Author Archives: Kokanai Digital

ओएनजीसी कंपनीकडून रत्नागिरी येथे समुद्रात तेलांच्या साठ्यांचा शोध सुरु…

रत्नागिरी – रत्नागिरीच्या समुद्रामध्ये तेलाच्या साठ्यांचा (Oil Reserves) शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असून यासंदर्भातील कामही सुरु झालं आहे. स्थानिक मच्छीमारांसाठी जारी करण्यात आलेल्या एका पत्राद्वारे सावधानतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्‍यापासून 40 नॉटिकल मैलांवर ओएनजीसी कंपनीमार्फत तेलाचे साठे शोधण्यासाठी भूकंपीय सर्वेक्षण (सिझमिक सर्व्हे) करण्यात येत आहे. याच सर्वेक्षणासाठी एक मोठे जहाज फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जयगड ते रायगड दरम्यानच्या समुद्रामध्ये फिरणार आहे. हा सर्व्हे सुरू असताना दुर्घटना टाळण्यासाठी मच्छीमारांना विशेष सल्ला देण्यात आला आहे. मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षा बाळगावी किंवा जहाजाच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन मत्स्य विभागाकडून केले आहे. याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सोसायट्यांना पाठवण्यात आले आहे.

हा सर्व्हे समुद्रात ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणाचा नकाशा तसेच अक्षांश व रेखांशची माहितीही मच्छीमारांना कळवण्यात आली आहे. ओएनजीसी कंपनीमार्फत समुद्रात फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत तेल संशोधन करण्यात येत आहे. त्यासाठी भूकंप संशोधन जहाज जयगड ते रायगडपासून 40 नॉटिकल मैलांवर दाखल झाले आहे. हे सर्वेक्षण क्षेत्र किनाऱ्‍यापासून लांब असून, दाभोळपासून खोल समुद्रात 75 किमी अंतरावर आहे.

जहाजावरील विविध यंत्रणांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे जहाज 4 ते 4.5 नॉट्स वेगाने 24 तास सतत समुद्रात सक्रीय राहणार आहे. या जहाजाच्या मागे 6 हजार मीटर लांबीच्या (6 किलोमीटर) 10 केबल्स लावण्यात आल्या आहेत. स्ट्रीमर्सची खोली 6 मीटर आणि शेपटीच्या दिशेने 30 मीटरपर्यंत असेल. हा भाग पाण्याखाली असेल असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक 6 हजार मीटर लांबीच्या केबलच्या शेवटी फ्लॅशिंग लाइटसह एक टेल-बॉय असेल. ही बोट न थांबता चालवण्यात येणार असून, ती लगेच वळवता येत नाही. अपघात टाळण्यासाठी मच्छीमारांनी नौका व जाळी भूकंपीय जहाज आणि बाहेरील उपकरणाच्या मार्गापासून दूर राहावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

या मोठ्या जहाजाबरोबर दुसरे एक छोटे जहाज (सॅन्को स्काय) आणि 3 सुरक्षा व्हेसल्स (मॅट युरेनस, एनाक्षी, सोहा) या परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण करत असताना समुद्रात मासेमारी नौकांच्या हालचालींचं प्रत्येकी दोन समन्वयक आणि दुभाष्यांद्वारे 24 तास निरीक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कंपनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मासेमारीसाठी जात असताना मच्छीमारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा सर्व्हे जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्याचा कंपनीचा तसेच स्थानिक प्रशासनाचा प्रयत्न आहे.

ओएनजीसी कंपनीकडून समुद्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी जहाज दाखल होत आहे. सर्वेक्षण करत असताना मच्छीमारांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात मच्छीमार सोसायटींना पत्र पाठवण्यात आले आहे, असं सहायक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी म्हटलं आहे.

Loading

‘वंदे भारत’ मुळे एका दिवसात शिर्डी यात्रा शक्य

मुंबई : या आठवडय़ात सुरू होणार्‍या मुंबई ते शिर्डी 22223/Mumbai CSMT – Sainagar Shirdi Vande Bharat Express या वंदे भारत गाडीमुळे भाविकांना शिर्डीला जाण्याचा जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. 

एका दिवसात शिर्डी यात्रा शक्य

मुंबईहून साईनगर शिर्डी या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत एक्सप्रेस आनंदाची पर्वणी राहणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस मुंबई ते शिर्डी दरम्यान सकाळी धावणार आहे. मुंबई येथून ही ट्रेन सकाळी सहा वाजून 15 मिनिटांनी (6:15 AM) शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे. आणि दुपारी 12:10 वाजता ही ट्रेन शिर्डी या ठिकाणी पोहोचेल.तसेच शिर्डीहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही ट्रेन सायंकाळच्या वेळेला धावणार आहे. सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी (5:25 PM) ही ट्रेन शिर्डी येथून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. रात्री अकरा वाजून 18 मिनिटांनी (11:18 PM)ही ट्रेन मुंबई या ठिकाणी पोहोचेल. हाती आलेल्या माहितीनुसार मंगळवार वगळता आठवड्याचे सर्व दिवस ही ट्रेन धावणार आहे.

 

मुंबई शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस चे तिकिटाचे दर

मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी चेअर कारसाठी 800 आणि एक्सिक्युटिव्ह क्लाससाठी 1660 रुपये असे दर तर नाशिक ते मुंबईसाठी अनुक्रमे 550 आणि 1250 रुपये तिकीट दर आहेत. 

थांबे 

ही गाडी फक्त काही मोजक्या स्थानकावर थांबणार आहे. दादर, ठाणे, नाशिक हे या गाडीचे थांबे आहेत. 

खाद्यपदार्थांचे पर्याय 

सकाळच्या न्याहारीसाठी साबुदाणा-शेंगदाणा खिचडी, ज्वारीची भाकरी-बेसन पोळा, ज्वारीचा उपमा, शेंगदाणा चिवडा आणि भडंग असे पर्याय आहेत

जेवणासाठी अस्सल झुणका, शेंगदाणा पुलाव, धान्याची उसळ असे पर्याय आहेत. यांसह ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकरी प्रवाशांना मिळेल. 

सायंकाळच्या न्याहारीमध्ये शेगावची प्रसिद्ध कचोरी, कोथिंबिर वडी, भरड धान्यांचे थालिपीठ, मिश्र धान्यांचे भडंग, साबुदाणा वडा असे पर्याय आहेत. यासाठीचे पैसे प्रवाशांना भरावे लागणार आहेत, असे आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आले.

 

 

Loading

आंबोली येथील खूनप्रकरणी आणखीन ५ संशयितांना अटक

सिंधुदुर्ग : आंबोली येथील सुशांत खिल्लारे खूनप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखीन ५ संशयितांना अटक केली असून विशेष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी दि.१३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

 नव्याने अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीत आबासो उर्फ अभय बाबासो पाटील (वय-३८ रा. वाळवा, सांगली),प्रवीण विजय बळीवंत (वय-२४, रा. वाळवा, सांगली),स्वानंद भारत पाटील (वय-३१, रा.इस्लामपूर, सांगली),राहुल बाळासाहेब पाटील(वय- ३१, रा.वाळवा,सांगली), राहुल कमलाकर माने( वय-२३,रा.कराड,सातारा) यांचा समावेश आहे.

वीटभट्टी व्यवसायासाठी कामगार पुरविणार असल्याचे सांगून सुशांत खिल्लारे याने भाऊसो माने याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते.मात्र,त्याने कामगार पुरवले नव्हते.तसेच घेतलेले पैसे देण्यास ही तो टाळाटाळ करीत होता.याचा राग येऊन सुशांत याला पंढरपूर येथून पुढे कराड येथे आणून भाउसो माने व तुषार पवार यांनी मारहाण केली होती.यात सुशांत याचा मृत्यू झाला होता.त्यानंतर मृतदेह आंबोली येथे दरीत टाकताना भाऊसो याचा तोल गेल्याने सुशांत यांच्या मृतदेहाबरोबर तोही दरीत कोसळला होता.त्यात त्याचाही मृत्यू झाला होता.

संबंधित बातमी आंबोलीत घातपाताची विचित्र घटना… मृतदेहाची विल्हेवाट लावताना एकाचा मृत्यू

Loading

अर्थसंकल्पात यंदाही तरतूद नाही! कोंकणरेल्वेचे विलीनीकरण काळाची गरज?

 

Konkan Railway News: नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये भारतीय रेल्वेला २.४ लाख कोटी रुपयांची भरीव तरतूद केली गेली आहे. पण नेहमीप्रमाणे कोकणरेल्वेसाठी या अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद केली गेली नाही आहे; त्यामुळे कोकणरेल्वेची  भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
कोकणरेल्वे महामंडळ ही भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत येणारी स्वायत्त आस्थापना आहे. कोकणात रेल्वेमार्ग बांधण्यासाठी  कोकणरेल्वे महामंडळाची स्थापना जुलै १९९०मध्ये झाली. त्यानंतर आतापर्यंत बाजारपेठेतील वाटय़ावर कोकण रेल्वे महामंडळाला अवलंबून राहावे लागत आहे. याआधी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेला मदत करावी, यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले होते. मात्र सुरेश प्रभू हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना झालेली ६०० कोटीची तरतूद वगळता मागील ३३ वर्षात अर्थसंकल्पात कोंकण रेल्वेच्या वाट्याला काहीच आले नाही.

कोकणरेल्वे कॉर्पोरेशन KRCL ही रेल्वे एक रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तसेच ती एक वाणिज्य आस्थापना Corporate Entity आहे त्यामुळे नफ्यावर तिचा जास्त भर आहे. तसेच ही कंपनी मालवाहतुकीवर जास्त भर देताना दिसते; त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर दुर्लक्ष होताना दिसत आहे. असे मत उत्तर कन्नड रेल्वे सेवा समिती चे सचिव राजीव गावकर यांनी मांडले आहे. त्यांचे हे वक्तव्य वास्तवाला धरून आहे. कारण कोकण रेल्वमार्गासारखा आवाहनात्मक मार्ग ,रो- रो सारखी नवी संकल्पना, जम्मूचा नवा रेल्वेमार्ग हे या कंपनीने यशस्वी केले मात्र प्रवासी वाहतुकीच्या अनेक समस्या अजूनपर्यंत या मार्गावर कमी झाल्या नाही आहेत.

कोकणरेल्वे मार्ग आणि मध्यरेल्वे मार्ग जोडणारा विजयदुर्ग- वैभववाडी-कोल्हापूर हा प्रस्तावित मार्ग निधीअभावी रखडला आहे. वाढता प्रतिसाद पाहता कोकण मार्गाचे दुपदरीकरण आवश्यक आहे. या मार्गावर प्रवासी गाड्यांची संख्या आवशक्यतेपेक्षा खूपच कमी आहे. अनेक स्थानकावरील प्रश्न सुटले नाही आहेत. कोकणरेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण झाल्यास गोवा व कर्नाटक रेल्वेच्या साऊथ झोनमध्ये, तर सिंधुदुर्ग,रत्नागिरी-रायगड सेंट्रल झोनमध्ये जाईल. अशा वेळी कोकण रेल्वेचा चेहरामोहरा बदलून जाईल, कारण त्यामुळे अर्थसंकल्पात या मार्गाला वाटा भेटेल आणि आणि प्रवासी वाहतुकीच्या बऱ्याच समस्या दूर होतील असे तज्ञांचे मत आहे.

 

Loading

कुणकेश्वर जत्रेसाठी एसटीच्या १७ फेब्रुवारीला विशेष फेऱ्या

मुंबई :दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर दिनांक १८ फेब्रुवारीला होणाऱ्या प्रसिद्ध जत्रेसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिनांक १७ फेब्रुवारी रोजी बोरिवली येथून संध्याकाळी ६ वाजता एक विशेष बस सुटणार आहे. ही गाईड सायन – पनवेल मार्गे चालवण्यात येणार आहे. तसेच कल्याण-विठ्ठलवाडी येथून त्याच दिवशी ६.३० ला एक गाडी या जत्रेसाठी सोडण्यात येणार आहे.

दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षॉंनी कुणकेश्वरच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात.

Loading

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी फेब्रुवारी -२०२४ उजाडणार

मुंबई :मागील सुनावणी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण होणार असे राज्य सरकारद्वारे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. पण आताच झालेल्या सुनावणीत ही तारीख पुढे ढकलली आहे. ह्या महामार्गावरील अखेरचा टप्पा १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे.

मुंबई-गोवा महार्गावरील अरवली – कंटे – वाकड ह्या पट्ट्यातील साडेनऊ किलोमीटर महामार्गाचे बांधकाम बाकी असून ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला व न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली आहे.

महामार्गाच्या कामाची सध्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.

अ. क्र.टप्पा अंतर पूर्ण झालेले काम
1पनवेल (पळस्पे) ते इंदापूर शुन्य ते ८४ कि.मी.८६.००%
2इंदापूर ते वडपाळे ८४ ते १०८ किमी६६.००%
3वडपाळे ते भोगाव खुर्द १०८ ते १४७ किमी९३.००%
4भोगाव खुर्द ते कशेडी १४७ ते १६१ किमी ८३.८६%
5कशेडी ते परशुराम घाट १६१ ते २०४ किमी९७.५०%
6परशुराम घाट ते आरवली २०४ ते २४१ किमी७४.०२%
7आरवली ते कांटे २४१ ते २८१ किमी२७.०८%
8कांटे ते वाकड २८१ ते ३३२ किमी२९.२५%
9वाकड ते तळगाव ३३२ ते ३६७ किमी१००.००%
10तळगाव ते कळमठ (३६७ ते ४०६ किमी१००.००%
11कळमठ ते झाराप ४०६ ते ४५० किमी१००.००%
एकुण ११ टप्पे ८८.५०%

Loading

मुंबई-गोवा महामार्गावरील ‘या’ भागात अपघाताचा धोका… वाहने सावकाश चालवा.

चिपळूण:मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम चालू असल्याने या भागात रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथून जात असताना आपले वाहन सावकाश चालवण्यात यावे.

आज सकाळी या भागात काम चालू असताना रस्त्यावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतुक काही वेळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने अनर्थ घडला नाही. कंत्राटदार कंपनीने जेसीबी च्या सहाय्याने ही दरड बाजूला करून वाहतुक पूर्वस्थितीत आणून दिली होती. मात्र असे प्रकार वारंवार घडत असल्याने या मार्गावरून जाणार्‍या प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

(संबधित बातमी >मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात टळला.. कंत्राटदार कंपनीचा निष्काळजीपणा समोर

मागे दोन वेळा रस्त्यावर भले मोठे दगड पेढे वस्तीत आणि रस्त्यावर आले होते. सुदैवाने अजूनपर्यंत काही जिवितहानी झाली नाही आहे. पण या सर्व प्रकारांतून कंत्राटदार कंपनी कामांदरम्यान योग्य त्या सुरक्षिततेचे मापदंड पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

 

Loading

अर्थसंकल्पामध्ये रेल्वेकरिता भरीव तरतूद…२०१३-१४ च्या तुलनेत नऊपट अधिक वाटप….

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे करिता भरीव तरतूद केल्याची दिसत आहे. २०१३-१४ च्या तुलनेत रेल्वेला नऊ पट अधिक वाटप देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने रेल्वेसाठी २.४० लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. रेल्वेच्या नव्या योजनांसाठी ७५ हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असून देशात १०० नव्या महत्त्वाच्या योजना सुरू केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली.

रेल्वेसाठी आतापर्यंतची ही सर्वात मोठी तरतूद आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पात रेल्वेसाठी करण्यात आलेल्या २ कोटी ४० लाख रुपयांच्या तरतुदीमुळे रेल्वेचे पायाभूत प्रकल्प मार्गी लागतील, असं मत रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री आदित्य वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. वंदे भारत रेल्वेत अमुलाग्र बदल होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Loading

वेंगुर्ला येथे साकारलेला कोकणातील पहिला झुलता पूल ठरतो आहे पर्यटकांसाठी आकर्षण….

सिंधुदुर्ग :कोकणातील पहिला झुलता पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे समुद्रकिनारा आणि मांडवी खाडी यांच्या संगमावर बांधण्यात आलेला आहे. या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. मात्र आतापासूनच  हे झुलते पूल (Sea Link ) पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. पर्यटक येथे सेल्फि, फोटोग्राफी आणि प्रि-वेडींग फोटोशूट साठी मोठ्या प्रमाणात भेट देत आहेत.

या पुलामुळे समुद्र किनार्‍यावर जाणे सोपे होणार आहे. याआधी ईथे जाण्यासाठी 3 ते 4 किलोमीटर वळसा घालावा लागत होता. पुलामुळे आता अवघ्या 5 मिनिटांत समुद्रकिनारी जाणे आता शक्य होणार आहे.

तत्कालीन पालकमंत्री व आताचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सुमारे पाच ते सहा वर्षांपूर्वी या झुलत्या पुलासाठी निधी मंजूर केला. पर्यटन विषयक काही मुख्य प्रकल्पांपैकी केसरकर यांच्या ‘समृद्ध कोकण’ या व्हीजनमधील वेंगुर्ल्यातील हा झुलता पूल होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे याचे काम बरीच वर्षे रखडले होते. त्यावरून अनेकांनी तत्कालीन पालकमंत्री केसरकर यांच्यावर वारंवार टीकाही केली होती. दरम्यान, आता राज्याचे मंत्री शालेय मंत्री झाल्यानंतर केसरकर यांनी पुलाच्या कामाला अधिक गती आणून हा पूल पूर्णत्वास नेला आहे. अरबी समुद्र व मांडवी खाडीच्या संगमावर हा झुलते पूल असून याकडे पर्यटक आकर्षित होत आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम जोरदार सुरू असल्याने शांत व सुरक्षित पर्यटनासाठी अनेक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. वेंगुर्ल्यात आल्यानंतर झुलत्या पुलावर जाऊन फोटो आणि व्हिडीओ काढण्याचा मोह पर्यटकांना होत आहे. सध्या वेंगुर्ल्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने गतिमान विकास होत असून यात हा पूल मैलाचा दगड ठरेल, यात शंका नाही.

 

(Also Read>आंगणेवाडी जत्रा; भाविकांच्या मोबाईल्सना मिळणार फुल्ल नेटवर्क…)

Loading

आंगणेवाडी जत्रा; भाविकांच्या मोबाईल्सना मिळणार फुल्ल नेटवर्क…

   Follow us on        

सिंधुदुर्ग:  लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवी मंदिरपरिसरात मोबाईल नेटवर्क ची समस्या येत होती. ह्या परिसरात कोणत्याच मोबाइल कंपनीचे नेटवर्क पकडत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. ह्या समस्येवर आता उपाय योजना करण्यात आली आहे.

(Also Read > सिंधुदुर्ग जिल्हा हवाईमार्गाने हैद्राबाद व म्हैसूर शहरांशी जोडला जाणार.. जाणून घ्या वेळापत्रक आणि प्रवासभाडे )

या परिसरातील मोबाईल कनेक्टीव्हीटीची सुविधा परिपूर्ण व अद्ययावत करण्यात आली आहे. या परिसरात जीओ मोबाईल टॉवर बसविण्यात आले असून १ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांना मोबाईल कनेक्टीव्हीटीच्या सुविधेचा लाभ मिळणार आहे. मालवण तालुक्या तील मसुरे गावातील आंगणेवाडी येथे दरवर्षी लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाकरिता येतात. यामध्ये स्थानिक गावक-यांसह मुंबईतून खास भराडी देवी करिता येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचाही समावेश असतो. पंरतू, आंगणेवाडी परिसरात गेलीअनेक वर्षे मोबाईल नेटवर्क सिग्नल मिळत नसल्यामुळे येथे येणाऱ्या लाखो भाविकांचा या परिसरात मोबाईल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे, त्यांचा हिरेमोड होत असे. त्यामुळे, भाविकांची ही मुख्य अडचण समजून घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात जिओ मोबाईल कंपनीचे टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच, या परिसरातील नेटवर्क अधिक चांगले व्हावे या दृष्टीने सुमारे २५ जिओ मोबाईल जत्रेच्या दरम्यान उपलब्ध राहणार आहेत.

या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search