१९५७ ला अल्बर्ट ट्रॅव्हल्सने ही बस सेवा चालू केली होती.त्यांची पहिली बस लंडन येथून १५ एप्रिल १९५७ रोजी सुटली ती भारतात कलकत्ता येथे ५ जून रोजी पोहचली होती.कलकत्ता ते लंडन ७९०० किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा मार्ग होता.
हा मार्ग बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण (अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया, ऑस्ट्रीया, जर्मनी, बेल्जियम मार्गे थेट लंडन असा जात होता.
ह्या बस चा प्रवास एखाद्या सहली सारखा असायचा. मार्गात भेटणारी काही निवडक प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येत होते. त्यात ताजमहाल, बनारस ईत्यादी ठिकाणांचा समावेश असायचा. त्याचप्रमाणे शॉपिंग साठी पण बस काही प्रसिद्ध बाजारपेठेत थांबायची त्यात प्रवासी दिल्ली, तेहरान, काबुल, इस्तंबुल, साल्जबर्ग, विएन्ना येथे शॉपिंग करू शकत होते. साहजिकच ह्या सर्वांसाठी काही दिवस राखीव ठेवण्यात आले होते.
या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ/टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते. फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती. झोपण्यासाठी सीट स्लीपर मोड मध्ये करायची सुविधा उपलब्ध होती.
तेव्हा बसभाडे होते ८५ पौंड.( आत्ताचे साधारण ८०१९रु.)
ही बस काही काळासाठी ऑस्ट्रेलिया च्या सिडनी पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. सिडनी-कलकत्ता-लंडन असा तो मार्ग होता. हा मार्ग कापण्यासाठी ह्या बसला तब्बल १३०/१३५ दिवस लागायचे.
पुढे भारत-पाक यांच्यातील सीमावादामुळे ही बस बंद करावी लागली.
नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून केरळमध्ये तर ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मान्सूनच्या अगोदरच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरसृश्य स्थिती निर्माण झाली आहे.
राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, याविषयी देखील होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही, याविषयी होसाळीकर यांच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज होसाळीकर यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.
कोकण विभागातील रस्त्यांची डागडुजी आणि विकास करण्यासाठी सुमारे १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये १२५६ किलोमीटरपर्यंत रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एकच्या धर्तीवर योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.जिल्हा नियोजन समितीला प्रतिवर्षी उपलब्ध होणाऱ्या निधीच्या दहा टक्के निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कामाला अधिक गती मिळणार आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनसाठी खालील प्रमाणे जिल्हावार खर्च अपेक्षित ठरविण्यात आला आहे
ठाणे जिल्हा – १३० किलोमीटरसाठी ९७ कोटी ५० लाख.
पालघर जिल्हा – २५१ किलोमीटरसाठी १८८ कोटी २५ लाख.
रत्नागिरी जिल्हा – ३५९ किलोमीटरसाठी २६९ कोटी २५ लाख
रायगड जिल्हा -२४३ किलोमीटरसाठी रायगडला १८२ कोटी २५ लाख
सिंधुदुर्ग जिल्हा – २४३ किलोमीटरसाठी २०४ कोटी ७५ लाख
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. या प्रदेशाला ‘मालवणी मुलुख’ अशी स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.मालवणच्या कुरटे बेटावर भर सागरात छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गामुळे १ मे १९८१ रोजी या दक्षिण कोकणाला ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ हे स्वतंत्र बाणेदार नाव प्राप्त झाले.
भौगोलिक स्थिती
सुमारे ५२१९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, १२१ किलोमीटर सागर किनारा या जिल्ह्याला लाभला आहे. संपूर्ण साक्षर असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग असे आठ तालुके असलेल्या या जिल्ह्याला समृद्ध निसर्ग संपदा लाभली आहे. जलश्री, वनश्री व शैलश्री या तिन्हींचा जणू अपूर्व संगमच येथे पहायला मिळतो.
उत्तरेला विजयदुर्गाची खाडा आणि दक्षिणेला तेरेखोलची खाडी, पश्चिमेचा अथांग सिंधुसागर तर पूर्वेला उत्तुंग सह्याद्रीचे कडे – दऱ्या आणि डोंगर. सागर सह्याद्रीच्या मधल्या भागात लालमातीचा हा मुलुख साहित्य, संगीत, नृत्य, लोककला, शिल्प या क्षेत्रात खूप आघाडीवर आहे.
लालमाती, काळीभोर कातळे, जांभा खडक, नारळ- पोफळी, आंबा, काजू, फणस यांच्या सदाहरित बागा, हिरवेगार भात फळे, पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात एकापेक्षा एक अधिक घनदाट देवराया, त्याच्यासोबत माऊली सातेरी, भूमिका, पावणाई, रवळनाथ, वेतोबा इ. देवतांची विस्तीर्ण सभामंडप असलेली भक्ती, शांती व समाधान प्राप्त करुन देणारी मंदिरे, खास प्राचीन बारा-पाचाची देवस्थान पध्दती, दशावतार ही उत्स्फूर्त नाट्याविष्कार दाखवणारी लोककला, हौशी मराठी रंगभूमीचे माहेर आणि फक्त जिल्ह्यापूरती खास ठसकेबाज, नादमधूर, चिमटे काढीत पण समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘मालवणी’ बोली. ही या प्रदेशाची स्वतंत्र ओळख आहे.
कोकणी मेवा
तुम्हाला फणसांचे – आंब्यांचे शेकडो प्रकारचे स्वाद चाखायचे असतील, कोकम रस, सोलकढी, अप्रतिम शाकाहारी भोजन तसेच असंख्य प्रकारचे चवदार स्वाद प्राप्त झालेले ‘मत्साहारी’ भोजन हवे असेल तर ‘मालवणी मुलुखाला’ महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही. वडे – सागोती, तिखला, पापलेट, सरंगा, माशांची कडी, सांबारे, भाजी – पाव – उसळ, कांदाभजी, शेवकांडे किंवा चिरमुऱ्याचे लाडू , जत्रेतले गोड खाजे, ग्रामीण भागात मिळणारी खोबऱ्याची कापे, एवढेच काय जांभुळ, करवंदे, हसोळी, नीव, जगमे – चाफरे, ओवळधोडे, चार भाजलेल्या किंवा उकडलेल्या आठल्या (फणस बिया) चिनी, कणग्या, कारंदे हा सारा रानमेवा व त्यांचा अनोखा स्वाद घ्यायचा असेल, ओल्या काजूगरांचा गुळ – खोबरं घातलेला ‘मोवला’, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, गरमागरम उकडा भात व सोबत रसदार फजाव, वालीचे झणझणीत सांबारे यांची चव हवी असेल तर या प्रदेशात वेगवेगळ्या ऋतूत यावे लागेल.
प्रेक्षणीय स्थळे
सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, पारगड, मनोहर मनसंतोषगड यासारखे २९ गड – किल्ले, आंबोली थंड हवेचे ठिकाण, श्रीसंत सोहिरोबा, साटम महाराज, टेंबे स्वामी, राऊळ महाराज, भालचंद्र महाराज अशा संत महंतांचे मठ, असंख्य साहित्यिक कवी, कलावंतांची घरे-गावे, कुडोपी, हिवाळे, बुधवळे परिसरातील अत्यंत प्राचीन कातळशिल्पे, नेरुर-वालावल-पेंडूरचा अनोखा निसर्ग,पेंडूरचे प्राचीन जैन मंदिर, मठगाव आणि वेतोरे येथील प्राचीन शिलालेख, वेंगुर्ले येथील ‘डचवखार’ दाभोलीचे ‘कुडाळदेशकर मठसंस्थान’, बांदा येथील बैल -रेडे घुमट, सावंतवाडीची रंगीत खेळणी, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, धामापूरचा शांत – निरव तलाव, तिलारीचे मातीचे धरण, हत्तीचे वास्तव्य असलेला परिसर, पिंगुळीची ठाकर आदिवासीची लोककला, धनगरांचे ‘चपई नृत्य’, सावंतवाडीचे शिल्पग्राम, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील असंख्य प्रेक्षणीय स्थळे…
हे सारे मालवणी मुलखाचे बाह्यरुप झाले. तुम्हाला जर कष्टात, गरिबीत पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पध्दतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरुन बोलणारी आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत ? तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन्हा पुन्हा यावे असा मोह वाटेल असा हा निसर्गरम्य प्रदेश आहे.
साभार – “मालवणी लोकगीते” (प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत)
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
मूळ रस्त्याचा प्लॅन बदली करून. कोकण महामार्गावरचा सर्वात उंच ब्रिज बांधल्या बद्दल माननीय नितीन गडकरी यांना धन्यवाद.
नॅशनल हायवे चे इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टरला प्लॅन बदली करायला भाग पाडणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि माय राजापूरची टीम जगदीश ठोसर तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन.
राजापूर शहरानंतर उत्तरातील सर्व धोकादायक वळणे तशीच ठेवून अपघातग्रस्त. जसा आहे तसा हायवे वाढवण्याचा अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदार यांचा प्लान होता. राजापूर मधील जगदीश ठोसर रिटायर्ड पीडब्ल्यूडी इंजिनियर व तेथील कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी याना तो पटला म्हणूनच राजापूर मधून सरळ बाहेर जाणारा आणि ही सर्व वळणे टाळणारा अतिशय देखणा रस्ता बनला. थोडा खर्च वाढला पण अतिशय सुरक्षित आणि कोकण हायवे वरचा सर्वात मोठा ब्रिज राजापूरच्या अर्जुना नदीवर बनला.
कोकण महामार्गावरील अनेक धोकादायक वळणे तशीच ठेवणारे धेडगुजरी कॉन्ट्रॅक्टर व डोकं बाजूला ठेवून डिझाईन करणारे नॅशनल हायवेचे इंजीनियर्स यांची डिझाईन सर्वसामान्य माणसे बदलू शकतात हे जागरूक जगदीश ठोसर आणि टीमने सिद्ध केलं. छोट्या छोट्या मुद्द्यांवर भांडणारे आपण कोकणी विकासाच्या मुद्द्यावर असे जागरूक राहून व्यवस्थेशी संघर्ष केला तरच कोकणात चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होतील.
म्हणूनच राजापूरच्या या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातले अनेक अपघात आणि माणसांचे बळी आपण वाचवले. अशीच जागृतता कोकण हायवे वरील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी दाखवणे आवश्यक आहे कारण कोकणी माणसाची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. हायवे अनेक ठिकाणी धोकादायक आहे आणि म्हणून खूप अपघात होत आहेत त्या त्या ठिकाणी बदल आवश्यक आहेत. यासाठी संघर्ष करूया पाठपुरावा करूया.
वेंगुर्ला प्रतिनिधी – निर्जिवाला सजिव करणा-या कुळातच जन्म, त्यात कलेचा ईश्वर अशा कलेश्वराचा आशिर्वाद, त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडून असे काही नाविन्यपूर्ण घडते की, ज्यामुळे त्यांचे नाव अबालवृद्धांच्या तोंडी असते. ही कथा नसून वास्तव आहे ते कुडाळ तालुक्यातील नेरुर गावातील ‘मेस्त्री‘ समाजातील कलाकारांचे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनविन हालते देखावे साकारत लोकांनाच आपल्याकडे खेचून आणण्याचे कसब या मेस्त्री वर्गाकडे पहायला मिळत आहे.
सध्या सर्वत्र शिमगोत्सव सुरु आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार हा शिमगोत्सव साजरा केला जात आहे. त्यातून ब-याच रुढीपरंपरा जपण्याचे काम या उत्सावातून होत आहे. अशीच प्रथा नेरुर गावात ‘मांड‘ या उत्सवातून जपली जात आहे. होळीच्या तिस-या दिवशी माड्याची वाडी येथील श्री गावडोबा मंदिराकडून ‘गावडे‘ समाजाचे रोंबाट तळी घेऊन ढोलताशांच्या गजरात श्री देव कलेश्वराच्या भेटीस येते. या रोंबटामध्ये मद्य, मांस नसल्याने याला ‘गोडा रोंबाट‘ असे म्हणतात. भेटीनंतर परतताना प्रत्येक वाडीत या रोंबटाला गा-हाणी घातली जातात, नवस बोलले जातात. हे रोंबाट सायचे टेंब येथे आल्यावर मांडाच्या ठिकाणी गा-हाणी वैगरे होतात आणि त्यानंतर मुख्य ‘मांड उत्सवाला‘ प्रारंभ होतो. राधा आणि शिमग्याचे खेळ या मर्यादेत असलेला हा मांड उत्सव कथांमधील विविध हलत्या देखाव्यांच्या संकल्पनेमुळे लोकप्रिय झाला आहे. कै. आना मेस्त्री, दिनू मेस्त्री, बाबा मेस्त्री व विलास मेस्त्री ही मंडळे आध्यात्मिक आणि पौराणिक कथांवर आधारीत बनविलेले ट्रिकसिनयुक्त हलते देखावे भजनाच्या साथीने सादर करतात. विशेष म्हणजे सर्व देखावे २५ ते ३० फुट उंचीपर्यंतचे असतात. एका ग्रुपमध्ये जवळपास २५च्या वर माणसे असतात. असतो. गणपती, मारुती, राक्षस, वाघ, हंस, बदक, फुलपाखरु, किडा, सिह असे पशूपक्षी कलात्मक पद्धतीने या मांडावर येऊन नृत्य करतात. यात लहान मुलांचाही सहभाग उत्स्र्फूत असतो.
या ‘मांड‘ उत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे देखावे सादर करणारी जी चार मंडळे आहेत, ती यावर्षी कोणता देखावा सादर करणार याची पुसटशीही कल्पना एकमेकांना नसते. साधारण शिवरात्रीच्या दरम्याने श्री कलेश्वराला श्रीफळ ठेऊन देखाव्यांच्या कामाला प्रारंभ केला जातो. जो तो आपल्या देखाव्यातील वेगळेपण जपण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो. त्यासाठी लाखोनी रुपये खर्च येतो. परंतु, याचा विचार न करता आपली कला असंख्य जनसमुदायासमोर आणण्यासाठी सिद्ध होतात. मांड उत्सवाला लाभलेला जनसमुदाय आणि त्यांच्याकडून टाळ्यांच्या स्वरुपात मिळणारा प्रतिसाद तसेच त्यांच्या कलाकृतीला कॅमेरात टिपणारा प्रेक्षकवर्ग हेच त्यांचे बक्षिस म्हणायाला हरकत नाही.
आजपर्यंत पिढ्यान्पिढे हा मेस्त्री समाज ही परंपरा जपत आहे. कालानुरुप त्यात बदलही करत आहेत. त्यांच्या युवा पिढीकडून नेहमी वास्तव मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी या उत्सवासाठी मर्यादा होती. त्यामुळे यावर्षी गर्दीने तर उच्चांक गाठला. ‘मांड उत्सव‘ व्यवस्थित पहाता यावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गॅलरीची सोय करण्यात आली होती. तरीही अफाट गर्दीमुळे काहींनी झाडावर तर काहींनी टाचा वर करुन या उत्सवाची मजा लुटली. यावर्षी आना मेस्त्री ग्रुपने रावण-इंद्र युद्ध, विलास मेस्त्री ग्रुपने नंदीवरील शंकर, दिनेश मेस्त्री ग्रुपने महाकाली अवतार विस्तार आणि ज्योतिर्लिग दर्शन व बाबा मेस्त्री ग्रुपने विश्वाचा मुलाधार अवतार ओंकार दर्शन असे देखावे सादर केले. शिमगोत्सवातील या ‘मांडा‘मुळे नेरुर गावाची एक वेगळी ओळख सर्वत्र होत आहे.
विशेष आभार श्री. प्रथमेश गुरव, वेंगुर्ला लेखक आणि संकलक संपर्क – ९०२१०७०६२४
तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा
.
टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.
डोंगर आणि देवाचा संबंध आपण नेहमीच पाहतो. हिंदूंची अनेक तीर्थस्थळे, मंदिरे उंच डोंगरावर, शिखरावर दिसून येतात. श्री देव शिव शंकर पण हिमालयात वास्त्यव करतो. कोकणात पण अनेक देवस्थाने डोंगरावर आढळून येतात. आज आपण माहिती घेणार आहोत अशाच एका गावातील अनोख्या होळी उत्सवाची जेथे होळी गावात किंवा सपाट भागावर न उभारता एका उंच डोंगर शिखरावर उभारली जाते.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ह्या गावी ही प्रथा खूप पूर्वीपासून जपली जाते. सावंतवाडी आणि मळगांवच्या सरहद्दीवर असलेल्या नरेंद्र डोंगराचा एक उंच कडा असलेल्या सुवारड्याच्या कड्यावर एका प्रशस्त खडकावर ही होळी उभारली जाते. गावचे मानकरी आणि ग्रामस्थ ह्या ठिकाणी डोंगर चढून दाखल होतात. गाऱ्हाणे घालून गतवर्षीच्या होळी उतरून नवीन होळी उभारली जाते. ह्या होळीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील इतर होळीप्रमाणे शिमगोत्सव संपल्यावर चैत्र पौर्णिमेला होळी न तोडता पूर्ण वर्षभर ही होळी उभी ठेवली जाते. वर्षानुवर्षे मळगावची ही परंपरा भक्तिभावाने सुरु आहे.
प्रतिनिधी – कोकणाई
विशेष सहाय्य – श्री. प्रज्वल नेवार
तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.
तळकोकणातील सांगेली गावातशिमगा जरा वेगळया परंपरेने साजरा केला जातो. काय आहे हे वेगळेपण हे पुढील मुद्दे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल.
१. येथे शिमगा सणाची सुरवात आदल्या रात्री पासून सुरू होते.ह्या सणाला गिरोबा उत्सव असे पण म्हंटले जाते.गावातील एक मोठे आणि सरळ फणसाचे झाड देवासाठी निवडून त्याला तोडून उंच देव महादेवाच्या पिंडीचा आकार देऊन त्याची प्राणप्रतिष्ठा मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्यग्रामदेवता म्हणून केली जाते.
२. खरेतर महाशिवरात्रीला देवासाठी फणसाचे झाड निवडले जाते. महाशिवरात्रीला येथे गाव आणि मानकरी जमा होतात आणि देव कोठे काढायचा हे प्रथेप्रमाणे ठरवितात.
३. ज्या वाडीतील झाड निवडायचे आहे त्याठिकाणी पाच मानकरी त्या झाडाला हात लावतात व त्यांनतर हर हर महादेव असा जयघोष करतात. या दिवसापासून गिरोबा उत्सवापर्यंत झाडाची पूजाअर्चा करण्याची प्रथा आहे.
४. होळीच्या आदल्या दिवशी झाडाला तोडून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सुतार ह्या झाडाला सुंदर आकार देतात.त्यानंतर गावातील तरुण स्वयंपूर्तीने खांदा लावून देव देवळात भव्य मिरवणुकीने नेतात. एकूण १४ फुटी असलेला देव जमिनीखाली ७ फूट आणि वर ७ फूट उभारला जातो. ह्या सोहळ्याला जिल्ह्यातीलच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील, तसेच गोवा आणि कर्नाटकातून भक्त उपस्थिती दर्शवितात.
५. प्राणप्रतिष्ठा केलेल्या देवाची ग्रामदेवता म्हणुन वर्षभर पूजा अर्चा केली जाते. अशाप्रकारे झाडापासून बनवलेले ग्रामदैवत असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे.त्याचप्रमाणे फणसाच्या झाडापासून लाकडी पिंडी बनवून पुजणारे हे एकमेव गाव आहे.
६. प्रत्येक शिमगा सणाला नवीन देवांची(पिंडीची) प्राणप्रतिष्ठा करून जुने देव मंदिराच्या आवारात एका जागेत ठेवले जातात जागेत ठेवले जातात, त्या जागेस खुट्याचा चाळा असे म्हणतात. असे बोलतात की दैवी चमत्काराने ह्या जुन्या देवांचीसंख्या त्यामध्ये दरवर्षी नवीन देवाचीभर घातली तरी २१ च राहते.
७. अजून एक वैशिष्टय म्हणजे हे गिरोबा फणसाचे झाड देवळात पाषाण म्हणून पुजण्यात येते त्यापासून पाळेमुळे खड्डयात मिळतात ती औषधी असतात असे जाणकार सांगतात. ८. या गावात फणसाच्या झाडाला देवाचे स्थान आहे. येथील ग्रामस्थ फणसाच्या झाडासमोर नतमस्तक होतात. आपल्या परसातील फणसाचे झाड देवासाठी वापरले गेले तर त्याला ते पुण्य मानतात. त्यासाठी ते फणसाच्या झाडाची लागवड आणि जतन करताना दिसतात.
टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.
तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
गणेश चतुर्थी प्रमाणे शिमगा (होळी) हा सण कोकणात खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणेशचतुर्थी झाली की मोठ्या कालावधी नंतर चाकरमानी कोकणात येतात आणि ह्या सणात सहभागी होतात.
होळी पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण प्रत्येक गावी-तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने आणि पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती प्रमाणे साजरा केला जातो. ह्या चालीरीती अनेकदा लोकांचे कुतूहल वाढवत असतात.
आपल्या गावातील ह्या शिमगा साजरा करण्याच्या पारंपरिक चालीरीती आणि पद्धती ईतर भागातील वाचकां पर्यंत पोहोचवण्यासाठी कोकणाई ”आमच्या गावात शिमगा” हे एक लेख सदर घेऊन येत आहे. तुमच्या गावात शिमगा कशा पद्धतीने साजरा केला जातो ते वर्णनात्मक लिखाण आम्हाला पाठवा. आपला लेख आमच्या संकेत स्थळावर, fb page आणि आमच्या सर्व whatsapp group वर आपल्या नावासह प्रकाशित केला जाईल.
नियम व अटी. १) लेख कमीत कमी 300 शब्दात असावे. २) स्थानिक शब्दांना पर्यायी मराठी शब्द कंसात लिहावा. ३) शक्य असल्यास फोटो जोडण्यात यावेत. ४) लेखातील भाषा कोणत्याही समजाला किंवा गटास दुखावणारे नसावी. ५) लेख प्रकाशीत करणे किंवा न करणे हा निर्णय कोकणाई टीम चा राहील. ६)लेख स्विकारण्याची अंतिम दिनांक २७.०३.२०२२ राहील.
लेख पाठवण्यासाठी whatsapp नंबर ९३५६९६८४६२ ९०२८६०२९१६
कोकणाई
pics cedit – https://tourdefarm.i
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
या लेखाचे शीर्षक वाचून घोगळ्यांनी वेंगुर्ला विषयक लेख लिहिण्यापासून फारकत घेतली की काय असे तुम्हाला वाटू शकते; पण थोडसं नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल अस्सल माशेखांव ही वेंगुर्लेकरांची प्रमुख ओळख आहे. वेंगुर्ल्यात मच्छी न खाणारे सुध्दा आहेत. त्यातील बरेचजण धार्मिक परंपरेमुळे मच्छी खात नाहीत, मात्र मासळी आणि भात हे वेंगुर्लेकरांचे प्रमुख अन्न आहे. आता महागाईमुळे सुध्दा या ओळखीत काडीमात्र बदल झालेला नाही. त्यामुळे आजचा हा लेख सुध्दा माझ्या वेंगुर्ल्यावरच आहे.
हा लेख लिहायला घेण्यामागचं कारण पण तसच आहे, माझे बहुतांशी लेख हे एखाद्या घटनेमुळे मला सुचतात, मग ती घटना कितीही छोटी असू दे. असो, तर त्याचं काय झालं अलिकडेच वेंगुर्ल्यात म्हणजेच 6 मे पासून जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा झाली आणि 5 मे रोजी आमच्या बंधूराजांचा मला फोन आला. “बाजारात मरणाची गर्दी झाली हां रे, लोक अक्षरश: तुटान पडलेत”. मागचा लॉकडाऊनचा अनुभव पाठिशी असल्याने वेंगुर्ल्यातील नागरिकांनी जनता कर्फ्युच्या काळात कमतरता भासू नये म्हणून भाजीपाला, धान्य, कडधान्य भरुन ठेवण्यासाठी वेंगुर्ल्याच्या मंडईत तुफान गर्दी केली होती. “अरे मग तू भरुन ठेयलय की नाय सामान”. अस्मादिकांच्या या प्रश्नावर बंधूराज उत्तरले, “नाय.. आसा आधीचाच थोडाफार धान्य, पुरात आठदहा दिवस, त्या गर्दीत शिरात कोण?” “अरे मग तू बाजारात काय गर्दी बघूक गेललस काय?” “नाय रे वायच जरा गोलमो हाडलय, आता दहा पंधरा दिवस माशे खांवक गावाचे नाय, म्हणान सोय करुन ठेवलंय”. मला अपेक्षित होते ते उत्तर मिळालेच.
वेंगुर्ल्यात असताना आमच्या लहाणपणी माशे हे अमुचे प्रमुख खाद्य होते, आता पन्नाशीकडे आलोय, नवी मुंबईत स्थायिक झालोय तरी प्रमुख खाद्यात काहीच बदल झालेला नाही, ही बात अलहिदा. आता मिळते तशी तेव्हा वेंगुर्ल्यात मच्छी काही महाग नसायची आणि दोंपारच्या जेवणात भाताबरोबर कढीसाठी अगदी सुरमई, पापलेट हवे असं काही नव्हते; किंबहुना सुरमई-पापलेट हे माशे लहाणपणी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत वेळा मी खाल्लेत. चार-आठाण्याचे खापी, पेडवे नाहीतर इंगा पाच्छाळी आणली की बस झाले. त्याकाळी ओल्या नाराळाची कापं (खोबऱ्याचे तुकडे) बाजारात पाच दहा पैशाला मिळायचीत, म्हणजे नारळ घ्यायला पैसे नसतील तर ती काप आणायची, लाल मिरशांगो, वायच धणे, हळद टाकून फातरीवर (पाटा वरवंटा) वाटण वाटलं की मस्तपैकी माश्याची कढी तयार. म्हणजे तात्पर्य काय तर माशे खाणं ही त्याकाळी आम्हा वेंगुर्लेवासीयांची चैन नव्हती तर स्वस्तात उदरभरणाची सोय होती. आजच्या सारखा त्यावेळी काही मच्छीचा तयार मसाला हा प्रकार नव्हता. मिक्सरवर वाटण वाटायचा प्रकारही नव्हता, फातरीवर वाटण वाटल्यामुळे माश्याची कढी चवदार व्हायची. सहसा कढी पुरतेच माशे आणले जायचे, खाणारी तोंडही जास्तच असायची. त्यामुळे माशे तव्यावरुन ताटात येणं हा प्रकार (तुमचं काय शेलो फ्राय की काय ते) कमीच असायचा, जास्तीत जास्त महिन्यातून एक-दोनदा.
मी वेंगुर्ला, सिंधुदुर्गच्या हद्दीबाहेर जेव्हा प्रथम बाहेर पडलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, आपल्याकडे खाणावळीत/हॉटेलात केवळ तीन प्रकारची जेवणाची ताटं मिळायचीत. शाकाहारी आणि मांसाहारीमध्ये मच्छी व चिकनचे ताट. हॉटेलात जेवायला जायचे म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांच्या डिश मागवायचा हा प्रकार काही आपल्याकडे तेव्हा नव्हता. आता तेही खुळ आपल्या मातीत रुजलंय. नाष्टा करायचा म्हणजे सुध्दा काही व्हरायटी नव्हती, ऊसळ पाव, वडे, कांदा भजी, बटाटा भजी, पुरीभाजी, चहा हे मोजकेच पदार्थ. तेसुध्दा त्यांच्या वेळा ठरलेल्या. सकाळी ऊसळ, कांदा भजी तर संध्याकाळी बटाटा भजी त्यामुळे हॉटेलात गेल्यावर तुम्ही ज्या वेळात गेलात त्यावेळी जे काही दोन-तीन पदार्थाचे प्रकार असतील तेच तुमच्या पुढ्यात येतील. बरं, थोडसं विषयांतर होत आहे, तर आपला विषय काय होता मच्छी. हां तर आपल्याकडे खाणावळीत जी तीन ताटं जेवणासाठी उपलब्ध असायचीत त्याचा दर चढत्या क्रमाने असा – सर्वात स्वस्त शाकाहारी, नंतर मच्छीचे जेवण आणि सगळ्यात महाग चिकन ताट. मी वेंगुर्ला, सिंधुदुर्ग हद्दीच्या बाहेर गेल्यावर माझ्या असे लक्षात आले की, इतर ठिकाणी आपल्यासाखेच शाकाहारी ताट स्वस्त होते, मात्र मच्छीचे ताट चिकन थाळीपेक्षा महाग होते. अर्थात आता काळ बदललाय, आता कोकणात सुध्दा मच्छीचे ताट चिकन ताटापेक्षा महाग मिळू लागलेय; अर्थात हे दर मच्छीच्या प्रकारावर अवलंबून आहेत.
लहाणपणी हातावर चार-आठाणे टेकवून मला दुपारच्या वेळात मच्छी आणायला काहीवेळा पाठवायचेत. त्यामुळे लहाणपणी थोडाफार माशे खरेदी करण्याचा अनुभव माझ्याकडे होता. चार-आठाण्याचा दर एक-दोन रुपयापर्यंत जाईपर्यंत मला वेंगुर्ल्यात मच्छी खरेदी केल्याचे आठवते. घरापासून काही लांब नव्हते मच्छी मार्केट. चालत पाच मिनिटे लागायचीत. वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालयाच्या बाजूला भाजी मार्केट ओलांडल्यावर तृप्ती हॉटेलच्या बाजून एक चिंचोळी गल्ली होती. कधी-कधी या गल्लीच्या तोंडापासून मच्छी विक्रेत्या बसलेल्या असायच्या. या गल्लीतच एक प्लॅस्टिक वा तत्सम पिशव्या विकायला विक्रेता बसलेला (बसलेला कुठे.. बसायला जागाच नव्हती, उभाच असायचा बिचारा) असायचा. त्यामुळे तुम्ही बाजारात येताना पिशवी आणायला विसरला असाल तर आत शिरतानाच पिशवीची सोय करुन जायचं. तेथील मासेविक्रेती तुम्हाला पैशाच्या मोबदल्यात फक्त माशे देणार. ते सुटी करुन देणे, पिशवी देणे असले लाड नाही चालायचेत. माशे ‘सुटी’ करणे म्हणजे काय हे तुम्ही कोकणातले असल्याने तुम्हाला लगेच कळले असेलच. जे कोकणातले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, मासे ‘सुटी’ करणे म्हणजे मासे साफ करणे, त्याचे डोके, शेपटी, पंख, खवले वेगळी करणे, मासे सुटी करणे ही सुध्दा एक मोठी कला आहे.
आत मासळी बाजारात ग्राहकांची व विक्रेत्यांची तुंबळ गर्दी असायची. या गर्दीतही आपल्याला हवे आहेत तसे मासे खरेदी करण्याच्या तपश्चर्येत अस्सल माशेखांव वेंगुर्लेवासिय भंग होऊ द्यायचा नाही. सर्वात स्वस्त मच्छीचे अनेक प्रकार होते. खापी हा त्यातला एक प्रकार. खापी जरा मोठ्या असतील तर ठीक, पण छोट्या असतील तर खाताना त्याचा काटा बऱ्याचदा गळ्यात अडकायचा. मग सुक्या भाताची मूद खाल्ल्यावर त्या घासाबरोबर तो काटा गिळला जायचा आणि पुन्हा माशे खाण्यावर आपले लक्ष केंद्रित व्हायचे.
पेडवे, तारले, राणे, धोडकारे, इंगा-पाच्छाळी हे अजून काही स्वस्त आणि मस्त मिळणाऱ्या माश्यांचे प्रकार. त्यातील तारले आणि त्याचाच छोटा प्रकार! पण चवीत वैविध्य आणणारे ईरडा हा माश्याचा प्रकार माझ्या अत्यंत आवडीचा. अलिकडे कित्येक वर्षे हा मासा खाता नाही आला. इथे मुंबईत आमच्या मासेवाल्यांकडे अलिकडे विक्रीसाठी नसतो आणि मी जेंव्हा वेंगुर्ल्याला जातो तेंव्हा या माश्याचा सिझन नसतो. तिरफळा टाकून इरडाची चटणी करायची, चटणी म्हणजे तुमच्या नेहमीच्या चटण्या नव्हेत बरं का, कमी वाटण टाकून अगदी भाजी सारखी घट्ट ईरडाची चटणी करायची. चपाती बरोबर काट्यासकट एका घासात दहाबारा ईरडा खायच्या. काय अप्रतिम लागते म्हणून सांगू. तसेच तारले हा प्रकार, तारल्याची चटणी, आमटी दोन्हीही अप्रतिम. तारले असले की त्यातील काही तारले तव्यावर जायचे. खूप कमी तेल लागते, किंबहुना तव्यावर भाजताना हा मासा तेल सोडतो. शिवाय घरात मस्त वास दरवळत असल्याने माश्याला तेल आणि आमच्या तोंडाला पाणी सुटायचे.
वरीलप्रकारचे माशे हे गरिबांच्या घरी असायचेत. अर्थात आपल्याकडे पैशाने गरीब असलेल्यांची संख्या तशी जास्तच होती म्हणा; त्यामुळे यांची विक्री जास्त व्हायची. त्यांनतर बांगडा हा मासा मध्यमवर्गीयांसाठी, थोडासा महाग. कधी-कधी जाळ्यात जास्त बांगडे मिळाले की तो गरिबांच्या घरीही जायचा. मी एकदा एक रुपयाला चौदा बांगडे आणलेले आठवतेय, अर्थात माझ्या लहाणपणी हां. नायतर म्हणशात घोगळ्यांनू काय फेकताय. हळदीचे पान, तिरफळे टाकून बांगड्या तिखला, कढी केली की त्या दिवशी भाताचे चार घास जास्तच जायचेत. बाजारात स्वस्त बांगडे मिळाले की आमच्या घरी भरलेले बांगडे व्हायचेत. भरलेले बांगडे करायला गृहिणींना आपले सगळे कौशल्य लावायला लागायचे. विशेषत: बांगडा सुटी करतानाच त्यातील संपूर्ण काटा काढून टाकणे हे काय सर्वांनाच जमायचे असे नाही. माझी आई अगदी सहज बांगड्यातून काटा वेगळा करायची. बळे, टोळ हेही काही अजून माशेखांव लोकांचे आवडीचे प्रकार. बुगडी हा मासा मात्र विकत घेणे कमीपणाचे मानले जायचे. वेंगुर्ल्यात खूप कमी किंमतीत हा मासा मिळायचा. फारच चविष्ट आणि आठाण्या-बाराण्यात भला मोठा मासा विकत मिळायचा. मुंबईत याला फुफा मासा असे नाव आहे, इथे तो जरा चढ्या दरातच विकला जातो. मी बरेच वेळा मुंबईत मासेविक्रेत्यांना सुरमई म्हणून ग्राहकांना विकताना पाहिले आहे.
कधी चार पैसे जास्त कनवटीला असले तर सुंगटाचा वाटाही पिशवीत यायचा. सुंगटाला कोळंबी असेही म्हणतात, हे मुंबईत आल्यावर मला कळले. सुंगटा हा प्रकार नेहमीच्या मच्छीच्या वाटणात तसेच भाजलेल्या वाटपात असे दोन्ही प्रकारे बनविले तरी तेवढेच चविष्ट लागतो. यात काटा हा प्रकार नसल्याने लहान मुलांमध्ये लोकप्रिय. सुंगटा फ्राय करायला घेतल्यावर संपूर्ण घरात असा वास पसरतो, की पोटातले कावळे अधिक जोरात ओरडायला लागतात. तिसऱ्या, खुबे, म्हाकला, लेपे, कुर्ले, मोरी हे अजून काही माश्याचे प्रकार आहेत जे भाजलेल्या वाटपात केले जातात. कुर्ल्या खाताना त्याच्या तंगड्या तोडताना जरा मेहनत घ्यावी लागते; पण आमचे दातांना कुर्ल्यांच्या डेंग्याची सवय झालेली असल्याने आम्ही लिलया फस्त करायचो. मोरी मासा हा मटणाचाच प्रकार, मोरीची आमटी, कढी न म्हणता मोरीचे मटण असेच म्हटले जाते. वेंगुर्ल्यात हा मासा खूप महाग मिळतो, मुंबईला मात्र त्यामानाने स्वस्त आहे मोरी मासा.
ईस्वन, सरंगो, पापलेट हे मासे श्रीमंतासाठी असाच माझा समज होता. खूप कमी वेळा जाळ्यात जास्त मिळाल्याने वेंगुर्ले मासळी मार्केटमध्ये स्वस्त मिळाले असतील. नाहीतर त्याचा दर आम्हाला न परवडणाराच असायचा. ईस्वनाला सुरमई तर सरंग्याला हलवा म्हणतात, असे मला मुंबईत आल्यावर कळाले. हे मासे खायला चविष्ट तसेच सोपे त्यामुळे खूपच लोकप्रिय आहेत; पण न परवडणारे. आता लोकांची कमाईच एवढी झाली आहे की परवडत नाही असा काही प्रकारच नाही राहिलाय. या माश्यांमुळे मुंबईत स्थायिक असलेले; परंतु मुळेचे ज्या भागातून आलेत ज्या भागात समुद्रातील मच्छी मिळत नाही, त्यांना माश्याची गोडी लागली आणि मासे हा प्रकार अजूनच महाग होत चाललाय. आम्हाला मच्छीखांव म्हणून हसणारे हॉटेलात गेल्यावर सुरमई थाळी, बांगडा थाळीची ऑर्डर देताना आढळतात.
असो, माश्याची भरलेली पिशवी घेऊन घरी मार्गक्रमण करत असताना, रस्त्यात “काय ईला?” असा प्रश्न विचारणारे किमान तीन- चार तरी महाभाग भेटणारच. हातात माश्यांनी भरलेली पिशवी असताना सुध्दा “काय नाय” असं तोंड वाकडंतिकड करुन मिळणारे उत्तर हे ठरलेले; पण त्याचे उत्तर काही असले तरी विचारणारा, लगबगीने बाजारात धाव घेतो. माश्याची पिशवी हातात घेऊन घरी पोहचल्यावर प्रथम स्वागत करते ती मनिमाऊ आणि तिची पिल्ले. कुठून तरी तिचा नवरोबा बोकाही वास काढत घरात दाखल होतो; मग पायात घुटमळणाऱ्या मांजरांपासून पिशवी सांभाळत पार पाटल्यावाटेक (घराची मागची बाजू) जाऊन पिशवी आईच्या ताब्यात द्यायची.
मच्छी सुटी करण्यासाठी “आदाळो” बाहेरच्या पडवीत वेगळा ठेवलेला असायचा. त्या आदाळयावर बसून आई सटासटा माशे सुटी करायची. माश्याची खवले साफ करणे, त्याचे पंख, शेपटी वेगळे करणे, डोके वेगळे केल्यावर ते मांजरांपुढे टाकले जायचे. इथ आमचे लहान मुलांचे सैन्य हातात काठी उभी घेऊन आदाळ्यापासून मांजरांना लांब ठेवण्यासाठी उभे असायचे. आईने टाकलेले माश्याचे डोके जमिनीवर पडायच्या आत मांजरे डाईव्ह मारुन झेलायचीत. त्यांच्या या झेलापुढे जाँटी ऱ्होडस, रविंद्र जाडेचाचे झेल पाणी कमच. बरं आमचे एवढे सैन्य हातात काठी घेऊन तैनात असताना देखील एखादे मांजर एखादा मासा लंपास करायचेच. ओरडा मात्र त्या मांजराऐवजी आम्हालाच पडायचा. टॉमी मात्र या मेजवाणी पासून वंचित रहायचा. जेवताना सुध्दा माश्याचे काटे खायला मनी आणि तिची फॅमिलीच उपस्थित असायची. तरीही आई टॉमीसाठी वेगळा मासा काढून ठेवायची आणि त्या इमानदाराला बाहेर नेऊन वाढायची.
असे आम्ही माशेखांव, लिहिण्यासारखे अजून बरेच आहे, पण लिहितांना पोटात भूक चाळवली. मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद! ओ भाऊ.. ओ ताई.. पिशवी घेऊन कुठे निघालात, लॉकडाऊन चालू आहे, मासळीबाजार बंद आहे. नाय ओशाळण्याची कायच गरज नाय, आपण आहोतच माशेखांव, तोपर्यंत डब्यात तो गोलमो भरुन ठेवलो हां, सुके बांगडे ठेयलेत ते काढा बाहेर.