Category Archives: ज्ञान आणि मनोरंजन

नितीन गडकरी यांच्या कारकीर्दीवर चित्रपट येतोय; पोस्टर प्रदर्शित

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ‘गडकरी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे. ‘गडकरी’मध्ये नितीन गडकरींची रीं भूमिका कोण साकारेल? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘गडकरी’ या चित्रपटाच्या ट्रेलरची आणि टीझरची प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट बघत आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अनुराग भुसारी म्हणतात, ‘’नितीन गडकरी यांची राजकारणातील कारकिर्द निश्चितच उल्लेखनीय आहे. अभ्यासू, प्रभावी वक्ता, कणखर, निरपेक्ष विचार करणारा नेता, रस्ता सुधारणा प्रवर्तक. त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध बाजू जनतेला माहितच आहेत. समाज कल्याणाचा ध्यास असणाऱ्या या नेत्याचा राजकारणातील प्रवास तसा अनेकांना माहित आहे. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य व तरुण काळ तितकाच रंजक आहे. अशा या नेत्याचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’’ 27 ॲाक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे अनुराग भुसारी, मिहिर फाटे सहनिर्माते आहेत.

Loading

”मी एक घर बोलत आहे.. ” कोकणातील एका आईची व्यथा

मी एक घर बोलतेय, तुम्ही चाकरमानी आलात की भरलेले आणि बाकी पूर्ण वर्षभर ओसाड असलेल्या घरापैकी वाडीतील एक घर… खूप आहे मनात बोलण्यासारखे पण कधी काही बोलले नाही.. यावर्षी अगदी राहावले नाही म्हणुन मी माझ्यात वर्षभर एकट्या राहणार्‍या एका आईची, एका आजीची आणि एका सासूची व्यथा ईथे मांडत आहे ….

मी एक घर बोलतेय… गणपती मुक्कामाला गेलेत तसा तू पण आल्या वाटेने पाहुण्यांसारखा आपल्या शहरातील ”घरी” परतलास. तुझ्या आईने जाताना तुला पाणावलेल्या डोळ्याने “बाबू सांभाळून जा, कामधंदो जीव सांभाळून कर, फोन करीत रव” अशा शब्दात निरोप दिला.

निरोप देवून मागे फिरली आणि माझ्याकडे पाहिले,ओट्यावर येवून खूप रडली रे ती. माझ्याकडे पाहून का रडली असेल? या प्रश्नाचे उत्तर तुलाही माहीत आहे. चतुर्थी सणात जे रूप मला आले होते ते पूर्ण बदलले, कदाचित भकास झालेले रूप पाहून ती रडली असेल.

आता माझ्यात (घरात) पुढील कित्येक दिवस नको नकोशी वाटणारी शांतता असेल. या घरात आता तिच्या नातवंडांची किलबिल नसेल. तिला साद घालणारे किंवा तिने कोणाला साद घालावी असे कोणीही नसेल. तोंड असून मुक्या सारखे तिला जगावे लागेल. कधी बाबू तुझा फोन आला तेव्हाच फक्त तिचा आवाज मला यापुढे ऐकू येईल. दिवस तर ठीक आहे मात्र रात्र खूपच भयानक आणि एकाकी असणार रे तिच्यासाठी. ८/१० खोल्या असल्या तरी फक्त एकाच खोलीत लाईट लागलेली असेल. ती पण जेमतेम संध्याकाळी ८ वाजेपर्यंत.

कोरी चाय (चहा) जरी दिवसातून चार वेळा असली तरी ”एकटी साठी कित्याक व्हया” असा विचार करून तिच्या जेवणात फक्त पेज, मसाला आणि भात आणि कधीतरी भाकरी हेच असेल. कधी सणावाराला ”वाडी” घालण्यासाठी एखादा गोडधोड पदार्थ असेल. कधी आजारी पडली तर काळजी घेणारे कोणीच नसणार. जेवण तर दूरची गोष्ट पाणी पण देणारे आता कोणी नसणार. कधी कधी तर भीती पण वाटायला लागणार की एखाद्या आजारपणात अगदी एकटेपणात जीवच जायचा.

बाबू तू तिची सर्व सोय केलीस, तिला जाताना पैसे दिलेस, वाडीतील लोकांना तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितलास. दर दोन दिवसांनी फोन तर तू करणारच आहे. मात्र तीची सर्व सुख तुझ्यासोबत घेऊन गेलास रे. आता चतुर्थी सणाला ती खरे आयुष्य जगली. पुढे तू पुन्हा येईपर्यंत ती जे जगणार त्याला जगणे म्हणतात की नाही हा मला प्रश्न पडलाय. पोटापाण्यासाठी तुला जावे लागले हे मान्य, मात्र तू शक्य तितक्या दिवशी येथे येत जा रे. ” या वेळी सुट्टी नाय/मुलांची परीक्षा हा, यावेळी यायला जमणार नाही ” अशी कारणे देताना दहावेळा तिचा विचार कर. एवढीच विनंती आहे माझी तुला….

महेश धुरी, सावंतवाडी 

 

Loading

Ratnagiri : नमन आणि जाखडी या लोककलांना राजाश्रय मिळणार

रत्नागिरी : कोकणातील अनेक लोककला आज लोकप्रिय आहेत. त्यातील नमन आणि जाखडी या लोककलांना राज्य शासनाने मान्यता द्यावी अशा आशयाची मागणी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रत्नागिरी  जिल्हा नमन मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि हरिश्चंद्र बंडबे, श्रीकांत बोंबबों ले यांनी केली होती. या मागणीची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत उदय सामंत यांच्या विनंतीनुसार ती मागणी तात्काळ मान्य केली.
रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील नमन, जाखडी या लोककला आजही येथील मंडळींनी ळीं जीवापाड जपल्या आहेत. पण नमन लोककलेची साधी नोंदही शासकीय दरबारी केली नाही. सध्या नमन कलाकारांची ‘रात्री राजा आणि सकाळी डोक्यावर बोजा’ अशी वाईट स्थिती आहे. त्यामुळे या लोककलेला राजाश्रयाची खऱ्या अर्थाने गरज आहे.
नमन अनेक नाट्यसंमेलनांच्या माध्यमातून जगभर पोहचले. पण कोकणातील नमन, जाखडी सादर करणारी हजारो मंडळे मात्र दुर्लक्षित होत आहेत आणि ही हजारो मंडळे राजाश्रयाच्या प्रतिक्षेत आहेत. या कलेची शासन दरबारी आजही नोंदनों व्हावी अशी मागणी आहे. कोकणात नमन तथा खेळे, शक्तीतुरा म्हणजे जाखाडी नृत्य या कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यातील नमन या लोककलेची प्रसिद्धी जगभर पसरली आहे.

Loading

लेख | कुडाळ ते वेंगुर्ला आणि गजाली भूतांचे

संजय गोविंद घोगळे  |  गुमनाम है कोई…… कारच्या टेप मधून लतादिदिंचे स्वर कानावर पडत होते. रात्री खूप उशीराची वेळ नव्हती ती, संध्याकाळचे जेमतेम सात वाजले असतील. पण कुडाळ वेंगुर्ला रस्त्यावरचा वळणावळणाचा रस्ता आणि पावसाचा शिडकावा यामुळे काळोख अजूनच दाट वाटत होता. जवळजवळ पंचवीस वर्षानंतर मी मुंबईतून ओरोसला ट्रान्स्फर होऊन आलो होतो. वेंगुर्ला ते ओरोस स्वत:च कार ड्राईव्ह करत जात-येत होतो. ओरोसला जॉईन होऊन जेमतेत महिना झाला असावा, त्यात शिफ्टींगसाठी बारा दिवसाची रजा. कामाच्या ठिकाणी फारशी ओळख झालेली नसल्याने सोबतीला कुणीच नव्हते, पन्नाशी उलटून गेल्यामुळे रात्रीच्या गाडी चालवताना मध्येच समोरुन येणाऱ्या वाहनांच्या हेडलाईटसचा त्रास सहन करावा लागत होता. अतिशय सावधपणे गाडी चालवत असताना… अरे आत्ताच तर मी इथून पुढे गेलो होतो आणि गाडी त्याच रस्त्यावरुन परत परत जातेय असा सतत भास होत होता. ओरोसवरुन वेंगुर्ल्याला गाडी सावकाश चालवली तरी रात्रीच्या वेळ जास्तीत जास्त एक तास लागतो तरीही आपण गाडी खूप वेळापासून चालवतोय असे वाटत असताना एका वळणावर कारच्या डाव्या बाजूने पांढरी आकृती अचानक कार समोर आली. जरी गाडी वेगात नसली तरी उजव्या बाजूला गाडी वळवून करकचून ब्रेक मारला तरी धडक वाचवणे अशक्य होते. पण आश्चर्य…. गाडीला कुणीच धडकले नव्हते. अगदी आसपास कुणीच नव्हते, मी आसपास कुणी दिसतेय का पहाण्याचा प्रयत्न केला…. कुणीच नव्हते. कुणीतरी धावत आलं असेल आणि अचानक गाडी समोर बघून  मागे हटले असणार आणि मागच्या मागे झाडीत पळून गेला असेल अशी मी तेंव्हा स्वत:ची समजूत घालून घरी मार्गस्थ झालो.
 ही घटना सप्टेंबर २०२२ मधील असेल, नंतर अजून दोन-तीन वेळा असाच अनुभव आला. पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर गाडी चालवतोय असे वाटणे, रस्ता निर्मनुष्य असताना अचानक कुणीतरी गाडीसमोर येणे आणि गायब होणे. गाडी समोर येणारी आकृती पांढऱ्या साडीतील बाई सारखी असायची. हा प्रकार नेहमी नेहमी होऊ लागला म्हणून मी शेवटी हा अनुभव बायको सोबत शेअर केला. भुता-खेतांवर प्रचंड विश्वास असलेली ती काहीच प्रतिक्रीया न देता किचन मध्ये निघून गेली. ऑफिसमध्ये मात्र काहीतरी विषय निघाला म्हणून मी हा अनुभव शेअर केला. ‘होय मा.. आम्ही पण ऐकला हां… वेंगुर्ल्याचो रस्तो खतरनाकच आसा, असो अनुभव ऑफिस मधल्या अजून एक-दोन लोकांका इलोहा’. मी मात्र विचारात पडलो, भूत वगैरे अंधश्रध्दा असते या विचारांचा मी. असे कसे होऊ शकते… निदान माझ्या पुरता मी शोध लावण्याचा प्रयत्न केला असता, एकटा असल्याने विचाराच्या तंद्रित मला असे भास झाले असणार या ठाम निष्कर्षापर्यंत येऊन मी पोहचलो.
 नंतर माझ्या गाडीतले मेंम्बर वाढत गेले, तसा हा प्रकार एकदम बंद झाला. नाही म्हणायला मी आणि माझा मित्र दोघेच असताना साज श्रृंगार केलेल्या एका स्त्रीने लिफ्टसाठी निर्मनुष्य ठिकाणी हात दाखवला होता. मी त्या स्त्रीला लिफ्ट देण्यासाठी गाडी थांबवत असताना, ‘मेल्या गाडी थांबव नको… चल बेगीन’ म्हणत मित्राने मला गाडी थांबविण्यापासून रोखलं होते. नंतर त्याने क्लिअर केले की, भूत वगैरे असेल असा काही त्याचा समज नव्हता पण अश्या निर्मनुष्य रस्त्यावर एका नटून थटून दागिने घातलेल्या स्त्रीला लिफ्ट देणे त्याला धोक्याचे वाटले होते. मी आसपासच्या गावातील लोकांना फारसा ओळखत नव्हतो, पण माझा मित्र आसपासच्या गावातील लोकांना ओळखत होता. त्याने त्या स्त्रीला यापुर्वी कधीच पाहिले नव्हते. असे अनुभव येणे नंतर एकदम बंद झाले, अर्थात आता संध्याकाळी काळोख लवकर होत नाही. नाही म्हणायला ३१ मार्च च्या रात्री (म्हणजेच १ एप्रिल सुरु झाला होता) अस्मादिकांनी रात्री साडेबारा ते एक च्या दरम्यान याच रस्त्यावरुन प्रवास केलाय.
 भूत वगैर अंधश्रध्दा असते, या निष्कर्षापर्यंत पोहचून मला बरीच वर्षे झालीत. पण नाही म्हणायला अज्ञात ठिकाणी एकांतात असताना काळोख असेल तर भीती वाटतेच हे नाकारुन चालणार नाही. लहानपणी मात्र भूतांना मी प्रचंड घाबरायचो. नानाच्या थेटरात ‘फिर वही रात’ पाहिल्यावर कित्येक रात्री लघूशंका करायला बाहेर जाताना सुध्दा माझी प्रचंड टरकायची. चाळीतील माझ्या घरा समोरील चिंचेच्या आणि चाफ्याच्या झाडावर चित्रविचीत्र आकृत्या दिसायच्या. नंतर भास, स्वप्न आणि वास्तव्य या एकमेकात एवढ्या मिसळून गेल्या की मी भूत पाहिले आहे या विश्वासावर मी येऊन ठेपलो होतो. पुढे वाचन आणि अनुभव यातून भूतांच्या गोष्टीमधील फेकपणा माझ्या लक्षात येत गेला आणि भिती नाहीसी होत गेली. परंतु लहानपणीची भूतांची मनात असलेली भिती अजूनही डोके वर काढते आणि पुन्हा असे कधीतरी अनुभव म्हणा वा भास होतच असतात.
 अलिकडेच शाळकरी मित्रांबरोबर गप्पा मारत असताना गप्पा भूतांच्या गोष्टींवर येऊन ठेपल्याच. यात काही उच्च शिक्षीत म्हणजे डॉक्टर, इंजीनिअर होते तर काही पुरोहीत आणि कष्टकरी सुध्दा होते. पण ते सांगत असलेल्या गोष्टी मधून त्यांचा भूतावर विश्वास ठाम असल्याचे लक्षात येत होते. त्या गप्पामधील काही अनुभव माझ्या शब्दात थोडक्यात इथे विषद करण्याचा प्रयत्न करतो, इथे नावे मात्र मी मुद्दाम वेगळी लिहीतोय. ‘रेखा तू सांग मगो मी भूताची गोष्ट…’ थोडाच मस्का मारल्यावर तीने रंगात येऊन गोष्ट सांगायला सुरुवात केली. वेंगुर्ला मारुती स्टॉपच्या आसपास एक घर होते, प्रचंड मोठे पेढीवजा असलेल्या  त्या घराची डागदुजी चालू होती. त्यासाठी भिंतीवरचे फोटो बाजूला काढून ठेवले होते. एक कामगार एकटाच काम करत असताना अचानक मागे कुणीतरी उभा असल्याचा त्याला भास झाला. मागे वळून पाहिले असता कुणीच नाही, असे एक-दोन वेळा झाल्यावर शेवटी त्याला दरवाज्याला हात लावून उभी असलेली व्यक्ती त्याला दिसली. त्यांच्याशी त्याच्या गप्पाही झाल्या, त्या व्यक्तीचा पगडी वगैरे जुन्या काळातील पेहरावातून त्याचा वेगळेपणा त्याला जाणवला. दुसऱ्या दिवशी घरातील लोकांना त्याने हा अनुभव सांगितला असता, अशी कुणीच व्यक्ती घरात नसल्याचे निदर्शानास आले. कामगार मात्र आपल्या मतावर ठाम होता, शेवटी बाजूला ठेवलेल्या एका फोटोतील व्यक्तीवर त्याने बोट दाखविले ‘ह्येच ते’ आणि सगळ्यांची बोबडी वळली. त्याने ज्या फोटोकडे बोट दाखविले होते त्यांना स्वर्गवासी होऊन बरीच वर्षे झाली होती.
 ‘तुमका ती गजाल म्हायत आसा काय, पेपरात सुध्दा इलेली….’ एखादी घटना सत्य कशी आहे हे सांगण्यासाठी तीची प्रसारमाध्यमातून झालेली प्रसिध्दी हा मोठा दाखला समजला जातो. एक एक भुतांच्या गोष्टी ऐकून आता प्रसाद रंगात आला होता. एक रिक्षावाला रात्रीच्या वेळी काही प्रवाशांना घेऊन जात होता. मध्येच त्यातील त्यांना कुणीतरी भेटते आणि रिक्षा थांबवून त्यांच्या गप्पा सुरु होतात. बरीच प्रतिक्षा केल्यावर रिक्षावाल्याचा लक्ष सहज बाहेर ऊभा राहून गप्पा मारणाऱ्या त्या व्यक्तीच्या पायाकडे जाते आणि त्याला घाम फुटतो. त्या व्यक्तीचे पाय ऊलटे असतात. ‘ओ… तुम्ही बघल्यात काय… तुम्ही जेच्याशी गजाली मारु होत्यात त्येचे पाय ऊलटे होते’, थोड्यावेळाने रिक्षावाला रिक्षा पुढे नेल्यावर आतील प्रवाशांना पाहिलेल्या प्रकाराची कल्पना देण्याचा प्रयत्न करतो. आतील प्रवाशी मात्र निर्विकारपणे उत्तर देतात ‘त्येच्यात काय एवढा, पाय आमचेपण उलटे आसत’.  ‘होय खरा आसा, कुणाकय ईचारा, पेपरात पण छापान इलेला’. प्रसाद वारंवार ही घटना वृत्तपत्रात छापून आल्याचा दाखला देत होता, ‘नंतर तो रिक्षावालो शीक पडलेलो’.
 नंतरच्या बऱ्याच गजालीपैंकी रिक्षावाल्यांनी पाहिलेल्या भूतांच्या अनुभवांच्या होत्या. रिक्षातील प्रवासी, त्यांचे अचानक गायब होणे, प्रवाशांकडे वळून पाहिल्यावर त्यांचा अक्राळविक्राळ चेहरा हे नेहमीचे गजाली सुरु होते. ‘आणि तुमका म्हायत आसा काय…. तो रिक्षावालो कोण होतो?’ सुरेश भूते असतात याला सायन्सचा आधार देऊन आम्हाला पटवून देण्याच्या प्रयत्नात असताना (तसा प्रयत्न करण्याची फारशी गरज नव्हती म्हणा, कारण भूत नसते हे पटवून द्यावे लागते, एवढा भूतांवर लोकांचा विश्वास आहे.) एका रिक्षावाल्याच्या अनुभवाची गोष्ट सांगताना तो रिक्षावाला आमच्या मित्रपरिवारातीलच एक असल्याचा दाखला देतो.
 ‘हि गोष्ट जुनी आहे, पनवेल तालुक्यातील….’ तीस एक वर्षापूर्वीची. कोकणातच पण रायगड जिल्ह्यात आणि मुंबईतच वाढलेली सुवर्णा मग रंगात येऊन तीने ऐकलेली भूताची गोष्ट सांगायला सुरुवात करते. माझे भावोजी एका कंपनीत कॅशीअर होते. दिवाळीचा बोनस वाटता वाटता रात्रीचे बारा वाजले होते. त्याकाळी पगार, बोनस वगैरे सर्व व्यवहार रोखीतच होत होते. कंपनीची शेवटची बस निघण्याची वेळ झाल्याने भावोजी घाईत होते. ‘राणे माझा बोनस नाही दिला तो’, ‘अरे तुला कसा बोनस देणार तू कालच मेलास ना, काही काळजी करुन नको मी देता तुझ्या बायकोकडे सगळा तुझा हिशोब’. भावोजींनी वर मान न करताच उत्तर दिले आणि ऑफिस मधून घाईघाईने घरी निघून आले. सकाळी नंतर त्यांच्या लक्षात आले… अरे हा तर माणूस परवाच मेला होता, हा बोनस मागायला कसा आला… आणि मीही त्याला तू मेलास असे सांगतोय. 
 गोष्टी रंगत चालल्या होत्या. वेळही रात्रीची होती. खाडीच्या किनारी चंद्रप्रकाशात एक गोष्ट संपली की दुसरा लगेच आपली गोष्ट सांगायला सुरुवात करत होता. एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे सगळ्यांचे हे स्वत:चे अनुभव नव्हते, तर त्यांच्या विश्वासातल्या कुणीतरी त्यांना आपले अनुभव सांगितलेले असतात. त्याने ते जशीच्या तशी आम्हाला सांगितली असेल याची खात्री मी देत नाही, कारण मीच या गोष्टीपैंकी काही गोष्टी इथे विषद करताना थोडातरी बदल नक्कीच झाला असेल. मी या गोष्टी ऐकताना गोष्टी मागच्या गोष्टींचा विचार करत बसलो होतो. गप्पा संपता संपत नव्हत्या पण ‘संजय तू ह्येचार कायतरी एकदा लीव असे सांगून’, जेवण तयार आहे असा निरोप आल्यावर या गोष्टी संपल्या.
 साधारण तीस वर्षापूर्वी मी पत्रकार असताना (होय, आता जरी मी शासकीय अधिकारी असलो तरी कॉलेज पूर्ण झाल्यावर दोनएक वर्षे मी फुलपगारी पत्रकारीता सुध्दा केली होती), वेंगुर्ल्यात एका घरावर दगड पडतात असा भुताटकीचा प्रकार घडला होता. मी तो प्रकार रंगवून वृत्तपत्रात प्रसिध्द केला होता. पण हा भुताटकीचा अनुभव ऐकताना, त्या गोष्टी मागच्या गोष्टीचा त्यांच्याकडून नकळत आढावा घेत होतो. दोन चार दिवसांनी हा भुताटकीचा प्रकार कसा बनावट आहे, तो कोण करतोय याचा सगळा वृतांत प्रसिध्द केला आणि त्याच दिवसापासून आपोआप तो भुताटकीचा प्रकार बंद झाला. प्रथम मी या भुताटकीच्या प्रकाराचे वृतांत दिल्यानंतर त्यावेळच्या जिल्ह्यातील सगळ्या वृत्तपत्रात हे वृत्त छापून आले होते. त्यामुळे याची दखल अनिस ने घेतली होती. एक-दोन महिन्यांनी अनिस ने याचा शोध घेऊन आपला अहवाल सर्व वृत्तपत्रात प्रसिध्द केला होता. वाईट एवढेच वाटत होते की त्यात त्यांचे असे काहीच प्रयत्न नव्हते, माझा भुताटकी प्रकार खोटा असल्याचा वृतांत जसाच्या तसा त्यानी आपला अहवाल म्हणून दिला होता. त्या दिवसापासून अनिसच्या क्षमतेवरचा माझा विश्वास उडाला तो आजपर्यंत.
 जाता जाता माझा अजून एक अनुभव इथे शेअर करतोय, ‘चंपू आसा काय घरात?’ साधारण चाळीस एक वर्षापूर्वीची गोष्ट. वेंगुर्ल्यातील एका प्रसिध्द खानावळीची मालकीण आणि तीच्या मुली घाबरत घाबरतच सकाळी आमच्या घरी आल्या होत्या. (माझ्या आईला चंपू या नावानेच सर्वजण ओळखत. लोकांची धुणीभांडी करुन तीने आम्हाला वाढवले.) आदल्यादिवशी मध्यरात्री माझ्या आईला त्यांनी घरी आणून सोडले होते, मुसळधार पावसात एवढ्या मध्यरात्री आपण ज्या व्यक्तीला घरी नेऊन सोडले ‘ता नेमका चंपूच होता ना’ याची खात्री करण्यासाठी आल्या होत्या. माझ्या आईला त्यांनी पाहिले आणि तीनेही जेंव्हा त्यांना खात्री करुन दिली की ती मी च होते, तेंव्हा त्यांना हायसे वाटले. माझी आई मात्र घाबरल्याने तापाने फणफणत होती.
 या घटनेने बऱ्याच जणांना भूताचा संशय आला होता ती घटना अशी, माझी आई वेंगुर्ल्यातील एका प्रसिध्द हॉटेलमध्ये कांदा-बटाटा चिरायला जायची. हॉस्पिटल नाक्याजवळ असलेल्या या हॉटेलाचे मालक आमच्या घरापासून एकदी थोड्या अंतरावरच रहायचे. दुसऱ्या दिवशीच्या पदार्थांची तयारी आदल्या दिवशी रात्री चालायची. कांदे-बटाटे चिरताना रात्रीचे दहा-अकरा वाजले असतील. बाहेर तुफान पाऊस सुरु झाला होता, त्यात लाईटही गेला होता. आम्ही भावंड तेंव्हा अगदी लहान होतो त्यामुळे हॉटेलची मालकीण थांब म्हणत असताना देखील आई घरी जाण्यासाठी बाहेर पडली. पावसापासून वाचण्यासाठी डोक्यावर गोणपाट आणि प्रकाशासाठी करवंटीची बॅटरी. त्याकाळी बॅटरी हा प्रकार दुर्मिळ होता, करवंटीच्या आत मेणबत्ती लावून त्याचा बॅटरी सारखा वापर केला जायचा. त्या हॉटेल मालकाचे घर आणि आमचे घर म्हणजे कुबल चाळ यांच्या मध्ये एक रस्ता रहाटाच्या विहीरी जवळून स्मशानभूमीत जायचा. आता या रस्त्यावर देखील वसती झाली आहे, पण पूर्वी हा रस्ता पूर्ण सुमसान असायचा. आई आम्हा लेकरांच्या काळजीने निघाली, तुफान वादळवाऱ्यात त्या करवंटीच्या बॅटरीचा काहीच निभाव लागला नाही. त्यामुळे चुकून माझी आई चाळीत जाण्यासाठी उजव्या हाताला वळायच्या अगोदर थोड्या अगोदरच उजव्या हाताला स्मशानात म्हणजेच तांबळेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर वळली. काळोखात काहीच दिसत नसल्याने धडपडत ती चालत होती. खर्डेकर रोडला मार्केटच्या दिशेन जाताना उजव्या हाताला वळल्यावर अगदी दहा-बारा पावलावर कुबळ चाळ आहे. परंतु एवढा चालून सुध्दा आपले घर येत नाही हे पाहून ती घाबरली. चालत चालत ती स्मशानात पोहचली आणि तेथूनच ती गाडी अड्ड्यात खाली उतरली. तीच्या सुदैवाने तीथे एक मनुष्य तीला दिसला, ‘झीला माका घराकडे नेवन सोड… मी वाट चुकलसय’ अशी ती त्याला विनवणी करु लागली. तो बिचारा ते ऐकून धूम पळाला. तो कोण होता ते मला अजून कळलेले नाही, पण त्याची झालेल्या अवस्थेची कल्पना करुन मला अजूनही हसू आवरत नाही. मध्यरात्री बाराच्या दरम्यानची वेळ स्मशानातून एक बाई येतेय, केस पिंजरलेले आणि मला घरी सोड असे सांगितल्यावर त्याची बोबडी नक्कीच वळली असणार. पुढे माझी आई चालत चालत गाडी अड्ड्यातून खाली आली आणि वेंगुर्ला मारुती स्टॉपच्या जवळ असलेल्या एका खानावळीजवळ थांबली. वीजांच्या कडकडाटात तीला ते परिचयाचे घर ओळखू आले. या खानावळीच्या मालक परिवाराकडे माझी बहिण आणि भाऊ कामाला होते त्यामुळे तीने त्यांच्याकडे मदतीची याचना केली. त्यांनीही घाबरत घाबरतच घराचा दरवाजा उघडला आणि तीला घरी आणून सोडले.
 ही घटना या लेखाचा शेवट करताना नमूद करण्याचे कारण हेच की एका छोट्याशा घटनेत सुध्दा आपणास भूत पाहिल्याचा संशय येऊ शकतो. माझी आई मध्यरात्री वाट चुकते काय, ती स्मशानात पोहचते काय, तेथून खाली उतरल्यावर ज्याच्याकडे मदतीचा याचना करते काय, तो भूत समजून घाबरुन पळून जाते काय आणि एवढेच नव्हे ज्यांनी तीला घरापर्यंत आणून सोडले त्यांनाही असाच भुताटकीचा संशय येतो काय. सगळच अजब पण मानवाला भूताची असलेली भीती आणि त्याचा पगडा यातून दिसून येतो.
 भूत आहे किंवा नाही, यावर इथे मी भाष्य करत नाही. पण भूताच्या गोष्टी आणि त्याची भीती जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या जवळजवळ सर्वच लोकांमध्ये आहे हे मात्र नक्की.
(खाली मी माझा फोन नंबर नेहमीप्रमाणे दिलेला आहे, पण कृपया फोन करुन तुमचे भूताचे अनुभव मला ऐकविण्याची तसदी घेऊ नका ही विनंती, त्याऐवजी जमलेच तर व्हाटसअप्प करा.)
– संजय गोविंद घोगळे (८६५५१७८२४७)

Loading

सोन्याच्या शुद्धतेबद्दल साशंक? बीआयएसच्या ‘या’ मोबाईल ऍप्लिकेशनवर शुद्धता तपासा

Gold Purity Test – आपण विकत घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत कायमच आपल्या मनामध्ये एक शंका असते. यावर उपाय म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजेच बीआयएस ने एक स्मार्टफोन ऍप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे.

या ॲपचं नाव बीआयएस केअर ॲप असे असून त्या ॲपद्वारे हॉलमार्क सर्टिफाइड गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी च्या शुद्धतेबाबत खात्री पटवता येते.बीआयएस ही भारतातील स्टॅंडर्ड बनवणारी एक राष्ट्रीय संस्था आहे.

बीआयएस केअर ॲप कसे डाउनलोड करावे?

अँड्रॉइड फोनचा वापर करणाऱ्यांनी प्ले स्टोअर मध्ये जाऊन बीआयएस केअर ॲप असे सर्च करावे आणि ते ॲप इन्स्टॉल करावे

ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये आपले नाव फोन नंबर आणि ईमेल आयडी एंटर करावा.

ओटीपीचा वापर करून आपला फोन नंबर आणि ईमेल आयडी कन्फर्म करावा.या ॲपचा वापर करून तुम्ही सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत चाचणी करू शकता. या ॲपमध्ये व्हेरिफाय HUID नावाचे फीचर आहे. तुम्ही विकत घेतलेले सोन्याचे दागिने जर हॉलमार्क सहित असतील तर तुम्ही व्हेरिफाय HUID वापर करू शकता. 

HUID नंबर म्हणजे काय? 

एक जुलै 2021 रोजी भारत सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचे सिम्बॉल बदलले. या नियमानुसार सोन्याच्या दागिन्यांवर तीन सिम्बॉल असतील.

1. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचा हॉलमार्क

2. सोन्याची प्युरीटी ग्रेड

3. सहा आकडी अल्फा न्यूमेरिक HUID नंबर

HUID नंबर हा इंग्रजी अक्षरे आणि अंक यांच्यापासून बनलेला आहे. सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करताना दागिन्याच्या प्रत्येक तुकड्याला HUID नंबर दिला जातो. हा नंबर युनिक असतो. ज्वेलरीवर हा नंबर स्टॅम्प केलेला असतो.

31 मार्च 2023 नंतर  सहा आकडी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID शिवाय कुठल्याही प्रकारचे सोन्याचे दागिने विकण्यास बीआयएसने मनाई केली आहे.

जर तुम्हाला आपण खरेदी केलेल्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत, हॉलमार्कबाबत काही तक्रार असेल तर ती तुम्ही या ॲपचा वापर करून दाखल करू शकता.

 

Loading

मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ चे आयोजन

मेगा रिक्रेयशन तर्फे ‘आ॑तरराष्ट्रीय लघुपट महोत्सव” चे आयोजन करण्यात आले असून. या महोत्सवमध्ये भारतीय तसेच परदेशी भाषिक लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना ” ईंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक आहे. या महोत्सवमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख २३ एप्रिल २०२३ असून सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना तसेच सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा, पटकथा, संवाद, छायांकन, संकलक ईत्यादी गटांप्रमाणे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात येणार आहे. तसेच भाग घेणाऱ्या सर्व लघुपटांना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. अधिक माहितीकरता 7021642822 / 8108889100 यावर संपर्क साधायचा आहे.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सिनेमा संस्कृतीचे जतन, संवर्धन व विकास तसेच सिनेमा कलाकारांना, कलागुणांना वाव देण्यासाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

Loading

मराठी भाषेला केंद्राकडून ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळणार?

मुंबई, दि. २७: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य छगन भुजबळ यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भातचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधानांची भेट घेईल आणि त्यांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
  • भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
  • भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
  • भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत
  • प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावे

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने काय फायदा होतो?

  • अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात.
  •  अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येतं.
  • प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं.
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
मराठी भाषेसाठी प्रयत्न
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून ५०० पानांचा अहवाल भारतीय केंद्र सरकारकडे सादर केला होता. त्यावर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मंत्रिमंडळ पातळीवर विचाराधीन आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असं उत्तर केंद्राने दिलेलं आहे. त्यामुळे मराठीला कधीपर्यंत अभिजात दर्जा मिळेल हे चित्र अजूनही अस्पष्टच आहे.

Loading

उपग्रह टॅगिंग – ऑलिव्ह रिडले कासवांचे गूढ उलगडणार ?

रत्नागिरी: जिल्ह्याच्या गुहागर किनाऱ्यावर बुधवारी दोन ऑलिव्ह रिडले कासवांना  उपग्रह टॅगिंग करण्यात आले. राज्याचा कांदळवन कक्ष आणि डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग करून त्या माध्यमातून समुद्रातील त्यांचा भ्रमणमार्ग शोधण्यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. 
‘बागेश्री’ आणि ‘गुहा’ नामकरण 
 टॅगिंग केलेल्या कासवांपैकी  एक-मादी बाग या भागात सापडल्याने तिचे नाव ‘बागेश्री’ ठेवण्यात आले, तर गुहागर या नावावरून दुसरीचे नाव ‘गुहा’ असे ठेवण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील कासव-मित्र तृशांत भाटकर यांनी  दिली आहे.
टॅगिंग चा इतिहास 
पूर्वी भारताच्या पूर्व किनाऱ्यावर या कासवांचे टॅगिंग झाले होते. पश्चिम किनाऱ्यावर गेल्या वर्षी (२५ जानेवारी २०२२) पहिल्यांदाच उपग्रह टॅगिंग करण्यात आले होते. सुरुवातीला मंडणगड (वेळास), आंजर्ले (दापोली) या किनाऱ्यावरील प्रत्येकी एका कासवाला ट्रान्समीटर लावले होते. त्यानंतर आणखी तीन कासवांना ट्रान्सलेटर बसवून तेही गुहागरमधून सोडले होतो. ते मादी कासव श्वास घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यानंतर हे ट्रान्सलेटर त्यांच्या ठिकाणाचे संकेत उपग्रहाला पाठवल्यानंतर त्यांच्या अधिवासाची माहिती अभ्यासकांना मिळत होती. सहा-सात महिन्यांनंतर अचानक माहिती येणे बंद झाले होते. यंदाच्या वर्षी कासवांना पुन्हा ट्रान्समीटर बसवण्याचा निर्णय भारतीय वन्यजीव संस्थान (डब्ल्यूआयआय), कांदळवण कक्ष, वन विभागाने घेतला.
टॅगिंग का केली जात आहे?
हा प्रकल्प यशस्वी झाल्यास या कासवांबद्दल काही गूढ गोष्टी समजण्यास मदत होईल. त्यात या कासवांच्या स्थलांतराचा पॅटर्न कोणता? ती कुठून येतात? कोणत्या ठिकाणी जास्त वेळ राहतात? याशिवाय आपणास  माहित नसलेल्या अनेक गोष्टी समजू शकतील.
कशी केली जाते टॅगिंग
टॅगिंग करण्यासाठी किनारपट्ट्यावर आलेले योग्य वजनाचे ऑलिव्ह रिडले जातीचे मादीकासव निवडले जाते. टॅगिंग उपकरणाचे वजन या कासवांच्या प्रवासास त्रासदायक ठरू नये यासाठी एक नियम ठरविण्यात आलेला आहे. उपकरणाचे वजन कासवांच्या वजनाच्या ३% पेक्षा जास्त असू नये. निवडलेल्या मादीचे कवच साफ करून एका विशिष्ट गमाने उपकरण चिटकवले जाते आणि त्यावर निळा रंग देण्यात येतो. सुमारे ७ ते ८ तासांनी  हा गम सुकल्यावर त्या मादीस समुद्रात सोडण्यात येते.
या उपकरणाला एक बटण असते. जेव्हा कासव श्वास घेण्यास समुद्राच्या पृष्ठभागावर येते तेव्हा या बटनावरचा दाब कमी होऊन बॅटरी कार्यन्वित होते आणि हे उपकरण सेटेलाईटला सिग्नल पाठवते. त्यामुळे या कासवाचे स्थान (Live Location)  माहिती होण्यास मदत होते.   

Loading

मालवणात जप्त करण्यात आलेली व्हेल माशाची उलटी (अ‍ॅम्बरग्रीस) म्हणजे नक्की काय?

सिंधुदुर्ग: तळाशील मालवण येथून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालवण पोलिसांनी कार्यवाही करून व्हेल मासाउलटी सदृश 27 तुकडे जप्त केले आहेत. मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली एच व्ही पेडणेकर व सुशांत पवार यांच्या पथकाने गुरुवारी रात्री ही कार्यवाही केली आहे. पंचनामा, जबाब नोंदनों तसेच वन विभागाच्या ताब्यात २७ तुकडे देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मालवण पोलिसांनी सांगितले. सापडलेले तुकडे व्हेल मासा उलटी आहे की नाहीत याचीही तपासणी होणार आहे.

व्हेल माश्याच्या उलटीला एवढे महत्व का?

व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अ‍ॅम्बरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीनें विकले जाते. त्यात अ‍ॅम्बरग्रीस (व्हेल माशाची उलटी) यापासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अ‍ॅम्बरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह (स्थिरीकरण द्रव्य) म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.

उलटी कशी बनते

शरीरातील अपचन झालेले पदार्थ बाहेर टाकले जातात. वैज्ञानिक भाषेत याला अ‍ॅम्बरग्रीस असे म्हटले जाते. स्पर्म व्हेलच्या शरीरातून निघणारा हा पदार्थ काळ्या रंगाचा असून हा ज्वलनशील पदार्थ मानला जातो. व्हेलचे आवडतं खाद्य म्हणजे, म्हाकुळ होय. म्हाकुळचा तोंडाचा भाग पोपटाच्या चोचीसारखा असतो. तो पचन नाही. तसेच व्हेल कोळंबी खातो. ज्याचा भाग कडक असल्यामुळे तो पचत नाही. न पचलेला भाग व्हेल उलटून टाकतो. त्यात विविध प्रकारची रसायनेही असतात. उलटी लाटांवर तरगंत राहिल्यामुळे आपसूक त्यावर प्रक्रिया होते आणि ती मेणासारखी बनते. समुद्राच्या लाटाबरोबर ती तरंगत किनार्‍याला लागते

उलटी कशी ओळखतात?
स्पर्म व्हेलच्या उलटी ओळखण्यासाठी काही प्राथमिक गोष्टी सांगितल्या जातात. उलटीतील न पचलेल्या भागात म्हाकुळच्या दातासारख किंवा कडक कवचासारखे भाग आढळतात. गरम सुई उलटीच्या गोळ्यात खुपसली तर तो वितळतो आणि त्यातून काळा धूर येतो. त्याचा रंग काळपट असतो. तसेच काहीवेळा जहाजाचं तेल किंवा त्यातील बाहेर टाकलेले घटकांचा गोळाही तयार होतो. तो मेणासारखा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही उलटी उपयुक्त आहे की नाही याची चाचणी विशिष्ट ठिकाणीच करता येते.

बंदी का?
या उलटीची किंमत जास्त असल्याने लोक व्हेल माशाला पकडून त्याच्या पोटातून त्याची विष्ठा काढण्याचा प्रयत्न करतील अशी सरकारला भीती वाटते आणि त्यामुळे त्या माशाची जात नष्ट होण्याची भीती वाटते.

Loading

कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!

मुंबई : येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पहिले जात आहे.
‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.
राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे.  चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत  किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.
कोकणच्या मातीचा गंध
ह्या चित्रपटाला कोकणच्या मातीचा गंध आहे. कारण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील निवती आणि कोकणातील इतर भागात झाले आहे. कोकणात मूळ असेलेले आणि आपल्या मातीविषयी अतुल प्रेम असलेले अभिजीत वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या आधीचे चित्रपट देखील कोकणात चित्रित झाले होते. त्यातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिकासो’ या अमेझॉन प्राईम  ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ श्रेणीत गौरव प्राप्त केला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण तळकोकणातील कुडाळ ह्या गावात झाले होते. कोकणातील पारंपरिक कला दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित होता.  कोकणात मूळ असल्याने इथे मला चित्रपट सुचतात आणि मी करतो असे त्यांचे म्हणणे आहे. एका आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण पण ते कोकणात करणार आहेत असे म्हणाले आहेत.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search