सिंधुदुर्ग: पुणेकर चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी नवीन जलद पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती फ्लाय-९१ विमान कंपनीने माहिती आपल्या संकेतस्थळावरून प्रवाशांसाठी दिली आहे.
येत्या ३१ ऑगस्टपासून दर शनिवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल. या पूर्वी सिंधुदुर्ग – हैदराबाद – पुणे अशी एक थांबा असलेली विमानसेवा उपलब्ध होती. ती प्रवाशांसाठी सोयीची नसल्याने चिपी विमानतळावरून पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून होत होती ती आता पूर्ण झाली आहे.सिंधुदुर्गवासी मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसाय व शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. या विमानसेवेमुळे आता त्यांना दिलासा मिळाला आहे. ऐन गणेशोत्सवात ही सेवा सुरू होत असल्याने गणेश चतुर्थीसाठी पुणेकरांची सिंधुदुर्गात येण्याची चांगलीच सोय झाली आहे.
पुणे येथून दर शनिवारी व रविवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करणारे विमान नऊ वाजून दहा मिनिटांनी चिपीला पोहचेल.परतीच्या प्रवासाला सकाळी साडे नऊला सुटून पुणे येथे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोचेल. तिकीट दर १९९० रूपये आहे. फ्लाय ९१ विमानसेवेच्या तिसऱ्या यशस्वी मोहिमेनंतर आता चिपी-मुंबई अशी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
कोल्हापूर: मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे यासाठी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यांना शाहू महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लगोलग त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून या प्रकल्पासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. खासदार नारायण राणे यांनीही या प्रकल्पासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले आहे. तसेच आपण संयुक्तपणे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू असेही सांगितले. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच अस्तित्त्वात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
११४ किलोमीटर अंतर असलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वे मार्गाचा पहिला सर्वे १९७० रोजी झाला होता. त्यानंतर २०१८ रोजी साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या अधिकार्यांनी या मार्गाचा पुनः सर्वे करून आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्त केला होता. मात्र त्या नंतर योग्य पाठपुरावा झाला नसल्याने हा रेल्वे मार्ग प्रस्ताव रेंगाळला. अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांनी दिली. बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोलीमार्गे सावंतवाडी असा हा लोहमार्ग आहे.बेळगाव-सावंतवाडी मार्गाने दक्षिण रेल्वे आणि कोकण रेल्वे जोडली जाणार आहे. बेळगाव भागातील भाजीपाला कोकण-गोव्यात तर कोकणातील मासे दक्षिण कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्यास मदत होणार आहे.
या मार्गात बेळगाव, चंदगड, आंबोलीसह एकूण 9 स्टेशन्स निश्चित केली आहेत. या लोहमार्गाचा अपेक्षित खर्च 1805.09 कोटी ऊपये असून निश्चितच तो भारतीय रेल्वेला परवडणारा आहे. या लोहमार्गामुळे होणारा आणखी एक प्रमुख लाभ म्हणजे जेव्हा कधी कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळून मार्ग बंद पडतो, त्यावेळी कोकण रेल्वेची वाहतूक बेळगावमार्गे वळविता येणे शक्य होणार आहे. शिवाय सध्याचे बेळगावहून खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, मडगाव, करमळी, पेडणेमार्गे सावंतवाडी हे अंतर 279 कि.मी. आहे. बेळगाव-सावंतवाडी लोहमार्ग झाल्यास हे अंतर 114.60 कि.मी. होऊन 165 कि.मी. सध्यापेक्षा रेल्वेमार्गाने बेळगावला सावंतवाडी जवळ होणार आहे, असा सकारात्मक अहवाल बेंगळूरचे मुख्य इंजिनिअर राम गोपाल यांनी रेल्वे मंत्रालयास पाठवला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या खासदाराने बेळगाव आणि सिंधुदुर्गच्या खासदारांच्या मदतीने स्वत: कॅप्टनशीप करून बेळगाव-सावंतवाडी लोहमार्गाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यामुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील तसेच कोकणातील चौकुळ आणि आंबोली भागातील लोक रेल्वेच्या कक्षेत येतील. या भागातील प्रवासी पंढरपूर, मुंबईला रेल्वेने जाऊ शकतील. त्यामुळे या भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल. स्वातंत्र्यानंतरही रेल्वेच्या प्रतीक्षेत दिवस कंठणाऱ्या वंचित भागाच्या विकासाची परिमाणे बदलू शकतील
खासदार शाहू महाराज यांनी आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करून तो पूर्ण करून घेवू असे आश्वासन दिले होते
मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. नमो किसान योजनेच्या चौथ्या हप्त्याचं ऑनलाईन वितरण आज करण्यात आलं. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे , आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत या हप्त्याचं वितरण करण्यात आलं.
नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या चौथ्या हप्त्यापोटी सुमारे एक कोटी २० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे २०४१ कोटी २५ लाख रुपये जमा करण्या संदर्भातील शासन निर्णय मंगळवारी निर्गमित करण्यात आला होता.
राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर जून २०२३ पासून राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या बरोबरीने नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. या योजनेतून राज्य सरकारमार्फत आतापर्यंत तीन हप्त्यात पाच हजार ५१२ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्यात आली आहे.
Follow us on मुंबई :नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाला शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने या महामार्गाचे संरेखन बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. त्यानुसार आता ८०५ किमीच्या संरेखनात बदल होणार आहे. परिणामी, काही दिवसांपूर्वीच पर्यावरणविषयक परवानगीसाठी पाठविलेला प्रस्ताव एमएसआरडीसीने मागे घेतला आहे. संरेखनात करण्यात येणाऱ्या बदलामुळे नवा प्रस्ताव तयार करावा लागणार असून त्यामुळे एमएसआरडीसीने वरील निर्णय घेतला आहे.
प्रास्तावित नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्ग ८०५ किमी लांबीचा असून तो वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. या महामार्गाचे संरेखन अंतिम करण्यात आले असून आराखडाही तयार करण्यात आला आहे. हा महामार्ग मार्गी लावण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसीने भूसंपादन प्रक्रियेस सुरुवात केली होती. मात्र कोल्हापूर, सांगली आणि आसपासच्या भागातील शेतकरी, स्थानिक रहिवासी आणि राजकीय नेते या महामार्गास विरोध करीत आहेत. हा महामार्ग रद्द व्हावा यासाठी आंदोलन सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर याआधीच एमएसआरडीसीवर भूसंपादन प्रक्रिया स्थगित करण्याची नामुष्की ओढावली आहे. भूसंपादन पूर्णत: बंद असतानाच आता शक्तिपीठ महामार्गास पर्यावरणासंबंधीची परवानगी घेण्यासाठी एमएसआरडीसीकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव आता एमएसआरडीसीने मागे घेतला आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
Konkan Railway: रविवार दिनांक 18/08/2024 रोजी ठाणे – दिवा स्थानकांदरम्यान ५ व्या आणि ६ व्या रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकात तात्पुरता बदल करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार
दिनांक १६ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेसचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसचा प्रवास १८ ऑगस्ट रोजी पनवेल स्थानकावर सुरू होणार आहे.
दिनांक १८ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजरचा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त करण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून दिली.
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंमलात आणली आहे. १ जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंक १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी दिली होती. परंतु, त्या आधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात!!
राज्यभरात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या योजनेत राज्यभरातून कोट्यावधी माता-भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून मान्यता प्राप्त अर्जदारांना थेट… pic.twitter.com/iTeaZpCH71
— Ranajagjitsinha Padmasinha Patil (@ranajagjitsinh1) August 14, 2024
ठाणे : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दि.17 ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त महिलांना यांचा लाभ मिळणार आहे, असे विधान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संजय बागूल, महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते, कायापालट लोकसंचलित केंद्राच्या पदाधिकारी, महिला बचतगट व अंगणवाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दि. १७ ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता, गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बॅक खाते ही अट ठेवली आहे. ज्या महिलांनी बॅक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बॅक खाते काढून ३१ ऑगस्टपूर्वी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा अर्ज भरावा.
कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युएटी देणार आहोत. तसेच केंद्र शासनाकडे मानधन वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १ लाख १४ हजार महिला स्मार्टफोन देण्यात आले आहे. ४ लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचतगटांना देण्यात आले आहे. त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला ११० रुपये मिळत आहे. यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अंगणवाडी सेवकांना “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये देण्यात येत आहेत, असेही यावेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार दौलत दरोडा यांनी कायापालट लोकसंचलित केंद्र चांगले काम करीत असून यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हे केंद्र करीत असलेल्या कामकाजासाठी शासनाकडून प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजया गवारी यांनी केले.
Shaktipeeth Expressway Updates:महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाबद्दल एक महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. या द्रुतगती मार्गावर आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली दोन मोठे बोगदे खोदले जाणार आहेत. या बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास तो देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे.
महामार्गाची फेरआखणी
नागपूर-गोवा हा प्रस्तावित महामार्ग जवळपास ८०२ किलोमीटरचा आहे. हा महामार्ग १२ जिल्ह्यामधून जाणार आहे. यामध्ये १२ जिल्ह्यातील जवळपास २७ हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक नेत्यांनी केली होती. तसेच या महामार्गामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना अनेकांनी बोलून दखवली आहे. त्यामुळे नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. या महामार्गाच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही असे आश्वासन दिले आहे. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे, त्याची फेरआखणी करता येईल का? याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुंबई:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ७ सप्टेंबरला श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे.
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे,उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.
पुणे:ऑनलाइन विडिओ गेम मुळे एका १६ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी चिंचवड येथील किवळे या भागात ही घटना घडली आहे. या गेममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
दिनांक 25 जुलै रोजी सुट्टी असल्या कारणाने सदर मुलगा बेडरूम मध्ये लॅपटॉपवर ऑनलाईन गेम खेळत होता. दुपारी एकच्या सुमारास सोसायटीच्या ग्रुपवर एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचा मेसेज आला. मुलाच्या आईला शंका आली म्हणून ती मुलाच्या खोलीत गेली असता तो मुलगा तिथे आढळला नाही. त्यानंतर खाली पाहिले तर तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला दिसला. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता
घरात गेममध्ये असलेल्या कोडची काही कागदपत्रं सापडली आहेत. त्यात उडी मारणं असा टास्क होता. प्राथमिक तपासानुसार हा मुलगा मोठ्या प्रमाणात गेम्स खेळत होता असं निष्पन्न झालं आहे.आत्महत्येआधी मिळालेल्या चिठ्ठीनुसार XD नावाचा एक गेम आहे असं दिसतंय. यासंबंधी आमचे अधिकारी पुढील तपास करत आहे. असं पोलीस म्हणाले.तसेच त्याच्या खोलीतून काही स्केचेस सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याने इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी स्वत:च्या मृत्यूचा प्लान आखला होता. त्याने पेन्सिलिने याचे स्केच तयार केले होते. तेही पोलिसांनी जप्त केले आहेत.
दरम्यान, मोबाइल वापरताना पॅरेंटल कंट्रोल आणि डिजिटल वेलबिंग नावाच्या अॅपचा वापर करून आपल्या मुलांचा स्क्रीनटाइमचा वापर मर्यादित करा, आणि आपली मुलं काय पाहतात यावर लक्ष ठेवायला हवं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
या मुलाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “गेल्या सहा महिन्यापासून त्याचं वागणं बदललं होतं. त्याच्या हातून लॅपटॉप घेतला की तो एकदम आक्रमक व्हायचा. तो अगदी लहानसहान गोष्टींना घाबरायचा. तो अचानक मला चाकू मागायला लागला. आगीला तो घाबरेनासा झाला. तो हे पाऊल उचलेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. सरकारने याबद्दल काळजी घ्यायला हवी. कारण मुलांना काहीच कळत नाही त्यामुळे मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचू नयेत याची काळजी सरकारने घेणं आवश्यक आहे. VPN वर सगळं दिसू शकतं. माझ्या मुलाबरोबर जे झालं ते इतरांबरोबर होऊ देऊ नका, सगळ्यांना सुरक्षित नेटवर्क पोहोचवा. माझी सरकारलाही कळकळीची विनंती आहे.”
मुलाच्या वडिलांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, “मुलांना आजकाल सगळं समजतं. पॅरेंटल कंट्रोल असला तरी मुलं तो कोड सहज क्रॅक करतात. बरेचदा मुलं ऑनलाइन अभ्यास करण्याच्या नादात लॅपटॉपवर बसतात. त्यामुळे ते नक्की तिथे काय पाहतात हे समजत नाही कारण हिस्ट्रीसुद्धा डिलिट करतात. पालकांना मुलांवर 24 तास लक्ष ठेवणं शक्य नाही.
मुलगा कोणता गेम खेळत होता हे अद्याप आई वडिलांना आणि पोलिसांनाही नीटसं कळलेलं नाही.
त्याबद्दल अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.