वाचकांचे व्यासपीठ: सावंतवाडीहून दिव्याला आलेली गाडी सकाळपर्यंत स्लाइडिंगला उभी करून ठेवण्यात येते. तसे न करता हीच गाडी पुन्हा रात्री दहा वाजता सावंतवाडी करता सोडण्यात यावी.
दुसर्या बाजूने दिव्याहून सकाळी मडगावसाठी निघालेली गाडी रात्रभर मडगाव स्थानकावर उभी करून ठेवण्यात येते. तीच गाडी रात्री मुंबईसाठी सोडल्यास दोन्ही बाजूने रात्रीची सेवा उपलब्ध होईल. रेल्वे प्रशासनाने याबद्दल तांत्रिक बाबींचा विचार करावा आणि रात्रीची दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत.
पनवेल स्थानकावरील राखीव जनरल डबे पूर्ववत करावेत
मुंबई उपनगरातील शेवटचे रेल्वे स्टेशन पनवेल असून प्रवाशांची वर्दळ असणारे शेवटचे स्थानक आहे. या स्टेशन वरती पनवेल, उलवा, उरण ,अलिबाग, पेण , मानखुर्द ,गोवंडी, चेंबूर कोपरखैरणे, वाशी, बेलापूर नवी मुंबई परिसरातील लोक शेवटची कोकण कन्या किंवा तुतारी गाडी पकडून कोकणात जाण्यासाठी येतात. पूर्वी येथे कोकणकन्या, तुतारी एक्सप्रेस ईत्यादी गाड्यांचा एक जनरल डबा राखीव असायचा, मात्र ती सोय बंद केल्याने येथील प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.
कोकणातील आमदार खासदारांनी यात लक्ष घालून तो डबा पूर्ववत पनवेलला सुरू करावा जेणेकरून उपनगरातील व शेवटचे जंक्शन स्टेशन असलेले पनवेल रेल्वे स्टेशनला स्वतंत्र जनरल डबा उपलब्ध होईल.
वाचकांचे व्यासपीठ: कोकण रेल्वे २५ वर्षापूर्वी कोकणात आली. कोकण रेल्वे मार्ग साकारणे हे अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक कार्य KRCL कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आणि त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी अगदी लीलया पेलले. मात्र त्यानंतर आतापर्यंत पाहिजे तसा विकास कोकण रेल्वेचा झाला नाही. असे नाही की प्रयत्न झालेच नाही. कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक योजना, प्रस्ताव पुढे आलेत, मात्र त्यांना मूर्त स्वरूप देण्यात अपयश आले. कोणत्या आहेत या योजना आणि प्रस्ताव हे थोडक्यात पाहू.
राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना चिपळूण कराड रेल्वे मार्ग होणार असे जाहीर केले गेले होते. या प्रस्तावाला ७ मार्च २०१२ रोजी मंत्रिमंडळात मान्यताही दिली गेली होती. मात्र त्यानंतर यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मात्र कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रेल्वे मार्ग मृगजळच ठरला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू रेल्वे यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर वैभववाडी मार्ग याबाबत सर्वेक्षण झाले होते. मात्र पुढे यासाठी म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने हाही मार्ग रखडला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा मार्ग होणे काळाची गरज आहे त्यामुळे गणपती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ज्यादा गाड्याअप किंवा डाउन कोल्हापूर मार्गे वळवता येतील व गाड्यांचा होणारा खोळंबा रोखता येईल.
विद्यमान खासदार नारायण राणे काँग्रेसच्या सत्तेत मंत्री असताना सावंतवाडी ते रेडी रेल्वे मार्ग टाकण्याचे सुतवाच झाले होते त्याचे पुढे काय झाले? कणकवली ते रेडी पर्यंत स्वतंत्र टॉय ट्रेन सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरणार अशी रेवडी त्याच वेळेला उडवली होती त्या रेवडीचे पुढे काय झाले? हे देखील प्रश्नच आहेत.
सावंतवाडी आंबोलीमार्गे बेळगाव जोडण्याची एक रेवडी मध्यंतरी उडवली केली होती त्यामध्ये सीमा वरती भागातील काही आमदार खासदार सक्रिय झाले होते त्याचे पुढे काय झाले ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस याचा कोनशिला समारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. खरं म्हणजे सावंतवाडी टर्मिनस काळाची गरज आहे. मे महिन्यामध्ये आणि गणपती मध्ये सावंतवाडी टर्मिनस जर पूर्ण झाले तर जादा गाड्या सोडता येतील तसेच वसई सावंतवाडी कल्याण सावंतवाडी पुणे सावंतवाडी अशा गाड्या सोडता येतील
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न येत्या दिवाळीपूर्वी सोडवून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्या टर्मिनसचे उद्घाटन करा आणि त्याला मधु दंडवते यांचे नाव द्या कारण कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस यांना जाते. 2024 साल हे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी या वर्षात टर्मिनसला त्यांचे नाव देऊन सावंतवाडी टर्मिनस वरून स्पेशल गाडी वसई किंवा कल्याण पर्यंत सोडण्यात यावी हीच मधु दंडवते यांना आदरांजली ठरेल. पाणी भरण्याची आणि पाण्याची सोय आता दीपक केसरकर यांनी पूर्णत्वास नेलेली आहे तिलारी प्रकल्पातून पाणी देण्याची योजना त्यांनी मंजूर केलेली आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करून मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.
Follow us on मुंबई: वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून नेहमीसाठी व रात्रीची वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा स्लो मधू दंडवते एक्सप्रेस सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला.यासाठी कोकण रेल्वे,मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे प्रशासन,रेल्वे बोर्ड व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला होता . मात्र आत्ताच नव्याने सुरू करण्यात आलेल्या वांद्रे मडगाव एक्सप्रेसच्या थांब्या बाबत, वेळापत्रकाबाबत संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
आम्ही कोकणासाठी पॅसेजर मागतोय तुम्ही सुपरफास्ट देताय,आम्ही रात्रीसाठी रेल्वे मागतोय तुम्ही दिवसाला देताय,आम्ही कोकणासाठी रेल्वे मागतोय तर तुम्ही गोव्यासाठी देताय? कोकणातील फक्त सात रेल्वे स्थानकावर थांबणारी सुपरफास्ट एक्सप्रेस देऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणी माणसाच्या जखमेवर मिठ चोळलेय अशा शब्दात संघटनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वेच्या प्रकल्पात ज्या महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक २२% गुंतवणूक केली त्याच्या वाटयाला मध्यरेल्वेच्या फक्त तीनच रेल्वे आल्या,त्यामुळे पश्चिम रेल्वेवरून चालू झालेली नवीन रेल्वेही वांद्रे ते वसईमार्गे सावंतवाडीपर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस चालवावी म्हणजे किमान कोकणातील प्रत्येक तालुक्याला एकतरी हॉल्ट मिळेल अशी मागणी करणाऱ्या प्रवासी संघटनेची धारणा होती.मात्र कोकण रेल्वेने बोरीवली मार्गे सुटणारी स्लो रेल्वे न देता बोरीवली ते मडगाव दरम्याने धावपारी सुपरफास्ट एक्सप्रेस १०११५/१६ देऊन काय साध्य केले?
कोकणातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील तब्बल ३४ रेल्वे स्थानकांवर हया पश्चिम रेल्वेवरून सुरू झालेल्या नवीन रेल्वेला हॉल्टच दिला नाही.यामध्ये १)आपटे २) जिते ३) पेण ४) कासू ५) नागोठणे ६) कोलाड ७) इंदापूर ८) माणगाव ९) गोरेगाव रोड ८) सापे वामने ९) करंजडी १०) विन्हेरे ११) दिवाणखवटी १२) कलंबनी बु. १३) खेड १४) अंजनी १५) कामथे १६) सावर्डा १७) आरवली रोड १८) कडवई १९) संगमेश्वर रोड २०) उक्षी २१) भोके २२) निवसर २३) आडवली २४ ) वेरवली २५) विलवडे २६) सौंदळ २७) राजापूर रोड २८) खारेपाटण रोड २९) वैभववाडी रोड ३०) आचरणे ३१) नांदगाव रोड ३२) सिंधुदुर्ग ३३) कुडाळ ३४) झाराप ह्या स्टेशनवरील चाकरमनी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये राहत नाहीत का?असा संतप्त सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.
लोकसभा प्रचाराच्या वेळी मंत्री पियुष गोयल यांनी मला मतदान करा मी कोकणाला नेहमीसाठी रेल्वे सुरू करून देतो असे आश्वासन दिले होते स्वाभिमानी कोकणी माणसाने गोयल यांना भरभरून मतदानही केले पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पियुष गोयल हे सर्वाधिक मताधिक्याने निवडूनही आले, कोकणी माणसामुळे साहेब पुढे कॅबिनेट मंत्रीही झाले व पुढे जाऊन द्विसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस कोकणा ऐवजी गोव्यासाठी सोडण्याचे प्रयोजन मंत्री महोदयांनी केले त्यामुळे ही सुपरफास्ट एक्सप्रेस नेमकी कोकणासाठी की गोव्यासाठी असा सवाल श्री.यशवंत जडयार यांनी विचारला आहे.
पश्चिम रेल्वेवरून नवीन सुरू होणाऱ्या बांद्रे ते मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेसला फक्त बोरीवली,वसई,पनवेल,रोहा,विर,चिपळूण,रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग,सावंतवाडी,थिवीम,करमळी हे थांबे देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवासी संघटना ह्या रेल्वेची रात्रीसाठी मागणी करीत आहे तरीही ती दिवसाची दिल्याने ती तळकोकणात रात्री १०.३५ च्या दरम्याने पोहोचतेय.म्हणजे कोकणातील लोकांनी मुंबईतून ३०० रू.मध्ये रेल्वेने जायचे आणि तेथे उतरल्यावर १५०० रू.ची रिक्षा करून घरी जायचे.
प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी मागील १o वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे यासाठी वसई विरारमध्ये फक्त एका महिन्यामध्ये १८ हजार सहयांचे क्याम्पीयनही राबवले,कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयासमोर उपोषण,वसई रोड येथे रेल्वे आंदोलन,सावंतवाडी रोड येथे लाक्षणिक उपोषण केले तर माजी खासदार श्री.विनायक राऊत,श्री.राजेद्र गावीत,श्री.गोपाळ शेट्टी तर विद्यमान खासदार श्री.नारायण राणे,श्री.पियुष गोयल,श्री.अरविंद सावंत,श्रीम.सुप्रिया सुळे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला आहे.त्यामुळे फक्त कोकणासाठी स्वतंत्र्य रेल्वे मिळणे अपेक्षित होते,मात्र प्रवासी संघटनेने पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष ही नवीन रेल्वे सोडताना कोकण रेल्वे प्रशासनाने ह्या प्रवासी संघटनांशी संपर्क न साधता वेळापत्रक परस्परच जाहिर केले.
पश्चिम उपनगरातील कोकणातील प्रवाशांनी मागील १० वर्षे ही रेल्वे मिळवण्यासाठी संघर्ष केला आत्ता पुढील १० वर्ष त्याचे हॉल्ट मिळवण्यासाठी कोकणकरांनी आंदोलने / उपोषण करत राहायची का? असा सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.
वांद्रे मडगाव एक्सप्रेस नेहमीसाठी सुरू करून त्यातील एक जनरल कोच वसई रोड स्टेशनला राखीव ठेवावा व किमान माणगाव,खेड,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड व कुडाळ ह्या तालुक्याच्या ठिकाणी जादाचे हॉल्ट मिळावेत अन्यथा प्रवासी संघटना आपल्या मूळच्या वसई सावंतवाडी पॅसेंजरच्या मागणीवर ठाम असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले.
आज पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे दक्षिणेतील राज्यामध्ये दिवसाला साधारण ५ सुपरफास्ट एक्सप्रेस जात आहेत,त्यामुळे कोकणाला सुपर फास्ट एक्सप्रेसची आवश्यकताच नाही आहे. दिव्यावरून सावंतवाडी पर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस जाऊ शकते तर वांद्रे ते सावंतवाडी पॅसेंजर का शक्य नाही? नवीन सुपर फास्ट एक्सप्रेस कोकणाच्या नावाखाली गोव्याला देण्यापेक्षा कोकण रेल्वे प्रशासनाने ती उरलेल्या ३४ स्टेशनवर थांबवावी असे श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.
कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई वडिलाच्या घरात राहतो, फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.
नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी, मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका, मुले तिथे एकाच चुलीवर, दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. भावा भावात कितीही भांडणे असले तरी, या दहा दिवसात एकत्र राहणे, एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा तिथला कडक नियम आहे.
असे गणपतीमुळे एकत्र आल्याने, कधी कधी जुने भावांतील वाद एकत्र आल्याने मिटले जातात. नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे मनाई असते, नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.
कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं. आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, भजने, दशावतार, शक्ती तुरा नाच, नमन भारुड,कथा इत्यादी रात्री कार्यक्रम उत्साहात करतात. आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात.
गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पाऊलांची दाटी, दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं, गुण्या गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं. पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या, मी करते असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा गावात, घरा-घरात पहायला मिळते. योग्य वेळी, योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, हे सर्व कोकणाच्या बाहेर प्रेम, माया संपत चालली आहे.
एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही. एका आई वडिलाची मुले पण द्वेष, मत्सर वाढत चाललाय. त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे. दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे. आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसलेत तुमच्या काडी लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात.
संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत. काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी, जमीनीसाठी भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा, नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथे सुद्धा जागा मिळणार नाही.
कोकणासारखे वागून बघावे, कोकणात एकाही शेतकऱ्यांने आजपर्यंत आत्महत्या केली नाही. तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी. कोकण बाहेर दहा एकरवाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही व रात्री मुड बनला की, घेतला फास.
साधेपण जपावा, कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून घरी दरवर्षी कोकणा प्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा. गौराई बसवतात तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करतात, तसे आपल्याच बहिणीला वडे आदी सागोती नाही जमले तर, कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहीजे,
जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वास एकत्र पाहून आनंदीत होईल,
ही भोळी अपेक्षा जरी असले तरी, प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावांचे बहिणींचे, भावा भावांचे एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील, यात तिळमात्र शंका नाही.
वाचकांचे व्यासपीठ: खरेतर देशाला आपले सर्वस्व समर्पित केलेल्या महान नेत्यांची तुलना करणे चुकीचे आहे. मात्र जेव्हा एखाद्या नेत्याच्या कर्तृत्वाचा सन्मान होत नाही, त्याची अवहेलना केली जाते तेव्हा नाईलाजाने त्या व्यक्तीने केलेल्या कार्याचे महत्व पटवून देण्यासाठी ही तुलना होतेच.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर या दोन्ही कालखंडात प्रा. मधु दंडवते यांचे देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय असेच आहे. १९४२ च्या चळवळीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते यांनी आंदोलनात भाग घेऊन स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आणि करावासही भोगला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गोवा सत्याग्रहामध्येसुद्धा त्यांनी भाग घेतला होता त्यादरम्यान त्यांना पोर्तुगीज पोलिसांकडून एवढी मारहाण झाली की त्यांच्या शरीरातली हाडे मोडली होती व त्या जागी स्टीलच्या पट्या घातल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनामध्ये दोघा पती पत्नीने आपले योगदान देऊन कारावास भोगला होता. देशात जेव्हा आणीबाणी जाहीर झाली होती तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना अटक झाली होती. त्यात अटकेत प्रा. मधु दंडवते
आणि त्यांच्या पत्नींचाही समावेश होता.
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना त्यांच्या त्यागासाठी आणि देशसेवेसाठी भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. त्यांनी केलेली देशसेवेबद्दल तिळमात्र शंका नाही. मात्र त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्तच देशसेवा केलेल्या मधू महानेत्याच्या त्यागाचा, कार्याचा सन्मान होणे गरजेचे आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी फक्त आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगला परंतु प्रा. मधु दंडवते यांनी स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यामध्ये तुरुंगवास भोगला मग प्रा. मधु दंडवते यांना भारतरत्न का दिला जाऊ नये?
केंदीय रेल्वे मंत्री असताना त्यांनी भारतीय रेल्वेमध्ये अमुलाग्र बदल केलेत. ६ डब्याच्या ऐवजी २२ डब्याच्या मेल एक्सप्रेस सुरू करून तिकिटांचा होणारा काळाबाजार त्यांनी रोखला. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक गाडीला वेगळे नाव देण्याची सुरवात त्यांनीच केली. त्याची सुरुवात पहिली कलकत्त्या वरून मुंबईला येणाऱ्या ” गीतांजली” एक्सप्रेस या नावाने सुरुवात झाली. विशेष म्हणजे, त्यांनी दुय्यम दर्जाच्या स्लीपर कोचच्या प्रवाशांसाठी, अधिक आरामदायी प्रवासासाठी विद्यमान लाकडी बर्थ बदलून, उशी असलेले बर्थ सुरू केले. सुरुवातीला प्रमुख ट्रंक लाईन्समध्ये लागू केले जात असताना, 1980 च्या दशकाच्या अखेरीस सर्व गाड्यांमध्ये त्यांच्या द्वितीय श्रेणीच्या डब्यांमध्ये हे पॅड बर्थ होते. कोकण रेल्वे प्रत्यक्षात येण्यासाठी प्रा. मधु दंडवतेंनी रेल्वेमंत्री म्हणून सादर केलेल्या पहिल्या अर्थसंकल्पातच तरतूद केली. कोकण रेल्वे प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यांचे योगदानही सर्वश्रुत आहे.
एवढं मोठे भारताला योगदान देणाऱ्या या तपस्वी देशभक्ताला त्याच्या मृत्युपश्चात जर भारतरत्न देता येत नसेल तर किमान सावंतवाडी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस म्हणून तात्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केलेल्या या टर्मिनस चे काम पूर्ण करून त्याला मधु दंडवते टर्मिनस असे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील ३ वर्षांपासून मोठ्याप्रमाणात होत आहे. मात्र या मागणीला वेळोवेळी केराची टोपली दाखवली जात आहे. भारतरत्न पदासाठी योग्य असलेल्या एका महानेत्याची मरणोत्तर अशी अवहेलना होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते?
स्वातंत्र्य चळवळीसह गोवा सत्याग्रह आणीबाणी मध्ये सहभाग घेणाऱ्या प्रमिला दंडवते यांनी महिला आयोगाची स्थापना करून संपूर्ण भारतातील महिलावर खूप मोठे उपकार केले आहे त्यांच्याही यथोचित सन्मान व्हावा असे मी जाहीर पत्रकाद्वारे मागणी करीत आहे विलंबित सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करून त्या टर्मिनसला मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे. हे वर्ष प्रा. मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी येत्या २१ जानेवारी २०२५ रोजी मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम पूर्ण करून २१ जानेवारी २०२५ पुर्वी मधु दंडवते टर्मिनस असे नामांतर करून या थोर विभूतीला आदरांजली अर्पण करावी
श्री. सुरेंद्र हरिश्चन्द्र नेमळेकर संस्थापक सदस्य – कोकण रेल्वे, सल्लागार- सखांड कोकण रेल्वे सेवा समिती
वाचकांचे व्यासपीठ: जैतापूर हातिवले हमरस्त्यावरील साखर या गावच्या कातळावर चिरेखाणींच्या विळख्यात कातळ खोदचित्रांच्या दोन साईट आहेत.पैकी एलिफंट बर्डचे 12 फुट x 4 फुटाचे चित्र नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले दिसते.लगतच्या चिरेखाणीचे मार्किंग या चित्रावर झाल्याचे स्पष्टपणे दिसते.कदाचित नजिकच्या काळात ते नष्ट झालेले असेल.
एकीकडे कोकणातल्या निवडक नऊ साईट्सचा समावेश जागतिक वारसा प्राथमिक यादीत झालेला असतानाच अनेक ठिकाणची चित्रे रस्ते,चिरेखाणी,आंबा कलमबागा यामुळे नष्ट झाली आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत ही अत्यंत क्लेशदायक बाब आहे.
रत्नागिरीतील “निसर्गयात्री” संस्थेसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील अनेक संस्था, समुह किंवा व्यक्तींनी आजवर 125 गावांमधून 151 साईट्सवरची 2000 हजारहून अधिक कातळ खोदचित्रे (Geoglyphs) शोधून काढली आहेत.मात्र त्यातील काही निवडक साईट्स सोडल्या तर बहुतांश ठिकाणी हा अनमोल ठेवा बेवारस अवस्थेत पडून आहे.
या सर्व साईट्स खासगी मालकीच्या असून बहुतांश मालकांना त्यांचे महत्व/गांभीर्य अद्याप कळलेले नाही.बहुतांश साईट्स अक्षरशः उघड्यावर असंरक्षित अवस्थेत आहेत. कित्येक चित्रांवरून माणसे,गाईगुरे यांची रहदारी सुरू आहे.कित्येक साईट्स वरून पावसाच्या पाण्याचे लोट वहाताना दिसतात.या गोष्टींमुळे ऑलरेडी अनेक चित्रांची भरपूर झीज झाली आहे.ती आता भरून न येणारी हानी आहे.मात्र सध्या अस्तित्वात असणारी सर्वच्या सर्व चित्रे आहेत त्या अवस्थेत संरक्षित होणे ही काळाची गरज आहे.
त्यासाठी त्या त्या साईट्सच्या मालकांना कनव्हिन्स करून माणसे आणि गाईगुरांची रहदारी तसेच पावसाळी पाण्याचे प्रवाह थांबवावे लागतील. त्या त्या गावातील स्थानिक मंडळे, संस्था किंवा ग्रामपंचायतींच्या माध्यमातून साईटभोवती दोन दोन चिऱ्यांची लाईन फिरविता येऊ शकेल.तसेच चिरेखाणी,कलम बागा,प्लॉटिंग,रस्ते विस्तार या बाबीही थांबवाव्या लागतील.
“निसर्गयात्री” संस्थेच्या अथक प्रयत्नातून रत्नागिरी येथे नुकतेच “कोकणातील कातळशिल्पे आणि वारसा केंद्र” सुरू झाले आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतील काही टक्के रकमेचा विनियोग या तातडीच्या आणि अत्यावश्यक कामांवर करता येणे शक्य झाल्यास धोक्यात असलेली अनेक कातळ खोदचित्रे नष्ट होण्यापासून वाचविता येतील अशी आशा करण्यास हरकत नाही.
मालगाडी अपघातानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक चुकीच्या पद्धतीने हाताळली गेल्याचा आरोप..
मुंबई :गेल्या आठवड्यात कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचे कारण साफ आणि स्वच्छ होते. पनवेल स्टेशनच्या पुढे दोन फरलांगावरती नवीन पनवेल जुना पनवेलच्या पुलाखाली मालगाडी घसरली पण ही मालगाडी घसरण्याचे कारण आता पुढे येत आहे तेथे असलेल्या नाल्यावर टाकलेले पाच स्लीपर चुकीच्या पद्धतीने टाकले गेले होते त्या स्लीपर च्या वरती अचानक लोड आल्यामुळे रेल्वे रूळ वाकले आणि मालगाडी घसरली असे समजते परंतु त्याच वेळेला कोकण रेल्वेच्या प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून जवळपास च्या लाईन वरून कोकण रेल्वेची दुसरी गाडी येत नव्हती अन्यथा हा अपघात भीषण असा झाला असता.
या अपघाताची पार्श्वभूमी अशी आहे अगोदर शनिवारपासून हार्बर लाइन मार्गावरती बेलापूर ते पनवेल मेगाब्लॉक घेण्यात आला होता आणि तो मेगाब्लॉक चालू असताना बेलापूर पासून रेल्वे मार्ग पनवेल पर्यंत बंद करण्यात आला होता. परंतु ज्या वेळेला अपघात घडला त्यावेळेला कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू झाली असती परंतु मालगाडीमुळे ही वाहतूक पुढे होऊ शकणार नव्हती याचे निदान स्पष्ट झाल्यानंतर त्वरित मेगा ब्लॉक रद्द करणे गरजेचे होते व कोकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या गाड्या पनवेल पर्यंत आणून तिथे रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावर वळवून पुढे उभ्या करून ठेवता आल्या असत्या, परंतु हे न करता सरळ पुढे गाड्या येऊन देण्याचा मूर्खपणा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला यावर कोणाचाच लक्ष जात नाही आहे कसे? पनवेलच्या पुढे रेल्वे घसरली म्हणजे पनवेल पर्यंत गाड्या आरामात येऊ शकत होत्या .पनवेलला एकंदरीत तीन गाड्या येऊन लागू शकत होत्या या तीन गाड्या रिकाम्या करून पुन्हा कुठेतरी पुढे कर्जत उरण मार्गावरती पाठवून येणाऱ्या गाड्यांना पनवेल पर्यंत येऊ द्यायला पाहिजे होते व मेगाब्लॉक रद्द करून प्लॅटफॉर्म क्रमांक एक दोन तीन चार वरून ठाणा गोरेगाव आणि सीएसटी वडाळा अशा लोकल सेवा चालू ठेवल्या पाहिजे होत्या परंतु मेगा ब्लॉक का रद्द केला गेला नाही ?तसेच या गाड्या पनवेल पर्यंत येऊ शकत होत्या पनवेलला त्या गाड्या रिकाम्या करून त्या गाड्या कर्जत उरण मार्गावरती नेऊन कुठेतरी सायडींगला उभ्या करून ठेवल्या पाहिजे होत्या तेवढी जर समय सुचकता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दाखवली असती तर किमान गणपतीला गावाला गेलेले सगळे चाकरमानी सुखरुप पणे पनवेल पर्यंत येऊ शकले असते आणि मेगा ब्लॉक रद्द केला असता तर पनवेल पासून पुढे प्रवास करून लोक सुखरूप घरी गेली असती.तीस तीस तास रखडपट्टी झाली नसती
त्यात आणखीन एक शहाणपणा केला तो म्हणजे जनशताब्दी एक्सप्रेस लोढा मिरज मार्गे वळवली त्यामुळे पनवेलच्या पुढे मडगाव पर्यंत ती गाडी कुठेही स्टॉप वर थांबणार नव्हती ती गाडी लोढा मिरज मार्गे मडगाव करून मडगावला गेली मडगावला गेल्यानंतर तिथे नेत्रावती एक्सप्रेस तिथल्या लोकांना पाच मिनिटांसाठी चुकली मडगावच्या अधिकाऱ्यांनी पाच मिनिटं नव्हे तर अर्धा तास तरी नेत्रावती एक्सप्रेस थांबवुन ठेवली असती तर मडगाव पासून ते चिपळूण पर्यंतच्या प्रवाशांना नेत्रावती मध्ये जागा करून घेता आली असती कारण गाडीचा खोळंबा झाल्यामुळे नेत्रावतीचीअनेक तिकिटे रद्द झालेली होती आणि प्रवास फक्त पाच तासाचा होता रेल्वेच्या ह्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे तिसपस्तिस तास मनस्ताप प्रवाशांनी का बरं सोसावा? याचे उत्तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे आणि या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
कोकण रेल्वेचे रेल्वे रूळ हार्बर लाइन मार्गावरती आज तीस वर्षे झाली अजून जोडलेले नाहीत ते जर जोडले असते तर गाडी ठाणा हार्बर मार्गे सुद्धा नेता आली असती याबाबतचे पत्र मी दोन ऑगस्ट २३ रोजी पा ठवलेले होते आता तरी गंभीर होऊन कोकण रेल्वे मार्ग हार्बर लाइन ला जोडला जावा जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोकण रेल्वे वाशी ठाणा मार्गे सीएसटी पर्यंत पोहोचू शकते आपला एक शेअर कोकण रेल्वेचे भविष्य बदलू शकते.
मे महिन्यात गणपती मध्ये वाशी बेलापूर येथून थेट केरळ कन्याकुमारी पर्यंत गाड्या सोडता येतील गणपती मध्ये बेलापूर वाशी येथून थेट गाड्या सावंतवाडी चिपळूण रत्नागिरी ला सोडता येतील
मी एक घर बोलतेय, तुम्ही चाकरमानी आलात की भरलेले आणि बाकी पूर्ण वर्षभर ओसाड असलेल्या घरापैकी वाडीतील एक घर… खूप आहे मनात बोलण्यासारखे पण कधी काही बोलले नाही.. यावर्षी अगदी राहावले नाही म्हणुन मी माझ्यात वर्षभर एकट्या राहणार्या एका आईची, एका आजीची आणि एका सासूची व्यथा ईथे मांडत आहे ….
मी एक घर बोलतेय… गणपती मुक्कामाला गेलेत तसा तू पण आल्या वाटेने पाहुण्यांसारखा आपल्या शहरातील ”घरी” परतलास. तुझ्या आईने जाताना तुला पाणावलेल्या डोळ्याने “बाबू सांभाळून जा, कामधंदो जीव सांभाळून कर, फोन करीत रव” अशा शब्दात निरोप दिला.
निरोप देवून मागे फिरली आणि माझ्याकडे पाहिले,ओट्यावर येवून खूप रडली रे ती. माझ्याकडे पाहून का रडली असेल? या प्रश्नाचे उत्तर तुलाही माहीत आहे. चतुर्थी सणात जे रूप मला आले होते ते पूर्ण बदलले, कदाचित भकास झालेले रूप पाहून ती रडली असेल.
आता माझ्यात (घरात) पुढील कित्येक दिवस नको नकोशी वाटणारी शांतता असेल. या घरात आता तिच्या नातवंडांची किलबिल नसेल. तिला साद घालणारे किंवा तिने कोणाला साद घालावी असे कोणीही नसेल. तोंड असून मुक्या सारखे तिला जगावे लागेल. कधी बाबू तुझा फोन आला तेव्हाच फक्त तिचा आवाज मला यापुढे ऐकू येईल. दिवस तर ठीक आहे मात्र रात्र खूपच भयानक आणि एकाकी असणार रे तिच्यासाठी. ८/१० खोल्या असल्या तरी फक्त एकाच खोलीत लाईट लागलेली असेल. ती पण जेमतेम संध्याकाळी ८ वाजेपर्यंत.
कोरी चाय (चहा) जरी दिवसातून चार वेळा असली तरी ”एकटी साठी कित्याक व्हया” असा विचार करून तिच्या जेवणात फक्त पेज, मसाला आणि भात आणि कधीतरी भाकरी हेच असेल. कधी सणावाराला ”वाडी” घालण्यासाठी एखादा गोडधोड पदार्थ असेल. कधी आजारी पडली तर काळजी घेणारे कोणीच नसणार. जेवण तर दूरची गोष्ट पाणी पण देणारे आता कोणी नसणार. कधी कधी तर भीती पण वाटायला लागणार की एखाद्या आजारपणात अगदी एकटेपणात जीवच जायचा.
बाबू तू तिची सर्व सोय केलीस, तिला जाताना पैसे दिलेस, वाडीतील लोकांना तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितलास. दर दोन दिवसांनी फोन तर तू करणारच आहे. मात्र तीची सर्व सुख तुझ्यासोबत घेऊन गेलास रे. आता चतुर्थी सणाला ती खरे आयुष्य जगली. पुढे तू पुन्हा येईपर्यंत ती जे जगणार त्याला जगणे म्हणतात की नाही हा मला प्रश्न पडलाय. पोटापाण्यासाठी तुला जावे लागले हे मान्य, मात्र तू शक्य तितक्या दिवशी येथे येत जा रे. ” या वेळी सुट्टी नाय/मुलांची परीक्षा हा, यावेळी यायला जमणार नाही ” अशी कारणे देताना दहावेळा तिचा विचार कर. एवढीच विनंती आहे माझी तुला….
सागर तळवडेकर |सावंतवाडी :या वर्षीचा गणेशोत्सवात चाकरमानी आतापर्यंतचा सर्वात जास्त प्रमाणात रेल्वे प्रवास करत आपल्या गावी पोहोचलो खरे,परंतु चाकरमान्यांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, रेल्वे प्रशासनाला एकेरी मार्गावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.अनेकांना ४-५ तास स्टेशन वर ताटकळत उभे राहावे लागले, गाडीतील अस्वच्छता, पाण्याची असुविधा, सदोष बोगी संरचना आदी, अनेक छोट्या मोठ्या अडचणी ह्या सर्व चाकरमान्यांना येताना आणि मुंबईला परतताना सहन कराव्या लागल्या, आणि पुन्हा एकदा कोकणात स्वतंत्र असे टर्मिनस व्हावे ही जुनी मागणी डोळ्या समोर आपसूकच आली.
पण दुदैर्व.. “सावंतवाडी टर्मिनस” व्हावे असे कोकणी माणसाला वाटतच नाही असेच दिसते. चाकरमाण्यांपासून मालवणी माणूस देखील याला अनुकूल नाहीच असे दिसते. सावंतवाडीत टर्मिनस व्हावे यासाठी पहिल्यांदा कै. वालावलकर,आणि स्वतः कोकण रेल्वेचे जनक कै. मधु दंडवते यांनी नियोजन केले, त्यांनतर २००६ पासून समाजवादी आमदार कै. जयानंद मठकर, त्यांनतर कै. डी के सावंत यांनी अथक प्रयत्न केले, पत्रव्यवहार केले आणि त्याची पायाभरणी बॅरिस्टर नाथ पै यांचा वारसा पुढे नेणारे माजी खासदार श्री सुरेश प्रभू यांनी २०१५ ला केली. परंतु हे टर्मिनस आता निधी अभावी रखडणार आहे हे माझ्यासारख्या टर्मिनस प्रेमीला कितपत पचनी पडेल हे सांगता येत नाही. टर्मिनस साठी निधी नाही हे सांगत खासदार महोदयांनी आपले हात वर केलेत असेच काही दिसते आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असे बोलणे कितपत योग्य आहे हे येणारी निवडणुकीच ठरवेल.
काही जणांना टर्मिनस म्हणजे काय हे देखील माहित नसेल, त्यांसाठी मी थोडी त्याबद्दल माहिती देतो,रेल्वेचे टर्मिनस ज्या ठिकाणी प्रस्तावीत होते म्हणजेच त्या ठिकाणाहून रेल्वे सुरू करण्याचे / सोडण्याचे नियोजन करण्यात येते, रेल्वे सोडताना तेथे रेल्वे उभी करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका, रेल्वे बोगी धुण्याची सोय, पाणी भरण्याची सोय, आदी कामे केली जातात. जेणेकरून भविष्यात या टर्मिनस वरून काही गाड्या ह्या चालवण्यात येतील, त्या गाडीची देखभाल केली जाईल. ही सर्व कामे सध्या गोव्यातील मडगाव येथे केली जातात,परंतु सध्याचा घडीला मडगाव स्टेशन हे गणेशोत्सवातील किंवा इतर मोठ्या सण किंवा उत्सवाला अतिरिक्त भार घेण्यास सक्षम नाही. त्यामुळे कोकणातील या गर्दीचा भार उचलण्याचे काम सावंतवाडी टर्मिनस ने नक्की केले असते, जेणेकरून स्पेशल गाड्यांचे / दुप्पट दरात तिकिटे काढून प्रवास करणाऱ्यांना अशा प्रसंगाचा सामना करावा लागला नसता. म्हणून मी सर्वांना पुन्हा विनंती करतो की टर्मिनस, ते देखील रेल्वेचे टर्मिनस होण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. नाहीतर प्रवासादरम्यान असे वाईट अनुभव हे येतच राहतील.
माझ्या मते हा विषय केवळ सावंतवाडी पुरती मर्यादित नसून हा मुंबई आणि कोकण या दोन्ही भागांचा आहे कारण कोकणातील अर्धी मंडळी ही मुंबईला पोटापाण्यासाठी आहे आणि ही मंडळी आपला प्रत्येक सण आपल्या घरी म्हणजेच कोकणात येऊन साजरे करतात त्यामुळे ह्या जिव्हाळ्याचा विषयाला आज आलेल्या खासदारांचा विधानाने कुठेतरी कोकणी माणूस दुखावला असेल असेच दिसते. मी पुन्हा एकदा सांगतो की सावंतवाडी टर्मिनस होणे ही आजची खरी गरज आहे. आपण सर्वांनी यावर विचार करावा ही विनंती
वाचकांचेव्यासपीठ :कोकणात गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता रेल्वे स्टेशन व बस स्थानक येथील गर्दीवर नियंत्रणासाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीकरिता स्वयं सेवक, स्वयंसेवी संस्था यांनी पुढे आले पाहिजे.गणपती विसर्जन ठिकाणी अनेक स्वयंसेवी संस्था सेवा देतात. अनिरुद्ध अकॅडमी, संत निरंकारी मिशन ,नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान असे अनेक संस्था आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी व निर्माण झाल्यानंतर सेवा देतात. त्याच धर्तीवर कोकण गणेशोत्सवाला येणाऱ्या भाविकांसाठी मदत होईल. कोकणातील रेल्वे स्टेशन बस स्थानके येतील सेवा सुविधांचा अभाव आहे .काळजी घेणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांची भाविकांसाठी सेवाभावी उपक्रम ही पण एक गणपती बाप्पा चरणी सेवा अर्पण होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि पनवेल या स्थानकावर गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. गर्दी आणि नियोजनाअभावी अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते. दुसरीकडे कोकणातील स्थानकांवरील अपुऱ्या सुविधांमुळे येणार्या चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागतो अशा वेळी स्वयंसेवी संस्थांनी यात लक्ष घालून मदत केल्यास कित्येक चाकरमानी प्रवाशांचा त्रास नक्किच कमी होईल.