Category Archives: कोकण

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार! मंत्रालयातील बैठकीत घेतले गेले महत्वाचे निर्णय

   Follow us on        
Mumbai Goa Highway : कोकणात जाण्यासाठी मुंबई व गोवा हायवे हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. याच मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या 17 वर्षांपासून रखडलेले आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई गोवा महामार्गाला जे चार पर्यायी मार्ग आहेत. याबाबत उपमुख्यंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आढावा घेण्यात आला.  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती करुन तातडीची उपाययोजना करण्यात येणार आहे.  इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अजित पवार यांनी बैठकीत याबाबत महत्वाच्या सूचना केल्या.  मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी  मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई – गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक 15 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ही कामे  पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

Devgad: रिक्षेची एसटीला धडक बसून भीषण अपघात; ४ प्रवाशांचा मृत्यू

   Follow us on        

देवगड: देवगड तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा समावेश आहे. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण आचरा येथील रिक्षा व्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते.

हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंग्रे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघातातील मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृत व्यक्तींचे नातेवाईकही मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह आचरा येथील रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Konkan Railway: महत्वाची बातमी! गणेशचतुर्थीसाठीचे रेल्वे आरक्षण उद्यापासून सुरु

   Follow us on        

Konkan Railway: पावसाळा सुरू होताच कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध सुरू होतात. यासाठी चाकरमानी गणेशोत्सवास गावी जाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. यामध्ये महत्वाचे नियोजन असते ते गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी बसचे आरक्षण करणे. यासाठी रेल्वे प्रशासन दोन महिने आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करते.

गणेशोत्सवाला चाकरमानी किमान आठ दिवस अगोदर गावी जातात. या वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट रोजी आहे. यावर्षी गणपतीसाठी गावी जाणारे चाकरमानी 19 ऑगस्ट पासून सुरूवात करतील. म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनी दोन महिने अगोदर म्हणजेच 20 जून रोजी आपल्या इच्छीत गाडीचे आरक्षण घेणे आवश्यक आहे.

खरेतर गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासन नियमीत गाड्यांबरोबरच शेकडो विशेष गाडया कोकण रेल्वे मार्गावर सोडते. मात्र, या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या एक-दोन मिनिटातचं संपूर्ण गाडीचे आरक्षण फूल्ल होते. कधीकधी तर तिकीट खिडकीवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रवाशालाही संबधित गाडीचे कर्फम तिकीट मिळत नाही. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनची ही समस्या आहे.दुसरीकडे खासगी तिकीट एजंटकडे याच गाड्यांची तिकीटे सहज उपलब्ध होतात. मात्र, त्यासाठी मूळ तिकीटाच्या दामदुप्पट दर आकारला जातो. तासनतास् रांगेत राहूनही जे तिकीट प्रवाश्याला मिळत नाही ते एजंटला सहज कसे मिळते? यामागचे गौडबंगाल काय? प्रवाशांची खुलेआम लूट करणारा हा गोरख धंदा कुणाचा? रेल्वे प्रशासनाचे यावर काहीच नियंत्रण नाही कसे? अवघ्या एका मिनिटात संपूर्ण रेल्वेची हजारो तिकीट कशी आरक्षित होतात? लोकप्रतिनिधी याबाबत आवाज का उठवत नाहीत? याबाबत रेल्वे प्रशासन कधी खुलासा का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न कोकणवासींय रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहेत. मात्र याचे योग्य उत्तर कुणीच देत नसल्याने कोकणवासींय प्रवाशांच्या नशिबी गुराढोरा प्रमाणे रेल्वे डब्यात कोंबून घेत प्रवास करण्याची परवड कायम आहे.

 

Konkan Railway: “….तर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य”

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीत सुपरफास्ट एक्सप्रेस ८ डब्यांची धावत आहे. मात्र हे डबे अपुरे पडत आहेत. त्यात पावसाळ्यात या गाडीच्या फेऱ्यांत कपात केली जात असल्याने प्रचंड मागणी असूनही या गाडीची सेवा अपुरी पडत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.

जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसशी तिचे एकीकरण करण्याचा निर्णय अलिकडेच रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या डब्यांची प्राथमिक देखभाल आता नांदेडला हलवण्यात आली आहे. यामुळे मुंबईत पिट लाईन आणि देखभाल स्लॉट उपलब्ध झाला आहे. या पिट लाईन आणि देखभाल स्लॉटचा वापर मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेस साठी वापरल्यास ती १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने ९५ टक्के आसन क्षमतेची प्रभावी अंमलबजावणी राखली आहे. यामुळे सध्या धावणारी ८ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी आसनांअभावी गैरसोयीची ठरत आहे. यामुळे एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आर्जवही करण्यात आले आहे.

 

Mumbai Goa Highway: सावधान! कळंबणीमध्ये रस्ता खचल्याने धोकादायक स्थितीत

   Follow us on        

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणीमध्ये रस्ता खचला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला मोठे तडे गेलेले आहेत. तर खबरदारी म्हणून स्थानिकांनी या महामार्गावर झाडाच्या फांद्या देखील टाकल्या आहेत. या खचलेल्या रस्त्यावरूनच वाहनांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. अतिशय धोकादायक असा हा मार्ग सध्या बनलेला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कळंबणी येथे रस्ता खचल्याची घटना घडली आहे. वाळंजगाडी येथील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटला मोठे तडे गेले असून रस्ता खचायला सुरुवात झाली आहे. यामुळे वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला असून रस्ता तात्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिकांनी खबरदारी म्हणून महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली असली तरी काल रात्रीपासून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

Panvel Express: पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा

   Follow us on        

मुंबई: पुणे आणि कोकण जोडणारी विशेष गाडी सुरु करण्यात यावी किंवा गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल (पनवेल एक्सप्रेस) या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनांनी केली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांचे केंद्रीय विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री यांना साकडे.

सध्या २२१४९/५० पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस ही एकमेव गाडी पुण्याहून कोकणमार्गे चालवली जाते. मात्र ही गाडी आठवड्यातून फक्त दोन दिवसच धावत असून कोकणात काही मोजक्याच स्थानकावर थांबा घेत असल्याने या गाडीची सेवा अपुरी पडते. त्यामुळे पुणे आणि कोकण जोडणारी विशेष गाडी सुरु करण्यात यावी किंवा गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) वतीने संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी केंद्रीय विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे.

“आपण पुणे – जोधपूर ही नवीन रेल्वे पुण्यातून सुरू केलीत, आणि आता आपण पुणे – रीवा वाया जबलपूर ही रेल्वे गाडीची घोषणा केलीत, फक्त एका वर्षात आपण रेल्वे संदर्भात जे कार्य केले आहे त्याला प्रेरित होऊन आम्ही कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, आपल्याला विनंती करत आहोत की पुण्याहून सावंतवाडीसाठी देखील नवीन रेल्वे किंवा सध्या सुरू असलेली १७६१३/१४ नांदेड – पुणे – पनवेल या दैनिक गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करावा, जेणेकरून पुण्यात राहणाऱ्या लाखो कोकणी जनतेला याचा फायदा होईल.” अशी विनंती करणारे निवेदन त्यांना देण्यात आले आहे. या बरोबरच सावंतवाडी टर्मिनस स्थानकावरील विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच स्थानकाचा विकास करण्यासाठी या स्थानकाचा समावेश ‘अमृत भारत स्थानक योजने’त समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे.

गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आलेली आहे. या समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी अशी मागणी करणारे निवेदन समितीच्या वतीने संबंधित रेल्वे आस्थापना आणि अधिकाऱ्यांना दिले आहे.

या गाडीसाठी एका अतिरिक्त रेकची सोया करून तिचा विस्तार केला गेल्यास मराठवाडा-पुणे-कोकण अशी कनेक्टिव्हिटी मिळेल. या गाडीचा विस्तार करताना तिला पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे.

याशिवाय ही गाडी पुणे-कर्जत-कल्याण- पनवेल या मार्गाने चालविण्यात यावी. जेणेकरून ‘लोको रिव्हर्सल’ साठी लागणार वेळही वाचेल आणि कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या प्रवाशांचीही सोय होईल. त्याच प्रमाणे या गाडीला आधुनिक एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी करण्यात या निवेदनांत करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल ही नांदेड (NED) ते पनवेल (PNVL) दरम्यान चालणारी एक्सप्रेस गाडी आहे. गाडी क्रमांक १७६१४ नांदेड-पनवेल ही नांदेड येथून संध्याकाळी ६:२० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३५ वाजता पनवेलला पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी, गाडीक्रमांक १७६१३ पनवेल येथून दुपारी ४:०० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:४५ वाजता नांदेडला पोहोचते.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसचे डबे वाढले

   Follow us on        

Konkan Raiwlay:कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक १२२२३ /१२२२४ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम जं. – लोकमान्य टिळक (टी) दुरांतो” एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात येणार आहे.

या गाडीच्या डब्यांची सध्याची संरचना अशी आहे: फर्स्ट एसी – ०१, टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६, स्लीपर – ०८,पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २० एलएचबी डबे

सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – ०७, स्लीपर – ०८,पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे

थ्री टायर एसी आणि स्लीपर स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवून या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ करण्यात आली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवास चालू करताना गाडी क्रमांक १२२२३ तर एर्नाकुलम येथून प्रवास सुरु करताना गाडी क्रमांक १२२२४ या सुधारित संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.

 

Konkan Railway: आषाढी वारीसाठी सावंतवाडी-पंढरपुर विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाची भेट घेण्यासाठी वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. मध्य रेल्वेने नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर, मिरज अशा महाराष्ट्रातील सर्वच विभागांतून पंढपूरला जाण्यासाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

रेल्वेने आजपर्यंत एकदाही सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही.

कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो.

रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र च्या वतीने समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे. ही मागणी करणारे निवेदन ईमेल द्वारे संबधित अधिकारी आणि प्रशासकीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी हालचाली सुरु; तीन टप्प्यांत होणार दुहेरीकरणाचे काम

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला आता गती मिळत असून, भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार आहे. नैसर्गिक अडचणींवर मात करत कोकण रेल्वेने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरणाचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सपाट मार्गांवर दर किलोमीटर १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर बोगद्यांच्या भागात हा खर्च ८० ते १०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी रोहा ते वीर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी ५३० कोटी रुपये खर्च झाले होते.

यापुढील टप्पे कोणते?

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार खालील तीन टप्प्यांत कोकण रेल्वे मार्गाचे दुपारदरीकरण करण्यात येणार आहे.
१)खेड–रत्नागिरी,
२) कणकवली–सावंतवाडी
३) मडगाव–ठोकुर

या तीन प्रमुख टप्प्यांमध्ये दुहेरीकरणाची योजना आहे. या टप्प्यांचा सविस्तर अहवाल लवकरच रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

दुहेरीकरणासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ९९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा आणि सोयी-सवलती मिळण्याची शक्यता आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींना रामराम! पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरूवात

   Follow us on        

संगमेश्वर: गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने संगमेश्वर स्थानकात फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. सतत पाठपुरावा आणि वेळोवेळी अधिकारी वर्गाशी केलेल्या चर्चेतून हे सकारात्मक चित्र साकार होत आहे.

फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा पाढा निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप सतत वाचून दाखवतात. फलाटावरील पेव्हर ब्लॉक, पादचारी पूल, आसनव्यवस्था, स्वच्छ पाणी, पंखे, दिवे , सांडपाण्याची व्यवस्था, तिकीट आरक्षणाची सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने तीन एक्स्प्रेसला संगमेश्वर स्थानकात थांबा मिळावा म्हणून निवेदन,आंदोलन असे अनेक विषय हाताशी घेऊन ते सफल करण्यात आले.

हे भगिरथ प्रयत्न करण्यासाठी या संघटनेचे प्रमुख संदेश जिमन आणि त्यांचे सर्व सहकारी आवर्जून झटताना दिसतात.

लोक प्रतिनिधींच्या गाठीभेटी, त्यांच्या शिफारशी यांच्या जोरावर कित्येक किचकट विषय मार्गी लावण्यात संघटनेला यश आले आहे. फलाट क्रमांक २ वरील पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण या कामात आमदार शेखर निकम यांनी मौलिक सहकार्य केले आहे. जातीने या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करुन सर्वतोपरी सहाय्य केले. या कामासाठी २३ लाख ३६ हजार ५५४ रुपये इतका भरघोस निधी उपलब्ध याबद्दल निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप आणि तमाम संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशी, सामान्य जनता यांच्यावतीने आमदार महोदयांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

संगमेश्वर तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करीत इथे पर्यटनाची संधी निर्माण व्हावी. केरळ गोवा यांच्या धर्तीवर कोकणातील गाव खेड्यातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा.
इथल्या कोकणी माणसाचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी कायमच निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप प्रयत्नशील असतों.

रुपेश मनोहर कदम/ सायले

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search