मुंबई: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर एक नवीन प्रयोग हाती घेत आहेत. आता विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्गात दर तीन महिन्याने सेमिस्टरमध्ये 3 ते 4 पुस्तक एकत्र करुन एकच पुस्तक शाळेत आणावे लागणार आहे. प्रयोग पहिली ते सातवी पर्यंतच्या इयत्तेसाठी असणार आहे
पहिले ते पाचवीतील विद्यार्थ्यांना वर्षातून तीन महिन्याला 1 पुस्तक अशी तीन पुस्तकं असतील. यामध्ये सर्व विषयाचा अभ्यासक्रम एकत्र केला जाणार आहे. तर सहावी आणि सातवीसाठी वर्षभरात चार पुस्तकामध्ये या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण असणार आहे. त्यामुळे वर्षात 3 ते 4 पुस्तकं दर तीन महिन्यात बदलावी जरी लागत असली तरी वर्गात मात्र शिकण्यासाठी एकच पुस्तक घेऊन जावं लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा विषय सातत्याने चर्चेत असतो. न्यायालयाने या मुद्द्यावरुन शिक्षण विभागाला वारंवार फटकारले आहे.
सध्या शाळेचे वेळापत्रक पाहून विद्यार्थी रोज पाच ते सहा पुस्तके , वह्या दप्तरात घेऊन जातात. आता मात्र हा प्रयोग प्रत्यक्षात आला तर विद्यार्थ्यांना दप्तरात एकच पुस्तक न्यावं लागणार आहे.
सुरुवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपाय अमलात येणार आहे. सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल नाशिक मध्ये दिली..