाठी असूनही नसल्यासारख्या आहेत. पुण्यावरून सावंतवाडी पर्यंत एका गाडीची प्रतीक्षा पुणेकरांना आहे. मागेच हुजूर साहिब नांदेड पनवेल एक्सप्रेसचा विस्तार रत्नागिरी पर्यंत करण्याची मागणी प्रवाशांकडून झाली होती. रेल्वे रूळ दुहेरीकरणामुळेच अशा मागण्या पूर्ण करणे शक्य होणार आहे.
वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता कोकणरेल्वे पूर्ण क्षमतेने कार्यरत करायची असेल तर रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे सिद्ध होत आहे. हे काम सोपे नसून मोठ्या प्रमाणात निधी मिळवणे आवश्यक आहे, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरजही आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने त्यात रस दाखविला गेला पाहिजे. कोकणातील जनतेने सुद्धा सरकारवर यासाठी दबाव टाकणे आवश्यक आहे.
Konkan Railway | प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन उन्हाळी हंगामासाठी सोडलेल्या दोन विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.या गाडयांना सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ दिल्याने गणेशचतुर्थी दरम्यान गावी जाणाऱ्या कोकणवासीयांना या गाड्यांचा लाभ घेता येणार आहे.
1) 01139/01140 Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly)
आठवड्यातून दोन दिवशी धावणारी ही विशेष रेल्वे गाडी जून-२०२३ अखेरपर्यंत चालविण्यात येणार होती तिला मुदतवाढ देण्यात आली आहे.
01139 Nagpur – Madgaon Jn. Special – या गाडीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
01140 Madgaon Jn. – Nagpur Special – या गाडीला 01 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
2) Train no. 02198 / 02197 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातुन एकदा धावणारी ही विशेष रेल्वे गाडी जून-२०२३ अखेरपर्यंत चालविण्यात येणार होती तिला मुदतवाढ देण्यात आली आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Special – या गाडीला 29 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
02197 Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Special – या गाडीला 02 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या दोन्ही गाड्या या आधी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार (पावसाळी), स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहेत
Konkan Railway Updates | सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या जामनगर तिरुनेवेली एक्सप्रेसला गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबा वाढवण्यात आला आहे.
जामनगर ते तिरुनेवेली दरम्यान धावणाऱ्या 19578 Jamnagar – Tirunelveli Express या गाडीला दि. 16 आणि 17 जून 2023 रोजीच्या फेरीसाठी तर परतीच्या फेरीसाठी 19577 Tirunelveli – Jamnagar Express या गाडीला दिनांक 19 आणि 20 जून 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.
Vande Bharat Express | बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस संबंधी एक नवी बातमी आली आहे. या एक्सप्रेसच्या उद्घाटनाची नवीन तारीख समोर आली आहे. मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन 26 जून रोजी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 जूनपासून मुंबई-गोवा मार्गावर बहुप्रतिक्षित सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेन आणि देशातील अजून चार मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन ओडिशा येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे पुढे ढकलण्यात आले. 3 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी विडिओ कॉन्फरन्सच्या पद्धतीने या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार होते. त्यानंतर 05 जूनपासून ट्रेनची नियमित सेवा सुरू होणार होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या गाड्यांचे लोकार्पण करतील अशी अपेक्षा आहे. त्याच दिवशी ज्या इतर मार्गांवर गाड्या सोडल्या जातील त्या बेंगळुरू-हुबळी, पटना – रांची, भोपाळ-इंदूर आणि भोपाळ-जबलपूर असतील. याआधी एका दिवसात जास्तीत जास्त दोन वंदे भारत एक्सप्रेसंना हिरवा कंदील दाखविण्यात आला होता. आता 26 जून रोजी एकाच दिवशी 5 वंदे भारत एक्सप्रेसंना हिरवा झेंडा दाखविण्याची ही पाहिलीच वेळ असेल.
Konkan Railway News : कोकण रेल्वेमार्गे धावणाऱ्या हापा मडगाव एक्सप्रेस ला स्लीपर दर्जाचा एक अतिरिक्त कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादी वरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
रेल्वेकडून प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार कोकण रेल्वे मार्ग धावणारी हापा- मडगाव (22908 ) या एक्सप्रेस गाडीला दि. 14 जून 2023 साठी स्लीपरचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. परतीच्या प्रवासात या गाडीला (22907) मडगाव येथून हापासाठी धावताना दि.16 जून रोजी जादा डबा जोडण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग |सावंतवाडी टर्मिनसच्या फेज-1 चे काम पूर्ण होवून फेज-2 चे काम रखडले आहे. हे काम पूर्ण झाल्यास येथे सर्व गाड्यांना थांबा मिळणे शक्य होणार असल्याने हे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रश्नासाठी सावंतवाडी तालुक्यातील तरुण वर्ग पुढे आला आहे. रखडलेल्या रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागावे तसेच या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस थांबा देण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू व सावंतवाडी रोट्रॅक्ट कल्ब अध्यक्ष मिहिर मठकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज खासदार राऊत यांची भेट घेतली यावेळी त्यांना निवेदन देत त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी भावेश भिसे ,साहिल नाईक, प्रणय गावडे, रौनक रेडीज आदी उपस्थित होते. यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनस व्हावे म्हणून सतत पाठपुरावा सुरू आहे. टर्मिनस झाल्यावर विशेषतः सर्वच रेल्वेना थांबा मिळेल. तसेच रेल्वे स्टेशनवर पाणी भरण्याची सुविधा निर्माण होईल. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
तरुणांनी एकत्र येऊन त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे त्याबद्दल खासदार विनायक राऊत यांनी धन्यवाद दिले. रखडलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम मार्गी लागण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत ते काम झाल्यानंतर या ठिकाणी सर्वच गाड्या थांबतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.