नागपूर: नागपूरमध्ये काल सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र सध्या बहुतेक भागात तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत.
सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून महाल परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. काल रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत.
महसूलमंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी सकाळी 10 वाजता नागपूर येथे येत असून, ते महाल भागातील पाहणी करणार आहेत. प्रशासनातील वरिष्ठांशी संवाद करतील. मीडियाशी संवाद साधतील, अशी माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा हात जायबंदी झाली आहे.