Category Archives: महाराष्ट्र

या वीकएंडला अटल सेतूने प्रवास करण्याचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी वाचाच

नवी मुंबई : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने अधिसूचना काढून दिली आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.
या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वाहतूक विभागाकडे हा मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रवेशबंदी जाहीर करणारी सूचना नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी काढली असल्याची माहिती न्हावाशेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे.

Loading

आंबाघाट विशाळगड मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद… ‘हे’ आहे कारण

विशाळगड : आंबा विशाळगड मार्गावरील रात्रीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यटक, भाविक, प्रवासीवगनि या मार्गावरून रात्रीचा प्रवास करू नये, अन्य मार्गाचा वापर करावा असा आशयाचा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे. मात्र मानोली, विशाळगड, गजापूर, केंबुर्णेवाडी, आंबा या गावांसाठी मार्ग खुला राहील, अशी माहिती मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली.
कारण काय?
आंबा-विशाळगड हा मार्ग सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जातो. राधानगरी आणि चांदोली अभयारण्यांना जोडणारा हा घनदाट वनराजीचा भाग आहे. विविध पक्षी, प्राणी, वनौषधी यांनी संपन्न जंगल असल्याने या मार्गावर जंगली पशू-पक्ष्यांचा वावर असतो. दुर्मीळ अशा जैविक जातीही येथे आढळतात. राज्य प्राणी शेखरू, गवा, लांडगा, कोल्हा, मोर, रानकोंबडे, मलबार पायबर पीठ, हॉर्नबिल यासारखे दुर्मीळ पक्षी-प्राण्यांच्या जाती येथे पाहावयास मिळतात. यांची सुरक्षितता तसेच निसर्ग सांभाळणारा प्रमुख घटक म्हणून त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा मार्ग रात्रीचा बंद ठेवणे गरजेचे आहे.
मानोली येथील चेक पोस्ट येथे वन विभागाच्या वतीने प्रवाशांची तपासणी केली जाते. रात्रीची वाहतूक बंद केल्याने वनौषधींची तस्करी, चोरटी वृक्षतोड व गुन्हेगारीलाही पायबंद बसणार आहे.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने संयुक्त वन व्यवस्थापन समिती मानोली, मानोली ग्राम व वन विभाग करत असलेली उपाययोजना म्हणून रस्ता रात्रीच्या वेळी बंद राहील, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी सांगितले.

Loading

रेल्वेकडून ‘या’ कालावधीत राबवली जाणार विशेष तिकीट तपासणी मोहीम; योग्य तिकीट काढूनच प्रवास करण्याचे आवाहन

मुंबई : पश्चिम आणि मध्य रेल्वे कडून ३१ मार्च पर्यंत २ टप्प्यात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. ही विशेष मोहीम १२ ते २५ फेब्रुवारी आणि १५ ते ३१ मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी योग्य तिकीट काढून रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य, पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या प्रथम श्रेणीसह द्वितीय श्रेणी डब्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तसेच वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे तिकीटधारक प्रवाशांना धक्काबुक्की प्रवास सहन करावी लागते. परिणामी, याबाबत प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. धावत्या वातानुकूलित आणि सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात तिकीट तपासणी करण्याची सूचना प्रवाशांकडून करण्यात आली. त्यानंतर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील गर्दीच्या स्थानकात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. यासह आता भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम सुरू केली जाणार आहे. तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह वाणिज्य अधिकारी आणि विभागीय कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षकांचे पथक आवश्यकतेनुसार आरपीएफ, दक्षता आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना पाचरण करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
रेल्वे मंडळाकडून भारतीय रेल्वेमधील प्रत्येक विभागाला दिलेल्या सूचना
– पीआरएस तिकिटांच्या तपासणीदरम्यान प्रवाशांचे ओळखपत्र तपासणे, सवलतीचे तिकीट असल्यास त्याबाबतचे वैध पुरावा तपासून घ्यावा.
– आरक्षण केंद्रावर दलालाच्या हालचाली रोखण्यासाठी पथके तयार करून, तपासण्या कराव्यात. तसेच आपत्कालीन कोट्याचा गैरवापर होऊ नये, याबाबत सतर्क राहावे.
– कॅटरिंग कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांकडे योग्य शुल्क घेत आहेत आणि त्यांना योग्य पावती दिली जाते, याची तपासणी करावी. तसेच अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेगाड्यांमध्ये बंदी घालावी. खाद्यपदार्थांच्या स्टाॅलवर दराचे फलक आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जाते का, हे तपासावे.

Loading

Nagpur-Goa Expressway Updates: नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाचे कोकणात ‘या’ ठिकाणी होणार मिलन

मुंबई :नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या संरेखनास महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली आहे. एकूण ६ लेन असलेला ८०६ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. लवकरच या मार्गासाठी भूसंपादन प्रकियेस सुरवात होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाशी जोडणी
हा महामार्ग कोल्हापूर येथून आंबोलीमार्गे तळकोकणात येणार आहे. या महामार्गाची समाप्ती बांदा येथील आरटीओ च्या जवळ होणार आहे. येथेच प्रस्तावित ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्ग या महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

नागपूर येथून सुरु होणार हा महामार्ग एकूण ११ जिल्ह्यातून जाणार आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी (उत्तर गोवा) अशी या जिल्ह्यांची नवे आहेत. प्रकल्पाचा अंदाजित एकूण खर्च ८३ हजार ६०० कोटी एवढा आहे. प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नसली तरी २०२८-२९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

Loading

खुशखबर! लवकरच बेस्ट बसेस अटल सेतूवरून धावणार

MTHL News: नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आणि देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणुन ओळखल्या जाणार्‍या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर MHTL (अटल सेतू) वर बेस्ट BEST आता प्रीमियम बस सेवा  सुरु करणार आहे. 

ही प्रीमियम बस कोकण भवन, बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बसला S-145 असा नंबर देण्यात आला असून तिचे साई संगम, तारघर, उल्वे नोड, आई तरुमाता, कामधेनु ओकलैंड्स, एमटीएचएल, ईस्टर्न मोटरवे, सीएसएमटी, चर्चगेट स्टेशन और कफ परेड हे स्टॉप असतिल.चलो अॅपद्वारे (Chalo App) या बसमध्ये आसन आरक्षित केल्या जाऊ शकतील. 

सकाळी बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि दुपारी दोन वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर ते बेलापूर अशा दोन सेवा सुरुवातीला चालविण्यात येतील. ही बस सेवा प्रीमियम बस सेवा असणार आहे. या बसचे तिकीट दर जाहीर केले नाही आहेत.

या प्रीमियम बससेवे नंतर लवकरच सामान्य बस सुद्धा या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहनांचा टोल भार सरकार सहन करत असल्याने त्याचा परिणाम तिकिट दरात होणार नसल्याने या सामान्य बस चा तिकीटदर ईतर बस प्रमाणे असतिल असे बेस्ट च्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Loading

शिवसेनेला एक कोटी दिल्याचा मंत्री दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा

सावंतवाडी : धनादेशाद्वारे मी शिवसेनेला (ठाकरे गट) एक कोटी रुपये दिले होते आणि ते दिल्याचा माझ्याकडे पुरावा असल्याचा खळबळजनक दावाही दीपक केसरकर यांनी केला. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्याला मंत्री केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
केसरकर म्हणाले, ‘माझ्या श्रद्धेवर ठाकरे यांनी संशय घेतला. मात्र, मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली होती. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? मला गद्दार म्हणण्याचा ठाकरे यांना अधिकार नाही. त्यांचे कर्तृत्व काय?
माझ्यात कर्तृत्व असूनही मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २०१४ मध्ये राज्यमंत्री केले; पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही. याची खुद्द आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीच कबुली दिल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा, आमदारांनाही ते भेटत नव्हते. मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो; पण मला कधी भेटही मिळत नव्हती. मग त्यांच्याकडे लोक थांबणार कसे? मी स्वतःहून नाही, तर मला भाजपकडून निमंत्रण असतानाही ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले, म्हणून मी शिवसेनेत गेलो.’ असे ते पुढे म्हणालेत 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपण पाणबुडी प्रकल्प मंजूर केल्याचा व तो गुजरातला नेण्यात आल्याचे सांगितले; पण वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यावी. पाणबुडी प्रकल्प मी स्वतः मंजूर केला होता; पण नंतरच्या पर्यटनमंत्र्यांनी तो प्रकल्प पुढे सरकवला नाही. त्यामुळेच तो रद्द झाला; मात्र आताच्या पर्यटनमंत्र्यांनी तो मंजूर केला असल्याचे मंत्री केसरकरांनी यावेळी सांगितले.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची मते लाखांच्या आतमध्ये होती; पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हीच मते लाखांच्या बाहेर गेली. त्यामुळेच वैभव नाईक तसेच विनायक राऊत हे निवडून आल्याचा दावाही मंत्री केसरकर यांनी यावेळी केला.

Loading

कोकण रेल्वेच्या मडगाव रेल्वे स्टेशनवर पॉड हॉटेलची सुविधा उपलब्ध होणार

Konkan Railway News: या वर्षापासून कोकण रेल्वेच्या मडगाव रेल्वे स्टेशनवर पॉड हॉटेल ही सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉड हॉटेलला कॅप्सूल हॉटेल म्हणूनही ओळखले जाते आणि एक अद्वितीय प्रकारची मूलभूत, परवडणारी निवास व्यवस्था याद्वारे प्रवाशांना दिली जाते. मडगाव रेल्वे स्टेशनच्या इमारतीतच ही सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक अतिथीसाठी एक कॅप्सूल दिली जाते. मूलत: बेडच्या आकाराचे हे पॉड जे दरवाजा किंवा पडद्याने बंद करता येतात.
याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांच्या रेल्वेगाडीला बराच विलंब असणार आहे, त्यांना होऊ शकतो. कमी वेळेत हॉटेल रूम शोधणे बऱ्याचदा प्रवाशांसाठी जिकिरीचे असते. अशावेळी प्रवाशांना या पॉड हॉटेलचा फायदा होऊ शकतो.
या सेवेसाठी तासाला नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. प्रवाशांना साह्य करणे हाच यापाठीमागचा हेतू आहे. तथापि, त्यातून कोकण रेल्वेला महसूलही मिळणार आहे.

Loading

”…. म्हणुन गाड्यांचे हे डबे कमी केले जात आहेत.” गाड्यांचे स्लीपर कोचेस कमी केल्यावर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे स्पष्टीकरण

नागपूर: रेल्वेत प्रवाशांकडून वातानुकूलित (एसी) कोचला जास्त मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’ कमी करून ‘एसी कोच’ वाढवले गेले, असा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केला.

मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मध्य रेल्वेसह देशभरात प्रवासी गाड्यांमधील सातत्याने स्लिपर कोच कमी होऊन वातानुकूलित ‘थ्री टायर एसी कोच’ वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राम करण यादव पुढे म्हणाले, रेल्वेत सातत्याने प्रवाशांकडून ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वातानुकूलित कोच वाढवले गेले.

देशातील काही ठिकाणी मागणीनुसार ‘स्लिपर कोच’च्याही गाड्या चालवल्या जात आहेत. त्यातच सध्या ‘एसी थ्री टायर’ आणि ‘स्लिपर कोच’मधील सीटच्या प्रवासी भाड्यात खूप जास्त फरक नाही. रेल्वेकडून सातत्याने पायाभूत सुविधा बळकट केली जात असून थ्री लाईन, फोर लाईनसह इतरही कामांना गती दिली गेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मग कमी झालेल्या पॅसेंजर रेल्वे पुन्हा चालवण्याबाबत प्रक्रिया होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेत अमृत भारत योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्थानकांचा विकास होत असल्याचेही यादव म्हणाले.

 

महाव्यवस्थापकांचा दावा कितपत योग्य? 

कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाड्यांचे दोन स्लीपर डबे कमी करून त्या जागी दोन ‘ईकाॅनाॅमी थ्री टायर एसी’ चे डबे जोडले गेले आहेत. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर चालवते. या गाड्यांना स्लीपर कोचपेक्षा एसी कोचला जास्त मागणी होती हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कारण या गाड्यांच्या स्लीपर कोच च्या तिकीट चार महिने आगावू बूक करताना भेटणे मुश्किल होत असे. मग मागणी कमी कशी असा प्रश्न प्रवाशांकडून विचाराला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लीपर श्रेणी आणि थ्री टायर एसी यांच्या तिकीट दरांमध्ये जास्त फरक नाही असे महाव्यवस्थापक बोलत आहेत. पण खरे पाहता थ्री टायर एसी चे प्रवासभाडे स्लीपर श्रेणीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा पण चुकीचा आहे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

Loading

पुण्यात नाटकामध्ये हिंदू देवतांचा अपमान; सीतामाईचे पात्र करणार्‍या कलाकाराचे आक्षेपार्ह वर्तन..

पुणे: अयोध्येत नुकतेच प्रभू रामलल्लांच्या मूर्तीचा राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण देश राममय झाले असताना विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणार्‍या पुण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. कलेच्या गोंडस नावाखाली एका नाटकात रामायणाची पात्रे अगदी घाणेरड्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

पुणे विद्यापीठातील ललित कला मंचाने आयोजित केलेल्या या नाटकात रामायणाची पात्रे खूप चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. या नाटकात सीता माताची भूमिका करणारा कलाकार या नाटकात शिव्या देताना आणि सिगारेट पिताना दाखवला आहे. 

नाटक चालू असताना आपल्या देवी देवतांचा अपमान सहन न झाल्याने अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली आहे.

 

Loading

मोठी बातमी: अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती.

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search