पुणे: अयोध्येत नुकतेच प्रभू रामलल्लांच्या मूर्तीचा राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण देश राममय झाले असताना विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणार्या पुण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. कलेच्या गोंडस नावाखाली एका नाटकात रामायणाची पात्रे अगदी घाणेरड्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
पुणे विद्यापीठातील ललित कला मंचाने आयोजित केलेल्या या नाटकात रामायणाची पात्रे खूप चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. या नाटकात सीता माताची भूमिका करणारा कलाकार या नाटकात शिव्या देताना आणि सिगारेट पिताना दाखवला आहे.
नाटक चालू असताना आपल्या देवी देवतांचा अपमान सहन न झाल्याने अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली आहे.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या सोमवारी आणि मंगळवारी दिनांक ०५ आणि ०६ फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेच्या वेर्णा ते माजोर्डा या विभागां दरम्यान रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण दोन तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. या मेगाब्लॉक मुळे सोमवार दिनांक ५ फेब्रुवारीला मुंबई सिएसएमटी वरून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 22229 Mumbai CSMT – Madgaon Jn. Vande Bharat या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून ही गाडी रत्नगिरी ते करमाळी या स्थानकांदरम्यान सुमारे १ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
आंबोली: परप्रांतीय मोठ्याप्रमाणात कोकणात जमिनी विकत घेत आहेत. एक चांगली गुतंवणूक म्हणून जमिनी खरेदी करण्यात येत आहेत. तर काही बांधकाम व्यावसायिक जमिनी विकत घेऊन तेथे इमारतीची बांधकामे करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असून कोकणच्या निसर्गाला हानी पोहचत आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ आंबोली येथेही असेच प्रकार चालू असल्याने येथील ग्रामस्थ जागरूक झाले आहेत. काल दिनांक ३१ जानेवारीला आ बोली ग्रामपंचायत कार्यालय येथे आंबोलीतील गावठण फौजदारवाडी ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी बाहेरच्या तसेच परप्रांतीय लोकांना जमिनी विकण्यास मज्जाव करण्याबाबत ठराव घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षरींचे निवेदन दिले. जमीन ही गावची असल्याने विकण्याचा कोणाला अधिकार नाही, असा ठराव घेण्यात आला. आंबोलीतील बाकी वाडीतील ग्रामस्थांनाही गावातील जमीन विक्रीला पायबंद घालण्याची मागणी केली आहे.
गावातील १५ एकर जागा परस्पर विकल्याचा आरोप
आंबोली असलेला कबुलायतदार गावकर जमिन प्रश्न शासन दरबारी सुटण्याच्या मार्गावर असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर हिरण्यकेशी रस्त्यालगत १५ एकर जागा गावाबाहेरील व्यक्तींना काही स्थानिकांनी परस्पर विकल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. संबंधित जागेत जेसेबीने सपाटीकरण सुरू आहे. याविरोधात गावठण ग्रामस्थांनी एल्गार केला असून ते अतिक्रमविरोधात एकवटले. प्रशासनाला स्वाक्षरींचे निवेदन देऊन जिल्ह्याधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करावे; अन्यथा आंबोली ग्रामस्थांतर्फे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गावातील १९९९ नंतर विकलेल्या सर्व जागेचा सर्व्हे व्हावा तसेच तलाठी कार्यालयात भ्रष्टाचार करून घातलेल्या नोंदी काढून टाकाव्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ यावर आदेश काढून पंचनामे करावेत आणि गाव वाचवावे, अशी मागणी गावठणवाडी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, सरपंच सावित्री पालेकर, सदस्य काशीराम राऊत, ग्रामसेवक संदीप गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, प्रकाश गुरव, बबन गावडे, बाळकृष्ण गावडे, अंकुश राऊत, कांता गुरव, प्रथमेश गावडे, मोतीराम सावंत, रंजना गावडे, काशीबाई गावडे, सुनील राऊत, दीपक मेस्त्री, शंकर गावडे, अमित गुरव, राकेश अमृस्कर, झिला गावडे आदी उपस्थित होते.
मुंबई: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती.
ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा #महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले.
रत्नागिरी : कोकण रेल्वेमधून प्रवास करताना चिपळूण – रत्नागिरी ही स्थानके आली कि खास करून वडापाव विकणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गाडीत चढून वडापाव विक्री करतात. प्रवासी पण रास्त किंम्मत आणि गरम असल्याने हे वडापाव खरेदी करतात. मात्र हे फेरीवाले प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
समाज माध्यमांवर एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. एक वडापाव विक्रेता विक्रीस आणलेल्या वडापाव च्या ट्रे वर पाय ठेवून झोपला असल्याचा हा किळस आणणारा हा फोटो आहे. हा फोटो चिपळूण स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकारामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. रेल्वे कॅन्टीन च्या विक्रेत्यांकडून असे किळसदायक प्रकार घडल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्यामुळे प्रवासी वर्ग या बाहेरील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेत असे. मात्र इथेही असे अनुभव येत असल्याने प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ घ्यावे कि न घ्यावे हा प्रश्न साहजिकच त्यांना पडला आहे. हे विक्रेते बहुतेक करून परप्रांतीय आहेत. विकताना ते असे किळसवाणे प्रकार करत असतील तर हे खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छतेचे किती मापदंड पाळत असतील हा प्रश्न समोर आला आहे.
जाने. ३० : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी (दि. २९ जानेवारी) ही माहिती दिली. मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
Suvarnadurg-Fort.jpg
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.
Sindhudurg Fort
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात किल्ल्यांचा आधार घेत शत्रूला नामोहरण केले, त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांनी लष्करी कारवाया करण्यासाठी किल्ल्यांचा आधार घेतला.
Panhala Fort
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सहा ठिकाणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
वाशी, २९ जानेवारी : कोकणातील हापूस वाशी बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूसची विक्रमी आवक झाली आहे. यावर्षी जानेवारीत बाजार समितीमध्ये विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. प्रतवारीनुसार या आंब्याला प्रतिपेटी सात हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.
अद्याप आंबा हंगामाला पूर्णपणे सुरूवात झालेली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला दरही चांगला मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आंब्याचा मोहराची गळ झाली होता. तसेच बुरशीजन्य रोग आणि रसशोषक कीडींचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे मोहर गळ झाल्याने पुनर्मोहराची प्रकिया लांबली. परिणामी फळ तयार होण्याच्या प्रक्रियेलाही उशीर झाला. परंतु काही भागात अवकाळीचा फटका बसूनही योग्य व्यवस्थापनामुळे फळ वेळेत तयार झाले आहे.
मागील वर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे चांगल्या प्रमाणत उत्पादन राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांना होता. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचा मोहर काळा पडला. याशिवाय रसशोषक कीडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
RRB Bharti 2024: भारतीय रेल्वे मंडळने असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदांसाठी ५६९६ जागांसाठी भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यासंबंधी जाहिरात सुध्दा प्रसिदध करण्यात आली आहे. योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे.
अर्ज करण्याचे माध्यम -ऑनलाइन
एकूण पदसंख्या – ५६९६ पदे
संस्था – भारतीय रेल्वे मंडळ
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२४
जाहिरात दिनांक – जानेवारी २०२४
भरती प्रकार – सरकारी
निवड मध्यम (Selection Process) –
अधिकृत वेबसाईट www.indianrailways.gov.इन
पद- असिस्टंट लोको पायलट (ALP)
पदसंख्या – ५६९६
शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria: – असिस्टंट लोको पायलट (ALP): १० वी उत्तीर्ण आणि ITI.
नवी मुंबई :तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला. अशी विनंती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेला केले. आज नवी मुंबईत भरलेल्या विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते.
काय म्हणालेत राज ठाकरे?
मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो.
ह्या जूनमध्ये मला अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांच्या संमेलनाला आमंत्रित केलं आहे. ह्या संमेलनाचे अध्यक्ष मला भेटले. ते मला म्हणाले की अमेरिकेत आम्ही शंभरहून अधिक मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होणं हे काय कमी आहे का?
पण सध्या आपण महाराष्ट्राकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या मराठी लोकांनी मराठीची, महाराष्ट्राची श्रीमंती जरूर इतर लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. पण आपल्याच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये जेंव्हा मराठीची उपेक्षा होते, जेंव्हा तिकडे सर्रास हिंदी कानावर पडते तेंव्हा मात्र त्रास होतो. माझा भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही देशातल्या इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. ह्या देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधीच झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकार ह्यांच्यातील व्यवहारासाठी हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा वापरल्या जातात इतकंच. बाकी हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. पण जेंव्हा मी हे १५,२० वर्षांपूर्वी बोललो तेंव्हा माझ्या अंगावर सगळे धावून गेले. जेंव्हा ते अंगावर आले तेंव्हा त्यांना मी गुजरात हायकोर्टाचा निर्णय दाखवला.
मराठी लोकंच एकमेकांशी बोलताना हिंदी का वापरतात हे मला कळत नाहीये. आणि आपलीच मराठी भाषा जेंव्हा राजकीय दृष्ट्या दुय्यम लेखण्याचा प्रयत्न जेंव्हा होतो तेंव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते.
माझी श्री. दीपक केसरकारांना विनंती आहे की ह्या राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मग त्या कुठल्याही असोत तिकडे पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. सध्या सीबीएएससी, आयसीएस्सी शाळांमध्ये ज्या राज्यात राहताय तिथली भाषा शिकवायची आणि शिकायची सोडून परदेशी भाषा का शिकवताय? परदेशी भाषा हव्या तितक्या शिका पण त्याच वेळेस मराठी पण शिकलीच पाहिजे, बोलता आलीच पाहिजे.
ह्या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल प्रेम वाटतं. गिफ्ट सिटी असो की हिऱ्यांचा व्यापार जर गुजरातमध्ये न्यावीशी वाटते किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षा मोठा पुतळा गुजरातमध्ये उभारावासा वाटतो, थोडक्यात काय जर त्यांना त्यांच्या राज्याबद्दलचं आणि भाषेबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर आपण का लवपतोय, का मागे राहतोय ?
जेंव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला जैन माणूस घर नाकारतो तेंव्हा काय करायचं? हे गुजरात, तामिळनाडू, आसाम, केरळ ह्या राज्यात करून दाखवा. पैसे असून सुद्धा मराठी माणसाला घर नाकारायची हिंमत होते कारण आमच्या सरकारांचं बोटचेपं धोरण.
मराठी माणसाकडे पैसे असताना त्याला घर नाकारलं जात असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि मराठी माणसाकडे कुठे आहे पैसा असं म्हणणारे गल्लीच्या बाहेर पण गेलेले नाहीत. त्यांना काय माहिती की महाराष्ट्रभर मराठी लोकांनी किती अफाट कर्तृत्व दाखवून पैसा उभा केलाय.
भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका. तुमची ओळखच तुम्ही कोणते भाषिक आहात ह्यातून होते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर बघितली तर आपण जगात दहाव्या क्रमांकावर आहोत. थोडक्यात जगातील मोठी लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. पण आम्ही आमच्याच राज्यात दुसऱ्या भाषेमध्ये गोट्यांसारखे घरंगळत का जातो. माझी आज तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला.
Konkan Railway News: कोकणात गावी जाण्यासाठी कोकणवासीयांची आणि गोवेकरांची पहिली पसंद असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. या गाड्यांचे २ स्लीपर डबे कमी करून त्या जागी इकॉनॉमी २ थ्री टायर एसी डबे जोडले जाणार आहेत. हा बदल कायमस्वरूपासाठी करण्यात येणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १०१०४/१०१०३ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “मांडवी” एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. २०११२ /२०१११ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांत हा बदल दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ गुरुवारपासून पासून अमलांत आणला जाणार आहे.
श्रेणी
सध्याची संरचना
सुधारित संरचना
बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त )
01
01
बदल नाही
टू टियर एसी
01
01
बदल नाही
थ्री टायर एसी
04
04
बदल नाही
इकॉनॉमी थ्री टायर एसी
00
02
02 डबे वाढवले
स्लीपर
09
07
02 डबे कमी केले
जनरल
04
04
बदल नाही
एसएलआर
01
01
बदल नाही
पेन्ट्री कार
01
01
बदल नाही
जनरेटर कार
01
01
बदल नाही
एकूण
22 LHB
22 LHB
कोकणातील प्रवाशांकडून नाराजीचे सूर
या गाड्यांचे सेकंड स्लीपर डबे कमी केल्याने कोकणातील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या आधी या गाडीला ११ स्लीपर डबे होते त्यानंतर ते ९ वर आणलेत. आता तर त्यातही कपात करून ७ वर आणले आहेत. याचा खूप मोठा तोटा कोकणातील सामान्य प्रवाशांना सोसावा लागणार आहे. कारण त्यावरील श्रेणीचे तिकीट त्यांना परवडणारे नाही. आधीच तिकीट मिळणे खूप कठीण त्यात हे डबे कमी केल्याने अधिकच कठीण झाले आहे.
गोवा आणि दक्षिणेकडील प्रवाशांचे हित नजरेसमोर ठेवून असे बदल होत असतील तर कोकण रेल्वे नक्की कोणासाठी हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.