नवी मुंबई : गणेशोत्सव काळात कोंकणातील गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नवीमुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
19 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून चाकरमाने कोकणात मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. 16 व 17 रोजी शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात या बैठकीत आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे
तसेच राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी: हंगामात खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षांचे दरपत्रक ठरवून दिले असून ते प्रसिद्ध केले आहे. या दरांपेक्षा जर कोणी रिक्षाचालक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने रिक्षाचे मिटरने आणि शेअर-ए-रिक्षा तत्त्वावर चालविण्यात येणार्या रिक्षांचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहेत. या दरापेक्षा अधिक दर एखादा रिक्षाचालक आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर क्रमांकावर नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
Mumbai Goa Highway :रत्नागिरी व रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गाने कोकणात येणार्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४ ठिकाणी, तर रायगड जिल्ह्यात १० ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष सज्ज केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून गणेशभक्त कोकणातील आपल्या गावी येण्यासाठी सुरवात होईल. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १० लाख चाकरमानी दाखल होतील, असा अंदाज जिल्हा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी पोलिस चौकी सज्ज असणार आहेत. रत्नागिरी जिल्हा आढावा घेणारी बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ३९ ऑगस्टला घेतली. जिल्ह्यात एकूण १४ ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष व्यवस्था करण्यात येणार आहे.
कशेडी घाटापासून खारेपाटणपर्यंत तसेच आंबाघाट येथे ही व्यवस्था असणार आहे. रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन करताना गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्याकरिता दहा ठिकाणी चौक्या सज्ज असणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली. खारपाडा पोलिस चौकी, पेण वाहतूक चौकी, वडखळ वाहतूक चौकी, वाकण वाहतूक चौकी, कोलाडनाका वाहतूक चौकी, माणगांव वाहतूक चौकी, लोणेरे वाहतूक चौकी,नातेखिंड महाड चौकी, पोलादपूर वाहतूक चौकी, पाली वाहतूक चौकी या सगळ्या ठिकाणी वाहतूक स्वागतकक्ष सुरू करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव स्वागतासाठी वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी बुधवारी (ता. ६) आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी हे तीन तालुके हे महामार्ग कक्षेत येतात.
क्रेन, रुग्णवाहिकेची सुविधा
गणेशोत्सव काळात भक्तांसाठी महामार्गावर असलेल्या सर्व स्वागत कक्षाच्या ठिकाणी वायरलेस सेट, क्रेन, रुग्णवाहिका या सुविधा सज्ज असणार आहेत, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबई :’सिल्वर पापलेट’ महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून ओळखला जाईल अशी माहिती आज मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सातपाटीमधील मच्छीमार सहकारी संस्थांनी याबाबत सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्याबद्दल मागणी केली होती ती आता पूर्ण झाली आहे. पापलेटला महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित केल्यास या अधिकृत मत्स्य प्रजातीच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासोबतच सागरी पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. असं त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
‛सिल्वर पापलेट' महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून यापुढे ओळखला जाईल अशी घोषणा आज मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत करताना अतिशय आनंद झाला.#silverpofret #Maharashtra #statefish #SMUpdate pic.twitter.com/JDkBabArw5
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) September 4, 2023
Rain Alert : राज्यातील शेतकर्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवसाचा पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. राज्यातील बहुतेक जिल्हय़ात पुढच्या ४/५ दिवसात पाउस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती निर्माण झाल्याने येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक ३ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत कोकण गोव्यात मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाऊस , तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज दिनांक ०४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ात तर दिनांक ०५ ते ०७ सप्टेंबर पर्यंत कोकणातील सर्वच जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
दिनांक ५ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाची शक्यता आहे.
मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करणार्या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला असल्याने उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचा मुख्य सचिवांकडे केली आहे. याबाबत माहिती त्यांनी समाज माध्यमातून जनतेला दिली आहे.
काय म्हणालेत विजय वडेट्टीवार?
राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी करणार्या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे.
उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी.
सावंतवाडी | जिल्ह्यातील शाळेत अजूनही शिक्षक न दिल्याने तसेच डी.एड., बी.एड. बेरोजगारांचे प्रश्न न सोडवल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे शिक्षकदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा कुडाळ युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे.
५ सप्टेंबरला सकाळी १०. ३० वाजता युवा सेनेचे कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री योगेश धुरी यांनी केले आहे गेले काही महिने जिल्ह्यात शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे डी.एड, बी.एड झालेल्या शिक्षकांना अद्याप पर्यंत नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यामुळे त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे याच निषेधार्थ शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे असे योगेश धुरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.