मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आग्रहाचे आवाहन.
Follow us onमुंबई : मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे ‘मराठी भाषा गौरव दिन २०२६’ चे औचित्य साधून सरकारकडे मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणासाठी आग्रहपूर्वक आवाहन करत मागणी केली आहे. श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशात नमूद केले आहे की ही मागणी, गेली अनेक वर्षे शासन तथा विविध लोकप्रतिनिधी, प्रशासन यांची थेट भेट घेत तसेच सामाजिक स्तरावरून देखिल पाठपुरावा करत सातत्याने लावून धरलेली आहे.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण मराठीतून सुरू व्हावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.
श्रीकांत सावंत प्रसिद्धी संदेशात म्हणतात की महाराष्ट्रात एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा व नर्सिंग यांसारखे वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध होणे आवश्यक आहे.
कोकण व सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बुद्धयांक तसेच कौशल्य हे अव्वल असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे परंतु वैद्यकीय शिक्षणादरम्यान इंग्रजी भाषेतील न्यूनगंड दूर करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घ्यावा असे नमूद करताना हे शिक्षण ‘ऐच्छिक करा पण करा…’ असेही विशेष आग्रहपूर्वक आवाहन केले आहे.
महाराष्ट्र, कोकणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या तळागाळातील विद्यार्थी विद्यार्थीनीना मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणाचा लाभ झाला तर स्थानिक स्तरावरील विविध वैद्यकीय रिक्त पदांचा आपसुक, तत्काळ तसेच स्पर्धात्मक गुणवत्ता वाढ होत भरणा होईल. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा सुधारल्या की नगरे, महानगरे व शहरांतील वैद्यकीय यंत्रणांवरचा ताण देखिल नियंत्रणात येत संपूर्ण राष्ट्राची आरोग्य व्यवस्था सुधारेल अशी विशेष सूचना देखिल श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशात केली आहे.
बदलत्या काळात ‘एआय’ ची अत्यावश्यकता आहे सोबतच मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण मिळाले तर जिल्ह्यातील असंख्य वैद्यकीय शिक्षण इच्छुकांना त्यांच्या बुद्धी व कौशल्थाला न्याय देण्याचे महत्वाचे कार्य घडेल असाही आशावाद ‘मराठी भाषा दिन २०२६’ च्या पार्श्वभूमीवर मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी व्यक्त केला आहे.












