Author Archives: Kokanai Digital




सिंधुदुर्ग: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पुतळा कोसळण्याची घटना काल घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत संताप व्यक्त केला गेला. पुतळा उभारणीत हलगर्जीपणा झाला असून हा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदलाने एक पथक नेमले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीबाबत नौदलाने सांगितले की, “राज्य सरकार आणि तज्ञांसह, नौदलाने या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त केले आहे.” लवकरच हे पथक या घटने मागची कारणे शोधून आपला अहवाल सादर करेल. मात्र त्याआधी पुतळा कोसळण्यामागची कोणते कारणे असू शकतात, कोणते आरोप होत आहेत ते पाहू.
निकृष्ट दर्जाचे काम?
राज्य सरकारने योग्य ती काळजी न घेतल्याने ही पडझड होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारने कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले नाही. केवळ कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे शिवसेनेचे (यूबीटी) आमदार वैभव नाईक यांनीही कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे.
लोखंडी अँगल अर्धवट?
पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते. त्यावर पुतळ्याचे पार्ट जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.
पुतळा निर्मितीसाठी खूप कमी कालावधी?
उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच पुतळा कोसळला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर या पुतळ्याच्या निर्मितीस खूपच कमी कालावधी भेटला असे या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे हे म्हणाले होते. अशा प्रकारच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी किमान ३ वर्षे लागतात मात्र आपण हा पुतळा अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण केला असल्याचे ते म्हणाले होते.
अपूर्ण अभ्यास?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मागील २ दिवस ताशी ४५ किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं होते . तर पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी येथील खाऱ्या हवेमुळे पुतळ्याच्या नट बोल्ड्सना गंज पकडली असे विधान केले आहे. कोणतेही बांधकाम करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्याप्रमाणे बांधकामात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र हा पुतळा उभारताना हा अभ्यास झाला नसल्याचे दिसून आले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्टला नौदलाला पाठविले होते पत्र
महाराजांच्या पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी ज्या नट-बोल्टचा वापर केला होता ते आता पाऊस आणि खारे वारे यामुळे गंजले असल्याने पुतळा विद्रूप दिसत आहे. तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्र मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळविले होते. मात्र या पत्राची दखल का घेतली नाही याबाबत नौदलाकडून काही उत्तर आले नाही आहे.




सिंधुदुर्ग: पुणेकर चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी नवीन जलद पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती फ्लाय-९१ विमान कंपनीने माहिती आपल्या संकेतस्थळावरून प्रवाशांसाठी दिली आहे.
येत्या ३१ ऑगस्टपासून दर शनिवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल. या पूर्वी सिंधुदुर्ग – हैदराबाद – पुणे अशी एक थांबा असलेली विमानसेवा उपलब्ध होती. ती प्रवाशांसाठी सोयीची नसल्याने चिपी विमानतळावरून पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून होत होती ती आता पूर्ण झाली आहे.सिंधुदुर्गवासी मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसाय व शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. या विमानसेवेमुळे आता त्यांना दिलासा मिळाला आहे. ऐन गणेशोत्सवात ही सेवा सुरू होत असल्याने गणेश चतुर्थीसाठी पुणेकरांची सिंधुदुर्गात येण्याची चांगलीच सोय झाली आहे.
पुणे येथून दर शनिवारी व रविवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करणारे विमान नऊ वाजून दहा मिनिटांनी चिपीला पोहचेल.परतीच्या प्रवासाला सकाळी साडे नऊला सुटून पुणे येथे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोचेल. तिकीट दर १९९० रूपये आहे. फ्लाय ९१ विमानसेवेच्या तिसऱ्या यशस्वी मोहिमेनंतर आता चिपी-मुंबई अशी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.




मुंबई: गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा एक मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.
ही बंदी तीन टप्प्यांत असणार आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे.
5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील.
सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.
हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.




मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नातून नव्याने चालू करण्यात येणाऱ्या वांद्रे – मडगाव या गाडीचे उद्घाटन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून त्यादिवसापासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे अशी माहिती बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे.
या पूर्वी ही गाडी दिनांक २४ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे पक्ष कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. या गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर विभागांना मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यात वेळ लागत असल्याने या गाडीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक दीड वाजता ही गाडी बोरिवली येथून मडगावसाठी मार्गस्थ करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
त्यानंतर ही २० डब्यांची गाडी वांद्रे – मडगाव दरम्यान आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येणार आहे. आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या उद्घाटन सोहोळ्यास उत्तर मतदारसंघातील कोकणकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पक्षाच्या वतीने सुनील राणे यांनी केले आहे.




राजापूर, दि. २४ ऑगस्ट: अणुस्कुरा घाटात आज शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
पहाटे ५ वाजताच्या सुमारास मातीचा भला मोठा भराव रस्तावर आल्याने हा मार्ग पूर्ण बंद झाला आहे. सुदैवाने पहाटेचा सुमार असल्याने, वाहनांची जास्त वर्दळ नसल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र या घाट मार्गावर वारंवार कोसळणार्या दरडीमुळे येथील हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याचा प्रकार घडला आहे.