स्वामी समर्थ मठ, वांयगणी येथे श्री देव सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळींच्या झाडापासून बनवण्यात आलेला हा अप्रतिम मकर.
कोकणातील कल्पकतेचा आणि कलाकारीला हा एक उत्तम नमुना. खूप बरे वाटले की आजून ह्या पारंपरिक कला नव-नवीन कल्पकता वापरून पुढे चालू ठेवल्या जात आहेत.
हा फोटो पाहिल्यावर काही जुन्या आठवणी ताज्या झाल्यात ज्या मला तुम्हास सांगायला आवडेल.
पूर्वी कोकणात कलाकाराचा एक प्रकार आपल्याला प्रत्येक वाडीत दिसायचा. गणेश चतुर्थी जवळ आली की ह्या कलाकारास खूप मागणी असायची. गणेश मूर्तीच्या मागच्या भिंतीवरचे कमळ मोडणे (चित्र काढणे), मकर तयार करणे तसेच सत्यनारायण पूजेसाठी केळीच्या झाडापासून मकर बनवणे ही कामे तो खूप आवडीने करायचा. गणेश चतुर्थीची आदल्या दिवशीची रात्र तर पूर्ण जागवून ज्यांनी ज्यांनी बोलवले त्यांच्या भिंतीवरची कमळे काढून देण्यात जागरण होत असे. मोबदला काय मिळायचा तर एक चहा, किंवा खूपच वेळ लागला तर जेवण. पण खरा मोबदला असायचा तो म्हणजे कौतुकाचे शब्द आणि पाठीवरची थाप. कलेला दाद पण तशी भेटायची.
आजकाल शाळेत कल्पकता वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतात. पण जी कल्पकता आमच्यातील ह्या हौशी कलाकारांनी त्याकाळी लावली त्याची सर कुठेच नाही. तहान भूक विसरणे ह्या वाक्प्रचाराचा खरा अर्थ तेव्हा त्यांनी अनुभवला. रेडीमेड च्या जगात ह्या गोष्टी नाहीश्या होत चालल्या आहेत. लोकांनी गणपतीच्या मागच्या भिंतीला फ्लेक्स लावायला सुरवात केली. कागदी आणि थर्माकोल च्या तयार मकर खरेदी करून सजावट केली जाते. अशा या युगात अशी कलाकृती बघितली तर तोंडातून आपसूकच वाह! हा शब्द आपसूकच निघतो.
कोकणात कला आणि कलाकार जिवंत आहे तो फक्त कोकणातील पाठीवर थाप देणाऱ्या रसिकांमुळे. खऱ्या कलाकृतीला दाद देताना येथील रसिक जात,धर्म, गरिबी-श्रीमंती बघत नाही. जे अस्सल आहे ते अस्सल भले ते आपल्या शत्रूचे असेल बाहेर जगाला नाही दाखवले तरी मनात वाहवा देऊन जातो.
-एक वाचक