Category Archives: सिंधुदुर्ग
शहरातील धोकादायक झाडे त्वरित तोडण्यात यावीत अन्यथा…. माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांचा इशारा
सावंतवाडी :मंगळवारी रात्री सावंतवाडी शहरात झाड पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. शहरात अशी बरीच धोकादायक झाडे आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने सावंतवाडी शहरासह परिसरातील रस्त्याच्या लगत जी धोकादायक झाडे आहेत, त्या झाडांच्या मालकांना सांगून ती आठ दिवसांत तोडावीत. अन्यथा शासनासह स्थानिक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना त्यांनी आज एक निवेदन सादर केले. या निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले आहे की, मंगळवारी जो आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आणि रेस्ट हाऊस जवळ भर रस्त्यावर आलेली अनेक धोकादायक झाडे आहेत मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मंगळवारी रात्री या दोन्ही दुर्दैवी युवकांनी काहीही चूक नसताना त्यांचा बळी गेला शहरातील सर्व धोकादायक झाडे येथे सात दिवसात तोडून घ्यावीत असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.
मंगळवारी रात्री 11 वाजता सावंतवाडी शहरातील राजवाड्याच्या नजीक एक मोठे झाड पडून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.
मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.
पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.
नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.
सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.
या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.
पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य पुरविणे या जि. प. च्या योजनेची काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात याची सोडत काढण्यात आली. या सोडतीत तालुक्यातील गावांचे गट पाडून प्रत्येक गटातून चार मंडळाची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भजनी मंडळांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भजनी मंडळांना साहित्य पुरविणे ही योजना सुरू केली आहे. एक पखवाज, एक चकी आणि पाच टाळ असे साहित्य प्रत्येक निवड झालेल्या भजनी मंडळाला दिले जाणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली दरम्यान, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी घ्यावा, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जि. प. कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत जि. प. कडे ३२०६ अर्ज प्राप्त झाले होते. एवढ्या मंडळांना साहित्य देणे शक्य नसल्याने विभागवार लकी ड्रॉ पद्धतीने मंडळांची निवड केली गेली.या लकी ड्रॉ पद्धतीत निवडलेल्या २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे.
सावंतवाडी :मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान असलेल्या झाराप येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातून येणार्या गणेशभक्त व वाहन चालकांकरता मोफत चहा, पाणी व बिस्कीट स्टॉलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज दिली.
गणेशभक्तांसाठी हा स्टॉल गणपतीपर्यंत चालू राहणार आहे. आज या स्टॉलची पाहणी करून, उपस्थितांकडून स्टॉलच्या व्यवस्थेची माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री रविन्द्र चव्हाण हे आज मुंबई गोवा पाहणी दौर्यावर होते. मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. यामुळेच लवकरच ही सिंगल लेन कोकणवासीयांच्या सेवेत खुली होईल. यामुळेच जो प्रवास करायला पूर्वी १२ तास लागत होते, ते अंतर आता जवळपास ८ तासातच गाठता येईल. असं असलं तरीही कोकणवासीयांनी या रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. ओव्हरटेकिंग आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असलेले इतर प्रकार करू नयेत असे त्यांनी कोकणवासीयांना आवाहन केले आहे.
सावंतवाडी | जिल्ह्यातील शाळेत अजूनही शिक्षक न दिल्याने तसेच डी.एड., बी.एड. बेरोजगारांचे प्रश्न न सोडवल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे शिक्षकदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा कुडाळ युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे.
५ सप्टेंबरला सकाळी १०. ३० वाजता युवा सेनेचे कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री योगेश धुरी यांनी केले आहे गेले काही महिने जिल्ह्यात शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे डी.एड, बी.एड झालेल्या शिक्षकांना अद्याप पर्यंत नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यामुळे त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे याच निषेधार्थ शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे असे योगेश धुरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.
सिंधुदुर्ग: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून वातावरण गंभीर झाले आहे. सदर घटनेचा निषेध राज्यातील इतर जिल्यात करण्यात येणार असल्याची शक्यता असून वातावरण अजून गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ०२ सप्टेंबर दुपारी २ वाजल्यापासून ते १६ सप्टेंबर पर्यंत रात्री १२ वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि कलम कलम 37(3) अंतर्गत जिल्ह्यात मनाईचे आदेश लागू केले आहेत.
कलम 37 (1)
- शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
- अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.
- दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.
- व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)
- सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.
- सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
कलम 37(3)
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.
- हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .
वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव आहे. या मनाईचे सावट या सणांवर पडणार आहे.

















