वाचकांचेव्यासपीठ :कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथील गर्दीवर नियंत्रणासाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीकरिता स्वयं सेवक, स्वयंसेवी संस्था यांनी पुढे आले पाहिजे.गणपती विसर्जन ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था सेवा देतात. अनिरुद्ध अकॅडमी, संत निरंकारी मिशन ,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान असे अनेक संस्था आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी व निर्माण झाल्यानंतर सेवा देतात. त्याच धर्तीवर कोकण गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांसाठी मदत होईल. कोकणातील रेल्वे स्टेशन बस स्थानके येतील सेवा सुविधांचा अभाव आहे .काळजी घेणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांची भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम ही पण एक गणपती बाप्पा चरणी सेवा अर्पण होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि पनवेल या स्थानकावर गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. गर्दी आणि नियोजनाअभावी अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे कोकणातील स्थानकांवरील अपुऱ्या सुविधांमुळे येणार्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो अशा वेळी स्वयंसेवी संस्थांनी यात लक्ष घालून मदत केल्यास कित्येक चाकरमानी प्रवाशांचा त्रास नक्किच कमी होईल.
मुंबई : कोकण रेल्वेसंबंधी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशन यांच्या शिष्टमंडळाने केलेल्या विविध मागण्यांसाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी रेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा करायला सुरवात केली आहे.
पश्चिम रेल्वेवरील गेल्या दशकभरपेक्षा जास्त काळ चर्चेत असलेल्या नायगाव जुचंद्र जोड मार्गिका प्रकल्पाला गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याची विनंती करण्यासाठी तसेच इतर काही मागण्यांसाठी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशन यांच्या शिष्टमंडळाने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची शनिवार दि. ९ सप्टेंबर, २०२३ सकाळी १० वाजता कांदिवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली होती.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रेल्वे बोर्डाला या मागण्यांसाठी निवेदने सादर केली आहेत. खालील तीन निवेदने खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून रेल्वे बोर्डाला पाठवण्यात आली आहेत.
१) कोकण रेल्वेचे मध्यरेल्वेत विलीनीकरण करणे
२) दिवा सावंतवाडी एक्सप्रेस गाडीचे थांबे पूर्ववत करणे
३) पश्चिम रेल्वे मार्गावररून कोकणात जाण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या नायगाव जुचंद्र जोड मार्गिका प्रकल्पाला गती देणे.
रायगड :मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे कोकणवासियांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे. आता तर या खड्ड्याबाबत अचंबित करणारी बातमी समोर आली आहे. या मार्गावरील खड्ड्यांमुळे एका महिलेची प्रस्तुती चक्क एसटी बस मध्ये झाल्याची ही बातमी आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून एसटीतून प्रवास करणाऱ्या महिलेची एसटीतच प्रसूती होण्याची घटना घडली आहे मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचा व त्यावरील निर्माण झालेले खड्डे हा विषय सध्या चर्चेत आहे त्यातच या खड्डेमय रस्त्यावरून एसटीबस मधून प्रवास करणाऱ्या महिलेची एसटी बस मध्ये प्रसूती होण्याचा हा प्रकार ९ सप्टेंबर रोजी रविवारी सायंकाळी उशिरा घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यात महाड एसटी आगारातील चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार हे आपली ड्युटी क्रमांक ४७/४८ करीत असताना एका प्रवासी महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. मूळ रोहा आगाराच्या असलेल्या या बसमध्ये त्या महिलेची प्रसूती झाली. आपल्या कर्तव्यावर तत्पर असलेले चालक जाधव आणि वाहक पवार क्षणाचाही विलंब न लावता या महिलेला कोलाड येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले. बाळ आणि आई दोघेही सुखरूप दवाखान्यात पोहोचल्याने
बसमधील अन्य प्रवाशांनीही त्यांचे आभार मानले.कोलाड आंबेवाडी येथील रुग्णालयात उपचार केल्यावर बाळाची प्रकृती मात्र
नाजूक असल्याने या महिलेला अलिबाग येथील उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले..
मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.
नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.
सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.
या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.
पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर गुरुवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी मडगाव ते कुमठा दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० असा तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या मेगाब्लॉकमुळे मडगाव पर्यंत धावणाऱ्या गाड्यांपैकी एका गणपती स्पेशल गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
खालील गाडी या दिवशी उशिराने धावणार आहे.
Train no. 09057 Udhna – Mangaluru Jn. Special दिनांक 13 सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते मडगाव दरम्यान १०५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना याची नोंद घेण्याची विनंती केली असून प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबई : गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली. जसजसा चतुर्थी सण जवळ येत आहे तसतसा उत्साह वाढत चालला आहे. मात्र चाकरमान्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची घोषणा केली आहे.
राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली असली तरी त्यामध्ये अजून चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर (ST Worker Protest) जाणार आहेत. येत्या 11 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर हा संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशाराही महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
राज्य सरकारने नुकताच एक जीआर काढून एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. पण शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांनाही 42 टक्के महागाई भत्ता मिळावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केली आहे. तसेच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये वाढ करावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने 11 सप्टेंबरपासून संप करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन (ST Worker Protest) करण्यात येणार असल्याचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीनं काढण्यात आलं आहे.
मुंबई :पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल/वांद्रे टर्मिनस येथून सावंतवाडी/मडगावसाठी थेट गाडी सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या व गेला दशकभरपेक्षा जास्त काळ चर्चेत असलेल्या नायगाव जुचंद्र जोड मार्गिका प्रकल्पाला गती देऊन काम लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पावले टाकण्याची विनंती करण्यासाठी कोंकण विकास समिती आणि जल फाउंडेशन यांच्या शिष्टमंडळाने उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांची आज शनिवार दि. ९ सप्टेंबर, २०२३ सकाळी १० वाजता कांदिवली येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.
यावेळी सर्वप्रथम शिष्टमंडळाच्या सदस्यांनी खेड स्थानकात मंगला एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस थांबवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानले.
नायगाव जुचंद्र जोड मार्गिकेला रेल्वे बोर्डाने मान्यता दिली असली तरी कालबद्ध कार्यक्रम देऊन सदर काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन पूर्ण करून त्यानंतर साधारण एका वर्षाच्या कालावधीत हे काम करण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनातील संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्याची विनंती शिष्टमंडळाच्या सदस्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांना केली . तसेच, काम पूर्ण होण्याची वाट न पाहता तत्पूर्वीच लवकरात लवकर मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनसयेथून सावंतवाडीला जाणारी नियमित गाडी सुरु करणे आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्याचबरोबर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण, दादर चिपळूण रेल्वे, रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दादरवरून चालवणे, दिवा रत्नागिरी मेमू केवळ गणपती सणापुरती न चालवता कायमस्वरुपी करणे, अनेक थांबे कमी करून दिवा सावंतवाडी पॅसेंजरची एक्सप्रेस केल्यानंतरही प्रवास वेळेत काहीही फरक पडलेला नसल्यामुळे दिवा सावंतवाडी एक्सप्रेसला रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व थांबे देणे, तेजस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस, गांधीधाम नागकोईल एक्सप्रेस व मारुसागर एक्सप्रेस गाड्यांना वैभववाडी स्थानकात थांबा देण्यासंबंधीची निवेदने खासदारांना यावेळी देण्यात आली .
खासदार गोपाळ शेट्टी यांनी या विषयात लक्ष घालून कामे पूर्ण करून घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी कोंकण विकास समितीचे संस्थापक – अध्यक्ष श्री. जयवंत शंकरराव दरेकर, जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन सखाराम जाधव, रेल्वे अभ्यासक श्री. अक्षय मधुकर महापदी, ॲड. श्री. प्रथमेश रावराणे, श्री. रविंद्र वसंतराव मोरे, श्री. विनोद भगवंत भोसले, ॲड. श्री. चंद्रकांत सकपाळ, श्री. वसंत रामचंद्र मोरे, श्री. सचिन काते, श्री. रविंद्र मोरे, श्री. निवृत्ती निकम इ. उपस्थित होते.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना साहित्य पुरविणे या जि. प. च्या योजनेची काल दिनांक ७ सप्टेंबर रोजी जि. प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात याची सोडत काढण्यात आली. या सोडतीत तालुक्यातील गावांचे गट पाडून प्रत्येक गटातून चार मंडळाची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भजनी मंडळांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी भजनी मंडळांना साहित्य पुरविणे ही योजना सुरू केली आहे. एक पखवाज, एक चकी आणि पाच टाळ असे साहित्य प्रत्येक निवड झालेल्या भजनी मंडळाला दिले जाणार आहे. यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली दरम्यान, या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त भजनी मंडळांनी घ्यावा, यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जि. प. कडून करण्यात आले होते. त्या आवाहनाला अनुसरून आतापर्यंत जि. प. कडे ३२०६ अर्ज प्राप्त झाले होते. एवढ्या मंडळांना साहित्य देणे शक्य नसल्याने विभागवार लकी ड्रॉ पद्धतीने मंडळांची निवड केली गेली.या लकी ड्रॉ पद्धतीत निवडलेल्या २५० मंडळांना याचा लाभ दिला जाणार आहे.