नागपूर: नागपुरातील सुरू होणारी कंपनी गुजरातला नेण्यात आली असल्याची बातमी काल व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी या गोष्टीवरून मोठ्या प्रमाणात सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे रिन्यू कंपनीने म्हंटले आहे. याबाबत कंपनीने एक लिखित खुलासा जारी केला आहे.
कंपनीने काय म्हटले आहे खुलाश्यात..
महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा वीज दर प्रचंड असल्याने महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असे आम्ही म्हटल्याचे वृत्त धादांत खोटे. हे वृत्त नुसते दिशाभूल करणारे नाही, तर अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. महाराष्ट्रात आम्ही सौर उत्पादनात अपस्ट्रीम व्हॅल्यूचेनमध्ये गुंतवणूक करणार आहोत, ती गुजरातमध्ये करणार नाही. रिन्यू ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कंपनी आहे आणि महाराष्ट्राबाबत आमची वचनबद्धता आहे. महाराष्ट्रात आम्ही 550 मेवॉ क्षमता स्थापित केली आहे आणि आणखी 2000 मेवॉ चे काम सुरु आहे. 2026 पर्यंतचा हा आराखडा असून, त्यासाठी 15,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे. याशिवाय पंप स्टोरेज, ग्रीन डायड्रोजन क्षेत्रात सुद्धा आम्ही राज्यात काम करणार असून, यातून 30 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनी महावितरणला 550 मेवॉ वीज स्पर्धात्मक दरात देत असून, सध्याचे प्रकल्प आणि येणारे प्रकल्प असे मिळून 1 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आम्ही करणार आहोत
मुंबई :लालबागचा राजा गणेश मंडळ दर्शनादरम्यान व्हीआयपी आणि सामान्य भाविक यांच्यात भेदभाव करत असल्याचा आरोप करत, मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन वकिलांनी मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या प्रसिद्ध मंडळामध्ये बाप्पांचे दर्शन घेताना, सामान्य लोक आणि व्हीआयपींना परस्परविरोधी वागणूक दिली जात असल्याचे दर्शवणारे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
व्हिडिओमध्ये, मंडळ कर्मचारी गणेशाचे दर्शन घेताना लगेचच भक्तांना जबरदस्तीने ओढून ढकलताना दिसत आहेत, तर दुसरीकडे व्हीआयपींचा एक वेगळा गट बाप्पांच्या समोर सेल्फी घेत आहे. या प्रकाराबद्दल आशिष राय आणि पंकज मिश्रा या वकिलांनी या असमान वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मंडळांच्या कर्मचाऱ्यांचा हा माजोरडेपणा सुरु आह्रे. या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती या दोन वकिलांनी मुंबई पोलीस आयुक्तांना केली असून, त्यांच्या तक्रारीच्या प्रती राज्य महिला आयोग, राज्य मानवाधिकार आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांना पाठवल्या आहेत.
आशिष राय म्हणाले, हे मंडळ जगप्रसिद्ध आहे. इथे चांगला पोलीस बंदोबस्त आहे, तरीही ही सुरक्षा व्हीआयपींपुरती मर्यादित आहे. सामान्य भाविकांना असे संरक्षण मिळत नाही. मंडळाच्या आर्थिक स्त्रोतांचा विचार करून, या असुरक्षित गटांना प्राधान्य दिले पाहिजे. भक्तांना तक्रारी नोंदवण्यासाठी घटनास्थळी तक्रार पेटी बसवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राय यांच्या मते, मंडळामधील कर्मचारी अप्रशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे मूलभूत मानवी व्यवस्थापन कौशल्यांचा अभाव आहे. हा मुद्दा वर्षानुवर्षे कायम आहे, आणि व्हायरल व्हिडिओमुळेच समोर आला आहे. पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवात याबाबत सुधारणा न झाल्यास हे प्रकरण न्यायालयात नेले जाईल, असे त्यांनी सांगितले.
I see only solution to this demeaning treatment is to boycott by the common men and women and declare Lalbaug cha Raja as VIP only. pic.twitter.com/oRqmLTHyXR
— John HeyGhaati (@Sant_patil) September 12, 2024
मुंबई, दि.४ सप्टें राज्यातील गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारने यावर्षी गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वतीने सर्व गणेश भक्तांना टोल माफ असणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बँगलोर महामार्ग, इतर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या टोल नाक्यावर गणेश भक्तांना टोल माफी दिली जाणार आहे.
आज राज्य सरकाराच्या वतीने यासंबधी अधिसूचना काढून टोल प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. गणेश उत्सवासाठी गावी निघालेल्या गणेश भक्तांच्या सर्व गाड्या आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या बसेसना टोल नाक्यावर मोफत सोडले जाणार आहे. तसेच फ्री पाससाठी संबंधित वाहतूक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.
मुंबई: यावर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता किती एसटी कर्मचारी आणि कोणत्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार? हे पाहावे लागेल.
याशिवाय, एसटी स्थानकांवर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यादृष्टीने दक्षता घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुठल्याही डेपोत एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयात दिल्या जातील. जेणेकरून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्याची बसेसची सोय केली जाईल.
रायगड : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या कामाच्या ठेकेदाराविरुद्ध माणगाव पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी कारवाई चालू केली असून प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाच्या इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराचा महामार्गाचे चौपदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्जाहिन कामामुळे व अपूर्ण असलेल्या कामाच्या ठिकाणी महामार्गास खड्डे पडले. काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना त्यामध्ये थर्मोप्लास्टीक पेंट (पांढ-या पट्टया), कॅट आईज, डेलीनेटर, वाहन चालकांच्या माहितीसाठीचे माहिती, सूचना फलक लावणे, अनधिकृत रस्ते दुभाजक बंद करणे आवश्यक होते. हे काम केले नाही. त्यामुळे या महामार्गावर अपघात होऊन होऊ लागले. २०२० पासून एकूण १७० मोटार अपघात झाले. त्यामध्ये एकूण ९७ प्रवाशांच्या मृत्यूस झाला. २०८ प्रवाशी जखमी झाले. त्याचप्रमाणे वाहनाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या ठेकदार कंपनी विरुद्द मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार करीत आहेत.
महामार्गाचे निकृष्ठ काम केल्याप्रकरणी मे. चेतक एंटरप्रायझेस लिमीटेड (मे. चेतक अॅप्को (जेव्ही)) (कॉन्ट्रॅक्टर), ५०१, नमन सेंटर, सी-३१, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५१ या कंपनीचे व्यवस्थापकिय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेश कुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित सदानंद कावळे व कंपनीच्या इतर जबाबदार व्यक्ती यांच्या विरुध्द प्रकल्प अभियंता, राष्ट्रीय महामार्ग यांनी तक्रारी केली होती. त्यानुसार माणगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम १०५,१२५ (अ) (ब) व ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कंपनीने महामार्गाच्या रुंदीकरण व आधुनिकी करणाचे काम सुरु केले. परंतू त्यांनी हे काम मुदतीत पूर्ण न करता दर्जाहिन काम केले.
मुंबई: वांद्रे टर्मिनस – मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे वाहतूक मंत्री आश्विनी वैष्णव यांनी हिरवा बावटा दाखवून मार्गस्थ केले. बोरिवली स्थानकावर या एक्सप्रेसच्या शुभारंभाचा कार्यक्रम दुपारी साडे तीन वाजता पार पडला.
पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या या ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक्सप्रेसला हिरवा बावटा दाखवला. यावेळी बोरिवली रेल्वे स्थानकावर भाजप नेते पियुष गोएल, प्रविण दरेकर यांच्यासह रेल्वे अधिकारी व राजकीय नेते उपस्थित होते.
बोरिवली – मडगाव ट्रेन क्रमांक ०९१६७ ला बावटा दाखवल्यानंतर ट्रेनने मडगावच्या दिशेने प्रस्थान केले.
वांद्रे टर्मिनस – मडगाव द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस कोकणात आर्थिक विकास वाढवेल तसेच, या ट्रेनचा स्थानिक व्यापार आणि व्यवसायांना फायदा होणार आहे. तसेच, सिंधू एक्स्प्रेसद्वारे प्रवास सुलभ झाल्याने या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.वांद्रे टर्मिनस ते मडगाव दर बुधवार आणि शुक्रवार तर, मडगाव ते वांद्रे टर्मिनस दर मंगळवार आणि गुरुवार ही ट्रेन धावणार आहे. प्रवाशांना IRCTC च्या संकेतस्थळावरुन यासाठी बुकींग करता येणार आहे.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पश्चिम मार्गावर वांद्रे – मडगाव एक्सप्रेस सुरु करण्याचा निर्णय घेतला.
गणेशोत्सवादरम्यान प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना या ट्रेनमुळे प्रवासाचा आणखी एक सोयीस्कर आणि आरामदायी पर्याय उपलब्ध झाला आहे.
सिंधुदुर्ग: मालवण राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या ९ महिन्यात कोसळला. तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांची अशी अवहेलना खुद्द महाराष्ट्रातच होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? महाराजांची यापेक्षा मरणोत्तर अपमान आणि अवहेलना ती कोणती?
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यादृष्टीने कारवाई केली गेली पाहिजे होती. कोणी जबाबदार नेत्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे होती. मात्र घडले विपरीत…. कोणत्याही गोष्टीतील राजकीय फायदा बघणाऱ्या राजकारण्यांनी या घटनेचेही राजकारण सुरु केले. काल ठाकरे गट आणि राणे समर्थक एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर आल्यावर खूप मोठा राडा झाल्याची घटना घडली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते एकमेकांशी भिडले. या राड्याचे विडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेत. हे विडिओ बघताना ही घटना यूपी बिहारमध्ये घडत असल्याचे भासत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि राडा हे आता जणू समीकरणच झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव खराब होत आहे. याला जबाबदार आहेत येथील राजकारणी. पण कालचा विषय हा राजकारणाचा नव्हताच. तरी यांनी ती संधी वाया जाऊ दिली नाही. अगदी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला. पुतळा कोसळल्यानंतर महाराज येथून गायबच झाले जणू. मुख्य विषय बाजूलाच राहिला आणि त्याची जागा राजकारणाने घेतली. संपूर्ण देशात ज्या महाराजांची आराधना केली जाते त्यांचा पुतळा आपल्या घरात पडला ही शरमेची गोष्ट असताना येथील राजकारणी ताठ मानेने राडे करत आहेत? महाराजांचा पुतळा कोसळला हे कमी होते की काय म्हणून राजकारण्यांनी राजकोट किल्ल्याची तोडफोडही केली. त्यापेक्षा दुर्देव म्हणायचे तर त्यांना समर्थन देणारे आपलेच लोक आहेत.
आज सर्व सोशल नेटवर्किंग मीडियावर कालचा राडा कसा होता? कोणाला कशी धमकी दिली? कोणाची किती फा… ली? यासारख्या पोस्ट्स दिसत आहेत. अरे ज्यांच्यासाठी हे सर्व चालले ते छत्रपती शिवाजी महाराज कुठे गायब झालेत? पुतळा बांधणारा तो कंत्राटदार फरार झाला आहे याबाबत कोणाला काही सोयरसुतक आहे का?
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे महाराजांचा १०० फुटी येथे लवकरच उभारला जाणार असे विधान केले. एक शिवप्रेमी म्हणून मला वाटते ईथे १०० फुटी सोडाच तर १ फुटी पुतळा सुद्धा नका उभारू. जेथे महाराजांची अशी अवहेलना केली जाते तिथे आमच्या दैवताचा पुतळा नकोच.
सिंधुदुर्ग: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पुतळा कोसळण्याची घटना काल घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत संताप व्यक्त केला गेला. पुतळा उभारणीत हलगर्जीपणा झाला असून हा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदलाने एक पथक नेमले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीबाबत नौदलाने सांगितले की, “राज्य सरकार आणि तज्ञांसह, नौदलाने या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त केले आहे.” लवकरच हे पथक या घटने मागची कारणे शोधून आपला अहवाल सादर करेल. मात्र त्याआधी पुतळा कोसळण्यामागची कोणते कारणे असू शकतात, कोणते आरोप होत आहेत ते पाहू.
निकृष्ट दर्जाचे काम?
राज्य सरकारने योग्य ती काळजी न घेतल्याने ही पडझड होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारने कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले नाही. केवळ कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे शिवसेनेचे (यूबीटी) आमदार वैभव नाईक यांनीही कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे.
लोखंडी अँगल अर्धवट?
पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते. त्यावर पुतळ्याचे पार्ट जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.
पुतळा निर्मितीसाठी खूप कमी कालावधी?
उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच पुतळा कोसळला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर या पुतळ्याच्या निर्मितीस खूपच कमी कालावधी भेटला असे या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे हे म्हणाले होते. अशा प्रकारच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी किमान ३ वर्षे लागतात मात्र आपण हा पुतळा अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण केला असल्याचे ते म्हणाले होते.
अपूर्ण अभ्यास?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मागील २ दिवस ताशी ४५ किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं होते . तर पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी येथील खाऱ्या हवेमुळे पुतळ्याच्या नट बोल्ड्सना गंज पकडली असे विधान केले आहे. कोणतेही बांधकाम करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्याप्रमाणे बांधकामात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र हा पुतळा उभारताना हा अभ्यास झाला नसल्याचे दिसून आले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्टला नौदलाला पाठविले होते पत्र
महाराजांच्या पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी ज्या नट-बोल्टचा वापर केला होता ते आता पाऊस आणि खारे वारे यामुळे गंजले असल्याने पुतळा विद्रूप दिसत आहे. तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्र मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळविले होते. मात्र या पत्राची दखल का घेतली नाही याबाबत नौदलाकडून काही उत्तर आले नाही आहे.
सिंधुदुर्ग: पुणेकर चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी नवीन जलद पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती फ्लाय-९१ विमान कंपनीने माहिती आपल्या संकेतस्थळावरून प्रवाशांसाठी दिली आहे.
येत्या ३१ ऑगस्टपासून दर शनिवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल. या पूर्वी सिंधुदुर्ग – हैदराबाद – पुणे अशी एक थांबा असलेली विमानसेवा उपलब्ध होती. ती प्रवाशांसाठी सोयीची नसल्याने चिपी विमानतळावरून पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून होत होती ती आता पूर्ण झाली आहे.सिंधुदुर्गवासी मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसाय व शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. या विमानसेवेमुळे आता त्यांना दिलासा मिळाला आहे. ऐन गणेशोत्सवात ही सेवा सुरू होत असल्याने गणेश चतुर्थीसाठी पुणेकरांची सिंधुदुर्गात येण्याची चांगलीच सोय झाली आहे.
पुणे येथून दर शनिवारी व रविवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करणारे विमान नऊ वाजून दहा मिनिटांनी चिपीला पोहचेल.परतीच्या प्रवासाला सकाळी साडे नऊला सुटून पुणे येथे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोचेल. तिकीट दर १९९० रूपये आहे. फ्लाय ९१ विमानसेवेच्या तिसऱ्या यशस्वी मोहिमेनंतर आता चिपी-मुंबई अशी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
Content Protected! Please Share it instead.