Category Archives: कोकण

”…. नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही” जनआक्रोश समितीचा ईशारा

   Follow us on        

रायगड – १७ वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून आधी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराच राज्य सरकारला कोकणवासियांनी दिला आहे.

माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही, अपघातात जखमी झालेल्यांना सहाय्य केले जात नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावरती अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने करून द्यावी, यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

संजय यादवराव, रुपेश दर्गे, अजय यादव, संजय जंगम,पराग लाड, सुरेंद्र पवार, प्रशिल लाड, आशिष बने, अनिल जोशी यांनी या आंदोलनाची हाक दिली असून त्यास मावळ प्रतिष्ठान, बजरंगदलसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, उद्योजक शेखर गोडबोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला.

नवीन महामार्ग होऊ देणार नाही – यादवराव

गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणवासियांचे प्रमुख सण आहेत. या सणाला कोकणी माणूस यायला निघाला की सरकार सल्ला देते पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जा, अरे आम्ही आमच्या हक्काच्या रस्त्याने जायचे नाही तर किती वर्षे दुसर्‍यांच्या दारातून घरी जायचे हे यापुढे जमणार नाही, आधी आमचा रस्ता पूर्ण करा. जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणासाठी घोषणा होत असलेल्यापैकी एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला.

 

 

Loading

Konkan Railway: सौरऊर्जेपासून ३.१८ लाख युनिट वीजनिर्मिती करून कोकण रेल्वेने वाचवले ३८.५६ लाख रुपये

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वेने स्पर्धात्मक निविदांद्वारे 1200 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे नवीन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करून 2023-24 या वर्षात आतापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे 301 कोटी रुपयांचा नफा मिळवला असल्याचे कोकणरेल्वे तर्फे आज स्वातंत्र्यदिनाच्या औचित्य साधून जाहीर करण्यात आले आहे. याबरोबरच कोकण रेल्वेने केलेल्या इतर कामगिरींची यादीही जाहीर केली आहे
जानेवारी ते जुलै 2024 या कालावधीत सौर उर्जेपासून 3.18 लाख युनिट वीज निर्मिती केली आहे, ज्यामुळे ऊर्जा बिलांमध्ये 38.56 लाख रुपयांची बचत झाली करण्यात कोकण रेल्वेला यश आले आहे.
रेल्वे मंत्रालयाने गोव्यातील जुने गोवा आणि पेरनेम बोगद्याच्या बांधकामासाठी 1,486 कोटी रुपयांच्या भागीदारीस मान्यता दिली असून कर्नाटकातील ठोकूर आणि येथील गुड्स शेडचे काम पूर्ण झाले आहे. तर उडुपी (कर्नाटक), इंदापूर (महाराष्ट्र), वेर्णा (गोवा) येथील गुड्स शेडचे काम प्रगतीपथावर आहे.
कोकण रेल्वेने जानेवारी 2024 ते जुलै 2024 दरम्यान सुमारे 15,399 गाड्या चालवल्या असून त्यात 181 उन्हाळी विशेष गाड्यांसह 11,444 मेल/पॅसेंजर गाड्या 3,955 मालगाड्यांचा समावेश आहे.
एकूण 26 हरवलेल्या मुलांची रेल्वे आणि रेल्वे परिसरातून सुटका करण्यात आली आणि त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांना आणि चाइल्ड हेल्पलाईनला सुपूर्द करण्यात आले. दिनांक 05 जुन 2024, जागतिक पर्यावरण दिनी कोकण रेल्वे मार्गावर आणि कोकण रेल्वे विहार येथे एकूण 6,548 रोपे लावण्यात आली.
कोकण रेल्वेतील 190 पदांसाठी भरती अधिसूचना लवकरच जारी करण्याचे नियोजन असल्याचे कोकण रेल्वे तर्फे जाहीर करण्यात आले. 2021-22 आणि 2022-23 या वर्षांसाठी कर्मचारी कल्याण निधीतून कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 20.78 लाख रुपये रोख पुरस्कार आणि शिष्यवृत्ती म्हणून वितरित करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी 9 जुलै 2024 रोजी इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेड (IIFCL) आणि कोकण रेल्वे यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक/कोकण रेल्वे, संतोष कुमार झा यांनी आज राष्ट्रीय ध्वज फडकावला आणि कोकण रेल्वे विहार, नेरुळ, नवी मुंबई येथे रेल्वे संरक्षण दल (RPF) तुकडीची पाहणी केली. मेळाव्याला संबोधित करताना झा यांनी कोकण रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या अपवादात्मक टीमवर्क आणि समर्पणाची प्रशंसा केली. त्यांनी संस्थेच्या वाढीसाठी आणि यशासाठी त्यांचे परिश्रमपूर्वक प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले. याशिवाय, त्यांनी कोकण रेल्वेच्या उत्कृष्टतेची वचनबद्धता अधोरेखित करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कामगिरी आणि भविष्यातील उपक्रमांवर प्रकाश टाकला.

Loading

Ganesh Chaturthi 2024: खुशखबर! गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी जाहीर

   Follow us on        
मुंबई : गणेशभक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूशखबर दिली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेचा आढावा आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बुधवारी बैठक झाली.  या बैठकीत गणेशभक्तांसाठी टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला होता. तसेच, गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळाला आहे. राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत. त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देशही या सभेत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.राज्यात गणेशोत्सवाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या तातडीच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे असे शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. गेल्या वर्षी ज्या सार्वजनिक गणेश मंडळांना परवानगी दिली होती, ती यावर्षीही कायम राहील त्यासाठी शुल्क आकारणी करू नये. मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी य़ोजना राबवावी. गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावर मिरवणुकीदरम्यान अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी तातडीने करावी. खड्डे बुजवताना आधुनिक तंत्रज्ञनाच्या वापराणे बनविण्यात आलेले साहित्य वापरावे. खड्डे बुजविण्याकामी हयगय करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावेत. महापालिकांनी गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी तैनात केलेल्या अग्नीशमन वाहनासाठी कुठलेही शुल्क आकारणी करू नये, असेही निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. याचबरोबर, सर्वंत्र पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांनी देखील सहकार्य करावे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकांनी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पुणे येथील एका संस्थेने विसर्जित केलेल्या शाडू मातीच्या मुर्तीचा पुनर्वापराचा प्रयोग केला असून त्यांनी पुनरावर्तन हा उपक्रम सुरू केला आहे. राज्यात सर्वच महापालिकांनी हा उपक्रम राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Loading

प्रशासनाला जागे करण्यासाठी सावंतवाडीत उद्या मोठा ‘घंटानाद’ होणार

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे संदर्भात प्रलंबित प्रश्नांची नेहमी वाचा फोडणारी संघटना म्हणजेच कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी. या संघटनेने गेल्या वर्ष भरात अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली त्यात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे मुख्य..!

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन होऊन ९ वर्षा पेक्षा अधिक काळ लोटला येथे प्रस्तावित रेलो-टेल देखील रखडले, त्यातच सावंतवाडी स्थानकातून कोरोना काळात तब्बल तीन रेल्वे गाड्यांचे थांबे हे रद्द करण्यात आले. या मुळे प्रवाशांची परवड होऊ लागली. या प्रवाशांचा आवाज प्रशासन आणि शासन या दोघांकडे पोहोचवण्यासाठी माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचा नातू मिहिर मठकर आणि त्याचे साथीदार व असंख्य टर्मिनस प्रेमी पुढे आले. सुरुवात झाली ती निवेदनाद्वारे, त्यानंतर माहितीचे अधिकार, त्यानंतर रेल्वे अधिकारी भेट, मंत्र्यांचा भेटी आदी घेण्यात आल्या. तरी यश मिळत नव्हतं.

२६ जानेवारी २०२४ रोजी संघटनेने सलग्न संघटनांचा सोबत मिळून हजारो लोकांचा उपस्थितीत लाक्षणिक उपोषण देखील केले होते. तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही.म्हणून प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या स्वातंत्र्य दिनी मोठ्ठा घंटानाद करण्यात येणार आहे. उद्या दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या घंटानाद आंदोलनाला सर्व रेल्वे प्रवासी,टर्मिनस प्रेमी आणि कोकणवासियांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Loading

Ganesh Chaturthi 2024: कोकणात जाणार्‍या गणेशभक्तांसाठी ‘अटलसेतू’ टोलमुक्त होणार?

   Follow us on        

Ganesh Chaturthi 2024:  गणेशभक्तांसाठी ‘अटलसेतू’ टोलमुक्त करावा अशी मागणी होत आहे.

मुंबई – गोवा महामार्गचे काम चालू असल्यामुळे गोरी – गणपती सणास आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होऊ नये म्हणून गेली काही वर्षे मुंबई – (पूणा ) बेंगलोर महामार्ग गौरी – गणपती सणात टोल मुक्त केला जातो. तसाच “अटल सेतू” टोल मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी गणेशभक्त कोकवासीय प्रवासी संघाने रायगड रत्नागिरी पालकमंत्री मान. उदय सामंत यांचकडे करण्यात आली.

गौरी – गणपती सणास कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या सहकार्याने गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने १२०० पेक्षा जास्त एस. टी. गाड्यांचे नियोजन केले आहे. इतर काही संस्था, राजकीय कार्यकर्ते, आणि एस. टी. महामंडळही जादा गाड्यांचे नियोजन करतात. एस. टी. महामंडळाने ३००० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन केल्याचे समजते. तसेच छोटया गाड्यांचेही प्रमाण जास्त असते, मुंबईत अनेक ठिकाणी रस्ता, पूल, मेट्रो अशी कामे सुरु आहेत.त्याच कालावधीत श्री गणेश आगमनाच्या मिरवणूकाही निघतात. वाहतूकीची कोंडी होते, जर अटल सेतू मार्ग टोल मुक्त केल्यास मुंबईतून निघणाऱ्या एस. टी. गाड्या, व इतरही गाड्या अटलसेतू मार्गे जातील. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होणार नाही, प्रवाश्यांचा वेळही वाचेल, हे मान. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. माजी आमदार मान. तुकाराम काते यांनी मंत्री महोदयांची भेट घडवून आणली. गणेशभक्त कोकवासीय प्रवासी संघांचे अध्यक्ष रविंद्र मुकनाक, कार्याध्यक्ष -दीपक मा. चव्हाण, कोषाध्यक्ष- विश्वनाथ मांजरेकर, प्रमुख संघटक- अनिल काडगे, अशोक नाचरे, अजित दौडे, संतोष कासार, शंकर नाचरे आदी उपस्थित होते. प्रवासी संघाच्या वतीने कार्याध्यक्ष- दीपक चव्हाण यांनी आपल्या मागणीचे सविस्तर विश्लेषण केले. सकारात्मक चर्चा झाली. दिनांक १८/०८/२०२४ रोजी होणाऱ्या स्नेह संमेलास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रणही प्रवासीसंघाच्या वतीने देण्यात आले.

Loading

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आता १२ तास रेल्वे आरक्षण सुविधा मिळणार; प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश

   Follow us on        
सावंतवाडी:  सावंतवाडी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी तिकीट आरक्षण खिडकी आता सकाळी ८ ते संध्याकाळी ८ अशी १२ तास खुली राहणार आहे. या आधी ती सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली असायची. आता ती १२ तास खुली राहणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश 
खरेतर सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून आंबोली-चौकुळ, कलंबिस्त-शिरशिंगे, शिरोडा, रेडी , दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील गावे अशा मोठ्या पट्ट्यातील प्रवासी प्रवास करतात. अर्धवेळ तिकीट आरक्षण खिडकीमुळे दुरून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे या स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ चालू करावी अशी मागणी येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे करण्यात येत होती. दिनांक ९ ऑगस्ट रोजी सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन सादर करून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती केली गेली होती. या निवेदनात स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ सुरु करावी या मागणीचा समावेश होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन खासदार नारायण राणे यांनी रेल्वे प्रशासनाला तशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रवासी संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत.

Loading

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची सभा मुंबईत संपन्न

   Follow us on        

मुंबई : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची सभा काल दिनांक ११ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पाडली.

या सभेला कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले व सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी वचनच दिले. भाषणात त्यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत त्वरित विलीनीकरण होणे आवश्यक आहे, गोवा महामार्ग त्वरित पूर्ण झालाच पाहिजे, कोकणच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने बोट वाहतूक पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे तसेच कोकणातील सर्वच बंदरांचा मांडवा बंदरा प्रमाणे विकास होणे आवश्यक आहे व तेथे सर्वसोई सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यामुळे भारतातील व परदेशीय पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी कोकणात येतील, त्यामुळे अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाल्या प्रमाणे भारतातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज निर्माण करून त्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलेगेले पाहिजे त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारणा होतील तळागाळातील समाजातील हुशार मुले डॉक्टर होतील त्याची सुरुवात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून या वर्षापासुन सुरू होईल असे ते यावेळी म्हणाले.

संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत सावंत यांनी कोकण रेल्वेचे विलीनीकरण व सावंतवाडी टर्मिनस होणे का जरूरी आहे याचा आपल्या भाषणात प्राधान्याने तसेच प्रभावीपणे उल्लेख केला तसेच यासाठी सर्व कोकणवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यासोबत इतर मान्यवरांनी तसेच उपस्थित असलेल्या सदस्यांनी आपले विषय तसेच मते मांडली.

सभेला विलास राणे वडाळा विधानसभा क्षेत्र प्रमुख,माजी नगरसेवक सुनील मोरे,मुकुंद पडियाल,नामदेव मठकर निवृत्त सुप्रिटेंड जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग जिल्हा,ऍड योगिता सावंत,पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते प्रकाश कदम,कोकणातील अनेक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते,सभेचा समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्या बद्दल धन्यवाद दिले व आभार मानले व पुढील काळात सर्वच कोकनवासीयांनी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्रित येऊन कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करूया असे आवाहन केले

Loading

Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार स्वातंत्र्यदिन विशेष गाडी; एकूण ४ फेऱ्या

Special train for Independence day: येत्या स्वातंत्र्यदिनी कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने मध्य रेल्वेने या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी ते मडगाव दरम्यान ही गाडी चालविण्यात येणार असून या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
०११४९/०११५० एलटीटी – मडगाव  – एलटीटी विशेष (एकूण ४ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०११४९ विशेष ही गाडी एलटीटी येथून गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री २१.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५० विशेष मडगाव येथून शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी आणि रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल ती रात्री ००.४० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवी
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६, सेकंड स्लीपर- ०८, जनरल – ०३, जनरेटर व्हॅन -०१ एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २१ LHB डबे

Loading

Mumbai Goa Highway: बाप्पा आता तूच वाचव! महामार्गावर १०६ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे

   Follow us on         Mumbai Goa Highway: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रेल्वेचे आरक्षण आधीच फुल झाल्याने मोठ्या उत्साहाने कोकणात गावी जाणाऱ्या कित्येक गणेश भाविकांकडे रस्ते वाहतुकीचा पर्याय राहिला आहे. साहजिक दरवर्षीप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्याप्रमाणात गणेश चतुर्थी दरम्यान वाहतूक होणार आहे. मात्र सध्याची महामार्गाची परिस्थिती पाहता गणेशोत्सवात प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या या परिस्थितीकडे कोंकण विकास समिती व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गाच्या दुर्दशेच्या फोटो पुराव्यासहित पत्रव्यवहार केला आहे.

“आपण मुंबई गोवा हायवे दुर्दशेबाबत स्वतःहून लक्ष घालून सहयाद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच राष्ट्रीय महामार्ग (सा.बा.) चे अधिकारी यांना खड्डे बुजविने तसेच खड्डे बुजविणेसाठी कोणत्या प्रतीचे मटेरियल वापरावे याबाबत स्पष्ट आदेश देवूनही पूर्तता होत नसलेने एकंदरीत मुंबई गोवा हायवे संबंधात आपणाकडून स्पष्ट आदेश होऊनही पूर्तता होत नसलेने कोंकणात लवकरच साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा करावा अशी नम्र विनंती आहे. कोंकण विकास समितीचे सदस्य व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे सह सचिव श्री चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी स्वखर्चाने तसेच कोंकण विकास समितीचे सदस्य श्री अक्षय मधुकर महापदी तसेच श्री सुधीर सापळे यांनी दिनांक २८.०७.२०२४ ते ०७.०८.२०२४ रोजी केलेले पाहणीत तसेच सोबत जोडलेले पीडीएफ मधील फोटो वरून दिसत आहे. या पाहणीत कासू ते माणगाव मार्गावर ४७ तर कासू ते पळस्पे मार्गावर ६९ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे आढळले” अशा आशयाचे पत्र ई-मेल द्वारे संबधीत लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले आहे.

Loading

कोकण रेल्वेतील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एका लोहमार्ग पोलीस ठाण्याला मंजुरी

   Follow us on        

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाने यासाठी ९१ लाख ७० हजारांचा निधी मंजूर केला असून १५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करण्यात येणार आहे. शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा अद्यादेश शुक्रवारी जारी केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीच्या प्रमाणाला आळा बसणार आहे.

कोकणातील रोहा, कणकवली आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी लोहमार्ग पोलीस ठाणी प्रस्तावित होती त्यापैकी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकीहिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. याहद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागते. आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search