मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आक्रमक रस्ता रोको-
संगमेश्वर | ११ जानेवारी २०२६
“कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!”
“या तिरडीत झोपलाय कोण,आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!”
अशा तीव्र व आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर येथील सोनवी पुल परिसर अक्षरशः दणाणून गेला. गेल्या तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविरोधात नागरिकांचा संयम संपल्याने जनआक्रोश समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
महामार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम, नियोजनाचा अभाव व ठेकेदारांचा हलगर्जीपणा यामुळे सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच मुक्या जनावरांचे प्राण गेले असून, शेकडो नागरिक गंभीर जखमी, कायमचे अपंग झाले आहेत. आर्थिक नुकसान व मानसिक त्रास हे कोकणकरांचे रोजचे वास्तव बनले आहे.
“अजून किती जीव गेल्यावर शासन व प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
आंदोलनामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण संगमेश्वर परिसर काही काळ पोलीस छावणीत रूपांतरित झाला होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी कनिष्ठ अभियंता – जनतेचा संताप
आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी केवळ कनिष्ठ अभियंत्याला पाठवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला.
“आमच्या प्रश्नांची दखल घ्यायची असेल तर जबाबदार वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजेत. अटक झाली, जेलची हवा खावी लागली तरी माघार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला.
सुमारे तासभर महामार्ग पूर्णतः ठप्प राहिला. काही आंदोलनकर्ते सोनवी पुलावरच झोपून प्रतिकार करत होते, तर महिलांनीही महामार्गावर ठाण मांडले. प्रतीकात्मक तिरडी ठेवून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.
अखेर अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी
दीर्घ तणावानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आंदोलनस्थळी दाखल झाल्या.जनआक्रोश समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “पोकळ आश्वासने नकोत. लेखी, ठोस व कालबद्ध हमी दिली तरच आंदोलन स्थगित करू.” अधीक्षक अभियंता अनामिका जाधव यांनी संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाईल, तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.
चार तासांचा नाट्यपूर्ण संघर्ष
सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, विशाखा खेडेकर.
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडवणे हे कायद्याने गुन्हा असला तरी, सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन व ठेकेदारांनी केलेली दिरंगाई हीदेखील गंभीर गुन्हेगारी कसूर आहे, असा ठाम आरोप जनआक्रोश समिती व नागरिकांनी केला आहे.
या आंदोलनात जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, हरिश बेगावले, विशाखा खेडेकर यांच्यासह मुंबईतून आलेले ८० कोकणकर, संगमेश्वरचे युयुत्सु आर्ते, मनसेचे जितेंद्र चव्हाण, अशोक जाधव तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.














