



Mansoon Updates: यंदाचा उन्हाळा यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. वातावरणातील या बदलाचा परीणाम मान्सूनच्या आगमनावर करणारा ठरणार आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडय़ात वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे.
यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला. थंडी कमी अन् ऊन जास्त, असे वातावरण होते. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. त्यापाठोपाठ मार्च आणि एप्रिलमध्येही तीच स्थिती आहे. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला तसेच सरासरी पाऊस कमीच झाला. त्यामुळे मार्च महिना पूर्ण उष्ण ठरला.एप्रिलची सुरुवातही खूप कडक उष्ण झळांनी झाली. गत अनेक वर्षांतील यंदाचा एप्रिल उष्ण ठरत आहे. हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असे आहे.
हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते असून, सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान, वार्याची दिशा, हवेचे दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान 31, तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. हवेचे दाब सध्या समुद्रावर 1005 ते 1010 हेक्टा पास्कल इतके आहेत.
देशात हवेचे दाब 1005 ते 1008 दरम्यान आहेत. देशातील दाब कमी झाले की वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात. अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे. काही दिवसांतच त्याच्या हालचाली सॅटेलाइट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे.
यंदा एप्रिलमध्ये पारा 43 ते 44 अंशांवर गेल्याने समुद्रातील पाणी वेगाने तापले. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्याने देशाभोवती सर्व बाजूंनी बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे.
” यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण, सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे. तसेच हवेचा दाब, वार्याची दिशा अन् समुद्राचे तापमान, ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल, अशी शक्यता आहे.”
– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे