Category Archives: कोकण

आंबा घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

   Follow us on        

रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाटात सोमवारी सकाळी मोठी दरड कोसळल्याने मुम्बई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घाट मार्गावर शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरड हटवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून, जेसीबी व यंत्रसामग्रीच्या मदतीने रवी इन्फ्रा कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे अडथळे येत असल्याने वाहतूक सुरळीत करण्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाने प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले असून, घाट मार्गावर अनावश्यक गर्दी करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे दरड कोसळण्याच्या घटना वाढत असल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

   

शिरशिंगे नदीपात्रात आठ फूटांची मगर; खडकांत दुरून लक्षात येत नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

   Follow us on        

सावंतवाडी : माडखोल-धवडकी परिसरातील शिरशिंगे नदीपात्रात तब्बल आठ फूट लांबीच्या महाकाय मगरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. नदीकाठावर कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिलांपासून गुरे पाजण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम कोळमेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची दखल घेऊन ग्रामपंचायत व वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या असल्या तरी यावेळी दिसलेली मगरीची लांबी आणि आकार मोठा आहे. तसेच मगरीचा रंग आणि नदीपात्रातील खडकांचा रंग समान असल्याने ही मगर जवळ गेल्याशिवाय लक्षात येत नाही.

स्थानिकांनी वनविभागाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी, तसेच गावोगावी जनजागृती करून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करावे, अशी मागणी केली आहे.

 

   

सावंतवाडीतील युवा सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ ने गौरव

   Follow us on        

सावंतवाडी, १५ ऑगस्ट:

सावंतवाडीतील युवकांच्या सामाजिक कार्याला राज्यस्तरीय पातळीवर मोठा सन्मान मिळाला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर आणि सचिव मिहिर मठकर यांची ‘राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट समाजरत्न पुरस्कार २०२५’ साठी निवड करण्यात आली आहे. जनजागृती सेवा संस्था (रजि.) यांच्यातर्फे हा प्रतिष्ठित पुरस्कार १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कणकवली येथील भवानी सभागृहात आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

संस्थेने जारी केलेल्या निवडपत्रानुसार, सागर तळवडेकर व मिहिर मठकर यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याची स्तुती करताना संस्थेने म्हटले आहे की, “त्यांचे सामाजिक योगदान हे भूषणावह आहे व तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.”

पुरस्कार वितरण समारंभात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात हा पुरस्कार एक मानाचा तुरा ठरणार आहे. या निवडीमुळे सावंतवाडी आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उज्वल झाले असून, स्थानिक पातळीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ म. तिरपणकर आणि सचिव संचिता भंडारी यांनी श्री. तळवडेकर व श्री. मठकर यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्सप्रेस’चा डबल धमाका – मोफत विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

कोकणवासीय गणेशभक्तांसाठी यंदाही “मोदी एक्सप्रेस”चा डबल धमाका घेऊन येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सलग १३व्या वर्षी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, २३ आणि २४ ऑगस्ट २०२५ रोजी या विशेष गाड्या धावणार असून प्रवाशांसाठी मोफत भोजनाची सोयही केली जाणार आहे.

ही सेवा खास करून लोकसभा आणि विधानसभेतील प्रचंड प्रतिसादाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. बुकिंगसाठी ठिकाण: भाजप तालुका मंडळ अध्यक्ष, शिवाजी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता दादर स्टेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक १४.

या उपक्रमाचे आयोजन केंद्रीय मंत्री नितेश नारायणराव राणे यांनी केले असून, यामुळे हजारो चाकरमान्यांना सोयीस्कर आणि मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे.

Konkan Railway: राजापूर रोड स्थानकावर नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on        

राजापूर : कोकण रेल्वे प्रशासनाकडून राजापूरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. १६३४५/१६३४६ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसया गाडीला आता राजापूर रोड स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. सुरवातीला हा थांबा प्रायोगिक तत्वावर असणार आहे.

गाडी थांब्याची वेळ
गाडी क्रमांक १६३४५ : लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेस रोज संध्याकाळी ७:४० ते ७:४२ राजापूर रोड येथे थांबेल.

गाडी क्रमांक १६३४६ : तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस “नेत्रावती” एक्स्प्रेस रोज सकाळी ७:३८ ते ७:४० येथे थांबेल.

अलीकडेच सांगली जिल्ह्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी या स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना राजापूर स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी केली होती — या मागणीचा पाठपुरावा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यावर्षीच्या मे महिन्यात पत्र लिहून कोकण रेल्वेवरील राजापूर रोड स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली होती.

राजापूर रोड स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ते मुख्य संपर्क केंद्र आहे. पूर्वी नेत्रावती एक्स्प्रेसला येथे थांबा नव्हता, त्यामुळे प्रवाशांना रत्नागिरी किंवा कणकवली स्थानकांचा वापर करावा लागत असे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी अनेक वर्षांपासून या गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती.

नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि केरळची राजधानी तिरुवनंतपुरम यांना जोडणारी लांब पल्ल्याची महत्त्वाची सेवा आहे. दररोज धावणारी ही गाडी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांतून प्रवास करते. ‘नेत्रावती’ नदीवरून या गाडीला नाव देण्यात आले आहे.

या प्रायोगिक थांब्यामुळे कोकणातील विशेषतः राजापूर आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना थेट मुंबई, गोवा, मंगळुरू आणि केरळकडे जाणे सुलभ होईल. तसेच मुंबईहून परतताना प्रवाशांना घरी पोहोचणे सोपे होईल.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘वीकेंड स्पेशल’ ट्रेन

   Follow us on        

Konkan Railway : स्वातंत्र्यदिन आणि त्याला लागून आलेल्या सुट्ट्यांमध्ये कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे .

०१५०२ / ०१५०१ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष गाडी

गाडी क्र. ०१५०२ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडी मडगाव जं. येथून १७ ऑगस्ट (रविवार) रोजी दुपारी १६:३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्र. ०१५०१ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून १८ ऑगस्ट २०२५ (सोमवार) रोजी सकाळी ०८:३० वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.

थांबे: कारमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली , रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड़, माणगाव, रोहा, पेन, पनवेल व ठाणे.

रचना: एकूण २० एलएचबी डबे = एसी २ टियर – ०१ डबा, एसी ३ टियर – ०३ डबे, एसी ३ टियर इकॉनॉमी – ०२ डबे, स्लीपर – ०८ डबे, जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

गाडी क्र. ०१५०२ आणि ०१५०१ साठी आरक्षण १२ ऑगस्ट २०२५ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर, इंटरनेट व आयआरसीटीसी वेबसाईटवर खुले होईल.

 

Sangameshwar: फक्त चर्चा… कृती शून्य! संगमेश्वरची पुन्हा थट्टा!

गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने वेगवान हालचाली घडोत, हीच जनसामान्यांची कामना!

   Follow us on        

गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर वासी जनतेला आनंदाचं भरतं आलं होतं! कारणही तसंच खास, आपल्या मतदार क्षेत्राचे नामदार खासदार नारायण राणे आपल्या तीन एक्स्प्रेसना संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा या मागणीचे पत्रक घेऊन रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना दिल्ली येथे भेटले. या वेळी कोकण रेल्वेकडून दिलेल्या सकारात्मक प्रस्तावाची प्रत जोडली होती.

योगायोग म्हणजे त्याच दिवशी खासदार सुनील तटकरे हे सुद्धा अंजनी, कोलाड या स्थानकांवर काही एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीसाठी रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला गेले होते. तसा तो दिवस कोकणातील जनतेसाठी आनंदाचा. ऐन गणेशोत्सवात अतिरिक्त रेल्वे गाड्या, आणि सोबत एक्स्प्रेसना थांबा मिळणार म्हणून सगळेच आनंदात!

पण काही दिवसांनी अंजनी,कोलाड स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर झाल्याचे पत्र मिळाले. पण संगमेश्वरच्या जनतेला प्रतिक्षेत ठेवले होते. आता खूप दिवस झाले. जवळपास एक महिना लोटला तरी मागण्यांचा विचार रेल्वे बोर्ड किंवा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला नाही.

दोन्ही कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रेल्वे बोर्ड कोकण रेल्वे बोर्डाने अधिकृत आदेश दिले असल्याचे कळविले. खातरजमा करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, अशा आशयाचे रेल्वे बोर्डाचे पत्र प्राप्त न झाल्याचे सांगितले जात आहे. चेंडूची टोलवाटोलव केली जाते आहे.

नेमकी रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे यांच्या डोक्यात नेमकं चाललंय काय?

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या मतदार क्षेत्रातील खासदार आपापल्या क्षेत्रातील समस्या घेऊन येतात. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करतात. त्यातील एका खासदारांच्या मागणीला त्वरित हिरवा झेंडा दाखवला गेला. मग मागील दोन अडीच वर्षांपासून कायम पाठपुरावा करीत असलेल्या मागणीला प्रतिक्षा यादीत ढकलून वजनाचा फेरफार रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे प्रशासनाने आमच्या निदर्शनास आणून दिला आहे काय? अशी आगपाखड जनसामान्यांनी केली आहे.

कोंबड्या बकऱ्यांसारखा खचखच गर्दीने भरलेल्या रेल्वेचा प्रवास कोकणी माणूस करतो. कधी जास्तीची अपेक्षा न करणारा कोकणी माणूस कायम अन्याय सहन करतो आहे. संगमेश्वर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज, अनेक धार्मिक स्थळे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे यांमुळे आता पर्यटन वाढले. पण या कंटाळवाण्या रेल्वे प्रवासामुळे पर्यटक नाखुश आहेत.

ऐन सणासुदीच्या दिवसांत अतिरिक्त सोडण्यात येत असलेल्या रेल्वे गाड्या, त्यात मागणी जवळजवळ मान्य झाल्याचा विश्वास यामुळे सगळे चाकरमानी आणि संगमेश्वरची जनता खुशीत होती. पण खासदार नारायण राणे यांच्या भेटीनंतरही उपेक्षित रहावे लागत असेल तर हा मोठ्या प्रतिष्ठेचा विषय आहे. संगमेश्वरच्या या मागण्यांसाठी आमदार, खासदार रेल्वे मंत्र्यांशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. पण तरीही मागण्यांचा विचार होत नाही. प्रतिक्षा यादीत कुठवर संगमेश्वर वासी यांच्या मागण्या घुटमळत ठेवणार? या गणेशोत्सवात थांबे मिळाले तरच बाप्पा पावले म्हणू!

नाहीतर जनसामान्यांचा असंतोष उफाळून येणार,हे मात्र नक्की!

-रुपेश मनोहर कदम/सायले

Railway Updates: ५२ गाड्यांसाठी नवीन थांबे जाहीर; कोकण रेल्वे मार्गावर ४ गाड्यांचा समावेश.. यादी इथे वाचा

   Follow us on        

Railway Updates:प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवरील गाड्यांना काही ठिकाणी नवीन थांबे मंजूर केले आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एकूण ५२ गाड्यांना इगतपुरी, देवळाली, भडली, मोहोळ, भिवंडी रोड, वालिवडे, विलाड, वांबोरी, सारोळा, राहुरी, रंजनगाव रोड, पाधेगाव, कासठी, चितळी, बेलवंडी, अकोलनेर, रोहा, पेन, जांबारा, हिरडगड, मार्तूर, कुलाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, साईनगर शिर्डी, अमरावती, गोंदिया, गोरखपूर, हावडा, कोल्हापूर, निजामाबाद, पुणे, सावंतवाडी रोड, दादर, दिवा, बेंगळुरू, जोधपूर, इंदूर, हैदराबाद, विजयपूर अशा विविध मार्गांवरील एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील ११००३/११००४ दादर–सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आणि १०१०५/ ५०१०५ दिवा–सावंतवाडी एक्सप्रेस यांनाही अनुक्रमे रोहा व पेन येथे थांबे मंजूर झाले आहेत.

क्रमांक गाडी क्रमांक / नाव स्थानक
१२१८८ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – जबलपूर एक्सप्रेस इगतपुरी
१२१८७ जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१३२ साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस इगतपुरी
१२१३१ दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस इगतपुरी
१२११२ अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१११ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – अमरावती एक्सप्रेस इगतपुरी
१२१०६ गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१०५ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – गोंदिया एक्सप्रेस इगतपुरी
२२५३७ गोरखपूर – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस देवळाली
१० १२८१० हावडा – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस देवळाली
११ १२८०९ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – हावडा एक्सप्रेस देवळाली
१२ २२५३८ लोकमान्य टिळक (टी) – गोरखपूर एक्सप्रेस देवळाली
१३ ५९०७६ भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर भडली
१४ ५९०७५ नंदुरबार – भुसावळ पॅसेंजर भडली
१५ १२११६ सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस मोहोळ
१६ १२११५ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – सोलापूर एक्सप्रेस मोहोळ
१७ १६५०८ बेंगळुरू – जोधपूर एक्सप्रेस भिवंडी रोड
१८ १६५०७ जोधपूर – बेंगळुरू एक्सप्रेस भिवंडी रोड
१९ ११०३० कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस वालिवडे
२० ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – कोल्हापूर एक्सप्रेस वालिवडे
२१ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस विलाड
२२ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस विलाड
२३ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस वांबोरी
२४ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस सारोळा
२५ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस सारोळा
२६ ११०४२ साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस राहुरी
२७ ११०४१ दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस राहुरी
२८ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस रंजनगाव रोड
२९ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस रंजनगाव रोड
३० ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस पाधेगाव
३१ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस पाधेगाव
३२ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस कासठी
३३ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस कासठी
३४ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस चितळी
३५ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस चितळी
३६ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस बेलवंडी
३७ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस बेलवंडी
३८ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस अकोलनेर
३९ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस अकोलनेर
४० ११००४ सावंतवाडी रोड – दादर एक्सप्रेस रोहा
४१ ११००३ दादर – सावंतवाडी रोड एक्सप्रेस रोहा
४२ ५०१०५ सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस पेन
४३ १०१०५ दिवा – सावंतवाडी रोड एक्सप्रेस पेन
४४ १९३४४ नैनपूर – इंदूर एक्सप्रेस जांबारा
४५ १९३४३ इंदूर – नैनपूर एक्सप्रेस जांबारा
४६ १९३४४ नैनपूर – इंदूर एक्सप्रेस हिरडगड
४७ १९३४३ इंदूर – नैनपूर एक्सप्रेस हिरडगड
४८ १७०३० हैदराबाद – विजयापूरा एक्सप्रेस मार्तूर
४९ १७०२९ विजयापूरा – हैदराबाद एक्सप्रेस मार्तूर
५० १७०३० हैदराबाद – विजयापूरा एक्सप्रेस कुलाळी
५१ १७०२९ विजयापूरा – हैदराबाद एक्सप्रेस कुलाळी
५२ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस वांबोरी

सावंतवाडी: नाकर्त्या प्रशासनाचा अजून एक बळी

   Follow us on        

सावंतवाडी: रविवारी चराठे-ओटवणे रस्त्यावर झालेल्या अपघतात कारिवडे गावातील ३२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाजारातून दुचाकीवरून घरी जात असताना येथील एका वळणावर त्याचा दुचाकीवरून ताबा सुटून ती एका मोठ्या दगडावर आढळली. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र या रुग्णालयात गंभीर जखमी रुग्णांना उपचार करण्याची सोय नसल्याने रुग्णालय प्रशासनाने त्याला बांबुळी येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले.

मात्र तिथे कोणतीही रुग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना रुग्णवाहिका शोधण्यासाठी पळापळ करावी लागली. १०८ वरून मागवलेली रुग्णवाहिका बांद्यावरून जवळपास सव्वा ते दिड तासाने आली. रुग्णाला घेऊन ती रुग्णवाहिका निघाली खरी मात्र बांबुळी रुग्णालयात पोहोचेपर्यंत परशुरामची प्राणज्योत मालवली.

वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती आणि परशुरामवर वेळेत उपचार चालू झाले असते तर त्याचा जीव वाचवता आला असता. मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे त्याचा जीव गेला. असे अजून किती बळी प्रशासन घेणार असा प्रश्न विचारला जात आहे. L

सावंतवाडी तालुक्यात मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल व्हावे ही मागणी खूप वर्षांपासून केली जात आहे. मात्र प्रखर राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी ते अजून काही वर्षे होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. मात्र ते होईपर्यंत किमान गंभीर जखमी रुग्णांना गोवा राज्यात जलद गतीने नेण्यासाठी रुग्णवाहिका तरी उपलब्ध करून द्यावी. येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी रुग्णाला गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देऊन सरळ आपले हात वर करतात. त्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांचा रुग्णवाहिकेचा शोध घ्यावा लागतो. साहजिकच याबाबत त्यांना कल्पना नसल्याने खूप वेळ वाया जातो. येथील प्रशासन अशा गंभीर जखमी रुग्णांना दुसरीकडे हलविण्यासाठी एक-दोन रुग्णवाहिका का ठेवू शकत नाही हा पण एक प्रश्नच आहे.
सावंतवाडीतील प्रस्तावित मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल चे काय झाले?
१६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेताना या हॉस्पिटलच्या कामास गती देण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे स्पष्टपणे सांगितले होते. दरम्यान, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत यांनी या हॉस्पिटलसाठीची जागा सध्याच्या कुटीर रुग्णालयाच्या परिसरातच असावी, अशी भूमिका घेतली आहे. मात्र काही राजकीय मंडळी हा प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्ते अमोल टेंबकर यांनी सावंतवाडीतील ‘यशराज मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल’ या पर्यायी प्रकल्पाला महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की जागेचा वाद सुटला तरी हॉस्पिटल उभारणीस किमान तीन वर्षे लागतील. त्यामुळे सध्या या प्रकल्पाची वाटचाल ठप्प झाली असून अद्याप कोणतेही ठोस पाऊल पुढे पडलेले नाही.

सावंतवाडी आणि आजूबाजूचा परिसर अजूनही अशा प्रकारच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी गोवा राज्यावर अवलंबून आहे. सावंतवाडीत एक सुसज्ज मल्टिस्पेशालिटी हॉस्पटिल व्हावे ही मागणी राजकीय इच्छा शक्ती अभावी पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.

Konkan Railway: कार-ऑन-ट्रेन सेवेला आता कोकणातही ‘हॉल्ट’

 

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे महामंडळाने कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दरम्यान सुरू केलेल्या रो-रो (Ro-Ro) कार ट्रान्सपोर्टेशन सेवेला आता नवा थांबा मिळाला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सोयीसाठी नांदगाव रोड स्थानकावर या सेवेसाठी अतिरिक्त थांबा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कार मालकांसाठी ही सेवा अधिक लवचिक आणि उपयोगी ठरणार आहे. आता प्रवासी कोलाड, नांदगाव रोड किंवा वेर्णा या कोणत्याही स्थानकावरून कार लोड आणि अनलोड करू शकतील.

या सेवेसाठी नोंदणीची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कोलाड ते वेर्णा दरम्यान एका कारसाठी भाडे ₹७८७५/- (५% GST सहित) आहे, तर कोलाड ते नांदगाव दरम्यानचे भाडे ₹५४६०/- इतके आहे. प्रत्येक कारसाठी ₹४०००/- नोंदणी शुल्क आकारले जाईल, जे सेवेसाठी पात्र ठरल्यास अंतिम भाड्यातून वजा केले जाईल. मात्र, जर १६ हून कमी बुकिंग्स प्राप्त झाल्या तर सेवा रद्द करण्यात येईल आणि नोंदणी शुल्क परत करण्यात येईल.

कार लोड झाल्यानंतर चालक किंवा सहप्रवाशांना कारमध्ये बसून प्रवास करण्याची परवानगी नसेल. त्याऐवजी प्रवाशांनी रेल्वेच्या कोचमध्ये 3AC किंवा 2S वर्गात तिकिट काढून प्रवास करावा लागेल. एका कार बुकिंगवर ३ प्रवासी (२ जण 3AC आणि १ जण 2S) प्रवास करू शकतात. अतिरिक्त प्रवासी केवळ रिक्त जागा उपलब्ध असल्यासच प्रवास करू शकतील.

या नव्या थांब्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. कोलाडहून वेर्णाकडे जाणारी सेवा दुपारी ३ वाजता सुटेल आणि नांदगाव रोडवर रात्री १० वाजता पोहोचेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता वेर्णा स्थानकात आगमन होईल. वेर्णाहून परतीच्या प्रवासात गाडी दुपारी ३ वाजता सुटेल, नांदगावला रात्री ८ वाजता पोहोचेल आणि कोलाडला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचेल.

नोंदणीसाठी कोलाड, वेर्णा किंवा कणकवली (नांदगावसाठी) स्थानकावर संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी आणि अटी व शर्तींसाठी अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search