Category Archives: सिंधुदुर्ग

Sawantwadi | कुणकेरीचा प्रसिद्ध हुडोत्सव शनिवारी ३० मार्चला

   Follow us on        
सावंतवाडी, दि . २६: कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव शनिवारी दिनांक ३० रोजी साजरा करण्यात येणार आहे.  शुक्रवार दिनांक २९ पासूनच या उत्सवाला सुरुवात होणार आहे.
शुक्रवारी (ता. २९) दुपारी २ वाजता गाव रोंबाट सुटणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता हुड्याजवळ सामुदायिक नारळ फोडण्यात येणार आहेत. रात्री ९ वाजता घुमट वादनासह हुडा आणि होळीवर धूळ मारण्यात येणार आहे. रात्री १० वाजता गाव रोंबाट आणि रात्री ११ वाजता हुडा आणि होळीवर पेटत्या शेणी फेकून ढोलताश्यासह भाभीचे रोंबाट आणून नंतर कवळे व पेटत्या मशाली घेऊन हुडा आणि होळीभोवती फिरण्याचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवारी (ता. ३०) हुडोत्सवाच्या मुख्य दिवशी सकाळपासून श्री भावई देवीच्या निवासस्थानी तसेच मंदिरात देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटणार आहे. याचवेळी पळसदळा येथे आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट होणार आहे. त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिराकडे येणार आहेत. शनिवारी (ता.३०) सायंकाळी ४ वाजता हुड्याजवळ घोडे मोडणी व लुटूपुटूचा खेळ होणार आहे. सायंकाळी ५ वाजता हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता होणार आहे. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटी, गावपंच आणि कुणकेरी ग्रामस्थांनी केले आहे.

“कोकण रेल्वे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बा……” सोशल मीडियावरील ती पोस्ट होत आहे तुफान व्हायरल

   Follow us on        

सावंतवाडी:सध्याच्या सोशल नेटवर्किंग युगात जनजागृती करण्यासाठी किंवा आपला आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा (सोशल मीडिया) वापर करून अपेक्षित परिणाम मिळवता येतात. अगदी जवळचे कोकणातील उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर फेसबूक या लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईटवर बनविण्यात आलेले Sawantwadi Railway Station – Terminus हे पेज.

सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि कोकण रेल्वे संबधीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, जनजागृती करून समस्यां सोडविण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्यात यावा या हेतूने या पेजची निर्मिती करण्यात आली. कोकण रेल्वे अभ्यासक सागर तळवडेकर यांनी हे पेज बनवले आहे. या पेज द्वारे त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते मिहीर मठकर, विहंग गोठोस्कर, भूषण बांदिवडेकर,तेजस पोयेकर ईत्यादींनी पोस्ट, लाईव्ह च्या माध्यमातून वेळोवेळी अनेक कोकण रेल्वे संबधी अनेक समस्या येथे मांडून जनजागृती केली आहे.

दोन दिवसांपूर्वी या पेजवर या कार्यकर्त्यांनी फलक मोहीम राबवून काही फोटो पोस्ट केले होते. ही पोस्ट तुफान व्हायरल होत असून तिच्यावर दृश्ये views, लाईक आणि कमेंटचा अक्षरशः पाऊस पडत आहे. “कोकण रेल्वे आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची” अशा आशयाची फलक मोहीम ”कोकणवाचवा” आणि ”SaveKokanRailway” या hashtag सहित कार्यकर्त्यांनी राबवून ते फोटो या पेज वर पोस्ट केले होते.

आम्हाला अजून पाठिंबा दर्शविण्यासाठी आमच्या ह्या चळवळीत सामील व्हा.या पेज ला फॉलो करून आमच्या सोबत जोडले जा ही तुम्हा सर्वांना विनंती. आवाहन या पोस्ट मध्ये करण्यात आले आहे

 

#Save Konkan Railway..
#Merge Konkan Railway With Indian Railways.
#Sawantwadi Terminus

@followers

Posted by Sawantwadi Railway Station-Terminus on Friday 22 March 2024

 

पर्यटकांना खुशखबर! सावंतवाडी येथील जंगल सफारी ३१ मार्च पर्यंत मोफत

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २३ मार्च : शहराच्या पर्यटन वाढीसाठी नरेंद्र डोंगरावर सुरू केलेली जंगल सफारी दिनांक ३१ मार्च पर्यंत मोफत करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

या सफारीच्या उद्घाटन प्रसंगी पर्यटकांना ही सेवा दिनांक ३१ मार्चपर्यंत मोफत देण्यात येईल असे दीपक केसरकर यांनी जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी शुल्क आकारण्यात येत होते. याबाबत परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही सफारी आता मोफत सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सुभेदार यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आली आहे.

आशिष सुभेदार यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री केसरकर यांनी एका कार्यक्रमात ही सफर मोफत देणार असल्याचे जाहीर केले होते; परंतु त्या ठिकाणी वन विभागाकडून लहान मुलांसाठी ५० रुपये तर मोठ्यांसाठी १०० रुपये असा दर आकारण्यात आला होता. त्यानंतर ४ दिवस पैसे घेण्यात आले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सुभेदार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याची दखल केसरकर यांच्याकडून घेण्यात आली असून, ही सफारी मोफत देण्यात यावी, अशा सूचना त्यांच्याकडून वन विभाग प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मोफत सफर सुरू केली असून, या सफारीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे

नारायण राणे की किरण सामंत? सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता

   Follow us on        

Loksabha Election 2024|लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार अजून जाहीर करण्यात आला नसून हा विषय महायुतीसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरणभैय्या सामंत ही दोन नाव प्रामुख्याने या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत. आज भाजपची महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या जागेसाठी दुसरी यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे आजतरी या ही उत्सुकता संपणार अशी आशा निर्माण झाली आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जनसंपर्क मोठा आहे. सर्वपक्षीय असलेले राणे यांचे संबंध, राणे यांची काहीशी आक्रमक शैली, तसेच राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले निलेश राणे याच मतदारसंघात यापूर्वी खासदार राहिले आहेत. त्यांचाही संपर्क आजवर या मतदारसंघात कायम राहिला आहे. या नारायण राणे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.

शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू असलेले किरण भैय्या सावंत हे शासनाच्या रत्न सिंधू योजनेचे सदस्य आहेत. त्यांनी गेले काही महिने लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी संपर्क सुरू केला आहे. इतकेच नाही तर उदय सामंत यांच्या यशस्वी कारकिर्दीमागे आणि उदय सामंत यांच्या प्रत्येक निवडणुकीत किरणभैय्या सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ही दोन वेळा भेट घेत किरण सामंत यांनी आशीर्वाद घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नारायण राणे यांच्या ऐवजी किरणभैय्या सामंत यांना मिळू शकते.

दिपक केसरकर यांचे विधान चर्चेत.. 

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी आंगणेवाडी यात्रेच्या दरम्यान माध्यमांजवळ बोलताना मोठे वक्तव्य केलं होतं. महायुती जेव्हा मजबूत आहे त्यावेळेला कोण कोणाच्या चिन्हावर लढलं याला फार महत्त्व नसतं, कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ज्या वेळेला पालघरची सीट शिवसेनेला दिली त्यावेळेला भाजपने आपला उमेदवार सुद्धा दिला होता, त्यामुळे जिथे जे चिन्ह चालतं आणि निवडून येण्याची शक्यता अधिक असते तिथे आपला उमेदवार द्यायला कोणताच कमीपणा नसतो, नाहीतर मग युती कशाला म्हणायची? असं मोठे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यामुळे किरणभैय्या सामंत यांना लोकसभेची रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळाली, तरी ते भाजपच्या कमळ चिन्हावरही लढू शकतात, असे संकेत दीपक केसरकर यांनी दिल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

 

 

 

 

नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसवेला कोकणातूनही विरोध

महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले जात असल्याचा वनशक्ती संस्थेचा आरोप. 
   Follow us on        
सावंतवाडी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांचा विरोध होत आहे.  या महामार्गामुळे येथील अल्पभूधारक भमिहीन होतील तसेच महामार्ग झाल्यास पुराचा धोका वाढेल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. म्हणून तेथील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. आता तर कोकणातही या महामार्गास विरोध होण्यास सुरवात झाली आहे. 
या महामार्गाची गरज नसताना हा महामार्ग कोकणावर लादला जात आहे. हा महामार्ग ज्या भागातून जाणार त्या भागातील निसर्गाला मोठी हानी पोचणार आहे. त्यामुळे आम्ही विरोध करणार आहोत असे येथील वनशक्ती संस्थेने जाहीर केले आहे  
सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील गावातून हा मार्ग जात असल्याने या दोन्ही तालुक्यांसाठी हा महामार्ग विनाशकारी ठरणार आहे. त्यामुळे गरज नसलेल्या या महामार्गाविरोधात न्यायालयात आव्हान देणार आहे. या महामार्गामुळे पन्नास टक्के वन्यजीव विस्थापित होणार असून धन दांडग्यांच्या घशात खाजगी जमिनी घालण्यासाठी या विनाशकारी प्रकल्पचे प्लॅनिंग केले गेले आहे. त्यामुळे कोकणाला गुलामगिरीमध्ये आणायचं का? हा विचार करून येथील जनतेने याला विरोध केला पाहिजे, असे वनशक्ती संस्थेच्या स्टॅलिन दयानंद पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सिंधुदुर्ग विमानतळावर “फ्लाय-९१” विमान कंपनीची सेवा आजपासून सुरु; पहिले प्रवासी विमान बंगुळुरूला रवाना

   Follow us on        
सिंधुदुर्ग, दि. १८ मार्च :नुकतेच विमान वाहतूक क्षेत्रात प्रवेश केलेल्या फ्लाय-91 विमान कंपनीने आपली सेवा सिंधुदुर्ग विमानतळावर आजपासून सुरु केली आहे. सिंधुदुर्ग ते बंगळुरू अशी ही विमानसेवा असून ७५ बैठक क्षमता असलेले पहिले विमान आज दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी बंगुळुरु साठी रवाना करण्यात आले आहे. या नवीन सेवेचे उद्दघाटन माजी सभापती निलेश सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्लाय ९१ कंपनीचे व्यवस्थापक मनोज चाको,आशुतोष चिटणीस, आय. आर. बि. कंपनीचे कुलदीपसिंग, परुळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर इत्यादी उपस्थित होते.
“सिंधुदुर्ग ते बंगुळुरु प्रवास करा फक्त १९९१ रुपयांत भारत ब्रॉडबँड या अंतर्गत कनेक्ट बंगुळुरु, गोवा, हैद्राबाद, सिंधुदुर्ग” अशी टॅगलाईन या कंपनीने केली आहे. या कंपनीने याच महिन्यात गोव्याच्या मोपा विमानतळावर सेवा चालू केली आहे. आता सिंधुदुर्ग विमानतळावर सेवा सुरु केल्याने तिच्या रूपाने सिंधुदुर्ग विमानसेवेबद्दल एक आशा निर्माण झाली आहे.
 फ्लाय-91 ही किंगफिशर एअरलाइन्सचे माजी सीईओ मनोज चाको यांनी सुरू केलेली नवीन एअरलाइन आहे. या विमान कंपनीला मागच्या वर्षी एप्रिलमध्येच सरकारकडून उड्डाणाची परवानगी मिळाली होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) प्राप्त केल्यानंतर, फ्लाय-91 एअर ऑपरेटर परमिट (AOP) मिळविण्याचा प्रयत्न करत होती, जे त्यांना आता मिळाले आहे. अहवालानुसार न्यू गोवा विमानतळ हे कंपनीचे बेस सेंटर आहे आणि गोवा हे कंपनीचे मुख्यालय आहे.

Video | रूळ ओलांडण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी; रेल्वे प्रशासन दुर्घटनेच्या प्रतीक्षेत?

   Follow us on        
Absence of FOB :कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी रेल्वे स्थानकावर पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पूल नसल्याने दोन प्लॅटफॉर्म च्या मधील रुळावरून जीव मुठीत पलीकडे जावे लागत आहे. खासकरून वरिष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती आणि लहानमुले आणि स्त्रियांना रेल्वे रूळ ओलांडताना मोठी पराकाष्टा करावी लागत आहे. सध्याच्या परिस्थितीवरून येथे मोठा अपघात घडण्याची दाट शक्यताही वर्तविली जात आहे. मात्र येथे प्रवासी संख्या आणि चांगले उत्पन्न मिळत असूनही तसेच अनेक वर्ष मागणी करूनही येथे पादचारी मंजूर होत नसल्याने येथे अपघात घडल्यावरच प्रशासनाचे डोळे उघणार का असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
सध्या वैभववाडी मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस आणि दिवा सावंतवाडी एक्सप्रेस  स्थानकावर सध्या ४ नियमित गाड्या थांबा घेतात. तसेच सणावारीआणि हंगामात चालविण्यात येणाऱ्या  जवळपास सर्वच गाडयांना येथे थांबा देण्यात येतो. या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी उत्पन्नाच्या बाबतीत वैभववाडी स्थानक रत्नागिरी विभागातून सातव्या स्थानावर तर संपूर्ण कोकण रेल्वेच्या स्थानकांचा विचार करता ७२ स्थानकामध्ये १४ व्या स्थानावर आहे. हे वास्तव असूनही या स्थानकावर एक पादचारी पूल का मंजूर होत नाही हा पण एक मोठं प्रश्च म्हणावा लागेल

Petroglyphs | देवगड तालुक्यात सापडली मानवाकृती “मामा भाचे” कातळशिल्पे

   Follow us on        
देवगड: देवगड तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली आहेत. येथील देवगड इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने  त्याची पाहणी करण्यात आली. सापडलेल्या कातळचित्राच्या परिसराची जागा स्वच्छ करून चित्र खुले करण्यात आले. या परिसरात आणखी काही कातळचित्रे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली.
कोकण इतिहास परिषद व देवगड इतिहास संशोधन मंडळ सातत्याने गेली काही वर्षे कातळचित्र शोधमोहीम राबवत आहे. याच मोहिमेतंर्गत तालुक्यातील मुणगे आडबंदर येथील सडा भागात दोन मानवाकृती कातळचित्रे सापडली. याची माहिती मिळताच प्राच्यविद्या अभ्यासक रणजित हिर्लेकर व अजित टाककर यांनी या कातळी चित्रांचा शोध घेतला. त्यावेळी तेथे पुसटशा मानवाकृती रेषा दिसत होत्या.
या दोन उलट सुलट साडेपाच फूट उंचीच्या मानवाकृती आहेत. उत्तर-दक्षिण अशी इथे जर मध्य रेषा काढली तर यातील एक आकृती पूर्वेकडे पाय सोडून व दुसरी आकृती पश्चिमेकडे पाय सोडून आहे. दोन्ही आकृत्यांची डोकी जवळ जवळ काढलेली नसावीत असे दिसते. डोक्याच्या जागी फक्त एक एक खळगे कोरलेले दिसते. या कातळचित्राच्या रेषा अतिशय सफाईने काढलेल्या दिसतात. खांदे, हात, कंबर, पायाच्या पोटऱ्या दर्शविणाऱ्या बाह्यरेषा सराईतपणे कोरलेल्या दिसतात. अन्यत्र आढळणाऱ्या मानवाकृती इतक्या सफाईने कोरलेल्या दिसत नाहीत.
कातळचित्राचे “मामा भाचे” नामकरण  
येथील काही ग्रामस्थ या कातळचित्रांना “मामा भाचे” असे संबोधतात. या मागे एक ऐकिव कथा पण आहे.  एके काळी मामा आणि भाचा येथे शिकारीला आले होते.  हे दोघे कातळावर शिकारीसाठी फिरत असताना त्यांना शिकार न मिळाल्यामुळे येथे थकून बसले होते. इतक्यात एक कुठला तरी जंगली प्राणी या दोघांच्या मधून पळून जाताना त्यांना दिसला. दोघांनी तात्काळ त्या प्राण्याच्या दिशेने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या. पण तो प्राणी शिफाईने पळून गेला व बंदुकीच्या गोळ्या लागून दोन्ही मामा भाचे ठार झाले. या मानवाकृतीच्या डोक्याच्या जागी जे दोन खळगे दिसतात त्या त्यांना लागलेला गोळ्या आहेत असे येथील गाववाले समजतात. (या कथेस कोकणाई दुजोरा देत नाही. फक्त वाचकांच्या माहितीसाठी हे येथे लहिण्यात आले आहे.)

दोडामार्ग | तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन

   Follow us on        

सिंधुदुर्ग :दोडामार्ग तालुक्यातील तळकट-खडपडे-कुभंवडे रस्त्यावर शनिवारी सकाळी नागरिकांना वाघाचे दर्शन झाले या भागात पूर्वीपासून वाघाचे अस्तित्व आहे . दोडामार्ग तालुक्याचे जैवविविधतेच्या दृष्टीने असलेले महत्त्व यापूर्वी देखील अधोरेखित झाले आहे.

दोडामार्ग तालुक्याला सावंतवाडी तालुक्याशी जोडण्यासाठी तळकट येथून चौकुल येथे जाणारा कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याला लागून राखीव जंगलाचे काही क्षेत्र आहे. रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना वन्यजीवांचे दर्शन होत असते. शनिवारी सकाळी या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. त्यांनी लागलीच या वाघाचे छायाचित्र आणि व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपले. वन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छायाचित्रित झालेल्या वाघाचे लिंग हे मादी असून पूर्वीपासून या मादीचा वावर या परिसरात आहे.

तळकट पंचक्रोशीत समृद्ध जंगल आहे; मात्र या भागात खनिज प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे मायनिंग लॉबी प्रयत्न करत आहे. पश्‍चिम घाट अभ्यास समितीचे अध्यक्ष माधव गाडगीळ यांनी या भागाचा दौरा करून आपल्या अहवालात हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असून त्याच्या संवर्धनासाठी उपाय योजण्याची शिफारस केली होती; मात्र नंतर आलेल्या कस्तुरीरंगन समितीने हा अख्खा दोडामार्ग तालुकाच पर्यावरण निर्बंध अर्थात इकोसेन्सिटीव्हमधून वगळला होता.

Konkan Tourism | सावंतवाडीत आजपासून जंगल सफारी सेवा सुरु; वेळापत्रक आणि शुल्क येथे जाणून घ्या

   Follow us on        
सावंतवाडी, दि. १६ मार्च: सावंतवाडी शहराचे वैभव असणाऱ्या व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या नरेंद्र डोंगरावर पर्यटकांना उद्यापासून नरेंद्र वन उद्यान निसर्ग पर्यटन सफारी वाहन, सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्गमाहिती केंद्र अशा सुविधा अनुभवता येणार आहेत. सावंतवाडी वन विभागांतर्गत येणाऱ्या नरेंद्र वन उद्यान येथे सिंधुरत्न योजनेतून पर्यटनवाढीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध निसर्गपर्यटन सुविधांचा अनुभव घेण्यासाठी सर्व सावंतवाडीकरांना आवाहन करण्यात येत आहे.
पर्यटकांना मोती तलावा शेजारी असलेल्या जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र वन उद्यानापर्यंत जाण्यासाठी सफारी वाहनाने प्रवास करता येईल. नरेंद्र वन उद्यानामध्ये पोहोचल्यावर तिथे असलेला सावंतवाडी दर्शन मनोरा, निसर्ग माहिती केंद्र हे देखील पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे.
सफारीचा मार्ग
येणार्‍या पर्यटकांना सावंतवाडी भोसले उद्यान ते नरेंद्र डोगर असे फिरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्या ठिकाणी जाताना सावंतवाडीच्या मोती तलाव तसेच राजवाडा आदींची माहिती देवून शहराला वळसा घालून ही सफर थेट सालईवाडा गणपती मंदिर हॉलकडुन नरेंद्र डोंगरावर नेण्यात येणार आहे. त्या ठिकाणी जाताना सर्व झाडांची स्थानिक स्तरावर आढणारे प्राणी, पक्षी, बुरशी आदींची माहिती देण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्या ठिकाणी जावून निसर्ग माहिती केंद्रांत सिंधुदुर्गात आणि सह्याद्री पट्ट्यात आढळून येणार्‍या प्राणी, पक्षी व फुले, फळे आदींची माहिती देण्यात येणार आहे.
वेळापत्रक 
जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान ते नरेंद्र डोंगर प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेले सफारी वाहन प्रत्येक 2 तासाच्या अंतराने सकाळी 8 वाजता, 10 वाजता, 12 वाजता, दुपारी 2 वाजता, सायंकाळी 4 वाजता व शेवटची फेरी सायंकाळी 6 वाजता या वेळापत्रकानुसार सोडले जाईल.
शुल्क 
या नरेंद्र डोंगर सफारीसाठी भोसले उद्यान ते नरेंद्र डोंगर सफारी चार्जेस, गाईड चार्जेस व निसर्ग माहिती केंद्र प्रवेश फी हे सर्व मिळून एकत्रितरित्या प्रौढांसाठी 100 रु. प्रति व्यक्ती तर 14 वर्षांखालील लहान मुलांसाठी 50 रु. शुल्क करण्यात येणार आहे. तरी सावंतवाडीकरांनी या निसर्ग पर्यटनाचा नक्की अनुभव घ्यावा असे सावंतवाडी वन विभागाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search