Category Archives: सिंधुदुर्ग

Sindhudurg | जिल्ह्यातील एकूण ३० दशावतार नाटक कंपन्यांना अनुदान मिळणार

कुडाळ:कोकणातील पारंपरिक दशवतार लोककलेस बळ मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण ३० दशावतार नाटक कंपन्यांना शासनातर्फे अनुदान देण्यात येणार आहे.  सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून कंपन्यांना साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. याबाबतची मागणी शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी योजनेचे अध्यक्ष तथा मंत्री दीपक केसरकर आणि संचालक किरण उर्फ भैय्या सामंत यांच्याकडे केली होती. त्यानुसार संबधितांना अनुदान प्राप्त होणार आहे. याबाबतची माहिती श्री. पावसकर यांनी दिली आहे. त्यांनी हे अनुदान देणार्‍या योजनेच्या सर्व पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्याकडे दशावतार मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र नाईक यांनी दशावतार मंडळांसाठी साहित्य आणि वाहन खरेदीसाठी अनुदान मिळण्यासंदर्भात मागणी केली होती. श्री. पावसकर यांनी तातडीने या मागणीचे पत्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर व सिंधुरत्न समिती संचालक किरण सामंत यांच्या जवळ केली.
मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा प्रशासनाला ही मागणी तातडीने पूर्ण करण्यास सांगितले. जिल्हा प्रशासनाने याबाबतची अंमलबजावणी करून तत्काळ प्रस्ताव तयार करून मंजुरी देखील मिळाली

सावंतवाडीतील कबूलायतदार गावकर जमिनीचा प्रलंबित प्रश्न सोडवणार – रविंद्र चव्हाण

मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गेळे गावातील कबूलायतदार गावकर जमीनीचा  प्रश्ना संदर्भात गेळे गावातील ग्रामस्थांनी आज मंत्रालयात सिंधुदुर्ग जिल्हय़ाचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांची भेट घेतली.
कबूलायतदार गावकर  प्रश्नावर नियमानुसार कार्यवाही करुन येत्या २ महिन्यात हा विषय सोडविण्याच्या सूचना या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असे मंत्रालयात झालेल्या या बैठकीत रविन्द्र चव्हाण यांनी ग्रामस्थांना सांगितले.
हा प्रश्न हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित होता. विशेष म्हणजे कबूलायतदार गावकर पद्धत ही सिंधुदुर्ग जिल्हा वगळता इतर कुठेही अस्तित्वात नाही. त्यामुळे हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. आपले सरकार हा प्रश्न नक्कीच मार्गी लावेल असा विश्वास गेळे गावातील ग्रामस्थांच्या मनात आहे. हा विषय सोडविण्याच्या दृष्टीने शासनाला सहकार्य करण्यासाठी हे ग्रामस्थ सकारात्मक आहेत. असे ते यावेळी म्हणालेत.
 या बैठकीला भाजपचे सावंतवाडी, आंबोलीचे तालुकाध्यक्ष संदिप गावडे यांच्यासह गेळे गावचे ग्रामस्थ प्रत्यक्ष तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे हे ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

Sindhudurg | देवगड तालुक्यातील पडेल गावात सापडली पुरातन काळातील मूर्ती

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पडेल येथील संकेश्वर मंदिराजवळ नळपाणी योजनेच्या खुदाई कामादरम्यान देवीची मूर्ती सापडली.जलजीवन मिशन योजने अंतर्गत पडेल गावामध्ये नळ पाणी योजनेचे काम सुरु असताना ही मुर्ती सापडली आहे. मूर्तीची उंची 3 फुटाच्या आसपास असून डाव्या हातात शंख,उजव्या हातात गदा आहे, उजव्या पायाशी गरुड असून डाव्या बाजूला लक्ष्मी देवी आहे.
पडेल शंकरेश्वर मंदिराजवळ पाईपलाईनच्या खोदाईचे काम चालू असतानाच एक देवीची मूर्ती खोदाईच्या दरम्यान सापडली आहे. ही देवीची मूर्ती सापडताच शंकरेश्वर मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीय, पडेल सरपंच भूषण पोकळे व गावातील ग्रामस्थांनी देवीची मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली. ही मूर्ती मंदिरामध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त बोडस कुटुंबीयांनी दिली आहे. शंकराचे मंदिर हे पडेल गावातील बोडस कुटुंबीयांचे आहे. हे मंदिर फार पुरातन काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shaktipeeth Expressway Updates | भूसंपादन करण्यासाठी सर्व तालुक्यांतून अधिकारी नियुक्त; राजपत्र जारी

Shaktipeeth Expressway Updates: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रीयेच्या हालचालींना सुरवात झाली आहे. हा महामार्ग जात असलेल्या तालुक्यांसाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे राजपत्र गुरुवारी जारी करण्यात आले आहे.
संपूर्ण महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस एकूण २७ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ५ विभागातून ५ विभागीय आयुक्तांची लवाद म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांतील भूसंपादनासाठी सावंतवाडीचे उप विभागाचे उपविभागीय अधिकारी काम पाहतील. ७ मार्च पासून त्यांची नियुक्ती झाल्याचे या राजपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. महामार्गाची संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन निश्चित करण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर असेल. शासनाने निर्धारित केलेल्या गुणांकनानुसार जमिनीची किंमत निश्चित केली जाईल. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लवाद म्हणून कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे.
राजपत्र Gazette वाचण्यासाठी खालील फाईल डाउनलोड करा
Gazette

नागपूर – पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग कोकणच्या पर्यटनास तारक की मारक?

सिंधुदुर्ग, संपादकीय : नुकतीच बहुचर्चित नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसची अधिसूचना महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ MSRTC तर्फे जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समजण्यात येणारा हा मार्ग राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. एकूण 11 जिल्ह्यातून जाणारा महामार्गामुळे नागपूर गोवा हे अंतर फक्त 8 तासांवर येणार आहे. महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांमधील तीन पूर्ण शक्तीपीठे म्हणून मान्यता असलेली माहुरची रेणुका माता, तुळजापूरची आई भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही जोडली जाणार आहेत. या महामार्गाने पर्यटन विकास होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
कोकणाला किती फायदा?
हा महामार्ग तळकोकणातून जाणार असल्याने त्याचा फायदा कोकणच्या पर्यटन वाढीस होणार असल्याचा दावाही केला जात आहे.  महामार्ग जेथून जातो त्या भागाचा विकास होतो ही गोष्ट साहजिक आहे. मात्र आखणी करताना एखाद्या भागाचा विचार करून त्याप्रमाणे आखणी केली असती तर त्या भागाचा किंवा प्रदेशाचा अधिक विकास होतो. मात्र या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नसल्याचे दिसत आहे.
गोव्याला तारक; कोकणास मारक 
हा मार्ग कोल्हापूरहून फणसवडे, घारपी आणि बांदामार्गे सरळ गोव्याच्या सीमेला मिळणार आहे.या मार्गात कोकणातील एकही पर्यटनस्थळ किंवा शहर लागत नाही आहे. आंबोली घाटातही बोगदा पाडून हा मार्ग पुढे येणार आहे. त्यामुळे आंबोली पर्यटनस्थळ सुद्धा पर्यटकांना या मार्गात भेटणार नाही. या कारणाने नागपूर किंवा पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक हा महामार्गामुळे सरळ गोव्यात जाणार आहे. त्यामुळे कोकण पेक्षा गोव्याच्या पर्यटनास या महामार्गाचा अधिक फायदा होणार आहे.  दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या कोल्हापूर आंबोली या मार्गाने गोव्याला जाणारा पर्यटक नवीन एक्सप्रेस मार्गाचा वापर करणार असल्याने त्याचा आंबोली आणि सावंतवाडी पर्यटन स्थळांवर विपरीत परिणाम होणार आहे.
आंबोली ते सावंतवाडी इंटरचेंज गरजेचा 
महामार्ग सावंतवाडी शहरातून किंवा शहराच्या अगदी जवळून गेला असता तर त्याचा खूप मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासाला झाला असता.  काही बाबींमुळे हे जर शक्य नसेल तर  या महामार्गाला एक इंटरचेंज सांगलीच्या धर्तीवर किंवा आता आजरावासिय मागत आहेत त्या धर्तीवर सावंतवाडी साठी द्यावा. जेणेकरून सिंधुदुर्ग चे पर्यटन बहरेल आणि सिंधुदुर्ग वासियांना आणि कोकण वासियांना धार्मिक पर्यटनासाठी अजून एक महामार्ग उपलब्ध होईल असे मत येथील स्थानिक  श्री. सागर तळवडेकर यांनी केली आहे.

६२५ नारळांच्या तोरणासह कोकण रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने विविध मागण्या आई भराडी देवीच्या चरणी अर्पण

गेली १७ वर्षे कोकण रेल्वे प्रवाशांसाठी तसेच इतर कोकणातील प्रश्नांसाठी लढणार्‍या कोकण रेल्वे प्रवासी संघाचे श्री. राजू कांबळे आणि ईतर कार्यकर्त्यांनी काल आई भराडी देवीच्या जत्रेला हजेरी लावून ६२५ नारळांचे तोरण देवीस अर्पण करून कोकणवासियांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्या पूर्ण होवो असे साकडे घातले.
मागण्यांचे फलक चर्चेत 
कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघातर्फे विविध मागण्या रेल्वे प्रशासनाकडे ठेवण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या प्रकारच्या ईतर मागण्याही संघटना करत आहे. काल जत्रेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात या मागणीचे फलक होते. हे फलक ईतर सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
कोणत्या मागण्या होत्या या फलकांवर? 
  • कोकणावरच नेहमी अन्याय का? कोकणवासियांना न्याय मिळणार का?
  • कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेतील विलीनीकरण करण्यात यावे.
  • “अमृत भारत योजनेत” कोकण रेल्वेवरील फायद्याचे आणि महत्त्वाचे स्थानकांत पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास समावेश करण्यात यावा.
  •  सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास रेल्वे  टर्मिनल्स चा दर्जा मिळण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार आदरणीय प्रा.  मधू दंडवते साहेबांचे, ‘प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनल्स’ असे नामांतरण करण्यात यावे.
  • कोकणातील महत्त्वाच्या सर्व स्थानकात पत्रा शेड, दिवा, पंखा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षालय, फलाटांची उंची, आसनव्यवस्था यांची पुरेपूर सोय करणे.
  •  महत्वांच्या रेल्वे स्थानकात प्रवाश्याच्या गर्दीचे प्रमाण पाहता बहूतेक जलद, मेल/एक्सप्रेस गाड्यांस वेळेच्या सोयीने थांबे देण्यात यावेत. (जनशताब्दि, वंदेभारत, तेजस आदि)
  • कोकणातील सर्व स्थानकांत प्रवासी  आरक्षण तिकिटांचा कोटा काही अंशी वाढविण्यात याव्यात.शारीरिक व्यंग असलेल्या तसेच वय वर्षे ७५ आणि अधिक असणाऱ्या महीला/पुरुष वर्ग प्रवाशांस रेल्वे तिकिटावर सूट देण्यात यावी.
  • मुंबई – चिपळूण इंटरसिटी एक्सप्रेस दैनंदिन गाडी सुरू करावी.
  • मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रकारचा प्रकल्प चिपळूण येथेही सुरू करण्यात यावा.
  • मुंबई  – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामा मार्गस्थ करण्यात यावे.

Sawantwadi: रुग्णालयात टाक्यांसाठी लागणारा धागा नाही; रात्री २ वाजता नातेवाईकांची पळापळ. रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर

सावंतवाडी: तळकोकणात सरकारी आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल गरजेच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात टाके घालण्या साठी लागणारा धागा उपलब्ध नसल्यामुळे जखमी रुग्णास जवळपास सव्वा तास रखडवल्याचा प्रकार येथे घडला. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांनी हा धागा आणण्यासाठी नातेवाईकांना पळापळ करण्यास लावली.
सविस्तर वृत्त असे की सावंतवाडी शहरात काल रात्री पावणे एक वाजता एक व्यक्ती गाडी रस्त्यावर स्लिप होवून अपघात झाला होता. व अपघात झालेल्या व्यक्तीला हाताला,पायाला डोक्याला चांगल्याच जखमा झाल्या होत्या. त्या नंतर अपघातातील जखमी रुग्णाला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णाला मोठ्या जखमा झाल्याने त्याला टाके पडले मात्र टाके घालण्या साठी लागणारा धागा रुग्णालयात उपलब्ध नाही तो बाहेरून घेवून या असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तो धागा शोधण्यासाठी नातेवाईक वेलनेस मध्ये गेले तेथे देखील सापडला नाही त्या नंतर त्यांनी जे जे मेडीकल गाठले तेथे देखील धागा सापडला नाही. अश्या अनेक ठिकाणी धाग्या साठी हेलपाट्या मारल्या नंतर शेवटी सर्वोदय नगर मध्ये धागा सापडला. व त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात आले व नंतर टाके घालण्यात आले. तोपर्यंत सव्वा तास रुग्ण रक्त बंबाळ परिस्थितीत तसाच रुग्णालयात होता. असा भयंकर अनुभव रुग्णाच्या नातेवाईकांना आला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील हा प्रकार आहे. एकीकडे येथे मल्टि स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्याच्या गोष्टी केल्या जात असताना असे प्रकार घडत असतील तर सामान्य नागरिकांनी शासनाकडून कोणती अपेक्षा करावी असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

वाशी : सिंधुदुर्गातून हापूसची आवक वाढली; पेटीला मिळत आहे ‘एवढा’ दर

वाशी : नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात साेमवारी काेकणातून पाच हजार  पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. यामध्ये सर्वाधिक (६० टक्के) हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर ४० टक्के रत्नागिरी  व रायगड जिल्ह्यातील आहेत. बाजारात दाखल झालेल्या आंबा पेटीला सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे.
 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्या तुलनेने रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे. सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा, असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत सध्या बाजारात कर्नाटक हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. हापूस ८० ते १७५ रुपये किलो, बदामी ६० ते १२० रुपये किलो, लालबाग १०० ते १४० रुपये किलो, तोतापुरी ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे गेल्या दोन आठवड्यांपासून हापूस विक्रीसाठी येत आहे. या आठवड्यापासून आवक वाढली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसचे प्रमाण ६० टक्के आहे. उर्वरित ४० टक्के आंबा रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील आहे. आंब्याच्या वर्गवारी, दर्जानुसार दर आकारण्यात येत आहेत.

Sindhudurg: आंबोली चौकुळ भागात ब्लॅक पॅन्थरचा वावर; फोटो कॅमेरात कैद

आंबोली दि.२५ फेब्रु; पश्चिम घाटात अजूनही  जैविविधता टिकून आहे. तळकोकणात आंबोली – चौकुळ ही गावे  जैवविविधतेतेसाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जंगलात अजूनही वन्यप्राण्यांच्या जाती अस्तित्वात आहेत आणि हे प्राणी कित्येकवेळा येथील ग्रामस्थांच्या आणि  पर्यटकांच्या नजरेस पडताना दिसतात. असेच काही पर्यटक येथे पर्यटनास आले असता  त्यांना येथे काळा बिबट्याचे Black Panther दर्शन झाले. यातील काही पर्यटकांनी धाडस करून या बिबट्याचे फोटोही काढलेत. फोटोस दुरून काढल्याने ते काहीसे अस्पष्ट आले आले तरी या भागात या काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे.
येथील जैवविविधतेला धोका
येथील ग्रामस्थांनी जरी येथील जैवविविधतेचे आणि निसर्गाचे रक्षण केले असले तरी बाहेरील लोकांकडून त्याला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे येणारे काही पर्यटक शिकारीच्या हेतूने येत आहेत. गेल्याच आठवड्यात सावंतवाडी शहर आणि बांद्यातून काही युवकांनी येथे येऊन साळींदर ची शिकार केली होती. ग्रामस्थांनी जागरुकपणा दाखवून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरी गोष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जमिनी गैरमार्गाने विकत घेऊन तेथे बांधकामे केली जात आहेत. त्याचा परिमाण येथील निसर्गाला, जैवविविधतेला आणि ग्रामस्थांना भोगावा लागत आहे. याविरोधात येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला असून आंदोलनाचा मार्ग अंगिकारला आहे.

खळबळजनक! सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १० बांग्लादेशी नागरिकांना अटक; जिल्हावासीयांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. २५ फेब्रु. | सिंधुदुर्ग जिह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  जिल्ह्यात दोन ठिकाणी वास्तव्य करुन राहणाऱ्या 10 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलीसांनी मोठी कारवाई केली असल्याची ही माहिती आहे. सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन हे बांगलादेशी नागरिक येथे तळ ठोकून होते.
अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय तसेच बांगलादेशी नागरीकांचा शोध घेऊन त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय, तसेच बांगलादेशी नागरीकांबाबत गोपनियरित्या माहिती घेवून, शोध घेणेसाठी विशेष मोहिम राबवून परकीय नागरीक मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.
यानुसार (दि.23) प्रभारी अधिकारी, बांदा व सावंतवाडी पोलीस ठाणे यांना त्यांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने अधिक शोध-चौकशी करता बांदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बळवंतनगर, बांदा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी, बांदा पोलीस ठाणे यांनी त्यांच्या स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या 6 नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच त्यांनी भारतात येण्यासाठी व वास्तव्यासाठीचे पारपत्र काढलेले नसून अनधिकृतपणे भारतात प्रवेश करुन बळवंतनगर, बांदा येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर 6 बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द बांदा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 (अ), 14(ब) व 14(क), पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आरोंदा, देऊळवाडी येथे सातेरी भद्रकाली मंदिराच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली, त्यानुसार प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांच्यां स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या 4 नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच ते भारत-बांगलादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आरोंदा, देऊळवाडी येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर 4 बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द सावंतवाडी पोलीस ठाण्यात ही विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 व पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चा नियम 3(अ), 6 (अ), परकिय नागरीक आदेश 1948 परि. 3(1), (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
जिल्हावासियांनी सतर्कता बाळगावी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या आजू-बाजूस कोणी बांगलादेशी नागरीक अवैधरित्या वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाल्यास, सदरबाबत स्थानिक पोलीस ठाणे, तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग यांना माहिती द्यावी असे आव्हान जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search