Category Archives: देश

Bridge Collapse: गुजरातमध्ये पूल कोसळला, अनेक वाहनं पडली

   Follow us on        

अहमदाबाद: गुजरातमध्ये पूल कोसळून भीषण अपघात झाल्याची धडकी भरवणारी घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे हा पूल कोसळल्याचं सांगितलं जात आहे. आणंद आणि वडोदरा यांना जोडणारा गंभीरा पूल कोसळून हा अपघात झाला. पूल कोसळला तेव्हा त्यावरुन वाहनांची ये-जा सुरु होती. त्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा पूल 45 वर्ष जुना असल्याची माहिती आहे.

महिसागर नदीवरील 45 वर्ष जुना गंभीरा पूल कोसळल्याने वडोदरा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली, ज्यामुळे संपूर्ण प्रदेशात धक्का बसला. वडोदरा जिल्ह्यातील पदराला आनंद जिल्ह्याशी जोडणारा हा पूल बराच काळापासून जीर्ण अवस्थेत असल्याची माहिती आहे.

महिसागर नदीवरील गंभीरा पुलाचा एक भाग बुधवारी (9 जुलै) सकाळी कोसळला, ज्यामुळे अनेक वाहनं नदीत पडली. पदराचे पोलिस निरीक्षक विजय चरण यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य महामार्गावर सकाळी 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आणि त्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या वाहनांमध्ये दोन ट्रक आणि दोन व्हॅनचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत चार जणांना सुरक्षित बचावलं आहे आणि इतर अपघातग्रस्तांचा शोध सुरू आहे.

मुजपूर गावाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. दोन ट्रक, एक बोलेरो जीप, दुसरी एक गाडी पूल ओलांडत असताना अचानक पुलाचा एक भाग कोसळला. त्यामुळे दुधडी भरुन वाहणाऱ्या महिसागर नदीत ही चारही वाहनं कोसळली. स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी जमा झाले आणि बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली

Railway Updates: प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षण चार्टिंगच्या वेळेत बदल; सुधारित वेळा अशा असतिल

   Follow us on        

Railway Updates: प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या आरक्षित प्रवाशांचे नाव, कोच आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात आणि मूळ स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी प्रसिद्ध केले जातात.

रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार, १०.०७.२०२५ पासून, ट्रेनचा पहिला आरक्षण चार्ट आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केला जाईल (४ तासांपूर्वीऐवजी).

सुधारित चार्टिंग वेळा पुढीलप्रमाणे:

• ज्या ट्रेन ०५.०० ते १४.०० वाजेदरम्यान प्रस्थान करतील, त्या ट्रेनसाठी पहिली आरक्षण यादी आधीच्या दिवशी २१.०० वाजता तयार केली जाईल.

• ज्या ट्रेन १४.०० ते ०५.०० या वेळेत प्रस्थान करतील, त्यांची पहिली आरक्षण यादी त्या ट्रेनच्या प्रस्थानाच्या ८ तास आधी तयार केली जाईल.

• दुसऱ्या आरक्षण चार्टसाठी सध्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, जो सध्याच्या तरतुदींनुसार सुरू राहील.

• अंतिम आरक्षण चार्ट ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तयार केला जाईल.

प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.

प्रवाशांनी कृपया चार्टिंग वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी.हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे. यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांना दोन्हींचा फायदा होईल असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

 

Pandharpur Special Train: आषाढी एकादशी निमित्त गोव्याहून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे धावणार

   Follow us on        

गोवा: पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता गोव्यातून रेल्वेने थेट पंढरपूरला जाणे अधिक सोपे झाले आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने कॅसल-रॉक येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कॅसलरॉक-मिरज एक्सप्रेस (गाडी क्रमांक १७३३४) ही रेल्वे ४ ते ९ जुलै या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पंढरपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे गोव्यातून निघणाऱ्या भाविकांना आता थेट पंढरपूरला रेल्वेने पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषतः आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय भाविकांसाठी अत्यंत सोयीचा ठरणार आहे.

रेल्वेने आजपर्यंत कोकण रेल्वे मार्गे पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही!

कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली होती. मात्र यावेळीही या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

Railway Updates:रेल्वे तिकीट आरक्षण नियमात मोठे बदल; उद्यापासून अंमलबजावणी

   Follow us on        

Railway Updates:भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल करत आता तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य केले आहे. 1 जुलै 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार असून यामुळे तिकीट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता येईल व फसवणूक टाळली जाईल, असा रेल्वे मंत्रालयाचा उद्देश आहे.

रेल्वे मंत्रालयाने 10 जून रोजी एक अधिकृत परिपत्रक जाहीर केले आहे. या परिपत्रकानुसार, “01.07.2025 पासून, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळ (IRCTC) च्या वेबसाईट किंवा अ‍ॅपद्वारे तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी युजर्सचे खाते आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर 15.07.2025 पासून बुकिंग करताना आधार-आधारित ओटीपी व्हेरिफिकेशनदेखील बंधनकारक करण्यात आले आहे.”

हे नवे नियम केवळ ऑनलाइन बुकिंगपुरते मर्यादित नसून काउंटर बुकिंगवरसुद्धा लागू होतील. पीआरएस काउंटर किंवा अधिकृत एजंटमार्फत तत्काळ तिकीट बुकिंग करतानाही वापरकर्त्याला सिस्टम-जनरेटेड ओटीपी प्रमाणीकरण करणे आवश्यक असेल, जो बुकिंग वेळी नोंदवलेल्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. याची अंमलबजावणी 15 जुलैपासून होणार आहे.

या नवीन नियमामुळे अधिकृत तिकीट एजंटसाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. बुकिंग सुरू झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांमध्ये एजंट तत्काळ तिकीट बुक करू शकणार नाहीत. याचा अर्थ, एसी क्लाससाठी सकाळी 10 ते 10.30 या वेळेत व नॉन-एसी क्लाससाठी सकाळी 11 ते 11.30 या वेळेत एजंटना बुकिंगची परवानगी दिली जाणार नाही.

रेल्वे सूचना प्रणाली केंद्र (CRIS) व IRCTC यांना याबाबत सर्व झोनल रेल्वेला माहिती देण्यात आली असून, सिस्टममध्ये आवश्यक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेल्वे मंत्रालयानुसार, हे बदल तिकीट बुकिंग प्रणालीतील अनियमितता व दलाली रोखण्यासाठी आवश्यक आहेत. अनेकदा दलाल तंत्रज्ञानाचा गैरवापर करून काही सेकंदात हजारो तिकीट बुक करतात, यामुळे सामान्य प्रवाशांना तत्काळ योजना अंतर्गत तिकीट मिळणे अवघड होते. या नवीन नियमांमुळे ही समस्या बर्‍याच अंशी कमी होईल, असा मंत्रालयाचा विश्वास आहे.

 

Goa:टेकऑफ होताच विमानाचा तोल गेला! प्रवाशांचा आक्रोश; पायलटच्या प्रसंगावधानामुळे धोका टळला

   Follow us on        

मोपा : अहमदाबाद विमानतळाजवळ  झालेल्या विमान दुर्घटनेतून देश सावरत असताना गोव्यातून काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. 172 प्रवाशांना घेऊन गोवा विमानतळावरुन उड्डाण घेताच  इंडिगोच्या विमानाचा तोल जाऊन, विमान खाली येऊ लागलं. मात्र, पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित केलं.

गोव्यातील मोपा विमानतळावरून इंडिगो कंपनीचे ६ई – ६८११ विमानाने दुपारी ३.४८ वाजता लखनऊसाठी उड्डाण घेतलं. उड्डाण घेल्यानंतर विमानाचा तोल जाऊन विमान जमिनीच्या दिशेने येऊ लागलं होतं. विमान कोसळणार की काय, अशी भीती निर्माण झाली होती. अचानक विमानाचा तोल गेल्यामुळे एकच खळबळ उडाली. या भीतीने विमानातील प्रवाशांनी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. दरम्यान, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमान नियंत्रित करत सुरक्षितपणे लखनऊच्या अमौसी विमानतळावर सुरक्षितपणे विमान लँड केलं.

या घटनेनंतर इंडिगोचा वैमानिक अधिकारी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. तसंच विमानात देखील नेमका काय बिघाड झाला होता का? किंवा झालेला प्रकार का घडला? याचे कारण शोधण्याची मागणी केली आहे. अहमदाबाद येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर विमानांची सुरक्षा आणि देखभाल याबाबत सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर आता गोव्यात घडलेल्या या घटनेमुळे १७२ प्रवासी चांगलेच घाबरले होते.

Railway Updates: महत्वाची बातमी! वेबसाइट असो वा काउंटर….तात्काळ तिकिटांसाठी आता ‘आधार ओटीपी’ अनिवार्य

   Follow us on    

 

 

Tatkal Ticket:  रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. जुलै महिन्यापासून तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला जाणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलैपासून आधार व्हेरिफिकेशन झालेल्या प्रवाशांनाच केवळ तत्काळ तिकीटचे बुकिंग करता येईल. तर रेल्वेचे एजंट अर्ध्या तासानंतर तिकीट बुक करू शकतील. आतापर्यंत तत्काळ तिकिटे आरक्षणात मोठे गैरव्यवहार होत होते.मात्र, रेल्वेच्या या नवीन नियमामुळे नागरिकांची सोय होणार आहे.
रेल्वेचे प्रसिद्धी पत्रक
रेल्वे मंत्रालयाने 10 जून 2025 रोजी एक पत्रक प्रसिद्ध केले. या पत्रकानुसार सर्व झोन्सना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. तसेच, तत्काळ सुविधेचा लाभ सामान्य नागरिकाला मिळेल, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे आधार कार्डाचे व्हेरिफिकेशन झाले आहे, असे प्रवाशीच 1 जुलै 2025 पासून आयआरसीटीसी संकेतस्थळ किंवा ऍपच्या माध्यमातून तिकीट बुक करू शकतील. यासोबतच 15 जुलै 2025 पासून तत्काळ बुकिंगसाठी आधारवर आधारित ओटीपी देखील अनिवार्य करण्यात आला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस काऊंटर्स तसेच अधिकृत एजंट्सच्या माध्यामातून आरक्षणासाठी तेव्हाच उपलब्ध होतील, जेव्हा यंत्रणेने दिलेल्या ओटीपीचे व्हेरिफिकेशन होईल. प्रवाशांना आरक्षण अर्जात मोबाईल आधार कार्डशी लिंक असलेला नंबर देणे बंधनकारक असणार आहे. काउंटर वरून आरक्षित तिकिटे बुक करताना या नंबर वर ओटीपी येणार आहे. हा ओटीपी काउंटर वर तिकीट बुक करण्यासाठी बसलेल्या कर्मचाऱ्याला द्यावा लागणार आहे. या ओटीपीची पडताळणी झाल्यावरच तिकीट बुक होणार आहे.
तत्काळ रेल्वे तिकीटसाठी सकाळी 10 वाजेपासून आरक्षण करता येते. यावेळी केवळ एसी तिकिटांचे बुकिंग होते. तर 11 वाजेपासून अन्य तिकिटांचे बुकिंग करता येते. या सगळ्या प्रक्रियेत सामान्य प्रवाशाला हमखास तिकीट मिळणे कठीण होते.
तत्काळ बुकिंगसाठी सामान्य प्रवाशांना सर्वाधिक त्रास होतो. तर दुसरीकडे एजंट आरामात तिकीट बुक करू शकतात. आणि त्यानंतर एजंट या तिकिटांची विक्री करताना ग्राहकांकडून अवाच्या सवा किंमत वसूल करतात. आता रेल्वेच्या या नवीन पत्रकानुसार, एजंट्स सकाळी 10 ते 10.30 पर्यंत एसी आणि सकाळी 11 ते 11.30 पर्यंत स्लीपर तिकिटे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे प्रवासी या वेळेत तिकीट काढू शकतात.

DigiPIN: आता पिनकोड विसरा; अचूक स्थान दाखवण्यासाठी डिजीपिन द्या; आपला डिजीपिन कसा शोधाल?

   Follow us on    

 

 

DigiPIN : सध्याच्या पिनकोड प्रणालीला एक उत्तम आणि अचूक पर्याय म्हणून भारतीय पोस्ट विभागाने ‘डिजीपिन’ (DigiPIN) नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. डिजीपिन ही आता देशातील नवी पत्ता प्रणाली (Address System) ठरणार आहे. 10 अंकी डिजीपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शविणार आहे.
.

पिन कोड आणि डिजीपिनमधील फरक…

भारतीय पोस्ट विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी डिजीपिन (DigiPIN) प्रणाली सादर केली आहे. डिजीपिन हा 10 अंकी डिजिटल कोड आहे. पारंपरिक पिन कोड ज्या प्रकारे विस्तृत क्षेत्राचा समावेश करत होता, त्याऐवजी डिजीपिनमुळे अचूक स्थानाची माहिती मिळणार आहे. म्हणजेच, तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान डिजीपिनद्वारे शोधता येईल.

डिजीपिन तयार करण्यासाठी आणि कोड मिळवण्यासाठी सरकारी संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमचा डिजीपिन मिळवू शकतात. डिजीपिनचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तो पत्रव्यवहार योग्य पत्त्यावर पोहोचवण्यात मदत करेल आणि रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना अचूक ठिकाणी पोहोचण्यात मदत करेल. ग्रामीण भागांसह दुर्गम भागात डिजीपिन फायदेशीर ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. डिजीपिन केवळ पत्रव्यवहारासाठीच नव्हे, तर ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील पार्सलसुद्धा अचूक ठिकाणी पोहोचवण्यात सक्षम ठरेल, असं सांगितलं जात आहे.

तुमचा डिजीपिन कसा शोधाल?
तुमचा डिजीपिन शोधण्यासाठी भारत सरकारने https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home ही वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटला भेट दिल्यावर आणि तुमचे लोकेशन निवडल्यावर तुम्हाला तुमचा 10 अंकी डिजीपिन कोड मिळू शकतो. डिजीपिन इतर पत्त्यांच्या प्रणालींपेक्षा वेगळी ठरण्याचे कारण म्हणजे, यात तुम्ही फक्त चार मीटरच्या त्रिज्येत तुमचे अचूक स्थान ओळखू शकता. इंडिया पोस्टने IIT हैदराबाद, NRSC आणि ISRO यांच्या सहकार्याने डिजीपिन ही जिओकोड केलेली डिजिटल अ‍ॅड्रेस प्रणाली विकसित केली आहे. विशेष म्हणजे, डिजीपिनचा ऑफलाइन देखील वापरता येऊ शकतो.

Railway Updates: कन्फर्म तात्काळ तिकीट मिळण्याच्या शक्यता वाढणार; भारतीय रेल्वे मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

   Follow us on    

 

 

नवी दिल्ली : रेल्वे तिकीट आरक्षणात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.  भारतीय रेल्वे लवकरच तत्काळ तिकीट बुकिंगसाठी (Tatkal Ticket Booking) ई-आधार पडताळणीचे काम सुरू करणार आहे. यामुळे प्रवाशांना गरजेच्या वेळी कन्फर्म तिकिटे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. रेल्वेने असेही म्हटले आहे की, ज्या लोकांचे ओळखपत्र आधारशी जोडलेले असतील. त्यांना तत्काळ तिकीट बुकिंगच्या पहिल्या १० मिनिटांत प्राधान्य दिले जाणार आहे. आयआरसीटीसीच्या अधिकृत एजंटनाही तात्काळ विंडो उघडल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत सिस्टमवर तिकिटे बुक करण्याची परवानगी आतापर्यंत नाही. अशा परिस्थितीत, ज्या लोकांचे ओळखपत्र आधारशी जोडलेले असेल त्यांना तिकिटे बुकिंग करणे अधिक सोयीस्कर ठरणार आहे, असे रेल्वेने घोषित केले आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वेने स्वयंचलित साधनांचा वापर करून ऑनलाइन तिकिटे बुक करणाऱ्या तिकीट एजंटविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. रेल्वेचे असेही नमूद केले की, अकाउंट्सच्या अलीकडच्या तपासणीत २० लाख इतर खाती देखील संशयास्पद आढळली आहेत. त्यांचे आधार आणि इतर कागदपत्रे तपासली जात आहेत. सध्या, आयआरसीटीसी वेबसाइटवर १३ कोटींहून अधिक सक्रिय ग्राहक आहेत. यापैकी, आधारशी जोडलेल्या खात्यांची संख्या १.२ कोटी आहे.
आता आयआरसीटीसीने आधारशी प्रमाणित नसलेल्या या सर्व ११ कोटी ८० लाख खात्यांविरोधात सक्त भूमिका घेतली आहे. यासाठी विशेष चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संशयास्पद आढळणारी सर्व खाती ब्लॉक केली जाणार आहेत. रेल्वे तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ सेवेअंतर्गत फक्त योग्य प्रवाशांनाच तिकिटे मिळावीत यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अशा परिस्थितीत, जे खातेधारक त्यांचे खाते आधारशी लिंक करतील, त्यांना तत्काळ बुकिंगच्या पहिल्या १० मिनिटांत प्राधान्य मिळणार आहे.

जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेसवर झाड कोसळले; लोको पायलटच्या प्रसंगवधाने अनर्थ टळला

   Follow us on    

 

 

त्रिशूर: चेरुथुरुथी येथील रेल्वे पुलाजवळ एक झाड उन्मळून चालत्या ट्रेनवर पडले. ही घटना सकाळी १०.३० च्या सुमारास जामनगर-तिरुनेलवेली एक्सप्रेस परिसरातून जात असताना घडली. झाड ट्रेन आणि ओव्हरहेड इलेक्ट्रिक लाईन्सवर आदळले, परंतु लोको पायलटने तातडीने कारवाई केली आणि ट्रेन थांबवली, ज्यामुळे संभाव्य अनर्थ टळला आहे.
या मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती. काही गाड्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या किंवा पर्यायी मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. ट्रॅक्शन डिस्ट्रिब्युशन डिपार्टमेंट (टीआरडी) ची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि पडलेल्या झाडाला बाजूला केले, त्यानंतर दोन्ही ट्रॅकवरील सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

Covid-19 Updates: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्यू..

   Follow us on    

 

 

मुंबई: देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. गेल्या २० दिवसांत मुंबईत ९५ रुग्ण सापडले असून दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एका आघाडीच्या वृत्तपत्रामार्फत देण्यात आली आहे. देशात एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २५७ वर पोहोचली आहे. केरळमध्ये सर्वाधिक ९५ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये ६६, महाराष्ट्रात ५६ आणि कर्नाटकात १३ रुग्ण आहेत.
दरम्यान, मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. तथापि, डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्यांचा मृत्यू कोविडमुळे नाही तर दीर्घकालीन आजारांमुळे झाला. एका रुग्णाला तोंडाचा कर्करोग होता आणि दुसऱ्याला नेफ्रोटिक सिंड्रोम, मूत्रपिंडाशी संबंधित आजार होता.
सिंगापूरमध्ये 14 हजार रुग्ण
आशियातील सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. या देशांमध्ये नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. १ ते १९ मेदरम्यान सिंगापूरमध्ये ३००० रुग्ण आढळले. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही संख्या ११,१०० होती. येथे प्रकरणांमध्ये २८% वाढ झाली असून १४ हजार रुग्ण असल्याचे समजते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search