सिंधुदुर्ग : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात
या वर्षीचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.